Sunday 29 November 2009

लडाखचा सफरनामा - २१ लूप्स टू सरचू ... !

ज्या शोर्टकटने तेनसिंग आम्हाला घेउन गेला त्या रस्त्यावरुन त्याची गाडी तर व्यवस्थित निघून गेली; आम्ही मात्र लटकलो. पुन्हा एकदा मागच्याला उतरवत तर कधी बाईक ढकलत वाळू खात-खात आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. किमान १०-१२ किमी.चा फेरा नक्कीच वाचला होता. आता पक्का डांबरी रस्ता लागला. चला आता पुढे तरी नीट मस्तपैकी जाऊ ह्या कल्पनेने मन सुखावले. पण काही कल्पना किती क्षणभंगुर ठरतात नाही...!!! २-३मिन. मध्ये तो सुखद रस्ता संपला आणि त्या पुढचा ३७किमि.चा पांग पर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिशय भयानक अश्या परिस्थितिमध्ये आम्ही पार केला. पूर्ण रस्त्याचे काम सुरू होते. दुपारच्या त्या रणरणीत उन्हात चांगली किलोभर वाळू खात आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. कधी बाईक सांभाळत तर कधी ती वाळूवरुन कशीबशी न पड़ता सरकवत. एका मोठ्या पठारावरून तो कच्चा रस्ता जात होता. उजव्या आणि डाव्या बाजूने असंख्य छोटे-छोटे रस्ते येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्सनी बनवून ठेवले होते. ज्या जागेवरून ट्रक गेला असेल तिकडची वाळू दाबली गेली असल्याने त्याच जागेवरून आम्ही बाईक पुढे काढत होतो नाहीतर बाईक पूर्णवेळ ढकलतच न्यावी लागेल की काय असे वाटत होते. अखेर एके ठिकाणी आम्हाला उतरावेच लागले. बाईक्स जास्तीतजास्त पुढे नेउन पिलियन रायडरला आम्ही खाली उतरवले. मात्र कुलदीपने अमेय म्हात्रेला बरेच आधी उतरवले असल्याने तो जवळ-जवळ २५० मी. अंतर तरी चालून आला असेल. आल्यानंतर कुलदीपला शिव्या पडल्या हे काही वेगळे सांगायला नकोच ... दुरवर रस्ता वर चढत चांगला होत जातोय असे दिसू लागले आणि आम्ही आमच्या बाईक्सचा वेग वाढवला. पांगच्या ४ किमी. आधी रस्ता पुन्हा एकदा पक्का होत घाट उतरु लागला. खाली दुरवर काही दुकानी आणि गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. आम्ही समजलो.. हुशश्श्श्.. आले एकदाचे पांग.

पांगला गाडी मधून पुढे गेलेले सर्व टीम मेंबर्स भेटले. हातात तसा जास्त वेळ नव्हता पण किमान चहा घेउन फ्रेश झालो. कुलदीप आणि अमेय साळवीच्या बाईक्सना सुद्धा भूका लागल्या होत्या, त्यांची भूक भागवली. उगाच आमच्या बाईक्स निषेध करू नयेत म्हणुन त्यांना सुद्धा थोड़े खायला दिले. थकलेल्या रायडर्स आणि पिलियन रायडर्सनी आपल्या जागा गाड़ीमध्ये बदलल्या आणि अर्ध्यातासात आम्ही तिकडून पुढे सटकलो. अजून सरचू बरेच लांब होते. अंधार पडायला अवघे ३ तास उरले होते. त्याआधी 'लाचूलुंग-ला' आणि 'नकी-ला' पार करणे आवश्यक होते. तासाभरात 'लाचूलुंग-ला' समोर उभा राहिला. फोटू-ला, खर्दुंग-ला, चांग-ला असे एक-सो-एक अनुभव पाठीशी असल्याने लाचूलुंग-लाच्या १६६१६ फुट उंचीला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तो पार करत आम्ही पुन्हा १००० भर फुट खाली उतरलो आणि लगेच 'नकी-ला' कडे मोर्चा वळवला. ६ वाजत आले होते आणि हवेत आता गारवा जाणवू लागला होता. नकी-ला च्या १५५४७ फुट उंचीवर पोचलो तेंव्हा इतकी थंडी वाढली की मी-शमिकाने बाईक थांबवून जाकेट्स अंगात चढवली. तिकडे मागे अमेयच्या बाईकवर बसलेल्या पूनमने पायात फ़क्त फ्लोटर्स घातल्याचे लक्ष्यात आले. ४ वाजता पांगला असताना ती गाडीमधून बाईकवर शिफ्ट झाली होती ते सुद्धा पायात सोक्स न घालता. आता थंडीने तिचे पाय गारठले होते. माझ्याकडे असलेले शमिकाचे एक्स्ट्रा सॉक्स तिला दिले तेंव्हा कुठे तिच्या जिवातजीव आला.

नकी-ला उतरु लागतो तसे २१ लूप्स समोर येतात. खाली-खाली उतरत जाणारा २१ वळण असलेला हा रस्ता अतिशय सुंदर आहे. पांगच्या वाळवंटामधून इकडे आल्यावर तर हा रस्ता आम्हाला स्वर्गाहून सुंदर असा भासत होता. शिवाय रुक्ष, झाडे नसलेल्या प्रदेशाच्या जागी आता हिरवी झाडे दिसू लागली होती. २१ लूप्सचा रस्ता १५३०२ फुट उंचीवरून सुरू होत १३७८० फुट उंचीवर येउन संपतो. म्हणजेच अवघ्या ८-१० किमी मध्ये थेट १५०० फुट खाली. २१ लूप्स जिथे संपतात तिकडे 'ब्रांडी नाला' आहे. ह्याचे नाव ब्रांडी नाला का ते माहीत नाही पण २१ लूप्स उतरल्यावर बहुदा ब्रांडी सारखी झिंग चढत असावी. आम्हाला तरी मस्तच झिंग चढली होती. ब्रांडीची नाही तर किमान रायडिंगची तरी. इकडून सरचू २१ किमी. लांब आहे. नाल्यावरचा ब्रिज पार करून पुढे निघालो. अंधार पडत आला असल्याने आमचा वेग पुन्हा कमी झाला होता. शिवाय रस्ता सुद्धा बराच वळणा-वळणाचा होता. ७:३० वाजता आम्ही सरचू मध्ये प्रवेश केला. गाडी पुढे गेली होती आणि रहायची सोय गाडीच्या ड्रायव्हरनेच केली होती. तेंव्हा आम्हाला आता त्या अंधारात त्याला शोधणे भाग होते. सरचूवरुन सुद्धा जवळ-जवळ ८ किमी. पुढे आलो तरी कोणी भेटेना. हवेत चांगलीच थंडी वाढली होती. टेम्परेचर ९ डिग. झाले होते. अखेर आर्मी पोलिसांच्या सांगण्यावरुन सर्वांना तिकडच्या एका चेकपोस्टवर थांबवले आणि मी-अभिजित शोधाशोध करायला अजून पुढे निघालो.

