Friday, 4 December 2009

लडाखचा सफरनामा - सारांश .. अर्थात माझ्या मनातला ... !

गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा सफ़रनामा आजच्या ह्या पोस्टने संपतोय. आज हा सारांश पोस्ट लिहिताना माझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत??? अगदी मोकळेपणाने सांगायचे झाले तर मनात खुप समिश्र भावना आहेत. ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. हाहा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. ;) जितक्या जोमाने मी सप्टेम्बर – ऑक्टोबर  मध्ये लिखाणाला सुरवात केली तितक्या जोमात मला पुढे म्हणजे नोव्हेंबरमध्ये लिखाण करता आले नाही. त्यामुळे वाचकांची वाचण्याची लिंक तूटली हे नक्की. पण काही वाचकांनी माझ्याकडे पुढच्या लिखाणाची सारखी मागणी करत मला लिखाण लवकरात लवकर पूर्ण  करावयास हवे ही जाणीव करून दिली. त्या सर्वांचे खरच आभार.

लडाख मोहिमेच्या १३ दिवसांच्या आणि त्या आधीच्या तयारीचा सफरनामा मी अगदी मोकळेपणाने मांडला. पण आज थोड़े मनातले लिहायचे म्हटले आहे तर विचार काही करून कागदावर उतरायला तयार नाहीत. डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे नुसती. बघुया किती प्रश्न कागदावर उतरवता येतात आणि किती प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता येतात ते.

अगदीच सुरवात करायची झाली तर.. आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे  विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती  गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???


माझ्या दृष्टीने अगदी अपयश म्हणता नाही आले तरी हे पूर्ण यश नक्कीच नव्हते. अनेक उणीवा आणि त्रुटी त्यात राहिल्या. हवी तशी एकत्र सुरवात करता आली नाही आणि शेवट तर निराशाजनक ठरला. दिल्लीमध्ये 'इंडियागेट'ला 'अमर जवान ज्योती' येथे नतमस्तक होउन मोहिमेचा शेवट करायचा असे माझे मत होते आणि अभीने त्याला मान्यता दिली होती. पण तसे होऊ शकले नाही. कारणे काहीही असोत. पण ते धैय गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मी कधीच विसरु शकणार नाही. मला हे सुद्धा माहीत नाही की आमच्यापैकी किती मेंबर्सना त्याबद्दल वैषम्य वाटत असेल. मी मात्र आजही तितकाच खिन्न आहे जितका दिल्लीवरुन निघताना होतो. एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला की ती गोष्ट कशी पुर्णच गोड लागते, तसे काही येथे घडले नाही. पण ह्या सर्व गोष्टींकडे मी नकारात्मक दृष्टीने बघतोय असे नाही. सकारात्मक दृष्टीने बघायचे झाल्यास असे म्हणता येइल की ह्या चूकांमूळे आता आम्हाला ही किंवा अशीच एखादी मोहिम पूर्णपणे यशस्वी करून दाखवावी लागेल. तेंव्हा कुठे मन शांत होइल आणि त्याचे प्लानिंग सुरू देखील झाले आहे. (माझ्यापुरते)

आज ३ महिन्यांनी सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे...कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राद्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत.

ही ब्लॉगपोस्ट संपवायच्या आधी मला खास करून इकडे 'अभिजित'चा विशेष उल्लेख करायला अतिशय आनंद होतोय. गेल्या सर्व पोस्ट्समध्ये त्याने ह्या मोहिमेत किती मोलाची भूमिका बजावली हे वाचक जाणतातच. तरीसुद्धा त्याचा उल्लेख केल्याशिवाय ही पोस्ट संपवणे योग्य ठरणार नाही. ट्रिपच्या प्लानिंगपासून ते ट्रिप पूर्ण होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी त्याने एकट्याने ज्याप्रकारे पेलली (जे फ़क्त त्यालाच शक्य होते) त्यासाठी त्याला खरच हाट्स ऑफ. उगाच आभार वगैरे मानत नाही मी, कारण ते त्याला आवडणार देखील नाही. मी त्याला जमेल तशी मदत करेन असे जरी ठरले होते, तरीपण माझ्या कामाच्या व्यापामुळे ते शक्य तर झाले नाहीच, उलट माझा अधिक व्याप त्याला सहन करावा लागला. त्याने माझ्याकडे कुठलीही तक्रार न करता ट्रिपचाच एक भाग म्हणुन मान्य केला हा त्याच्या मनाचे मोठेपण.


