Wednesday, 28 October 2009

लडाखचा सफरनामा - खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !
दिनांक १६ ऑगस्ट. मोहिमेचा दिवस नववा. आजचे लक्ष्य होते १८३८० फूटावरील जगातील सर्वोच्च रस्ता - खर्दुंग-ला. खुद्द स्वतःला आणि स्वतःच्या बाईकला सुद्धा तिथपर्यंत नेण्यासाठी सर्वजण आसुसलेले होते. या मोहिमेमध्ये अनेक अनुभव आले, येत होते पण हा अनुभव सर्वोच्च असणार होता याची प्रत्येकाला खात्री होती. आपल्या देशामधील सर्वोच्च रस्त्यावरुन बाईक चालवणे हे प्रत्येक 'बायकर'ला वाटत असते. आज आमचे ते स्वप्न पूर्ण होणार होते. सकाळी नाश्ता करून लेह सोडले तेंव्हा पासून मनात एक वेगळीच बेधुंद लहर संचारली होती. खाली येउन लेह मार्केटमध्ये न शिरता मागच्या बाजूने थेट 'खर्दुंग-ला'च्या वाटेला लागलो. अवघ्या ३० मिनिट्स मध्ये 'गंग्लोक' या ठिकाणी १३२०० फुटावर पोचलो होतो. पण तिथे न थांबता आता थेट १८३८० फुटावर थांबायचे असे ठरले होते. मध्ये एके ठिकाणी दगडाचा बेडूक बनवलेला दिसला. रंग मारून डोळा वगैरे काढला होत त्याला. 'त्सोलटोक'मध्ये सुद्धा आम्हाला असाच बेडकासारखा दिसणारा एक मोठा प्रस्तर दिसला होता पण त्याला रंग वगैरे नव्हता फसलेला. हा भन्नाटच होता. आम्ही ह्याला 'खर्दुंग फ्रॉग' असे नाव ठेवले.वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता ... एक U टर्न आणि मग विरुद्ध दिशेला वळून पुन्हा वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता. जस-जसे वर चढत होतो तसे वाऱ्याचा जोर अधिक-अधिक जाणवत होता. वाऱ्याच्या विरुद्ध बाजूने बाईक फूल रेस केली तरी २०च्या स्पीडला सुद्धा चढत नव्हती तर U टर्न मारून वाऱ्याच्या दिशेने बाईक चढावर सुद्धा ४० च्या स्पीडला व्यवस्थित पुढे जात होती. गंग्लोक मागे टाकत ८ च्या सुमारास १७००० फूटावरील 'साऊथ पुल्लू' गाठले. या ठिकाणी खर्दुंग-लाची दक्षिणेकडची चेकपोस्ट आहे. इकडे कळले की उदया संपूर्ण खर्दुंग-ला कामानिमित्त बंद असणार आहे. आली का अजून एक पंचाइत. आता 'नुब्रा-हुंडर'ला जाउन रहायचा प्लान रद्द करावा लागणार होता. कारण आज राहिलो तर उदया पण रहावे लागणार म्हणजेच परतीच्या प्लानचे वाजले न तीन-तेरा. तेंव्हा न रहता आज संध्याकाळपर्यंत परत यायचा प्रयत्न करायचा असे नक्की केले. तशी तिकडे एंट्री केली आणि पुढे निघालो. ह्या पुढचा रस्ता मात्र कच्चा आहे. कुठे मध्येच रस्ता वरुन वाहणारे पाणी, तर कुठे कडयावरुन घरंगळत आलेले छोटे-मोठे दगड आणि रस्त्यावरील बारीक खडी. लेह पासून ३४ की.मी. च्या अंतरात छोटे-मोठे अडथळे पार करत आम्ही बरोबर ९ वाजता 'खर्दुंग-ला'च्या सर्वोच्च उंचीवर पोचलो. ११००० वरुन थेट १८३८० फुट.


१८३८० फुट... जगातील सर्वोच्च वाहतुकीचा रस्ता. काय वाटत असेल ते शब्दात नाही सांगता येत. संपूर्ण ट्रिपचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. थंडी जास्त नसली तरी जोराचा वारा असल्याने गार वाटू लागले होते. फारवेळ इकडे थांबणे शक्य नसल्याने ते क्षण मनात साठवून घेतल्यावर आम्ही सर्वांनी तिथे काही फोटो काढले. सोबत नेलेला तिरंगा तिकडे फडकवला. हा माझा आणि आशीष दादाचा तिकडे घेतलेला एक फोटो. आमच्यापैकी कोणालाच इकडे श्वास घ्यायचा कसलाच त्रास झाला नाही. अर्थात मनात तशी भीती आधीपासून ठेवून आल्यास तसा त्रास होऊ शकतो. तेंव्हा इकडे यायचे तर मानसिक दृष्टया कणखर होउनच.
अधिक वेळ न दवडता पुढे निघालो आणि १८ की.मी. खाली उतरत उत्तरेकडच्या १६००० फूटावरील 'नॉर्थ पुल्लू' चेकपोस्ट वर पोचलो. तिकडच्या जवानांनी सुद्धा 'आज परत या नाहीतर परवा' असेच सांगीतले. ११ वाजत आले होते आणि अजून बरेच अंतर पुढे जायचे होते. मी-शमिका सुसाट वेगाने सर्वात पुढे निघालो होतो. 'नॉर्थ पुल्लू'नंतर खर्दुंग गाव लागले. तिकडे सुद्धा एक छोटेसे गेस्टहाउस आहे. म्हटले चला अगदीच अडकलोच तर इकडे सोय होऊ शकेल रहायची. खर्दुंग मागे टाकत मी-शमिका पुढे जात होतो पण मागे कोणीच येताना दिसत नव्हते. अखेर बराच वेळाने १२ च्या सुमारास मी एके ठिकाणी थांबलो. दूर-दूर पर्यंत रस्तावर बाईक्स दिसत नव्हत्या. मागुन बाकी सर्व येईपर्यंत मी ब्लॉगसाठी नोट्स काढत बसलो तर शमिका आसपासचे फोटो घेत होती. त्याचवेळी तिने घेतलेला माझा हा फोटो. एक भारीच गंमत आहे ह्या फोटोमध्ये. कळते आहे का ते बघा. मी नोट्स काढत असतानाच आर्मीचा एक ट्रकसमोर येउन थांबला. त्यातल्या जवानाने मला विचारले, 'कुठून आलात? मुंबईहून?' मी म्हटले 'होय'. कोल्हापुरचा होता तो जवान. त्याच्याबरोबर ५ एक मिं. गप्पा मारत होतो तोच मागुन बाकी सर्वजण दिसायला लागले. कोणीतरी आपल्या गावचे भेटले ह्या आनंदात तो पुढे निघून गेला. मला सुद्धा खुप बरे वाटते त्याला भेटून.

सर्व आल्यावर आम्ही ठरवू लागलो. १२ वाजले होते आणि आता निर्णायक वेळ आली होती. काय करायचे? अजून किती पुढे जायचे? हुंडरला पोचणे शक्य होते पण परत येताना उशीर झाला तर? की ईकडूनच परत फिरायचे? असे ठरले की एक वेळमर्यादा नक्की करून त्या वेळेला तिकडून परत फिरायचे. मग जिथे असू तिथून म्हणजे तिथूनच. आता कुठे थांबण्याचा प्रश्नच नव्हता. सुसाट वेगाने सर्वजण पुढे निघालो. अभि-मनाली सर्वात मागे होते. त्यात मनाली तिच्या कॅमेरामधून शूट करत होती. ही क्लिप बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या वळणा-वळणाच्या रस्त्यांवरुन बाईक चालवणे म्हणजे काय मजा असते... काय नशा असते ते... उजव्या हाताला सिंधू नदी सतत साथ देत होती. क्षणा-क्षणाला तिचे पात्र रुंद होत जात होते. आम्ही खाल्सर, डिस्किट अशी महत्वाचे गावे पार करत पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी 'सुमुर' फाटा लागला. या ठिकाणी एक रस्ता हा 'सियाचिन बेस'कडे म्हणजेच 'सुमुर'कडे जातो. या ठिकाणी प्रवेश करायला अजून वेगळी परवानगी लागते. आम्ही मात्र दुसऱ्या रस्त्याने 'हूंडर'कडे निघालो. १ वाजत आला होता आणि अजून सुद्धा हुंडर बऱ्यापैकी लांब होते. उजव्या हाताला सोबत करणाऱ्या सिंधू नदीने आता रौद्र रूप धारण केले होते. एका डाव्या वळणावर तिचे पात्र इतके मोठे झाले की बघून सुद्धा उरात धडकी भरेल. असे रौद्र विस्तीर्ण आणि घोंघावत वाहणारे पात्र मी आधी कधीच पाहिले नव्हते. दोन्ही बाजूला नजर जाइल तिथपर्यंत फ़क्त नदीचे पात्र. नजर अडत होती ती दोन्ही बाजूला असणाऱ्या पर्वत रांगांवर. निसर्गापुढे मनुष्य खरच किती खुजा आहे हे अश्यावेळी कळते. निसर्गत जावे ते ह्याच करीता. आपला असलेला-नसलेला सर्व अंहकार गळून नाही पडला तरच नवल.