एका कैंपसाइट वर चौकशी करत असताना समोरून एक गाडी येताना दिसली. मी धावतच रस्त्यावर पोचलो आणि गाडीला हात केला. अंदाज बरोबर निघाला होता. उमेश ड्रायव्हरला घेउन आम्हाला शोधायला मागे आला होता. शेवटी ९ च्या आसपास सर्व साइटवर पोचलो. सर्वांना रहायच्या जागेत सामान टाकले आणि गरमागरम चहा घेतला. रात्रीच्या जेवणावर धमालच आली. आजचे एक-सो-एक किस्से एकमेकांना सांगत, ऐकवत वेळ भुर्रकन निघून गेला. आज खरच भन्नाट दिवस होता. जरी गेल्या २ दिवसात आम्ही लेहवरुन निघून त्सो-कार मार्गे सरचूला आल्याने 'तांगलांग-ला' हा जगातील सर्वोच्च द्वितीय उंचीचा पास (उंची १७५८२ फुट) आम्ही स्किप केला. तरी सुद्धा 'त्सो-कार - पांगचा रुक्ष वाळवंटी प्रदेश' आणि मग 'नकी-ला, २१ लूप्स - सरचूचा हिरवागार प्रदेशात बाईक चालवायला मज्जा तर आलीच होती त्याशिवाय सर्वांच्याच कणखर मनोवृत्तीचा कस लागला होता. उद्याची आखणी करून आम्ही सर्व झोपी गेलो. उद्याचे लक्ष्य होते बारालाच्छा-ला आणि रोहतांग पास करत मनाली ... अर्थात काश्मिरला टाटा करत हिमाचल प्रदेश मध्ये प्रवेश ...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - रोहतांगचा चिखल सारा ... !
.
.
.

Saturday 28 November 2009

लडाखचा सफरनामा - 'दिपाली'च्या मनातला ... !

लडाखवर माझे लिखाण सुरूच आहे ... पण मध्ये-मध्ये कामामुेळ त्यात थोडा खंड पडतोच. अश्यावेळी अधून-मधून माझ्या लडाख टीम मध्ल्यांचे अनुभव मी इकडे मांडतोय. दिपाली म्हणजे आमच्यामधली सर्वात उत्साही आणि आनंदी. कधीही, कुठेही यायला लगेच तयार. 'लडाख का येणार का?' असे विचारल्यावर एका पायावर तयार झाली होती ही पोरगी. खरे सांगायचे तर लडाखला सर्वात जास्त मज्जा सुद्धा तिनेच केली आहे. तिचे अनुभव तिच्याच शब्दात...

"रोहन.. हा जो काही ब्लॉगचा घाट तू घातला आहेस ना तो मस्तच जमून आलाय. आपण सगळे तर एकत्रच जाउन आलोय तरीही वाचायला खुप उत्सुकता वाटते. आज काय लिहिला असेल बरं? रोज चेक करते. मजा येते वाचायला. अभिजीत आणि रोहन या दोन वेड्यांमुळे मला खूप काही बघायला मिळालय आणि या पुढे सुद्धा मिळेल हे नक्की. आयुष्यात कधी ट्रेकिंग न केलेली मी थेट 'सारपास'ला (हिमाचल प्रदेश) गेले ते या दोघांमूळे. कळवा ते ठाणा, फार-फार तर ठाणे ते अंधेरी हाच सगळ्यात मोठा बाईक वरून केलेला प्रवास. त्यानंतर केला तो राजमाची आणि मग थेट लडाख. माझ्या आयुष्यातल्या या क्षणांमूळे या दोघांच खूप मोठ देणे लागते मी."


"रोज रात्रीची मिटिंग, दिवसाचा क्वार्टर मास्टर कोण बनणार?, डे लीडर कोण बनणार? उदया कस सुटायच याची ठरवा-ठरव, अभि भडकलेला तो प्रसंग, माझी आणि अमेय साळवीची बाईकवरची अखंड बडबड, पांगोंगचा ट्रक प्रवास आणि नंतरच शब्दात पकड़ता न येण्यासारखे दृश्य, मोनेस्ट्रीच शांत आणि हजारो वर्षांपूर्वीच्या काळात नेणार वातावरण, त्सो-मोरिरीला जाताना आर्मीच्या जवानाने बळे-बळेच दिलेले ड्रायफ्रूट्स आणि बिस्किट्स, फोटु-लाची न संपणारी पर्वत रांग, मनाली ते चंडीगढ़मधे अभिला आलेली प्रचंड झोप, तेंव्हा माझ्या आणि अमेयच्या फूल-टू सुटलेल्या गप्पा आणि असे बरेच अनुभव."


"लडाख म्हटला की मनात गर्दी होते आठवणींची. हे १३ दिवस एका दुसऱ्याच जगात वावरत होतो आम्ही."

Friday 27 November 2009

लडाखचा सफरनामा - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !




पहाटे-पहाटे खोलीच्या छतामधून बारीक माती पडू लागल्याने मला आणि अभिला जाग आली. काय होतय ते समजतच नव्हते. नंतर कळले की छपरावार कोणीतरी नाचत असल्यामुळे असे होत आहे. ते कोणीतरी म्हणजे अमेय साळवी, अमेय म्हात्रे  आणि कुलदीप होते हे नंतर कळले. पहाटे-पहाटे फोटो काढायला हे तिघे छपरावार चढले होते. मला जाग आल्यावर मी इतर सर्वांना जाग आणली हे वेगळे सांगायला नकोच. ७ वाजता चहा घेउन आम्ही निघायची तयारी करू लागलो. पण पूनम काही सापडेना. कुठे गेली होती काय माहीत? नंतर ह्या तिघांचे अजून उपद्व्याप समजले. पूनम सुद्धा छतावर चढल्यानंतर ह्यांनी खालची शिडीच काढून घेतली होती. १५-२० मिं. वरतीच बसून होती. आरडा-ओरडा करत होती. शेवटी तिला खाली घेतले आणि ८ वाजता आम्ही सरचूच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी त्सो-मोरिरीचे सौंदर्य कालच्यापेक्षा वेगळे भासत होते. कालच्या कच्च्या रस्त्याने पुन्हा त्सो-मोरिरीला वळसा मारत आम्ही वाळूच्या पठाराकडे निघालो. वाळू कालपेक्षा जास्त भुसभूशीत जाणवत होती. आमच्या बाईकचा स्पीड फारतर तासाला २० किमी. इतका सुद्धा नव्हता. तेनसिंगला मात्र त्या कच्च्या रस्त्यावरून निघायची भलतीच घाई झाली होती बहुदा. अखेर त्याने चुक केलीच. वाळूच्या त्या रस्त्यात त्याने गाड़ी भलत्याच चिकिच्या बाजूने नेली आणि ...सामानाच्या वजनाने ती अख्खी गाड़ी वाळूमध्ये बसली. त्यात तेनसिंगने गाड़ी काढ़ण्यासाठी ती अजून रेस केली. आता तर ती अक्षरशः रुतली. मागुन येणाऱ्या बायकर्सना ह्याची काही कल्पनाच नव्हती. 'बाजुच्या दुसऱ्या रस्त्याने पुढे या' असे सांगायला दिपाली आम्हाला हातवारे करत होती. अभीला काही ते कळले नाहीत आणि तो पण त्याच रस्त्याने पुढे शिरला. आता त्याची बाईक सुद्धा वाळूत फसली. मग मात्र बाकी आम्ही सर्वजण उजव्या हाताने पुढे गेलो. बघतो तर.. गाड़ी अख्खी बसलेली. पुन्हा एकदा सर्व सामान उतरवले आणि मग 'इरादा पक्का तर दे धक्का' सुरू झाले. आजुबाजुने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा आमच्या मदतीला आले.अखेर अखेरचा 'दे धक्का' करून गाड़ी चांगल्या रोडला आणली.




त्यानंतर आमची हालत काय झाली होती ते खालच्या फोटोंवरुन समजेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिकडे असे सणसणीत ऊन होते की चांगलीच धाप लागली होती. पाणी प्यालो.. ताजेतवाने झालो आणि मग पुढे निघालो. चांगला १ तास वाया गेला होता.













आता लवकरात लवकर त्सो-कार मार्गे पांग गाठणे महत्वाचे होते कारण तिकडून पुढे आम्ही दुसरी गाडी केली होती. तेनसिंगला पुन्हा आज लेहला पोचायचे असल्याने तो आम्हाला १२ च्या आत सोडणार होता. पुन्हा एकदा वाळूचे पठार पार करत पक्या रस्त्याला लागलो आणि वेगाने 'सुमधो'कडे निघालो. १० वाजून गेले तेंव्हा फाट्यापाशी आलो. इकडून डाव्या हाताने 'त्सो-कार'कडे निघालो. इकडून पुढचा रस्ता चांगला असेल असे वाटले होते पण नाही; पुढचा रस्ता परत कच्चा आणि वाळूचा. बाईकचा स्पीड देखील २५-३० च्या पुढे नेता येत नव्हता. अशात रस्ता मध्येच खाली-वर जायचा तर कधी अचानकपणे उजवी-डावीकडे. अश्यावेळी मागच्याला बाईक वरुन इतरून चालत यावे लागायचे तर कधी-कधी रायडरला सुद्धा बाईक ढकलत पुढे न्यावी लागायची. ११:३० च्या आसपास अचानकपणे एके ठिकाणी मला गाडी काही कंट्रोल झाली नाही आणि मी-शमिका डाव्या बाजूला वाळूमध्ये धसकन पडलो. इतक्या सावकाश पडलो की कोणालाच काही लागले नाही पण कपड्यात सर्व ठिकाणी वाळू मात्र शिरली. गाडी चालवण्यात आजपर्यंत एकदा सुद्धा ब्रेक न घेतलेल्या अमेय साळवीने त्याची बाईक आता उमेशकडे दिली होती. मी पडल्यावर काही मिंनिट्स मध्ये एका उजव्या चढावर उमेश आणि शोभीत सुद्धा वाळूमध्ये पडले. उमेशच्या हाताला आणि पोटाला मात्र थोड़ेसे लागले होते. सर्वजन तिकडेच थांबलो. ज़रा दम घेतला. 'बरेचदा अपघात परतीच्या प्रवासात होतात'  हे मला पक्के ठावुक होते. त्यामुळे 'ह्या पुढे गाडी अजून नीट चालवा रे' असे सर्वांना सांगून आम्ही पुढे निघालो. निघून ५ मिं. होत नाहीत तो आदित्य-ऐश्वर्याने पुढचा नंबर लावला. कुठूनसा एक कुत्रा भुंकत आला आणि दचकून आदित्यचा तोलच गेला.