आशिष म्हणजे माझा दादा आधी सुट्टी मिळत नसल्याने लडाखला येणार नव्हता पण अखेर मी त्याला येण्यासाठी तयार केलेच. तो असल्याने मला बाईक लोड करणे आणि परत आणणे याचे टेंशन राहिले नाही. त्याने ती जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडून माझ्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. उमेश, अमेय साळवी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप यांनी ह्या ट्रिपमध्ये अनेक उत्कृष्ट फोटो काढले. त्यांनी ते मला विनासायास येथे वापरायला उपलब्ध करून दिल्याबद्दल खरच धन्यवाद. शमिका आणि मनालीने माझ्या आणि अभीच्या मागे चालत्या बाईकवर बसून अनेक चांगले फोटो टिपले. मनालीने तर काही व्हीडिओस देखील घेतले जे मला ब्लॉगसाठी खुपच उपयुक्त ठरले. साधना आणि उमेशने ह्या मोहिमेचे IBN-लोकमतसाठी संपूर्ण शूटिंग केले जे २ भागात दाखवण्यात आले. त्यातला १५ ऑगस्टचा भाग तर अप्रतिमच झाला होता. ह्या ट्रिपमध्ये सर्वात जास्त मज्जा ज्यांनी केली ते दिपाली आणि शोभित. अभिला सर्वात कमी त्रास ह्या दोघांनी दिला असेल. नाहीच दिला असे म्हटले तरी हरकत नाही. आदित्य, पूनम आणि ऐश्वर्या ह्या अंबरनाथच्या टीमने देखील ह्या ट्रिपमध्ये जान आणली.

या लेखातून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या ब्लॉग लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की आमचा हा सफ़रनामा तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

आज हा सफ़रनामा संपतोय याचा अर्थ हा ब्लॉगसुद्धा बंद असा होत नाही. ह्या ब्लॉगचे नाव ‘माझे भारत भ्रमण’ असे आहे. तेंव्हा काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात माझी अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन... तो पर्यंत 'टाटा' ...
.
.
.

Thursday, 3 December 2009

लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !

'संपतोय की नाही' असे वाटणार्‍या त्या दिवसाचा अखेर काळ पहाटे ४ वाजता अंत झाला होता. त्यानंतर बिछान्यावर पडल्या पडल्या मला झोप लागली. पण तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... माझ्या अवघ्या मीटरभर बाजूला एसीच्या पॉवरसप्लायमधून प्रचंड धूर निघत होता. संपूर्ण खोली धुराने भरली होती. काही क्षणात तो आता पेट घेईल अशी वेळ आली होती. मी पटकन शमिकाला उठवले आणि सर्व सामानघेउन खोली बाहेर पडलो. सकाळी लगेच निघायचे असल्याने सर्व सामान बॅगेतच होते. बाजूच्या खोली मधून अमेय आणि कुलदीपला उठवून शमिकाबरोबर थांबायला सांगितले आणि मी पुन्हा खिडक्या उघडायला खोलीत शिरलो. त्या २-३ मिन. मध्ये धूर इतक्या प्रमाणात वाढला होता की आतसुद्धा जाता येत नव्हते. मी तसाच मागे आलो आणि वॉचमनला बोलवायला गेलो. ते दोघेतिघे आले आणि मग खालून मेन पॉवरसप्लाय कट केला तेंव्हा कुठे धूर यायचा थांबला. आम्ही मग दुसर्‍या खोलीत झोपायला गेलो. तास-दोनतास झोपून लगेच उठलो आणि आवरायला लागलो. ९ वाजता आम्हाला दिल्लीसाठी निघायचे होते ना.

कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. मी आज गाडीमध्ये बसायचा निर्णय घेतला आणि बाइक आशिषने घ्यायचे ठरले. निघायच्या आधी कुणाल आम्हाला भेटायला आला होता. त्याला खरंतर आम्हाला चंदिगढ फिरवायचे होते पण आम्हाला ते काही जमले नाही. त्याला टाटा करून हॉटेल वरुन निघालो आणि सर्वांनी गरजेपुरते पेट्रोल भरून घेतले. आणि मग सुरू झाला शेवटच्या २०० किमी.चा प्रवास. सकाळी निघताना नाश्ता केला नव्हता आणि लंचला कुठे थांबणार नव्हतो म्हणून एक 'ब्रंच' करायचे ठरले. अंबाला येथे हायवेलाच 'सागररत्न' म्हणून एक मस्त साउथ इंडियन हॉटेल आहे. तिकडे तासभर फूरसत मध्ये जेवलो. काहीच घाई नव्हती कारण दुपारी ४ पर्यंत दिल्लीगाठून 'इंडियागेट'ला पोचणे सहज शक्य होते. आम्ही कुरुक्षेत्र - पानिपत - सोनिपत पार करत वेगाने दिल्लीकडे सरकत होतो. खरं तर ह्या ठिकाणी सुद्धा जायचे होते मला. पण वेळे अभावी ते शक्य नव्हते. ४ वाजता आम्ही बरोबर आय.एस.बी.टी. (ISBT) पार करत दिलीमध्ये प्रवेश केला आणि आमचे स्वागत करायला वादली वारा आणि प्रचंड पावसाने तिकडे हजेरी लावली. पाउस अस्सा लागला की काही मिन.मध्ये सगळीकडे प्रचंड ट्रॅफिक जमले आणि पुन्हा एकदा आमच्या वेळेचा बोजवारा उडाला. बायकर्स कुठे आहेत? आपण कुठे आहोत याचा काही-काही पत्ता लागत नव्हता. ट्रॅफिक मध्ये २-३ तास असेच वाया गेले. अंधार सुद्धा पडला आणि 'इंडिया गेट'ला पोचायची शक्यता धूसर झाली.

८ वाजायच्या आधी आम्हाला बाइक्स स्टेशनला नेउन लोड करणे सुद्धा गरजेचे होते तेंव्हा आता सर्व बायकर्सनी थेट दिल्ली स्टेशन गाठायचे आणि गाडीने चाणक्यपुरी मधले  व्हाय.एच.ए.आई. (YHAI) गाठायचे असे फोनवर ठरले. मध्ये एकेठिकाणी राजपुताना रायफल्सचे मुख्यालय दिसले. देशाचा झेंडा हातात घेउन कारगिल युद्धात विजयश्री खेचून आणणार्‍या जवानांचे स्मारक पाहून गेल्या १२ दिवसांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. तिकडून मी गाडी घेऊन चाणक्यपुरीला पोचलो आणि जागा ताब्यात घेऊन सामान सेट केले. एव्हाना अभी, अमेय, आशिष, कुलदीप आणि आदित्य दिल्ली स्टेशनला बाइक्स लोड करायला पोचले होते. आमच्या बाइक्सचे पेपर्स नेमके माझ्याकडे असल्याने मला पुन्हा ते घेउन स्टेशनला जाणे भाग होते. शिवाय मला आणि शमिकाला तिच्या मामाकडे सुद्धा जायचे होतेच. मग आम्ही पुन्हा निघालो त्या ट्राफिक मधून रस्ता काढत. ह्यावेळी गाडी नव्हती, निघालो होतो रिक्शा मधून. कसेबसे ते स्टेशनला पोचलो. फोन वर, 'अरे इकडे SBI ATM च्या बाजूला उभा आहे रे, झाड, एक मोठे झाड दिसते का?' असे लैंडमार्क शोधत-शोधत भेटलो त्यांना. पेपर्स दिले आणि मामाकडे जाउन येतो म्हणुन तिकडून निघालो. विकासपुरीला मामाकडे पोचलो. त्यांना भेटलो. शमिकाला तिकडेच रहा आज. उदया सकाळी मी परत घ्यायला येइन, असे सांगून मी निघालो पुन्हा चाणक्यपुरीला यायला निघालो. ११ वाजता पोचलो तेंव्हा सर्वजण बाईक्स लोड करून पोचले होते. आता अखेरच्या सामानाची बांधाबंध सुरू झाली. 'अरे हे तुझे इतके दिवस माझ्याकडे पडले आहे. हे घे.' 'माझे नहीं आहे रे ते, कोणाचे काय-काय उचलतोस तू. तुलाच लक्ष्यात नसते' असे करत करत प्रत्येकाने आपापले आणि बहुदा काही दुसऱ्याचे सुद्धा सामान बांढले. मोजुन १-२ असलेल्या चार्जिंग पॉइंट्सवर बरेच मोबाएल वेटिंग वर होते. 'बास झाल रे इतका घरी जाईपर्यंत. आता हा लाव चल.' असे करता करता १ वाजून गेले. अर्धे झोपले म्हणुन मी आणि अभी लैपटॉप घेउन खोली बाहेर बसलो होतो. मी माझी आणि शमिची टिकिट्स बदलून संध्याकाळची करून घेतली.