रस्ता आता डावीकडे नदी पासून दूर-दूर जाऊ लागला आणि दोन्ही बाजूला दिसू लागले वैराण असे वाळवंट. त्या वाळवंटामधून आता आम्ही जात होतो. दोन्ही बाजूला वाळवंट आणि त्यामधून जाणारा बूमरॅगच्या आकाराचा रस्ता कस मस्त वाटता होता. बाईक चालवायला तर पर्वणीच. ह्या रस्ताला माझ्या 'होंडा युनिकोर्न'ने ह्या ट्रिपमधला सर्वात जास्त स्पीड गाठला. 115 kmph... इतका चांगला रस्ता तर आपल्याकडे सुद्धा नाही आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये BRO च्या 54 RCC ने हा रस्ता अतिशय उत्तम ठेवला आहे. नुब्रा-हुंडर ह्या संपूर्ण भागातल्या रस्त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आम्ही तो रस्ता पार करत हुंडरला पोचलो. सर्वात आधी मी तिकडे पोचतो न पोचतो तोच मला समोर एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते cafe 125 आणि खाली काय लिहिले होते ते फोटो मध्ये वाचा. आता हा असा बोर्ड दिसल्यावर पुढे काय झाल असेल ते सांगायला हवे का? मी तिकडेच गाडी बाजूला लवली आणि आत नेमकं काय-काय मिळतय ते विचारून आलो. इतक्यात मागून अमेय, अभिजित, आदित्य येताना दिसले. रस्त्याच्या मधोमध उभा राहून मी त्यांना बाईक्स बाजूला घ्यायला लावल्या. अर्थात सर्वांनाच भूका लागल्या होत्या. पण इकडे असे काही खायला मिळेल असे वाटते नव्हते आम्हाला. समोसा - जिलेबी पासून साधा आणि मसाला डोसा सुद्धा मिळत होता इकडे. आम्ही तर अक्षरशह: सुटलो होतो. यथेच्छ जेवलो आणि मग निघालो हुंडर मधील 'डबल हंप कॅमल' बघायला. सहारा मध्ये जसे डबल हंप कॅमल आहेत तसे येथे सुद्धा आहेत. येथे त्यावर बसून राइड्स घेता येतात. पण आम्हाला मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही. किमान तो बघावा आणि फोटो काढावे तर तिकडच्या लोकांनी ते ऊंट कुठेशी लांब झाडी मध्ये बसवून बांधून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे फोटो न काढताच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. राहता आले असते इकडे तर मजा आली असती पण ते काही आमच्या नशिबी नव्हते. दुपारी बरोबर ३:३० ला आम्ही तिकडून परतीच्या मार्गाला लागलो.आता मी, शमिका, पूनम गाड़ी मध्ये होतो. बायकर्स सुसाट वेगाने मध्येच पुढे जायचे तर मध्येच फोटो काढायला म्हणुन मागे रहायचे. मनालीने येताना सुद्धा एक मस्त क्लिप घेतली आहे ती बघा. पुन्हा तो दोन्ही बाजूला वाळवंट आणि त्यामधून जाणारा बूमरॅगच्या आकाराचा रस्ता लागला. तिकडून खर्दुंग गावात पोचलो तेंव्हा ४:३० वाजत आले होते. बायकर्स मागे राहिले होते म्हणुन एका दुकानात थांबून चहा-कॉफी मागवली. मागाहून बायकर्स आलेच. मग आमच्या बाइक्सना सुद्धा सोबत असलेले एक्स्ट्रा पेट्रोल प्यायला दिले. 'निघा.. निघा .. चला निघा.' मी बोंबा मारत होतो. ५:३० च्या आधी पुन्हा एकदा 'खर्दुंग-ला'चा टॉप गाठायचा होता. गाड़ी मधून निघालो तसे पूनमला लक्ष्यात आले की तिचा कैमेरा सापडत नाही आहे. तिला वाटते की राहिला त्या दुकानमध्येच. पण तो अमेय-कुलदीपने लपवून ठेवला होता. ते तिला समजायला तसा बराच वेळ गेला. दूसरीकडे दिपालीला तिचा कैमेरा कुठे आहे ते आठवत नव्हते. शोभितला दिला आहे की कुठे काय माहीत? सगळा गोंधळ. पण कशासाठी सुद्धा आम्ही थांबलो नाही. पास बंद झाला असता तर आमची बरोबर बोंब लागली असती. खर्दुंगच्या १४७३८ फुट उंचीवरून १८ की.मी चे अंतर वर चढत पुन्हा एकदा १८३८० फुटावर येत खर्दुंग-ला फत्ते केला. एका दिवसात २ वेळा. मला नाही वाटत असे फार कोणी केले असेल. ६ वाजता तिकडे कोणी-कोणी नव्हते. अगदी आर्मीचे जवान सुद्धा बाहेर नव्हते. वारा इतक्या सोसाट्याचा सुटला होता की काही क्षणात आम्हाला थंडी वाजायला लागली. तिकडे फार वेळ न थांबता आम्ही पुन्हा लेहच्या दिशेने उतरत पुढे निघालो. उमेश आता गाड़ीमध्ये होता तर आशिष बरोबर साधना होती. उतरताना आमच्या ट्रिपचा पाहिला अपघात झाला. उतरताना वेग कमीच असल्याने तसे विशेष काही लागले नाही पण पडले दोघे बाईकवरुन. तिघांना सुद्धा काहीच लागले नाही. म्हणजे आशिष, साधना आणि बाईकला सुद्धा. अर्थात हे आम्हाला खाली पोचलो तेंव्हा कळले.


गंग्लोक पार करत ७ वाजता पुन्हा एकदा लेह मध्ये पोचलो. खरंतरं सर्व खोल्या रिकाम्या केल्या होत्या आम्ही सकाळी तरी सुद्धा 'नबी'ने आमची रहायची सोय व्यवस्थित केली. पोचल्या नंतर उमेश सर्वांचे फोटो घेत होता. त्यात हा माझा ८ दिवस बाईक चालवल्या नंतरचा फोटो. मला स्वतःला खुप आवडला. मी टॅन झालो की शाल्मली मला 'करपेला टोस्ट' म्हणते. खाण्याशिवाय तिला काही दुसरे दिसते का. असो.. सर्व आवरून उद्याचा प्लान फायनल केला. उदया सकाळी लेह सोडायचे होते आणि परतीच्या मार्गाला लागायचे होते. इतक्या दिवसात मनात साठवलेले अनेक क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तिकडून निघूच नये असे वाटत होते पण ते काही शक्य नव्हते. उद्या अजून काय नविन अनुभव येणार आहेत ह्याचाच विचार करत रात्री पाठ टेकली. उदया जायचे होते 'त्सो-मोरिरी'च्या दर्शनाला.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - त्सो-मोरिरी - अवर्णनीय असे सृष्टिसौंदर्य ... !
.
.
.

Tuesday, 27 October 2009

लडाखचा सफरनामा - एक निवांत दिवस ... !

'एक निवांत दिवस' लिहिता-लिहिता मध्ये बरेच दिवस निवांतपणे गेले. कामावरून आल्यावर दिवाळीच्या सुट्टीमध्ये सलग निवांतपणे लिखाणाला मात्र वेळ देता आला नाही. त्यामुळे पुढच्या लिखाणाला खिळ बसली होती. त्याबद्दल वाचकांची दिलगिरी व्यक्त करून पुन्हा जोमाने सुरू करतोय उरलेला 'लडाखचा सफरनामा' ...


मागील भागावरुन पुढे सुरू...

सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की १५ ऑगस्टचा दिवस तसा मोकळाच होता. आजच्या दिवसात दुपारी शॉपिंग उरकून बघायच्या राहिलेल्या 'अलत्ची गोम्पा' आणि 'मॅग्नेटिक हिल' ह्या जागा बघायच्या होत्या. दुपारच्या जेवणापर्यंत शॉपिंग उरकायचे आणि लंच करून फिरायला निघायचे असे ठरले. आता सुरू झाली मार्केटमधली भटकंती. कूणी ह्या दुकानात शिरले तर कोणी त्या. कोणी बघतय शॉल तर कोणी लडाखी ड्रेस. सर्वजण मस्तपैकी खरेदीमध्ये गुंतले होते. साधना आणि उमेश आमच्या सर्वांचे खरेदी करतानाचे शूट्स घेत होते. मी माझी खरेदी उरकली आणि 'टी-शर्ट'वाला शोधत फिरत होतो. लडाखला एम्ब्रॉयडरी केलेले खुप छान छान टी-शर्ट मिळतात. मी खुप सारे बनवून घेतले तसे. शिवाय आम्ही सर्वांनी एक टिम टी-शर्ट बनवून घ्यायचे ठरवले. काळ्या रंगाच्या टी-शर्टवर 'जम्मू ते लेह' आणि 'लेह ते दिल्ली' असा नकाशा बनवून घेतला. ह्या संपूर्ण रस्तामध्ये जी-जी महत्वाची ठिकाणे आणि पासेस आम्हाला लागले ते उंचीसकट त्यावर शिवून घ्यायचे होते. कारागीर ईब्राहीम भाईला सर्व डिटेल्स दिले आणि १ दिवसात ऑर्डर पूर्ण करून ठेवायला सांगितली. हे सर्व होईपर्यंत सर्वजण खरेदी संपवून एका होटेलमध्ये घुसले होते. जेवाय-जेवाय (हा आपल्या 'पंकज'चा खादाडी शब्द) केले आणि भटकायला निघालो.दुपारी अलत्ची गोम्पासाठी (काही ठिकाणी 'अलची' असा देखील उल्लेख आहे.) खालत्सेच्या दिशेने निघालो. १२ तारखेला या रस्तावरुन आलो होतो ते क्षण अन क्षण आम्हाला आठवत होता. अभिजित-मनाली आज फॉर अ चेंज गाडीमध्ये बसले होते. बाकी आम्ही सर्वजण बाइक्स ७०-८० च्या स्पीडला टाकत एकदम फुल तू राम्पार्ट रो... :) ४ च्या आसपास डावीकडे अलत्ची गोम्पाचा बोर्ड दिसला. अमेय आणि कुलदिप फोटो काढत राहिल्या मुळे बरेच मागे पडले होते. आशिष त्यांच्यासाठी फाट्यावर थांबला होता. नाहीतर वळायचे कुठे ते कळले नसते ना त्यांना. मी आणि अमेय म्हात्रे हायवे सोडून डावीकडे ब्रिज पार करत सिंधूनदी पलिकडे गेलो आणि पुढे लगेच मॉडर्न व्हिलेज ऑफ़ अलत्ची लागले. असेच एक मॉडर्न व्हिलेज लेह सिटीबाहेर आर्मी बांधते आहे. नाव काय माहीत का... 'साबू व्हिलेज'... मला तो चाचा चौधरी मधला साबू आठवला एकदम. हा.. हा.. अलत्ची गावत पोचलो आणि १००० वर्षे जुने 'अलत्ची गोम्पा' बघायला गेलो. गोम्पाकडे जाताना आजूबाजूला सगळीकडे सफरचंद, पीच आणि जर्दाळूची झाडे होती. खुद्द गोम्पा मध्ये प्रवेश केल्या-केल्या समोरच एक जर्दाळूचे झाड़ होते आणि त्याला अश्शी खालपर्यंत जर्दाळू लागलेली होती. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. गोम्पा राहिले बाजुलाच आणि आम्ही तुटून पडतो त्या जर्दाळूच्या झाडावर. शमिकाने तर एकदम असा हल्लाबोल केल की काय विचारूच नका. हे तोड़.. ते काढ.. गाडीच्या हेलमेट मध्ये भरून घेतली इतकी जर्दाळू तोडली. गोम्पा बघत बघत खायला झाली असती ना...!!!अलत्ची गोम्पामध्ये फोटो काढायला बंदी आहे शिवाय प्रवेश करायला ३० रुपये प्रवेश फी आहे. रिनचेन झांग्पो (Rinchen Zangpo) याने १००० साली ह्या गोम्पाची स्थापना केली. बाहेरील ३ मजली बांधकाम पूर्णपणे लाकडाचे आहे. येथे एकुण ३ विहार आहेत. पहिल्या विहारात मातीच्या बनवलेला अत्यंत जुन्या ३ बुद्ध मुर्त्या येथे आहेत. २ मजली तरी नक्की असाव्यात. हा प्राचीन कलेचा वारसा जपला नाही तर लवकर त्या नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. पुढच्या विहारामध्ये सुद्धा काही जुन्या बुद्ध मुर्त्या आहेत पण येथे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भिंतीवर काढलेली निरनिराळ्या देवांची भित्तिचित्रे. ह्यामध्ये आम्हाला ३ ठिकाणी चक्क 'श्री गणेशाची प्रतिमा' आढळून आली. बाकी बरीच चित्रे आता पाण्यामुळे अस्पष्ट झाली आहेत. तिसऱ्या आणि सर्वात शेवटच्या विहारामध्ये सर्वात विलोभनीय आहे डाव्या भागात असलेली सहस्त्रहस्त असलेली भगवान बुद्ध यांची धातूची मूर्ती. या शिवाय उजव्या भागात भगवान् बुद्ध आणि त्यांचा परिवार यांच्या धातूच्या प्राचीन मुर्त्या आहेत. ह्या सर्व मुर्त्या अतिशय सुंदर असून त्यांची चांगली निगा राखली गेली आहे. त्यांचे दर्शन घेउन ५ वाजता  तिकडून निघालो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.परतीच्या मार्गावर सासपोल मध्ये रस्त्याच्या बाजूला असलेली सफरचंदाची झाडे पाहून मोह आवरला नाही. शेवटी बाईक रस्त्याच्या बाजूला लावली आणि चढलो बाजुच्या भिंतीवर. झाडाची एक डहाळी रस्त्यावर बाहेर आली होती त्यावरून सफ़रचंद तोडली. लहानपणी कुठे कोणाच्या बागेत असे आंबे नाहीतर चिकू तोडायचो त्याची आठवण आली एकदम. पुढे निघालो तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावांमधून लडाखी घरांचे दर्शन होत होते. कुठे माती-विटांची तर कुठे सीमेंटची घरे. पण काही वैशिष्ट्ये असलेली. मोठ्या-मोठ्या लाकडी खिडक्या आणि त्यावर नक्षिकाम असणारी घरे. घरांच्या छतावर चारही बाजूने मातीचे साचे करून त्यात छोटी झाडे लावलेली असतात. या शिवाय शुभचिन्हे म्हणुन छतावर बहुरंगी पताका ज्याला 'प्रेयर फ्लाग्स' असे म्हणतात त्या लावतात. छोटेसे पण टुमदार असे हे लडाखी घर.सफरचंद खाऊन निघालो ते थेट निम्मू पार करत 'मॅग्नेटिक हिल'ला पोचलो. इकडे रस्त्याच्या मधोमध एक चौकोन काढला आहे. त्यात गाडी उभी केली की मॅग्नेटिक इफेक्ट जाणवतो. या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट जास्त असल्याचे बरेच ऐकले होते. वेगाने जाणाऱ्या गाडीचा स्पिड सुद्धा कमी होतो, एक्सेलरेट केली तरी गाडी पळत नाही असे ऐकले होते. त्यामुळे सर्व प्रकार करून पाहिले. कुलदीपने तर चौकोनामध्ये स्वतः उभे राहून उड्या मारून पाहिल्या. मी म्हटले 'तुझ्या अंगात काय मेटल आहे का?' हाहा.. आदित्यला बाईकवर इफेक्ट जाणवत होता मात्र मला अजिबात जाणवला नाही. माझे वजन जास्त असेल बहुदा .. हाहा. म्हणुन मग मी बाईक रस्त्यावरुन खाली टाकली आणि अक्षरशह: त्या 'हिल' वरती जिथपर्यंत बाईक जाईल तिथपर्यंत नेली. चढवताना मज्जा आली पण जशी ती चढायची थांबली तशी फिरवताना मात्र लागली बरोबर. कशीबशी न पड़ता फिरवली आणि सुसाट वेगाने उतरायला लागलो. एकतर तिकडे रस्तावरुन उमेश शूट करत होताच. अर्ध तास तिकडेच नव-नवीन प्रयोग करत होतो आम्ही. जसा अंधार पडत आला तसे आम्ही तिकडून निघालो आणि लेह मधली आमची शेवटची संध्याकाळ एन्जॉय करत सिटीकडे निघालो. परतीच्या वाटेवर अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला बघायला मिळाला. डोंगर, सूर्यकिरणे आणि ढग यांचा सुंदर मिलाफ.