त्सो-कारच्या त्या वाळवंटामध्ये अवघ्या १५ मिं मध्ये आम्ही एकामागुन एक असे आम्ही ३ बायकर्स धडपडलो होतो. नशिबाने कोणालाही जास्त लागले नव्हते. गाड्या सुद्धा शाबूत होत्या. कधी एकदाचा हा कच्चा रस्ता संपतोय आणि पक्क्या रस्त्याला लागतोय असे आम्हाला झाले होते. १२ वाजत आले तसे दुरवर त्सो-कार दिसायला लागले. सकाळी १ चहा घेउन निघलेलो आम्ही ह्या आशेवर होतो की किमान त्सो-कारला तरी काही खायला मिळेल. त्सो-कारला उजव्या बाजूने वळसा मारत पुढे निघालो. रस्ता ज़रा बरा होता म्हणुन सर्व बायकर्स वेगाने पुढे निघाले. मी मात्र फोटो घ्यायला ज़रा मागे थांबलो. काही वेळातच काळा कुळकुळीत असा नविनच बांधलेला पक्का डांबरी रस्ता सुरू झाला. 'अरे वा... चमत्कारच आहे ...' असे बोलून मी सुद्धा फटकन बाईकचा वेग वाढवत पुढच्यान्ना गाठले. अवघ्या १ किमी अंतरावर तो 'पक्का डांबरी रस्ता' संपला पण उजव्या बाजूला एक टेंट सदृश्य होटेल दिसले. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. :D



बाईक्स वरुन उतरलो तेंव्हा आमचा अवतार काय होता... बाईक वर वाळू, सामानावर वाळू, कपड्यांवर - बूटात - अंगावर सर्वत्र वाळूच-वाळू. वाळूमय झालो होतो आम्ही पूर्णपणे. हात आणि तोंड धुवून जेवायला बसलो. 'जे असेल ते आण रे' ... सवयीप्रमाणे तोंडातून वाक्य गेलं. बघतो तर काय... इकडे तर रोटी/चपाती, मसूरची आमटी, भात, अंड आणि मग्गी. वा. मस्त जेवण झाले. तिकडून निघालो तेंव्हा १ वाजून गेला होता. म्हणजे तेनसिंगने गाडी पांगला पोचवली सुद्धा असणार. आता आम्हाला सुद्धा लवकरात लवकर पांगला पोचणे आवश्यक होते. नशीब पुढचा रस्ता परत पक्का होता. १० मिं. मध्ये रस्त्यावर तेनसिंग गाडी घेउन उभा असलेला दिसला. म्हटले हा अजून इकडे काय करतोय. बघतोय तर गाडी मध्ये सामान नहीं की इतर टीम मेम्बर्स सुद्धा नाहीत. तेनसिंग त्यांना मेनरोडला पुढच्या गाड़ी मध्ये बसवून पुन्हा आम्हाला बघायला मागे आला होता. शिवाय पांगच्या दिशेने जाणारा एक शोर्टकट सुद्धा त्याला आम्हाला दाखवायचा होता. अजून एक वाळूने भरलेला कच्चा रस्ता.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - २१ लूप्स टू सरचू ... !.
.
.

Thursday 26 November 2009

लडाखचा सफरनामा - 'त्सो-मोरिरी' अवर्णनीय असे ... !

मोहिमेच्या ९ व्या दिवशी अखेर आम्ही लेह सोडून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. जम्मू ते लेह ह्या ४ दिवसाच्या आणि लेह मधील ४ अश्या एकुण ८ दिवसात अनेक अनुभव घेउन आम्ही मनाली मार्गे दिल्लीसाठी निघालो होतो. गेल्या ८ दिवसात कारगिल - द्रास, नुब्रा - खर्दुंग-ला, पेंगोंग - चांग-ला अश्या अनेक ठिकाणी भेट देऊन तृप्त झालेले आम्ही आता 'त्सो-मोरिरी'कडे निघालो होतो. लेह-लडाखला येणारे ९९ टक्के लोक मनालीमार्गे 'सरचू'वरुन लेहला पोचतात. आम्ही मात्र नेमका उलटा मार्ग घेतला होता तो ह्या 'त्सो-मोरिरी'साठी.वाकड्या मार्गाने पुन्हा एकदा चीन सीमारेषेवर जायचे आणि मग तिकडून 'त्सो-कार'च्या रस्त्याने खाली सरचूला उतरायचे असे आमचे ठरले होते.


सकाळी नाश्त्याला सर्वजण हजर झाले तेंव्हा ऐश्वर्याला लक्ष्यात आले की गेले २-४ दिवस झाले तिचा 'चीज'चा डब्बा दिसत नाही आहे. "तूला माहीत आहे का रे?" तिने आदित्यला विचारले. तितक्यात दीदी बाहेर आल्या आणि त्यांनी विचारले, "क्या धुंड रहे हो?" तर अमेय हाताने चौकोनी आकार दाखवत बोलला,"वो त्रिकोणी डब्बा था न. वो कहा है?" आता डब्बा होता चौकोनीच. हाताने त्याने सुद्धा चौकोन दाखवला पण बोलला मात्र त्रिकोणी. मी म्हटले काय रे,"आज इतक्या दिवसांनी विरळ हवेचा त्रास व्हायला लागला की काय? हा.. हा.." असो तो डब्बा काही शेवटपर्यंत मिळाला नाही. बहुदा ऐश्वार्याने रात्री झोपेमध्येच तो संपवला असावा. तिलाच लक्ष्यात नसेल बहुदा. हाहा...