८ वाजता सर्वजण गेस्टहॉउस वर पोचल्यावर 'जेवायला कुठे जायचे' हा एक यक्ष प्रश्न होता. २ दिवस ड्रीमलैंड मध्ये जेवलो होतो तेंव्हा तिकडे नको जायला असे ठरले होते. मी आणि शमिने म्हटले तुम्ही सर्व फ्रेश व्हा, आम्ही जाउन मस्त जागा शोधतो. ड्रीमलैंडच्या अगदी टोकाला 'मोनालिसा' म्हणुन मस्त गार्डन रेस्तरंट सापडले. टेबल बुक केले आणि परत होटेल वर आलो. आज जेवणासोबत चिकन आणि वेज 'मोमोस' खाल्ले. दिसायला आपल्या उकडीच्या मोदकांसारखे असतात. जेवण आटपून ११ वाजता होटेल वर परत आलो. उदया सकाळी खर्दुन्ग-ला साठी लेह सोडायचे होते. सामानाची बांधाबांध केली आणि झोपी गेलो. आजच्या लेह मधल्या झेंडावंदना नंतर उदया झेंडा रोवायचा होता तो जगातल्या सर्वोच्च रस्त्यावर. तो क्षण अनुभवायला आम्ही सर्वच उत्सुक होतो. आता प्रतीक्षा होती ती उद्याच्या सुर्योदयाची.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !
.
.
.

Tuesday, 13 October 2009

लडाखचा सफरनामा - 'अमृता'च्या मनातला ... !

माझ्या लडाख टिममधल्या इतरांनी सुद्धा थोडक्यात का होईना पण त्यांचे अनुभव सुद्धा मांडावे म्हणुन मी सर्वांना 'काहीतरी लिहा' अशी विनंती केली होती. अमृताने मला विचारले 'ज्यांना यायचे होते पण यायला जमले नाही अश्यानी लिहिले तर?' मी म्हटले लिही की. तो ही एक चुकवलेला अनुभवच आहे. अमृताने थोडक्यात आणि अतिशय सुंदर शब्दात तिचे अनुभव शब्दबंध करून पाठवले आहेत. खरंतरं माझे लडाखवरील लिखाण पूर्ण झाल्यावर मी हे पब्लिश करणार होतो पण इतके सुंदर लिखाण सर्वांनीच वाचावे म्हणुन आज लगेचच पब्लिश करतोय.

"रोहनने लडाखला जायचे प्लान ठरवायला सुरूवात केली आणि तेव्हापासून जायचे वेध लागलेले. मी काही प्रदर्शनांमधून पाहिलेलं लडाखचं निसर्ग सौंदर्य स्वतः अनुभवायची तीव्र ईर्षा होती. हा मस्त चांस मिळणार म्हणून खुप आनंदात होते मी. पण काही आनंद किती क्षणभंगूर ठरतात नाही!!!! इकडे रोहनचा जायचा प्लान अलमोस्ट फायनल होत होता आणि माझे काम व ते दिवस हे गणित जमणं अशक्य होत गेलं. त्यात साधनाचं जायचं नक्की झालं आणि झाल्लं... माझ्या मनाने जायची पुन्हा उचल खाल्ली. काम संपवण्याचा आटोकात प्रयत्न केला, संपेल असे वाटूही लागले पण तेव्हा दुसर्‍याच प्रश्नाने डोके वर काढले. घरच्यांचा विरोध (जो की कधी नसतो) पण ह्या वेळेस बाईक्सवरून जाणे आणि तेही लडाखपर्यंत!!!! वरून तब्येत अतिशय 'स्ट्रॉंग' असल्याने त्या विरोधास अजूनच मजबूती आली आणि माझा ठराव नामंजूर करण्यात आला (आधीच घरच्यांच्या बर्‍याच गोष्टी न ऎकत असल्याने मी हा विरोध निमूट स्वीकारला)"

"रोहन व साधनाकडून तयारीचे अपडेट्स मिळतच होते. ते ऐकून पुन्हा अस्वस्थ व्हायला व्हायच पण जवळ-जवळ त्या सगळ्यांएवढीच माझीपण एक्साइटमेंट लेव्हल हाय होती. शिवाय ह्या माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींची ही अभूतपूर्व मोहीम व्यवस्थित पार पडावी ह्याची काळजी होतीच. फायनली तो दिवस ऊजाडला. त्यादिवशी सकाळीच फोनवरून सर्वांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. (श्याsss ….) आज आपणंही त्यांच्यात असतो ही खंत मनात तशीच होती!!!! दुसर्‍या दिवशी रोहन येणार होता आणि तो लडाखला जाण्याआधी आम्ही सगळे भेटणार होतो. ते पण कुठे तर ईएनटी स्पेशालिस्टकडे!!! रोहनचा कान यायच्या आधीपासून दुखत होता तेव्हा लडाखला जायच्या आधी तपासून गेलेले बरे म्हणून त्याची अपॉइट्मेंट असताना तिकडेच भेटू असे ठरले. ठरल्याप्रमाणे रात्री आम्ही सगळे भेटलो व प्रवासासाठी शुभेच्छ देऊन आम्ही थोड्याच वेळात निघालो. एक दिवसाने उशिरा तोही श्रीनगरला पोहोचला आणि मग सुरू झाला त्याचा “लडाखचा सफरनामा”!!!!"

"ह्या सफरीचे अपडेट्स आम्हांला रोहन व साधनाकडून मिळायचे. आज एवढ्या उंचीवर, अमूक-अमूक फुटांवर, ह्या लेकला, त्या ‘पास’ला... कोणाची तब्येत खराब....तर कोणाची बाईक...कोणाची बाईक पडली...तर कोणी बाईकवरून!!! असं बरंच काही. हे सगळं ऎकताना मज्जा यायची पण तेवढीच ह्या सगळ्यांची काळजी पण वाटायची. अधून मधून बाकींच्यासोबत देखील बोलणे व्हायचे. आपले जवळचे मित्रमैत्रीणी अश्या जोखमीच्या सफरीला गेलेले असले आणि आपण त्यांच्यासोबत नसू तर कशी अस्वथता येते याचा अनुभव न घेतलेलाच बरा!!! ह्या दिवसांतील प्रत्येक क्षण हे सगळे कुठे असतील?? कसे असतील?? काय करत असतील?? या विचारांचाच असायचा. जणुकाही लडाखचे क्षण मीही इकडून अनुभवत होते!!! कदाचित ते प्रत्यक्ष अनुभवायला आसुसलेल्या मनाची तशी समजूत तरी मी काढत होते."


"लडाखला जाता न आल्यामुळे तिकडे गेलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या फोनची वाट पहाणे व त्यांच्या शब्दांतून तिथला अनुभव घेणे एवढेच फक्त हातात होते आणि ते मी न चुकता करत होते. फोनबरोबरच अजून एका गोष्टीची आतुरतेने वाट बघणॆ चालू होते आणि ते म्हणजे साधनाचा 15 ऑगस्टचा आय.बी.एन. लोकमतवरील लाईव्ह कार्यक्रम!!! तिकडून कार्यक्रमाच्या जोरदार तयारीचे व धावपळीचे वर्णन आमच्यापर्यंत येत होते त्यामुळे उत्सुकता वाढतच होती. अखेर 15 तारखेला सकाळी बरोबर 8.30 ला (खरंतर त्याआधीच) टीव्हीसमोर ठाण मांडून बसले आणि सोबत घरच्यांनाही बसवलं. आपल्या मैत्रिणीचा कार्यक्रम पहाताना वाटणारा आनंद आणि उत्साह काही वेगळाच असतो नाही का???"

"कार्यक्रमात घेतलेले कश्मिरी विद्यार्थींचे इंटरव्हूज अक्षरश: भेदून टाकणारे होते. ओघवते निवेदन, सुंदर लोकेशन्स आणि व्हिडीयो शूट्स ह्यांनी कार्यक्रमाला चार चॉद लावले. भारतीय जवानांच्या शौर्य गाथा व शत्रूबरोबरच्या लढायांचे इतिहासातले रेफरंसेस यांची उत्कृष्ट गुंफण या कार्यक्रमातून घातली गेली होती. 15 ऑगस्टच्या दिवशी ते सर्व ऎकताना, पहाताना अभिमानाचे रोमांच उठले आणि नकळतच डोळ्यांतून घळाघळा पाणी ओघळू लागले. कार्यक्रम सुरू झाल्यापासून एक्साईट्मेंट लेव्हल वाढतच होती. सर्वांना तिकडे एंजॉय करताना पहाताना खूप बरे वाटत होते पण आपण तिथे नसल्याची जाणीव मनाला टोचून जात होती. ...आणि त्यात आई कार्यक्रम पहाता पहाता म्हणाली,”अरेरे, तुलापण पाठवायला हव होतं. तुलाही हे सगळं अनुभवायला मिळालं असतं”....... बस्सं!!!! तेवढंच पुरे होतं एवढ्या दिवसांपासूनचा थोपवलेला बांध मोकळा करायला. ते अश्रु नक्कि कश्यासाठी होते??? मला माझ्या ग्रुपसोबत लडाखला ज़ायला न मिळाले त्यासाठी की शूर जवानांनी दिलेल्या प्राणांच्या आहूतीसाठी की आजही आपली कश्मिरी युवा पिढी स्वातंत्र्याची भाषा करतेय त्यासाठी!!!!!! कदाचित ह्या सग़ळ्यासाठीच!!!!"


"एकंदरीतच ह्या सगळ्या दिवसांत मनात एका वेगळ्याच हूरहूरीने घर केले होते. उत्सुकतेचे व काहिश्या काळजीचे हे दिवस भराभर निघूनही गेले. आता वेध लागले होते ते ह्या सगळ्यांच्या परतीचे, सर्वांकडून ऎकावयास मिळणार्‍या त्यांच्या अद्वितीय अनुभवांचे, सोबत केलेल्या मौजमस्तीच्या किस्स्यांचे, लडाखचे अप्रतिम सौंदर्य साठवलेल्या फोटोंचे. आणि हो, या लडाखच्या ट्रीपवरील आय.बी.एन लोकमतवर होणार्‍या साधनाच्या कार्यक्रमाचे. (सध्या वेध {वेड} लागलेत ते “लडाखच्या सफरनामा” मधील नेक्स्ट पोस्ट कधी पब्लिश होतेय याचे) !!! तिथून् परतल्यावर रोहन आम्हांला भेटला तो ह्या सर्वांनी खास तयार करून घेतलेल्या ट्रीपचा पूर्ण रूट असलेल्या टी-शर्टमध्येच आणि मग त्यानंतर सुरू झाला सिलसिला लडाखच्या टी-शर्टसचा (जो की अजूनही चालूच आहे....ही ही ही) त्याच्याकडून काही काही अड्वेंचर्स, मजेचे, अडचणींचे आणि खाण्याचे चटपटीत किस्से ऐकायला मिळत होते. ला, पास, त्सो हे शब्द (अर्थात त्यांच्या अर्थासह) आम्ही शिकत होतो. ते ऎकताना जाम मज्जा यायची पण मनात कुठेतरी खोलवर आपण न गेल्याची टोचणी लागलेलीच होती (किंबहुना ती अजूनही आहेच) साधनाचा “आमची मोटरसायकल डायरी” हा कार्यक्रम पाहून ही टोचणी जरा जास्तच तीव्र झाली. तरीही आपल्या मित्रमैत्रिणींनी घेतलेल्या या अनुभवाबद्दल एक वेगळाच आनंद व अभिमानही वाटत होता. ह्या सगळ्यांनी बाईकवरून अनुभवलेले निसर्ग सौंदर्य, बाईक रायडींगची धम्माल, सैनिकांच्या भूमितले भारावून टाकणारे ते क्षण हे सगळं-सगळं ऎकताना आपण आयुष्यातली एक सुवर्णसंधी दवडली ही जाणीव क्षणोक्षणी होत होती... होत आहे आणि होत राहिल यात काही शंका नाही."


"रोहन 'लडाखच्या सफरनामा' या ब्लॉग सिरिजमधून त्या 15 दिवसांचा जिवंत अनुभव सगळ्यांसमोर मांडतोय. आपल्या लिखाणातून त्याने लडाखच्या सौंदर्याचे, तिथल्या लोकांचे, संस्कृतीचे, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अविरत झटणार्‍या सैनिकांच्या वीरश्रीचे, त्यासंबंधित अतिशय प्रेरक अश्या इतिहासाचे रंजक वर्णन केले आहे व त्यातून जे लडाखचे यथार्थ दर्शन घडवले आहे ते वाचून “मी लडाखला का गेले नाही???” यापेक्षा “मी नक्किच लडाखला जाईन” हा मनाचा ठाम निश्चय झालाय. यासाठी रोहनचे मनापासून शतशः आभार!!!! असाच लिहीत रहा... आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत..."

Thursday, 8 October 2009

लडाखचा सफरनामा - फुलांनी बहरलेले लडाख ... !

लेहमध्ये गेले ३ दिवस आम्ही ज्या गेस्ट हाउस मध्ये राहत होतो त्याचे नाव 'रेनबो' होते. इंद्रधनुश्यात जसे विविध रंग असतात ना तश्या विविध रंगांची फूले तिकडे चहुकडे पसरली होती. निळ्या, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या, अबोली, लाल आणि अश्या कितीतरी रंगांची तिकडे नुसती उढळण झाली होती. गेल्या ३ दिवसात उमेशने त्यांचे बरेच फोटो घेतले होते. सकाळी फिरायला निघताना असो नाहीतर रात्री दमून परत आल्यावर सुद्धा त्यांच्याकडे पाहिले की कसे एमदम मस्त फ्रेश वाटायचे.

आजच्या ह्या पोस्टमध्ये मी काही लिहिणार नाही आहे. खाली फोटो दिले आहेत ते बघा आणि तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटतय का ते सांगा... :).
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.
.

.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - एक निवांत दिवस ... !
.
.
.

लडाखचा सफरनामा - १५ ऑगस्ट ... 'लेह'मधील ... !


स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाने कालचा थकवा आणि शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. कालच्या दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री उशिराने झोपून देखील सर्वजण ७:३० वाजता निघायला हजर होते. हलकासा नाश्ता केला आणि पोलो ग्राउंडकडे निघालो. लेह मार्केटच्या थोड वरच्या बाजूला आहे हे पोलो ग्राउंड. फार मोठे नाही आहे पण ह्या सोहळ्यासाठी पुरेसे असे आहे. जम्मू-काश्मिरप्रमाणे इकडे परिस्थिति नसल्याने तशी फारशी सिक्युरिटी नव्हती. झेंडा वंदनासाठी विविध दलाचे, अनेक शाळा-कोलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रिय छात्र सेनेचे कडेट्स त्यांच्या बर्रेटवरच्या लाल हायकलमध्ये उठून दिसत होते. ह्या सर्वात 'महिला दले आणि छात्र सेनेच्या मुली' यांची संख्या लक्षणीय होती. नागरीकांची उपस्थिती सुद्धा खुप जास्त होती. मला खरच समाधान वाटले. श्रीनगर प्रमाणे इकडे वातावरण नाही. इकडे प्रत्येकाला लेह-लडाख हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे मनापासून वाटते.


आमच्या पैकी ज्यांच्याकडे SLR होते त्यांना जरा जवळून फोटो घेता यावेत म्हणुन नबी (गेस्टहाउसचे मालक) यांनी अमेय, उमेश आणि कुलदीप या तिघांना आत नेले. आम्ही बाकी सर्वजण जरा लांब उभे होतो. बरोबर ८:३० वाजता प्रमुख पाहूणे आले आणि त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. 'जन गण मन'चे सुर घुमु लागले. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ५२ से. आम्ही निश्चल उभे होतो. आम्हाला आज एक वेगळाच आनंद येत होता. नेहमीप्रमाणे घरी किंवा शाळा-कोलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा न करता आम्ही एका निराळ्याच ठिकाणी तो साजरा करत होतो. झेंडावंदन झाल्यावर सर्व दलांनी राष्ट्रध्वजासमोरून संचलन केले. मला माझ्या कोलेजचे दिवस आठवत होते. असा एक १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी गेला नाही जेंव्हा मी घरी बसलो असेन. प्रत्येकवेळी कोलेजमध्ये तयारी करण्यात, मार्चिंगची प्राक्टिस करण्यात एक उत्साह असायचा अंगात. कोलेज संपल्यावर कामाला लागल्यापासून २ वर्षे ते सर्व काही चुकत होते. त्यामुळेच बहुदा आज एक निराळे समाधान मला लाभले.


या ठिकाणी आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो तो गेल्यावर्षी द्रास - कारगील - लेह या मोहिमेवर आलेल्या 'सलाम सैनिक'च्या टीमचा. अनुजा, ममता, अमित असे माझे काही जवळचे मित्र-मैत्रिणीं गेल्या वर्षी खास सैनिकांना भेटायला लेह-लडाखच्या बाइक ट्रिपवर आले होते. १५ ऑगस्ट आणि त्याला जोडून आलेली रक्षाबंधन असा मोहिमेचा दुहेरी हेतु होता. ह्या मोहिमेत जास्तीत जास्त सैनिकांना भेटणे, त्यांना घरी बनवून आणलेला खाऊ देणे, काही पुस्तकांचे वाटप करणे, नागरिकांनी सैनिकांसाठी लिहिलेली पत्रे त्यांना देणे अशी काही मुख्य उद्दिष्टे होती. टिममधल्या अनुजा आणि ममता यांनी सैनिकांना बांधण्यासाठी खुप साऱ्या राख्या सुद्धा नेल्या होत्या. या मोहिमेमध्ये मला सहभागी होता न आल्याने मी बराच अपसेट होतो. मला स्वतःला जात न आल्याने मी सुद्धा एक पत्र लिहून पाठवले होते. ते पत्र येथे देत आहे. आजच्या स्वातंत्रदिनी माझ्या भावना ह्यापेक्षा काही वेगळ्या नव्हत्या.


सैनिकहो तुमच्यासाठी ... !
स्वातंत्रोत्तर काळात गेल्या ६० वर्षात जेंव्हा-जेंव्हा शत्रुंनी सीमेवर यूद्धे छेडली, तेंव्हा-तेंव्हा आपण मोठ्या तत्परतेने मात्रुभूमीच्या रक्षणार्थ धावून गेलात. वारा-वादळे, उन-पाऊस, हिमवर्षाव आणि जगातल्या सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितिमध्ये पाय घट्ट रोवून उभे राहिलात. १९४८ च्या डोमेल पराक्रमापासून ते कारगिल युद्धापर्यंत आणि आत्तापर्यंत सुरु असलेल्या दहशदवाद विरोधातील सैनिकी जिद्दीला आणि अतुलनिय पराक्रमाला आमचा मानाचा त्रिवार मुजरा.


राष्ट्रभावनेच्या उद्दात्त हेतूने प्रेरित होउन, वैयक्तिक प्रश्नांना बगल देउन आपण या भुमीचे आधारस्तंभ बनता, तेंव्हा कुठे आमच्यासारखे तरुण आपणास निवांतपणे हे पत्र लिहू शकतात. या देशात आजही जिजाऊँसारख्या माता आपल्या शिवबांना सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत व शिवछत्रपतींसारखे पुत्र निर्माण करत आहेत. आपल्या प्रत्येकात आज सुद्धा शिवछत्रपतींचा एक अंश आहे आणि म्हणूनच आपली राष्ट्रभावना प्रचंड उच्च आहे.