८:३० च्या आसपास आवरून झाल्यावर बाइक्स वर सामान लोड केले. गाड़ीचे काही काम असल्याने आम्ही उशिराने निघणार होतो. मी-शमिका, पूनम, साधना आणि शोभित गाडीमधून जाणार असल्याने मागे थांबलो. शिवाय मला शिवायला दिलेले टी-शर्ट सुद्धा घ्यायचे होते. बाकी सर्वजण बाइक्सवर पुढे निघाले. जाण्याआधी 'नबी'च्या फॅमिलीसोबत एक ग्रुप फोटो काढायला आम्ही विसरलो नाही. गेल्या ५ दिवसात खरच अगदी घरच्यासारखे राहिलो होतो आम्ही इकडे. त्यांचा मुलगा असीम तर आम्हाला सोडायला तयारच नव्हता. शेवटी एका मोठ्या चोकलेटवर आम्ही आमची सुटका करून घेतली.पण त्याने पुन्हा यायचे प्रोमिस आमच्या कडून घेतलेच. गाडीचा ड्रायव्हर तेनसिंग गाडी घेउन गेला. तो आम्हाला मार्केट मध्ये मुख्य कमानी खाली भेटणार होता १०:३० ला भेटणार होता तेंव्हा आम्ही सुद्धा शेवटची धावती खरेदी आटपायचे ठरवले. टी-शर्ट साठी इब्राहीमभाईकडे पोचलो तर ते काही तयार नव्हते. जेवढे होते तेवढे घेतले आणि बाकी  सरळ माझ्या घरच्या पत्यावर पाठवून द्यायला सांगितले. उरली-सुरली कामे आटोपली आणि आम्ही सुद्धा ११ वाजता त्सो-मोरिरीच्या दिशेने निघालो.


-आम्ही निघालोय हे सांगायला अभीला फोन लावतोय तर तो काही लागेना तेंव्हा बायकर्स आतल्या रस्त्याला लागले हे समजुन आले. आता लवकरात लवकर अंतर गाठून बायकर्सना कधी गाठतो ते बघायचे होते. तासाभरात म्हणजे १२ च्या आसपास 'उपशी'ला पोचलो होतो. इकडून एक रस्ता मनाली कडे जातो तर दूसरा 'सुमधो' मार्गे 'त्सो-मोरिरी'कडे. सुमधो च्या मार्गाने आम्ही पुढे निघालो तशी सिंधुनदी पुन्हा आमच्या सोबत यायला निघाली. कधी आमच्या सोबत वहायची तर कधी आजुबाजुच्या डोंगरांना वळसा मारत उलट्या दिशेने वाहत जायची. दुपारी १:१५ च्या सुमारास उपशी - सुमधो मार्गावरील 'गयाक' हे महत्वाचे गाव लागले. पण इकडे काहीतरी खायला मिळेल ही आशा खोटीच निघाली. गाडीमध्ये सोबत जे काही होते ते खात-खात तसेच पुढे निघालो. बायकर्सचा सुद्धा पत्ता नव्हता. किती पुढे निघून गेले होते काय माहीत. फोन सुद्धा लागत नव्हते कोणाचे. इतक्यात २ च्या सुमारास 'कियारी' गावापासून ६ किमी. अंतरावर आमची गाडी बंद पडली. सर्व प्रयत्न करून झाले पण काही केल्या सुरू होईना. १ तास असाच वाया गेला. मागुन दुसरी गाडी पाठवायला आम्ही दुसऱ्या एका गाडीसोबत निरोप सुद्धा धाडला. पण निरोप जाउन दुसरी गाडी यायला किमान ३ तास जाणार ह्या अंदाजाने आम्हाला इकडेच संध्याकाळ होणार हे समजुन आले होते. पुन्हा एकदा वेळेचा बट्याबोळ.



असेच रस्तावर बसलो असताना समोरून आर्मीचा कोन्व्होय येताना दिसला. त्यातील जवानांनी थांबून चौकशी केली आणि पुढे 'कियारी चेक पोस्ट जा' कोणीतरी ते फोन लावून देतील असे सांगितले. मग शोभित मागुन येणाऱ्या एका गाड़ीतून पुढे गेला. आम्ही बाकी सर्व तिकडेच बसलो होतो. इतक्यात मागुन अजून एक ट्रावेल्सची गाडी आली. त्यातला ड्रायव्हर तेनसिंगच्या ओळखीचा होता. त्याने चक्क गाडी चालू करून दिली. स्पार्कप्लग मध्ये काहीसा प्रॉब्लम होता. ३ वाजून गेले होते आणि आम्ही अजून त्सो-मोरिरी पासून बरेच लांब होतो. आता अगदी जेवायला सुद्धा कुठेही थांबणे शक्य नव्हते. गाडी सुरू झाल्यावर पुढच्या १० मिं मध्ये कियारी चेकपोस्टला पोचलो. तिकडे शोभित सुद्धा भेटला. कियारी चेकपोस्टला A.S.C. म्हणजेच 'आर्मी सप्लाय कोअर'चा मोठा बेस होता. सध्या तिकडे Bombay Sapers 128 Field Coy स्थित आहे. तिकडच्या सुभेदारने आमची बरीच मदत केली.२-३ तास आधी मुंबईचे काही बायकर्स सुद्धा इकडून पुढे गेले आहेत असे सुद्धा त्यांच्याकडून कळले. भुकेले बायकर्स सुद्धा इकडे थांबले होते. सुभेदारने दिलेले काजू-बदाम आणि केळी खाऊन मग पुढे गेले होते. पण त्या आधी तो सुभेदार शिव्या द्यायला विसरला नव्हता. 'कयू आतेहो यहाँ? क्या देखने? है क्या यहाँ? नंगे पहाड़? पैसा बहोत है क्या तुम्हारे पास. हम को तो आना पड़ता है लेकिन तुम कयू आतेहो?' उद्विग्न मनाने बोलत होता बहुदा. एकजण धीर करून बोलला 'आपसे मिलने आये है साबजी' तसा एकदम खुश झाला आणि मग काजू-बदाम- केळी. ती स्टोरी ऐकून तिकडून निघालो. आवश्यक फोना-फोनी झाली होती. ३:३० होउन गेले होते. अजून सुद्धा बरेच अंतर जायचे होते. केशर, नुर्नीस अशी गावे मागे टाकत आम्ही 'किदमांग'ला पोचलो. डोंगरांनी आपला रंग आता बदलला होता. काळ्यावरुन आता ते जांभळ्या रंगाचे झाले होते. उजव्या बाजूला सिंधुनदी तर डाव्या बाजूला जांभळ्या रंगाचा सडा पसरला होता. त्यांच्यावरुन ऊन परावर्तित झाले की ते लख-लख चमकायचे.