युद्धसदृश्य किंवा युद्ध परिस्थितिमध्ये अनेक दिवस अन्न-पाण्याशिवाय राहून, शत्रूला हुलकावण्या देत, अंगावर प्रचंड वजन घेऊनसुद्धा काटक व चपळ राहून, एका दमात प्रचंड अंतरे पार करीत आपण यशस्वी होता. अखेरच्या टप्यात शत्रूच्या नरडीचा घोट घेत देशाचा झेंडा मोठया अभिमानात पर्वत शिखरावर रोवता, तेंव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. आज शत्रू फक्त सीमेवरच नव्हे तर सर्वत्र आहे. त्यास शोधून परास्त करण्याचे कर्तव्य आमचे देखील आहे. आम्ही ते पार पाडू याची आपण खात्री बाळगावी.
सैनिक आणि आमच्यात दुवा म्हणून काम करणार्‍या 'सलाम सैनिक' च्या तरुण-तरुणींना सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा. कारण आज प्रत्येकजण सिमावर्तीभागात जाउन सैनिकांशी संपर्क साधू शकत नसला तरी अशा मोहिमांमुळे हे शक्य होत असते. माझ्या सैनिकांनो, इकडे प्रत्येकाला तुमची आठवण आहे. काळजी आहे. सर्वात मुख म्हणजे सार्थ अभिमान आहे. आपण या देशाचे खरे आधारस्तंभ आहात. आपणास मनापासून मनाचा मुजरा.


            भारत माता की जय ... !
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - फुलांनी बहरलेले लडाख ... !
.
.
.

Wednesday, 7 October 2009

लडाखचा सफरनामा - १५००० फूटावरील पेंगॉँग-त्सो ... !


९:३० वाजत आले होते. आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. ११ वाजायच्या आत 'शैतान नाला' काहीही झाला तरी पार करणे गरजेचे होते. चांग-ला वरुन निघालो आणि पलिकडच्या 'त्सोलटोक' पोस्टकडे उतरलो. काय एक-एक नाव आहेत. उच्चार करून लिहिताना किती वेळ लागतोय मला!!! आता पुढचे लक्ष्य होते ४० की.मी पुढे असणारे 'तांगत्से'. 'त्से' म्हणजे गाव हे कळलेच असेल तुम्हाला. आधी आपण असेच खालत्से पाहिले आहे नाही का!!! ८०-९० च्या वेगाने आता त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमच्या गाड्या भरधाव वेगाने दौड़त होत्या. उजव्या हाताला नदीचे पात्र, डाव्या हाताला मिनिटा-मिनिटाला रंग बदलणाऱ्या उंच डोंगरसरी आणि समोर दिसणारे निरभ्र मोकळे आकाश. क्षणाक्षणाला वाटायचे की येथेच थांबावे. थोडावेळ येथील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. पण नाही. शैतान नाला डोक्यात शैतानासारखा नाचत होता. तो गाठेपर्यंत आता कोठेही थांबणे शक्य नव्हते. १०:४५ च्या आसपास 'तांगत्से'ला पोचतो न पोचतो तोच मागुन अजून काही बाइक्सचे आवाज येऊ लागले. काल पेट्रोल पंपवर भेटलेला पुण्याचा ग्रुप होता. सर्व गाड्या MH-12. त्यातले अर्धे पुढे निघून गेले तर काही मागे होते. तांगत्से चेकपोस्टला एंट्री केली आणि भरधाव वेगाने शैतान नाल्याकडे सरकलो. चांग-ला नंतरच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटी' म्हणतात. येथे स्थित असणाऱ्या रेजिमेंटला 'चुशूल वॉर्रीअर्स' असे म्हणतात. सध्या येथे गढवाल रेजिमेंटची पोस्टिंग आहे. चांग-लापासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी चुशूल वॉर्रीअर्स कडे आहे.ज्यावेळी मी ह्या ठिकाणावरुन पास झालो तेंव्हा 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज दिसली. आणि माझ्या मनात लोकसत्ता मध्ये वाचलेली एक बातमी आठवली. जी जागा मला आयुष्यात एकदा तरी बघायची होती आज त्या ठिकाणी मी आलो होतो. ती बातमी.. तो लेख.. जसाच्या तसा इकडे देतो आहे.


'चुशूल' हे नाव भारताच्या युद्धविषयक इतिहासात सदैव अभिमानाने घेतले जाईल असे...


सियाचेनजवळ रजांगला सीमेवर तांगत्से नामक चौकी आहे. त्या चौकीच्या हद्दीतलं हे ठिकाण. १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं, तेव्हा मेजर सैतानसिंहांची ११८ जवानांची तुकडी तिथं होती. १८ नोव्हेंबरचा तो दिवस होता. चिनी सैन्याच्या तुकडय़ा तांगत्से चौकीवर कब्जा मिळवून रजांगलच्या सीमा सुरक्षा चौकीकडेआक्रमण करायला लागल्या, तेव्हा याच सैतानसिंहानं आपल्या ११८ जवानांना, प्राणांचं बलिदान देण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत १३ व्या कुमाऊँ रेजिमेंटचे ते जवान पुढे सरकत होते. पण लांब पल्ल्याच्या तोफांचा वापर करत पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी सैनिकांपुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. अशातच एक गोळी सैतानसिंहांच्या दिशेनं आली आणि तिनं त्यांचा वेध घेतला. हरफुलसिंह नामक हवालदारानं ते पाहिलं आणि त्यांना उचलून मागच्या बाजूस नेण्याचा प्रयत्न केला. सैतानसिंहांनी त्याला रोखलं. त्यांनी त्याला तांगत्से चौकीच्या दिशेनं दारूगोळा आणण्यासाठी पिटाळलं आणि जखमी अवस्थेत झुंज सुरूच ठेवली.

हरफुलसिंह तांगत्सेला पोचला, ती चौकी आपण गमावली असल्याचं त्याच्या लक्षात आलं, तिथले सैनिक लेहकडे गेल्याचं त्याला कळलं. मेजर सैतानसिंहांना आपली गरज आहे याचं स्मरण होताच हरफुलसिंह माघारी फिरला. पण परत येईपर्यंत त्याला पाहावं लागलं ते धारातीर्थी पडलेलं सैतानसिंहांचं कलेवर. ते दिवस बर्फाच्या वादळाचे होते. युद्धबंदी झाल्यावर भारतीय सैन्यातील काही मंडळी तिथं पोचली तेव्हा बर्फाखाली गाडले गेलेले सैतानसिंहाचे आणि त्यांच्या ११६ साथीदारांचे मृतदेह त्यांना मिळाले. त्या सर्वावर अंत्यसंस्कार करून मंडळी परतली. ग्रीष्म ऋतु सुरू झाला, तसं बर्फ वितळायला लागलं. त्या चौकीवर पुन्हा एकदा भारतीय सैनिक गेले तेव्हा तिथे अनेक चिनी सैनिकांचे मृतदेह पडले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या मृतदेहांची मोजणी करण्यात आली, तेव्हा ११०० चिनी सैनिकांना मरणाला सामोरं जावं लागलं असल्याचं निष्पन्न झालं. मेजर सैतानसिंहांचा तो पराक्रम पुढल्या वर्षी ‘परमवीर चक्रा’चा मानकरी ठरला.

मेजर सैतानसिंहाची ही आठवण आजही तिथं अभिमानानं सांगितली जाते. सैतानसिंहाचा आत्मा आजही त्या चौकीच्या आसपास फिरत असतो अशी समजूत आहे. आणि त्यामुळेच त्याचा गणवेश, त्याचं सामान, त्याच्या वापरातील वस्तू आजही त्याच्या सहकाऱ्यांनी जशाच्या तशा जपून ठेवल्या आहेत. त्याचा पगार म्हणे आजही त्याच्या नातेवाईकांना पूर्वीसारखाच दिला जातो. त्या युद्धात सैतानसिंह मेजर होता. युद्धात धारातीर्थी पडतानाही त्याचा हुद्दा तोच होता. आता बढत्या मिळत मिळत तो ब्रिगेडियरच्या हुद्याला जाऊन पोचला आहे. अन्य सैन्याधिकाऱ्यांप्रमाणेच त्यालाही तंबू आहे. त्याच्या सेवेत सैनिक आहेत. त्याच्या वाहनावर आजही चालकाची नियुक्ती आहे. तो सुटीवर जायला निघतो तेव्हा त्याचं अंथरुण-पांघरुण, सामान घेऊन एक सैनिक त्याला जवळच्या रेल्वे स्थानकावर सोडायला जीप घेऊन निघतो. सुटी संपायचा दिवस येतो तसं त्याला आणण्यासाठी जीप रेल्वे स्थानकावर जाते, जीपमध्ये कुणीतरी बसलं आहे अशा थाटात त्याचे सहकारी ती जीप घेऊन परत येतात. सैतानसिंहाच्या निवृत्तीच्या दिवसापर्यंत हा प्रकार असाच सुरू होता. आता बहुधा तो थांबला आहे. पण हे सारं वाचायला मिळालं ते ‘जम्मू काश्मीरचा सफरनामा’ या श्रीकांत जोशी लिखित पुस्तकात. (पृष्ठ क्र. ७२ आणि १०१ वर)चुशूल ग्लेशिअरमधून वाहून येणाऱ्या त्या प्रवाहाला म्हणजे नाल्याला 'मेजर शैतानसिंह' यांचे नाव दिले गेले आहे. तिकडे पोचलो तेंव्हा ११:३० वाजले होते आणि शैतान नाला हा काय भयाण प्रकार आहे ते समोर दिसत होते. हा तर रस्तामध्ये घुसलेला नाला होता. नाही नाही.. दगडगोटयानी भरलेला उतरत नाल्यापलिकडे जाणारा रस्ता...!!! नाल्यामध्ये चांगले फुट दिडफुट पाणी वाहत होते. बाइकवरुन हा पार करायचा??? शक्य होते. आमच्यासमोर पुण्याचा ग्रुप नाल्यामध्ये बाइक्स टाकू लागला होता. आम्ही अंदाज लावला. १२ वाजत आले आहेत म्हणजे आता ग्लेशिअरमधून वाहुन येणाऱ्या पाण्याची पातळी पुढच्या २-३ तासात नक्की वाढणार आहे. आत्ता गाड्या टाकल्या तरी परत येताना त्या काढता आल्या नाहीत तर ??? लटकलो ना... आता कळले सकाळच्या ४५ मिं. चे महत्त्व. आम्ही जरा तासभर लवकर येथे पोचलो असतो तर बाइक्स घेउन अजून ४ की.मी पुढे पेंगॉँग-त्सो पर्यंत जाता आले असते. आता मात्र बाइक्स एकडेच ठेवणे भाग होते. आर्मीचा एक ट्रक होता त्यात बसलो आणि शेवटचे ४ की.मी. त्या ट्रकने प्रवास करून 'पेंगॉँग-त्सो' पर्यंत पोचलो. असा प्रवास मी जन्मात कधी केलेला नाही ना कधी करेन. एक-न-एक हाड निखळून पडते आहे की काय असे वाटत होते.

पुण्याच्या बायकर्सनी शैतान नाला पार करताना मनालीने घेतलेली एक छोटीशी क्लिप येथे आहे. तर कुलदीपने घेतलेला शैतान नाल्याचा हा एक जबरदस्त फोटो. फोटो बघून तुम्हाला कल्पना येइल की हे काय प्रकरण होत ते.'पेंगॉँग-त्सो'ला पोचलो तेंव्हा दिवसाभराचे पडलेले सर्व कष्ट विसरलो होतो. अगदी हे सुद्धा की आम्ही पहाटे ५ नंतर काहीही खाल्लेले नाही आहे. पेंगॉँग-त्सो - वर्णन करता येणार नाही असे सौंदर्य. जिथपर्यंत आपली नजर जाईल तितक्या दूर-दूर पर्यंत केवळ निळेशार पाणी. त्या पाण्याला सिमा घालायची हिम्मत फक्त त्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये. अवर्णनातीत असे पांढरेशुभ्र सुंदर आकाश आणि त्या आकाशाचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब. खरे सांगायचे तर माझ्याकडे अजून शब्दच नाहीत ते सौंदर्य तुमच्या समोर मांडायला. २ फोटो टाकले आहेत ते बघा म्हणजे कळेल काय सौंदर्य होते ते. पेंगॉँग-त्सो हा भारत चीन सीमेवर आहे. ६० टक्के चीनमध्ये तर ४० टक्के भारतात आणि गंमत म्हणजे हा तलाव खाऱ्या पाण्याचा आहे. हिवाळ्यात जोरदार हिमवर्षाव सुरू झाला की हा संपूर्ण तलाव गोठतो. इकडच्या उन्हाळ्याच्या सुरवातीला बर्फ वितळून शैतान नाला रौद्ररूप धारण करतो. ह्या संपूर्ण वेळात इकडे कोणीही जा-ये करू शकत नाही. जून नंतर थोडे फार पलीकडे जाता येते. आम्ही सर्वांनी तिकडे खुप-खुप फोटो घेतले.इकडे थांबायला खुपच कमी वेळ मिळाला होता. फार तर १५-२० मिं. आम्हाला घेउन आलेला ट्रक परत जाउन पुढच्या लोकांना इकडे आणणार होता त्यामुळे आम्हाला आता निघावे लागणार होते. मन मारून ट्रकमध्ये बसलो आणि इकडे लवकरच पुन्हा येणार असे नक्की केले. फक्त येणार नाही तर इकडे किमान १ दिवस राहणार. पुण्याचा ग्रुप आज इकडे राहणार असल्याने त्यांनी बाइक्स पलीकडे आणल्या होत्या. त्या ट्रकमधून पुन्हा एकदा शैतान नाल्यासमीप पोचलो. त्या ४०-४५ मिं. मध्ये प्रवाह वाढलेला जाणवत होता. बरं झाला बाइक्स पाण्यात नाही टाकल्या ते. बाइक्स ताब्यात घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. दुपारचे २ वाजत आले होते आणि आता सर्वांना भूका लागल्या होत्या.एके ठिकाणी होटेलचा तंबू लावलेला दिसला. त्याच्या कडे फक्त मॅगी होते. त्याला म्हटले आण बाबा जे काय आहे ते. काहीतरी जाऊदे पोटात. आधी चांग-ला आणि मग शैतान नाला दोघांनी चांगलीच वाट लावली होती. थोड़ा थकवा जाणवत होता. आता बायकर्स चेंज केले आणि ३ च्या आसपास आम्ही निघालो पुन्हा एकदा लेहकडे. इकडे साधना आणि उमेशने आम्हा काही जणांचे लडाख मोहिमे संदर्भातले बाइट्स घेतले. तांगत्से, त्सोलटोक ह्या भागातले नदीचे पात्र वाढलेले कळत होते. मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने थोड़ा वेळ वाया गेला. मध्येच एके ठिकाणी एक मोठा प्रस्तर लागला. त्याचा आकार बेडकासारखा होता. बायकर्स पुढे निघून गेले होते आणि मी आता गाडीमध्ये होतो. परतीच्या मार्गावर कुठेही न थांबता आम्ही पुन्हा एकदा 'चांग-ला'ला पोचलो तेंव्हा ६ वाजत आले होते. तिकडे पुन्हा हरप्रीत सिंग बरोबर परत थोड्या गप्पा मारल्या. शक्तिला पोचायला अजून २१ की.मी.चा घाट उतरून जायचे होते. त्या उतारावर बायकर्स तर सुसाटच पण आमचा गाडीवाला पण भन्नाट सुसाट मध्ये गाडी उतरवत होता. शक्ती - कारू पार करत ८:३० वाजता लेहमध्ये पोचलो. दिवसाभरात काय खाल्ले होते? २ चहा आणि १-२ मॅगी बास...!!!तेंव्हा ज़रा ठिक जेवुया म्हणुन पुन्हा एकदा ड्रीमलैंडला गेलो. बटर चिकन, चीज-गार्लिक नान आणि सोबत जीरा राईस असे तब्येतीत जेवलो. ११ च्या आसपास पुन्हा गेस्ट हाउसला आलो तेंव्हा अंगात त्राण नव्हते. झोपायच्या आधी मीटिंग मात्र झाली. अभीने मात्र सर्वांची खरडपट्टी काढली. सकाळी झालेल्या थोड्या उशिरामुळे पेंगोंगला जास्त वेळ देता आला नव्हता म्हणुन तो बराच अपसेट होता. ५-६ तास बाइक वरुन इतके अंतर पार करून गेलो आणि भोज्जा करून परत आलो असे काहीसे आज झाले होते. खरच आम्ही अजून लवकर निघायला हवे होते. पण जे झाले ते झाले आता पुढे ही काळजी घ्यावी लागेल हे मात्र नक्की होते. १२ वाजून गेले होते आणि सुरू झाला होता १५ ऑगस्ट. भारताचा स्वतंत्रता दिवस. उदया लवकर उठून आम्हाला लेहच्या पोलो ग्राउंडला परेड बघायला जायचे होते. तेंव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत निद्रेच्या अधीन झालो.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - १५ ऑगस्ट ... !
.
.
.

लडाखचा सफरनामा - 'चांग-ला' १७५८६ फुट उंचीवर ... !कालच्या थोड्या विश्रांतीच्या दिवसानंतर लडाख मध्ये समरस होत आलो होतो. आज एक मोठे लक्ष्य गाठायचे होते. जगातील तिसरा सर्वोच्च रस्ता 'चांग-ला' (१७५८६ फुट) फत्ते करून भारत - चीन सीमेवरील 'पेंगॉँग-त्सो'चे सौंदर्य अनुभवायचे होते. 'त्सो' म्हणजे तलाव. लडाखमधल्या प्रेक्षणीय स्थळापैकी महत्वाचा असा हा लेक आज आम्ही बघणार होतो. पहाटे-पहाटे ४:३० वाजता उठलो आणि आवरा-आवरी केली. चहा-कॉफी बरोबर ब्रेड-बटर पोटात ढकलले. ५ ला निघायचे होते ना. पण सर्वांचे आवरून गेस्टहाउस वरुन निघायला ५:४५ झाले. तसा फ़क्त ४५ मिं. उशीर झाला होता पण ही ४५ मिं. आम्हाला चांगलीच महागात पडणार होती. का म्हणताय... पुढे कळेलच की. अजून एक मिनिट सुद्धा न दवडता आम्ही पुन्हा एकदा मार्ग घेतला मनालीच्या दिशेने. आज मी - शमिका, अमेय म्हात्रे - पूनम आणि अमेय - दिपाली सर्वात पुढे होतो. आमच्या मागुन अभि - मनाली आणि आदित्य - ऐश्वर्या येत होते. सर्वात मागे होती आमची गाड़ी. कालपासून आम्ही गाडी बदलली होती. नवा ड्रायव्हर लडाखी होता.६:१५ च्या आसपास पुन्हा एकदा शे आणि ठिकसे गोम्पा पार करत आम्ही 'कारू'ला पोचलो. चीन सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या ह्या मार्गावरची ही पहिली चेक पोस्ट. पहाटे-पहाटे आम्ही तेथे पोचलो तेंव्हा सर्व जवान परेडसाठी निघाले होते. आर्मी ग्रीन कलरचे वुलन जॅकेट आणि वुलन कैपमध्ये ते सर्वजण एकदम स्मार्ट दिसत होते. तिथून पुढे निघालो आणि थोड़े पुढे जातो न जातो तो मागुन अमेय साळवी आम्हाला जोरात हार्न देऊ लागला. मी थांबलो पण अमेय म्हात्रे बराच पुढे निघून गेला होता. मला वाटले बाइकला परत काही झाले की काय. पण नाही, अभीने मागुन फोन केला होता की परमिट क्लिअरन्ससाठी त्याला पुन्हा कारू पोस्टला मागे जावे लागेल. बायकर्सना थांबवले नव्हते आर्मी पोलिसांनी मात्र त्यांनी गाडी अडवली होती. अमेय म्हात्रे तर पुढे निघून गेला होता पण मी आणि अमेय साळवी तिकडेच थांबलो. आमचे बाइक नंबर्स अभीकडे असल्याने आम्हाला मागे जायची गरज नव्हती. बराच वेळाने पुढे गेलेला अमेय म्हात्रे परत येताना दिसला. बहुदा त्याला आणि पूनमला कळले असावे की अरे.. आपल्या मागुन तर कोणीच येत नाही आहे. ६ की.मी पुढे जाउन म्हणजे जवळ-जवळ 'शक्ती'पर्यंत पुढे जाउन आला तो. ७ च्या आसपास मागुन सर्वजण आले आणि मग आम्ही पुढे निघालो. जास्तीत जास्त वेगाने पुढे सरकून वेळ कव्हर करायची हा आता आमचा प्रयत्न होता.काही मिनिटांमध्ये १३५५० फुट उंचीवर 'शक्ती' या ठिकाणी पोचलो. अमेय इकडूनच तर परत आला होता. आणि याच ठिकाणाहून सुरू होतो जगातील तिसरा सर्वोच्च पास. 'चांग-ला' रस्ता फोटू-ला इतका चांगला नसला तरी नमिके-ला सारखा खराब सुद्धा नव्हता. पहिलाच नजारा जो समोर आला तो बघून तर मी अवाक होतो. दूरपर्यंत जाणारा तो सरळ रस्ता टोकाला जाउन डावीकडे वर चढत जात होता आणि चांगला ३-४ की.मी.चा U टर्न घेउन मागे फिरत होता. साधना आणि उमेश गाडीमध्ये होते. आधीच उशीर झाल्याने जे जे शूटिंग करायचे आहे ते जास्तीत-जास्त पुढे जाउन उरकायचे होते त्यांना. उमेशला बायकर्सचे रायडिंग शॉट्स सुद्धा घ्यायचे असल्याने तो मध्येच गाडी थांबवायचा. हा ड्रायव्हर चांगला होता. हवी तशी गाडी मारत होता. सर्वजण एकाच पेस मध्ये कुठेही न थांबता बाइक्स दामटवत होते. माझ्यामागून शमिकाची आणि अभीच्या मागुन मनालीची धावती फोटोग्राफी सुरू होती पण अमेय आणि कुलदिप यांना मात्र फोटो घ्यायला थांबावे लागायचे. पण मग तो गेलेला वेळ ते कव्हर करायचे. तो एक मोठा U टर्न मारून आम्ही थोडे वर पोचलो. बघतो तर काय ... अजून तसाच एक U टर्न. आधीचा डावीकडे होता आणि हा उजवीकडे इतकाच काय तो फरक. आणि तो U टर्न चढून वर गेलो की पुढे अजून एक डावीकडे वळत जाणारा प्रचंड असा C टर्न. मनात म्हटले हा 'चांग-ला' चांगलाच आहे की. मागच्या बाजूला दुरवर शक्ती गावाबाहेरील शेती दिसत होती. मनोहारी दृश्य होते ते. आजुबाजुला सर्व ठिकाणी ना झाडे ना गवत पण बरोबर मध्यभागी हिरवेगार पुंजके.ते दृश्य मागे टाकुन आम्ही पुढे निघालो. दुसऱ्या U टर्नच्या मध्ये आपण पोचतो तेंव्हा आपण १७००० फुट उंचीवर असतो. ह्याच ठिकाणी 'चांग-ला'ची पहिली चेकपोस्ट लागते. 'सिंग इज किंग' असे लिहिले आहे इकडे. २ सिख लाइट इंफंट्रीचे (सिखली) एक प्लाटून स्थित आहे. इथपासून रस्ता थोडा ख़राब आहे. कितीही वेळा रस्ता बनवला तरी बर्फ पडला की सर्व काही वाहून जाते आणि परिस्थिति जैसे थे. तेंव्हा BRO ने इकडे रस्ते किमान ठिकठाक करून ठेवले आहेत. जसजसे वर-वर जात होतो तसा रस्ता अजून ख़राब होत जात होता. मध्येच एखाद्या वळणावर बाइक वाहत्या पाण्यामधून घालावी लागायची तर कधी पाण्यामुळे वाहून गेलेल्या खडबडीत रस्तामधून. असेच एक डावे वळण लागले. वाहत्या पाण्यामधून डबल सीट बाइक टाकणे सेफ वाटले नाही म्हणुन शमिकाला उतर बोललो. घाटामध्ये अश्या वाहत्या पाण्यामधून बाइक टाकायची असेल तर जास्तीत जास्त खबरदारी घेतलेली बरी नाही का..!! उजव्या बाजूने रापकन बाइक काढली आणि मग पुढे जाउन थांबलो. बाकीचे सुद्धा सिंगल सीट तेवढा भाग पार करून आले आणि मग पुढे निघालो. 'शक्ति' पासून सुरू झालेला चांग-ला संपतच नव्हता. एकामागुन एक U टर्न आणि चढतोय आपला वर-वर. कारूपासून निघून ४३ किमी. अंतर पार करून पुढे जात-जात अजून २ मोठे U टर्न पार करत आम्ही अखेर चांग-ला फत्ते केला. उंची १७५८६ फुट. फोटू-ला मागोमाग गाठलेली सर्वोच्च उंची. तो क्षण अनुभवायला आम्ही थोडावेळ तिकडे थांबलो.
वर पोचल्या-पोचल्या दिसला तो इंडियन आर्मीने लावलेला बोर्ड. १७५८६ फुट उंचीवर काय करावे आणि काय करू नये हे त्या बोर्डवर स्पष्टपणे लिहिले आहे. वरती चांग-ला बाबाचे मंदिर आहे. येथे असणाऱ्या सर्व जवानांचे आणि येणाऱ्या सर्व पर्यटकांचे चांग-ला बाबा भले करो अशी मनोकामना येथे आर्मीने केली आहे. २ सिख लाइट इंफंट्रीचे अजून एक प्लाटून वरती आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी इकडे सर्व सोई आहेत. शौचालय आहे, वैद्यकीय सुविधा आहे. खायला हवे असेल तर इकडे एक छोटेसे कॅंटीन आहे. चहा मात्र आर्मीतर्फे मोफत दिला जातो. अर्थात बिनदुधाचा बरं का.. त्या ठिकाणी दूध आणणार तरी कुठून नाही का!!! बाजुलाच एक छोटेसे शॉप आहे. तिकडे पेंगोंग संदर्भातले काही टी-शर्ट्स, कप्स, मिळतात. आम्ही सर्वांनी आठवण म्हणुन काही गोष्टी विकत घेतल्या. तिकडे हरप्रीत सिंग नावाचा जवान होता. त्याच्या बरोबर थोडावेळ गप्पा मारल्या. गेल्या २ वर्ष ते सर्वजण तिकडे आहेत. फारसे घरी गेलेले नाहीत. दिवाळीच्या आधी तो घरी जाणार आहे. चांगली २ महीने सुट्टी आहे. खुशीत होता तो. आम्हाला सांगत होता. "बास. अब कुछ दिन और. ३ गढ़वाल आके हमें रिलीफ करेगी. फिर मै अपने गाव जाऊंगा छुट्टी पे." त्याला शुभेच्छा दिल्या आणि परत येताना भेटू असे म्हणुन तिकडून निघालो. आता लक्ष्य होते चुशूल येथील 'तांगत्से' पार करून 'पेंगॉँग-त्सो' गाठणे ...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - १५००० फूटावरील पेंगॉँग-त्सो ... !
.
.
.