त्या डोंगरांच्या सोबतीने आम्ही ४:३० च्या आसपास 'चूमाथांग'ला पोचलो. पोटात सणसणीत भूक लागली होती. स्त्याच्या दोन्ही बाजूला २ होटल्स बघून आम्ही 'जेवायला थांबुया' असे बोलायच्या आत तेनसिंगनेच गाडी थांबवली. 'खाना खाके आगे जायेंगे' असे बोलून तो उतरला. आम्ही सुद्धा भुकेले होतो. आता इकडे जे मिळेल ते खाऊन पुढे जायचे होते. नेहमी प्रमाणे माग्गी आणि चावल-राजमा. बायकर्स सुद्धा इकडेच जेवून आत्ताच पुढे गेले आहेत असे कळले. २० मिं मध्ये तिकडून जेवून पुढे निघालो आणि ५ वाजता 'माहे' चेक पोस्ट गाठली. तिकडे एंट्री केली आणि 'सुमधो'कडे निघालो. अर्ध्यातासात 'सुमधो' गावात पोचलो. इकडून एक रस्ता 'त्सो-कार'मार्गे पांग-मनालीकडे जातो तर दूसरा आत 'कार्झोक'ला. ७ वाजायच्या आत 'कार्झोक' म्हणजेच त्सो-मोरिरीच्या काठाला असणाऱ्या गावात आम्हाला पोचायचे होते. अजून सुद्धा चक्क ६० किमी अंतर बाकी होते. पाहिले २५ किमी.चा रस्ता चांगला आहे पण नंतरचा कच्चा आहे असे तेनसिंग बोलला होता. 'अब थोडा संभालके बैठो. मै गाडी भगाने वाला हू. अँधेरा होने से पाहिले हमें कार्झोक पहुचना होगा. नहीं तो एंट्री नहीं मिलेगी' असे बोलून त्याने गाडी सुसाट मध्ये घेतली. चांगला रस्ता कमीतकमी वेळेत त्याला पार करायचा होता. तेनसिंगची बडबड सुरूच होती, 'इस ढलान से निचे जायेंगे तो कैमेरा तयार रखना. त्सो-मोरिरी दिखने वाला है आपको पहिली बार. आप फोटो तो निकालेंगे ही. लेकिन ज्यादा टाइम नहीं है अपने पास.' आता आम्ही कैमरे सरसावून बसलो ते त्सो-मोरिरी च्या पहिल्या दर्शनासाठी. आणि पाहतो तर काय ... निळ्याशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरांची रेखीव अशी मांडणी. काही हिमाच्छादित तर काही रांगडे. उघडे-बोडके असले तरी आगळेच असे सौंदर्य. मावळतीच्या उन्हाची एक चादर त्यावर पसरली होती. डोळेभरून ते दृश्य पाहून घेतल्यावर कामेर्यात सुद्धा पकडले आणि पुढे निघालो.





.
.


आता पुढे तर संपूर्ण कच्चा रस्ता होता. माती आणि भुसभुशीत वाळू. वाळूचे एक मोठेच्या मोठे पठारच. एकामागुन एक वेगवेगळे  डोंगर, रस्ते बघत आम्ही जगावेगळे अनुभव घेत होतो. त्सो-मोरिरीच्या वरती डाव्या बाजूला दुरवर आता एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र ढगाने स्वतःचे अस्तित्व बनवले होते. एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या ब्रशने आकाशात एक चित्र निर्माण करावे असा तो पसरला होता. आम्ही जस जसे पुढे जात होतो तसतसे त्या ढगचे रंग बदलत होते. मावळती बरोबर आता सूर्य सुद्धा त्यात स्वतःचा लालसर रंग भरत होता. काही क्षणात पचिमेकड़े कडा पूर्ण लालसर झाली आणि त्याचे प्रतिबिंब त्सो-मोरिरीमध्ये चमकू लागले. ढगाने आणि पाण्याने स्वतःचे आधीचे रंग बदलत नवे रंग धारण केले. निसर्गाचा तो खेळ बघत बघत आम्ही त्सो-मोरिरी च्या अगदी काठावर पोचलो. पुढे गेलेले बायकर्स सुद्धा इकडेच भेटले आम्हाला. आता त्सो-मोरिरीला शेवटचा वळसा मारत आम्ही 'कार्झोक'कडे निघालो. त्सो-मोरिरी म्हणजेच कार्झोक १५०७५ फुट उंचीवर आहे.



बरोबर ६:५० ला आम्ही कार्झोक चेक पोस्टला एंट्री केली आणि रहायच्या जागेच्या शोधात निघालो. इकडे राहण्यासाठी टेंट्स आहेत हे आम्हाला माहीत होते पण ते ३५००/- (डबल बेड) इतके महाग असतील हे नव्हते माहीत. याचे कारण असे की या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये भारतियाँचे प्रमाण अत्यल्प आहे. येथे सर्व फिरंगी येतात. पुढे कार्झोक गावात स्वस्तात 'होम स्टे' मिळेल असे त्याने आम्हाला सांगितले. पुढे बघतो तर काय... इतक्या आत आडवाटेला १००० च्या आसपास लोकवस्ती असलेले गाव असेल असे आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. ते सुद्धा स्वतःची बाजारपेठ असलेले. पुढे कार्झोक गावात 'मेंटोक' म्हणुन छोटेसे १ मजली 'गेस्ट हॉउस' सापडले. अवघ्या ४००/- एक खोली. जेवायला सुद्धा बनवून देऊ असे म्हणाले पण शमिका आज जेवण बनवायच्या मुड मध्ये होती. 'तुम्ही फ़क्त सामान दया. आम्ही घेऊ बनवून' असे बोलली. तिला मदत करायला पूनम सुद्धा किचन मध्ये शिरली. बाकी मी, अभी, उमेश, आशिष फोटो ट्रांसफरच्या कामाला लागलो होतो. तर दमलेल्या ऐश्वर्या आणि साधना कधीच झोपी गेल्या होत्या. जेवणाआधी मस्त पैकी चहा-कॉफी झाल्याने सर्वच ताजेतवाने झाले. रात्री १० च्या आसपास शमिका आणि पूनमने बनवलेले चविष्ट जेवण जेवून आम्ही सर्व निद्राधीन झालो. संध्याकाळी त्सो-मोरिरीच्या नितांत सुंदर दर्शनाने पेंगोंगच्या वेळचे दुख्ख थोडे कमी झाले होते. तिकडे नं देता आलेली वेळ इकडे थोड़ी भरून निघाली होती. परतीच्या प्रवासाचा पाहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता उदया लक्ष्य होते काश्मिरला अलविदा करत पांगमार्गे 'सरचू' गाठायचे.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !.
.
.
.