Friday, 2 October 2009

लडाखचा सफरनामा - लडाखचे अंतरंग ... !

आज बरेच दिवसांनंतर तसा थोडा निवांतपणा होता. ना लवकर उठून कुठे सुटायचे होते ना कुठे पुढच्या मुक्कामाला पोचायचे होते. काल रात्री लेहला आल्यापासून जरा जास्त बोललो किंवा जिने चढ-उतर केले की लगेच दम लागत होता. रात्री नुसते सामान खोलीमध्ये टाकेपर्यंत धाप लागली होती. सकाळी ८ वाजता आम्ही नाश्ता करायला टेबलावर हजर होतो. मस्तपैकी लडाखी ब्रेड सोबत चहा - कॉफी, बटर - जाम आणि ज्यांना हवे त्यांना ऑमलेट असा नाश्ता तयार होता. साधना काल रात्री १२ वाजता आल्यानंतर काहीही न खाता झोपली होती. त्यामुळे ती कालचे तिचे किस्से सांगण्यात मग्न होती. ते दोघे मागे राहिले होते न काल. फोटू-लाच्या छोटूश्या रस्त्यावरुन अंधारातून वेडीवाकडी वळणे घेत येताना दोघेही आम्हाला सारखे फोन करत होते. पण फोन लागतील तर ना इकडे. साधनाने नंतर सांगितले मला की तिला त्यांचा 'दि एंड' होणार असेच वाटत होते. आज सकाळी मात्र खुश होती एकदम. सर्वच आनंदात होते तसे. मोहिमेचा पहिला टप्पा सुखरूपपणे पार झालेला होता. नाश्ता करता करता सर्वजण आप-आपल्या घरी आणि मित्र-मैत्रिणींना फोन करत होते. मोकळ्या हवेवर फूलबागेच्या शेजारी बसून गप्पा टाकत नाश्ता करायला काय मस्त वाटत होते. खरचं. मस्तच होते ते गेस्ट हाउस. छोटेसे असले तरी अगदी घरासारखे. पुढचे ४ दिवस तर आम्ही त्याला आपले घरच बनवून टाकले होते. हवे तेंव्हा या आणि हवे तेंव्हा जा. नबी आणि त्याच्या कुटूंबाने देखील आमचे अगदी घरच्यांसारखे आदरातिथ्य केले.नाश्ता आटोपल्यानंतर ठरल्या प्रमाणे मी, अभिजित, आदित्य, अमेय साळवी, कुलदिप असे ५ बायकर्स बाइक रिपेअरसाठी घेउन गेलो. तिकडे गेले ३ दिवस ऐश्वर्याची तब्येत खालीवर होत असल्याने पूनम तिला घेउन जवळच्या हॉस्पिटलला गेली. मनाली, उमेश आणि आशिष गेस्ट हॉउसच्या फुलबागेत फोटो टिपत बसले होते. शमिका आणि दिपाली 'असीम' म्हणजे नबीच्या पोराबरोबर खेळत होत्या. कसला गोड पोरगा होता. अवघ्या काही मिनिटांमध्ये मस्त मिक्स झाला तो आमच्यात. मज्जा, मस्ती आणि मग त्याचे फोटो काढणे असे सर्व प्रकार सुरू होते. साधना आणि उमेशला गेल्या ४ दिवसातले केलेले शूटिंग ऑफिसला पाठवायचे असल्याने ते त्यावर काम करत बसले होते. आमचा ड्रायवर आज जम्मूला परत जाणार होता; तेंव्हा शूटिंगच्या टेप्स त्याच्याबरोबर पाठवून द्यायच्या होत्या. १२ वाजता आम्ही सर्व बाइक्स रिपेअर करून घेउन आलो. लंच झाला की आसपास फिरायला जायचे असा प्लान केला. ऐश्वर्याने मात्र बाहेर न पडता पूर्ण दिवसभर आराम करायचा असे ठरवले होते. दुपारचे जेवण झाल्यावर ३ वाजता आम्ही फिरायला बाहेर पडलो. दुपारी ३ वाजता सुद्धा लेह मार्केटमध्ये बरीच गजबज होती. आमचे गेस्ट हाउस मार्केटच्या पलिकडच्या टोकाला असल्याने मार्केट मधुनच जावे लागायचे. मार्केटमधून खाली उतरून खालच्या चौकात आलो की एक मोठी कमान लागते. लडाखी पद्धतीचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार. काल रात्री आलो तेंव्हा नीट बघता आले नव्हते तेंव्हा आत्ता जरा नीट थांबून पाहिले. इकडून रस्ता अजून खाली उतरत जातो आणि त्या मुख्य चौकात येतो. इकडून समोरचा रस्ता श्रीनगरकडे जातो. त्याच रस्त्याने आम्ही काल आलो होतो. डाव्या हाताचा रस्ता जातो सरचूमार्गे मनालीकडे. या ठिकाणी डाव्या हाताला लेह सिटीमधला एकमेव पेट्रोलपंप आहे. तेंव्हा आम्ही आमच्या लंचनंतर बाइक्सना सुद्धा त्यांचा खाऊ दिला हे सांगायला नकोच.चौकातून निघालो आणि मनालीकडे जाणाऱ्या रस्ताने १८ की. मी. अंतर पार करून काही मिनिटात थेट 'ठिकसे गोम्पा'ला पोचलो. (इकडे मात्र 'गोन्पा' असे लिहिले होते) 'गोम्पा'ला मराठीमध्ये 'विहार' असा शब्द आहे. आपल्याकडे कार्ला-भाजे सारख्या बुद्ध गुंफांचे विहार प्रसिद्द आहेतच. ठिकसेकडे येताना मध्ये 'सिंधूघाट दर्शन' आणि 'शे पॅलेस' ही ठिकाणे लागतात. मात्र आम्ही ह्या जागांवर परत येताना वळणार होतो. एका छोट्याश्या डोंगरावर ठिकसे गोम्पा वसलेली आहे. पाहिल्या-पहिल्याच एकदम प्रसन्न वाटले. ठिकसे ही लडाख भागामधल्या अत्यंत सुंदर गोम्पांपैकी एक असून १४३० साली बनवली गेली आहे. प्रवेशद्वार विविध रंगांनी सजवलेले आहे. आत गेलो की उजव्या हाताला अनेक प्रकारची फूले त्यांच्या रंगांनी आपले लक्ष्य वेधून घेतात. डाव्या हाताला काही दुकाने आहेत. येथे काही खायला आणि काही माहिती पुस्तके मिळतात. गोम्पामध्ये प्रवेश करण्यासाठी ३०/- प्रवेश फी द्यावी लागते.


थोड्या पायऱ्या चढून वर गेलो. रस्त्यावरुन येताना जसे ठिकसेचे सुंदर दृश्य दिसत होते तसेच दृश आता ठिकसेवरुन सभोवताली दिसत होते. नकळत आम्ही सर्व फोटो टिपायला थांबलो. आशिष मात्र एकटाच अजून थोडा वर पोचला होता. आम्ही जेंव्हा अजून वर जाण्यासाठी पुढे निघालो तेंव्हा आशिष कमरेवर हात ठेवून वरतून आमच्याकडे बघत होता.  डोक्यावरती काउबॉय हॅट, अंगात फुल स्वेटर आणि जिन्स... मागुन येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे एक वेगळाच इफेक्ट तयार झाला होता. ते बघून मला उगाच याराना पिच्चरमधल्या 'ये सारा जमाना ... ' गाण्यामधल्या अमिताभच्या जॅकेटची आठवण झाली. त्यात नाही का ते लाइट्स लावले आहेत. तसाच चमकत होता दादाचा स्वेटर. पुन्हा त्याचे फोटो शूट झाले आणि मग आम्ही अजून वर निघालो. कुठल्या ही गोम्पामध्ये तुम्हाला खुप फिरत्या घंटा बघायला मिळतील. गोम्पामधली घंटा क्लॉकवाइज म्हणजेच आपण देवाला प्रदक्षिणा मारतो त्याच दिशेने फिरवायची असते. चांगला दिड-दोन मीटरचा व्यास असतो एका घंटेचा. ती घेउन गोल-गोल फिरायचे. तिला वरच्या बाजूला एक लोखंडी दांडी असते ती दुसऱ्या दांडीला आपटून घंटानाद होतो. या संपूर्ण मार्गावर उजव्या हाताला छोट्या-छोट्या घंटा बनवलेल्या आहेत. त्या सर्व फिरवत वर जायचे. मजेचा भाग सोडा पण फिरत्या घंटा म्हणजे गतिमानतेचे आणि समृद्धीचे प्रतिक मानल्या गेल्या आहेत. तीच गतिमानता आणि समृद्धी भगवन गौतम बुद्ध सर्वांना देवोत हीच सदभावना ठेवून आत प्रवेश केला.गोम्पाच्या मुख्यभागात प्रवेश केला की प्रशस्त्र मोकळी जागा आहे. आतमध्ये बोद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रार्थना सभागृह आहे. आम्ही गेलो तेंव्हा नेमकी तिथल्या लामांची प्रार्थना सुरू होती. खुप जुन्या ग्रंथांचे ते मोठ्याने पठण करत होते. त्यांचा तो आवाज संपूर्ण खोलीमध्ये घुमत होता. आम्ही अर्थात अनवाणी पायांनी कुठलाही आवाज न करता आत गेलो. आतील संपूर्ण बांधकाम लाकडाचे आहे. सभागृहाच्या शेवटी अजून एक खोली होती. तेथे भगवन गौतम बुद्ध आणि काही इतर जणांच्या मुर्त्या होत्या. फ्लॅश न वापरता फोटो घ्यायला परवानगी होती. त्या पाहून आणि  फोटो काढून बाहेर आलो. लामांचे पठण करून संपले होते. आम्ही आता प्रार्थना सभागृह पाहिले. दलाई लामांचा फोटो आणि इतर अनेक जुन्या मुर्त्या तेथे होत्या. पण नेमकी माहिती द्यायला कोणी नव्हते तिथे.
तिथून बाहेर पडलो आणि समोर असणाऱ्या पायऱ्या चढून खोलीमध्ये गेलो. शेवटच्या पायरीवर पाउल ठेवल्यानंतर अवाक् बघत रहावे असा नजारा होता. भगवन गौतम बूद्धांची जवळ-जवळ ३ मजली उंच मूर्ती डोळे दिपवून टाकत होती. जितकी प्रसन्न तितकीच प्रशत्र. अहाहा... मुकुटापासून ते खाली पायांपर्यंत निव्वळ सुंदर... रेखीव... अप्रतिम कलाकुसर... कितीतरी वेळ मी त्या मूर्तीकडे पाहतच बसलो होतो. मूर्तीला प्रदक्षिणा मार्ग आहे. आपण प्रवेश करतो तो खरंतरं २ रा मजला आहे. त्यामुळे बाकी मूर्ती खाली वाकून बघावी लागते. संपूर्ण मूर्तीचा फोटो वाइडलेन्सने तरी घेता येइल का ही शंकाच आहे. मूर्ती समोर काही वेळ बसलो आणि मग तेथून निघालो. बाहेर पडलो तरी माझ्या मनातून ती मूर्ती काही जात नव्हती. साधना आणि उमेशला मात्र काय-काय शूट करू असा झाल होत. एक टेक घेताना कधी साधना चुकत होती तर कधी उमेशला हवी तशी फ्रेम मिळत नव्हती. शोंत.. घेता-घेता ४ वेळा पायऱ्या चढ़-उतर केल्या तिने. चांगलीच दमली होती ती. अखेर तिकडून निघालो आणि बाइक्स काढल्या. आता पुढचे लक्ष्य होते 'शे पॅलेस'. लेहच्या दिशेने घोडे म्हणजे आमच्या बाइक्स पळवल्या आणि १० मिं. मध्ये 'शे पॅलेस 'पाशी येउन पोचलो.

'शे' हे मुळात गोम्पा होते. १६५० मध्ये देलडॉन नामग्याल (King Deldon Namgyal) या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे 'सिंगाय नामग्याल' (Singay Namgyal) यांच्या आठवणीमध्ये राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज निवासस्थान होते. आता सध्या येथे फार कोणी रहत नाही. गोम्पाची काळजी घेणारे काही लामा आहेत बास. राजवाडा म्हणण्यासारखे सुद्धा काही राहिलेले नाही येथे. खुपश्या खोल्या बंदच आहेत. असे म्हणतात की ह्या राजवाडयाखाली २ मजली तळघर आहे. काय माहीत असेलही. पण आम्ही काही ते शोधायचा प्रयत्न केला नाही. एक चक्कर मारली आणि 'शे'चे आकर्षण असलेल्या बुद्ध मूर्तीला भेट द्यायला गेलो. ठिकसेप्रमाणे येथे सुद्धा ३ मजली उंच बुद्ध मूर्ती आहे. तितकी रेखीव नाही पण भव्य निश्चित आहे. आम्ही येथे पोचलो तर एक मुलगी बुद्धमूर्तीचे स्केच काढत होती. सुंदर काढले होते तिने स्केच. काही वेळात तिकडून निघालो आणि पुन्हा खाली आलो. लेह-लडाखमध्ये जिथे पाहाल तिथे तुम्हाला स्तुपाशी साधर्म्य दर्शवणारे एकावर एक दगड रचलेले दिसतील. कधी कुठे डोंगरावर तर कुठे छोट्याश्या प्रस्तरावर. शे मध्ये असे चिक्कार छोटे-छोटे दगडी स्तूप दिसले. मग मी सुद्धा एक बनवला आणि त्याचा छानसा फोटो घेतला. फोटो खरच मस्त आला आहे. मला स्वतःला खुप आवडला. बघा तुम्हाला आवडतो का ते.परत येताना उमेश आणि अमेयने काही मस्त फोटो घेतले. खास करून उमेश आज फुल फॉर्ममध्ये होता. काय ती एक-सो-एक फ्रेम पकडत होता आणि अंगल घेत होता. उमेशने काढलेला 'कलर फ्लॅग्स'चा हा फोटो हा आमच्या लडाख मोहिमेमधला सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक आहे. ५ वाजून गेले होते आणि अजून २ ठिकाणी जायचे होते आम्हाला. तेंव्हा इकडून सुटलो आणि थेट पोचलो 'सिंधूघाट' येथे.सिंधू नदीवर बांधलेला हा एक साधा घाट आहे. खरे सांगायचे तर ह्यापेक्षा जास्त सुंदर आणि स्वच्छ सिंधू नदी आम्ही आधीच्या ५ दिवसात पाहिली होती. शिवाय इकडे प्रवाह तितका खळखळ वाहणारा सुद्धा नव्हता. संथ होते सर्व काही. नदीपलीकडचे डोंगर मात्र सुरेख दिसत होते. लडाखमधल्या डोंगरांच्या रंगांनी मला खरच वेड लावले. त्यावर झाडे नसून सुद्धा किती छान दिसायचे ते. वेगळ्याच पद्धतीचे सौंदर्य होते ते. इकडे फोटो मात्र मस्त काढले आम्ही. माझा आणि आशीष दादाचा तसेच माझा आणि शमिकाचा (आख्या ट्रिपमधला एकमेव क्लोज़ फोटो) असे काही मस्त फोटो आले आहेत. इकडे काही मराठी लोक भेटले. त्यांनी सुद्धा विचारपुर केली बरीच. कुठून आलात? बाइक्स वर? अरे बापरे !!! .. वगैरे झाले. तिकडून निघालो ते थेट लेह सिटीमध्ये असणाऱ्या शांतीस्तूप येथे.

शांतीस्तूपला पोचलो तेंव्हा खरंतरं अंधार पडायला फार वेळ नव्हता. पण संध्याकाळचा चहा-कॉफी काही झाली नव्हती म्हणुन पटकन चहा-कॉफी मारुया असे ठरले. उमेश, साधना आणि आशिष मात्र आधीच पुढे निघून गेले होते. त्यांना माहीत पण नव्हते की आम्ही मागे थांबलो आहोत. १५-२० मिं. मध्ये मी पुढे जाउन वर पोचलो. शांतिस्तूप हे एक प्रकारचे शिल्प आहे. स्तुपापर्यंत चढून जायला पायऱ्या आहेत. तेथे 'बुद्धजन्म' आणि 'धम्मचक्र' अशी २ प्रकारची चित्रे काढलेली आहेत. स्तुपासमोर प्रशत्र मोकळी जागा असून येथून लेह सिटीचे सुंदर दृश्य दिसते. काही मिनिटे इकडे बसलो. बाजुलाच साधना आणि उमेशची शूटिंगची लगबग सुरू होती आणि आशिष त्यांचे फोटो काढत होता. अंधार पडायच्या आत त्यांना आजचा क्लोसिंग शॉट घ्यायचा होता. इतक्यात स्तुपाच्या पायर्‍यांवरुन व्हायोलिनचे सुर ऐकू येऊ लागले. बघतो तर काय. एक लामा मस्त व्हायोलिन वाजवत होता. कुठलीशी छानशी शांत धून होती. त्या नयनरम्य संध्याकाळला साजेल अशीच. त्याच मुडमध्ये तिकडून निघालो. आज निवांतपणे बरेचसे लेहदर्शन झाले होते. आता अजून एक लक्ष्य होते. काय विचारताय!!! मार्केटमध्ये जाउन हॉटेल ड्रिमलँड शोधायचे. त्याकामाला २ जण लागले बाकी आम्ही बायकर्स पेट्रोलपंपला पोचलो. उदयाच्या घोड़दौडीसाठी टाक्या फूल करून घेतल्या. तितक्यात ड्रिमलँडचा पत्ता लागल्याची खबर आली. हा... हा... मग आमचा मोर्चा तिकडे वळला. सर्वजण ९ वाजता बरोबर हॉटेल ड्रिमलँडला पोचलो. काय-काय जेवलो ते माझ्या फूड ब्लॉग वर लिहेनच मी. पण बरेच दिवसांनी एकदम 'ठिकसे' जेवलो... :D जेवण आटपून गेस्ट हाउसला पोचलो आणि ११ वाजता मीटिंग घेतली. लडाखमधले पहिले मोठे लक्ष्य उदया पूर्ण करायचे होते आणि आम्ही सर्व त्यासाठी सज्ज झालो होतो...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - 'चांग-ला' १७५८६ फुट उंचीवर ... !
.
.
.