Thursday 5 November 2009

लडाखचा सफरनामा - 'मनाली'च्या मनातला ... !

लडाखला जाण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्तवेळ हा 'लडाखचा सफ़रनामा' लिहायला लागतोय. काही-ना-काही बारीक-सरिक छोटी-मोठी अडचण येते आहे आणि वेळ जातोय. लिखाणाला वेळ देता येत नाही आहे. असो पण मी लिहित नसलो तरी मागे म्हटल्याप्रमाणे आता आमच्या लडाख मोहिमेमधले एक-एक भिडू त्यांच्या मनातले विचार लिहू लागलेत. अमृता पाठोपाठ आता 'मनाली'ने तिच्या मनातले 'लडाखचे भावविश्व' शब्दबद्ध करून पाठवले आहे. माझ्या हातून सुटलेल्या काही गोष्टी तिने इकडे नेमक्या टिपल्या आहेत.
.
.
.


"गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधील गोष्ट. आम्ही Y.H.A.I. - 'वाय एच ए आय'च्या कुंभळगड ट्रिपवरुन परतलो होतो. थोडेच दिवस झाले असतील आणि एक दिवस अभि अचानक म्हणाला, "पुढल्या वर्षी जून नंतर आपण लडाख ट्रिप करायची आहे. रोहन आणि माझा कधीपासून विचार आहे, पण पुढल्या वर्षी होऊनच जावूदे." त्यावेळी मनात आनंदाच्या, उत्साहाच्या आणि भीतीच्या कितीतरी भावना एकदम येऊन गेल्या. आम्ही आमचा हा बेत जेव्हा आमच्या मित्र-मैत्रिणींना, घरच्या मंडळींना आणि ऑफीस मधील सहकाऱ्याना सांगितला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देखील हजार प्रश्न उमटून जायचे. जसे, लेह लडाख आले कुठे? भारतात की भारताबाहेर? पासपोर्ट-विज़ाचे काम झाले काय? ट्रेक आहे की ट्रिप आहे? बाइक ट्रिप म्हणजे मनाली तू सुद्दा बाइकवरुनच जाणार का? जमेल का तुम्हाला? लेह लडाख म्हणजे काश्मिरजवळ, मग ते कितपत सुरक्षित आहे? असे एक-ना अनेक प्रश्न. सुरवातीला मला देखील हे प्रश्न पडले, कारण लडाखला आपण फिरायला जाउ, असा मी कधी विचारच केला नव्हता. पण जेव्हा अभि मला म्हणाला की "आपण लडाखला जातो आहोत" तेव्हा मला जाणवला तो त्याचा स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास, की आपण हे करू शकतो. मग मला हे प्रश्न पुन्हा पडले नाहीत."

"साधारणतः जानेवारी ०९ पासून अभिने कामाला सुरवात केली. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाइट्सना भेट देणे, लडाख भागातील माहिती मिळवणे, जायचा-यायचा मार्ग ठरवणे, एकंदर खर्चाचा अंदाज घेणे, अशा एक ना दहा गोष्टी. त्याने गोष्टींचा आढावा घेतला आणि पहिला ई-मेल पाठवला तो या ट्रिपमध्ये सहभागी होऊ ईच्छिणार्‍याची यादी तयार करण्यासाठी. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. "आम्ही यायला तयार आहोत" असे म्हणणार्‍याची संख्या खूप होती, पण प्रश्न होता सुट्ट्यांचा. मग आम्ही 'शिवाजीपार्क'वर भेटायच ठरवले, म्हणजे सगळ्यांच मुद्यांवर बोलता येईल. या भेटीनंतर बर्‍याच गोष्टी ठरल्या. त्यानुसार ट्रिपचा कालावधी जून बदलून ऑगस्ट ७ ते २२ असा पक्का झाला. आधी ठरलेला मार्ग दिल्ली-मनाली-लेह-कारगिल-श्रीनगर-जम्मू असा होता. तो बदलून जम्मू-श्रीनगर-कारगिल-लेह-मनाली-दिल्ली असा ठरला. आधी आमचा प्लान तेथून बाइक्स भाड्याने घ्यायच्या असा होता पण नंतर आपल्याच बाइक्स इथून लोड करायच्या असे ठरले. ( काय आमच्या बाइक्सचे भाग्य!!! नाही???) सहभागी होणर्‍याचा आकडा मात्र सतत बदलत होता. जो आधी २० होता तो कधी १५ तर कधी १० वर यायचा."

"लग्नाआधी आणि लग्नानंतरही ट्रिपची आखणी करताना मी पहिल्यांदाच इतक्या जवळून आभिला पाहत होते आणि त्यातच माझ्या जॉबमुळे मला त्याला पुरेशी मदत करता येत नव्हती. १५ जणांसाठी १५ दिवसांची ट्रिप तिही लडाखसारख्या ठिकाणी !!! हे काही सोप्पे काम नव्हते. त्यातून ट्रिपमद्ये सहभागी होणर्‍याचा प्रतिसाद वेळच्यावेळी नाही आला की अभिला निर्णय घ्यायला उशीर होत असे. मग त्याची चिडचिड होई. पण या गोष्टी होणार याची त्याला जाणीव होती आणि तरीही आपली ट्रिप चांगली होणार असा विश्वासही होता. एक दोनदा त्याने मला बोलूनही दाखवले की रोहन भारतात असता तर बरे झाले असते. अशी ही लडाख बाइक ट्रिप माझ्यासाठी आधीपासूनच सुरू झाली होती. ही बाइक ट्रिप असल्याने पुरेसा सराव असणे गरजेचे होते. जसे सलग काही तास बाइक चालवणे, तितका वेळ बाइक वर मागे बसणे, गाडीमध्ये काही खराबी आल्यास ती दुरुस्त करणे, इत्यादी इत्यादी. म्हणून आम्ही २-४ सराव ट्रिप्स करायचे ठरवले. त्यानुसार आमची पहिली सराव ट्रिप झाली ती 'राजमाची' येथे (आणि तीच आमची शेवटची सराव ट्रिप ठरली) पण तो अनुभव आम्हाला पुरेसा होता."

"जरा विचार करा ट्रिप आधीचे इतके सारे अनुभव मी तुम्हाला सांगू शकते, तर ट्रिपमध्ये आम्ही किती धमाल केली हे सांगायला मला रोहन सारखा ब्लॉगच लिहावा लागेल... नाही!!! घाबरू नका, मी काही ब्लॉग नाही लिहिणार, पण माझे अनुभव थोडक्यात सांगते. मला सांगायला खूप आनंद होत आहे की ही आमची ट्रिप खूप सुंदर झाली आणि आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली. आम्ही श्रीनगर सोडले आणि लडाखच्या दिशेने प्रयाण केले आणि एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले डोंगर.. कधी काळा कातळ, कधी दगड, कधी रूपेरी वाळू असे त्यांचे वेगवेगळे प्रकार. ओसाड वैराण जमीन. या ट्रिप दरम्यान आम्ही अनेक नवीन ठिकाणे पहिली. जसे जोझीला, चांगला, खारदुंगला, फोतुला, रोहतांगला असे पास म्हणजे खिंडी, तिकडची सरोवरे म्हणजे 'त्सो' जसे पॅनगॉँग-त्सो, मोरिरि-त्सो. तसेच तेथील लामांची प्रार्थना मंदिरे एत्यादी. ही ठिकाणे पहाणे जितके सुंदर होते, तितकेच तिथे पोहचणे देखिल रोमांचकरक होते."

"आम्हा सर्व मित्रमंडळींची १५ दिवसांची १५ जणांची अशी ही पहिलीच ट्रिप होती. सगळेच ओळखीचे होते. मित्र किंवा मित्रांचे मित्र. बाइक वरुन फिरताना, वेगवेगळ्या ठिकाणाना भेट देताना एकूणच सुंदर अनुभव होता. या ट्रिपमध्ये मला नवीन मित्र मिळाले आणि जुन्या मित्रांचे नवे पैलू कळले."


"आमच्या या प्रवासाचे काही क्षण अत्यंत हृदयस्पर्शी होते. आम्ही या ट्रिपचा कालावधी ७ ते २२ ऑगस्ट असा ठरवीला, कारण 'ऑपरेशन विजय' जे 'कारगिल युद्ध' म्हणून ओळखले जाते; त्याला जुलै ०९ मधे १० वर्षे पूर्ण झाली. दुसरे विशेष कारण असे की यंदाचा स्वातंत्रदिन आम्ही याच भागात साजरा केला. यामुळे आमच्या प्रवासाला एक ध्येय मिळाले. प्रवासात ठराविक अंतरावर महत्वाच्या ठिकाणी आर्मी चौकया लागायच्या. वाटेत किती वेळा आम्हाला बंदुकधारी जवान, त्यांच्या जीप, कॉनवाय्स, बोफोर्स तोफा असे बरेच काही पाहावयास मिळाले. सकाळच्या प्रहरी एक्सर्साइज़ करताना, उन्हात - वैराण जागी त्याना गस्त घालताना पहिले की माझे डोळे पाणवायाचे. त्याग, देशप्रेम, बलिदान यांसारखे शब्द जे केवळ पुस्तकात वाचले होते, ते प्रत्यक्षात पाहाताना काळीज भरून यायचे. आणि त्याना सलाम करायला नकळत हात वर उठायचे. लडाखवरुन परतल्यावर जेव्हा चिनी घुसखोरीच्या बातम्या कानावर आल्या त्यावेळी मनात एक कळ उठली. कारण आज मला जाणीव आहे की, हा आपलाच / आपल्या भारताचाच भाग आहे आणि त्यावर आक्रमण केले जात आहे. म्हणतात ना...

 अज्ञानात सुख असते, पण जेव्हा गोष्टी ज्ञात होतात, खरी बोच तेव्हाच लागते."


"याच ट्रिप दरम्यान मला स्वतःला उमगले की मी सुंदर फोटो काढू शकते. ट्रिप दरम्यान बाइक चालवण्याचे काम अभिकडे असायचे त्यामुळे कॅमेरा माझ्याकडे असायचा. सुरुवातीला चालत्या बाइक वरुन फोटो काढणे जमायचे नाही. कॅमेरा खाली पडेल / खराब होईल अशी भीती वाटायची. मग मीच बाइक वर स्वतःला सेट करून कॅमेरा नीट हाताळू लागले. आणि मग तर आजूबाजूचा निसर्ग पाहून कॅमेरा आत ठेवावा असे वाटेच ना. पाठीवर सॅक, कमरेला पाउच, डोक्यावर हेल्मेट आणि हातात ग्लॉव्स असतानाही फोटो घेताना हात थांबायाचे नाहीत. अशीही ही आमची 'लडाख बाइक ट्रिप' माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. या आठवणी आम्ही फोटोमधून, डॉक्युमेंटरी मधून साठवून ठेवल्या आहेत. असेच अनुभव पुढे येतील याची खात्री बाळगते. राहून राहून एकाच गोष्टीची खंत वाटते, ही बाइक ट्रिप करायच्या आधी मी माझे ड्राइविंग लाइसेन्स काढायला हवे होते... :( "
.
.
.