पहाटे ३:३० वाजता सर्वांचा पुन्हा एकदा गलका सुरू झाला. पहाटे-पहाटे फ्लाइट्स असल्याने ४:३० पर्यंत निघणे आवश्यक होते. ४ वाजता बाहेर पडलो. जायच्या आधी साधनाने सर्वांचे बाइट्स रेकोर्ड करून घेतले. त्या सर्वांना सोडून मी, साधना आणि उमेश परत खोलीत येउन पडलो. साधना आणि उमेश ज़रा उशिराने दुसऱ्या फ्लाइटने जाणार होते. ते सुद्धा पहाटे ६:३० नंतर निघाले. जाता-जाता ते इंडियागेट वर काहीवेळ थांबून एक क्लोसिंग शोट घेउन मगच पुढे जाणार होते. ते दोघे गेल्यावर मात्र मला तिकडे १ क्षण सुद्धा जड जात होता. इतक्या दिवसात अश्या शांततेत एकता राहणे हे काय असते ते माहीत नव्हते ना. तिकडे ते १० जण एकाच फ्लाइटमधून मुंबईला निघालेले. काय गोंधळ घातला असेल फ्लाइटमध्ये देवजाणे. मी माझे सामान बांधले, चेकआउटच्या फ़ोर्मालिटीज पूर्ण केल्या आणि विकासपुरीला पोचलो. तिकडून दुपारच्या फ्लाइटने मी सुद्धा संध्याकाळपर्यंत १४ दिवसाच्या प्रवासानंतर 'जिवाची मुंबई' करत मुंबईला पोचलो. १४ दिवसांच्या एका अविस्मरणीय अश्या प्रवासानंतर मनात खुप विचार सुरू होते... आजही आहेत... आणि  पुढेही राहतील... ते विचार अजून तुमच्या समोर लिहायचे आहेत. तेंव्हा भेटूया लडाखचा सफरनामाच्या शेवटच्या भागात ... मोहिमेचा सारांश घेउन ...
.
.
.
अंतिम भाग : लडाखचा सफरनामा - सारांश .. अर्थात माझ्या मनातला ... !
.
.
.

Wednesday, 2 December 2009

लडाखचा सफरनामा - 'बियास'च्या सोबतीने ... !

विचार करता करता रात्री झोप कधी लागली समजलेच नाही. सकाळी बियास नदीच्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने जाग आली. पुन्हा एकदा निघायची तयारी सुरू केली. ८ वाजता नाश्ता करायला मार्केटमध्ये जायचे होते. अभी-मनाली आणि अमेय मात्र गाडी हायर करायला आधीच पुढे गेले होते. मार्केटमध्ये बारीक - सारिक खरेदी करून ११ च्या आसपास मनाली सोडायचे असे पक्के केले होते. नाश्ता झाल्यावर सर्वजण खरेदीला लागले तर मी, अभी आणि अमेय आमच्या ओळखीच्या एका मित्राला, 'गोकुळ'ला भेटायला गेलो. गोकुळ आम्हाला दिल्लीपर्यंत दुसरी गाडी करून देणार होता. त्याच्याबरोबर चहा पिता-पिता गप्पा मारत बसलो होतो. काल रात्रीपासून फोन सुरू झाले होते तेंव्हा अधूनमधून फोन सुद्धा येत होते. ह्या तासाभरात फोनवर बऱ्याच गोष्टी कळल्या. दिघेफळला विट्ठलचे वडील वारले होते. तिकडे दुसरीकडे शमिकाच्या दिल्लीच्या आजीचे दोन दिवसांपूर्वी देहावसान झाले अशीही बातमी कळली. एक बातमी चांगली येत नव्हती... आत्ता आम्हा दोघांना दिल्ली लवकरात लवकर गाठणे आवश्यक होते. पण त्याला किमान २ दिवस तरी लागणार होतेच. बायकर्सनी निघायला १२ वाजवले. तर गाडीमधून येणारे १ नंतर निघणार होते. तितक्या वेळात ते ओल्ड मनाली मधले हिडिंबा माता मंदिर पाहून आले. आम्ही मागच्या वेळी ते पाहिले असल्याने तिकडे काही वळलो नाही. आम्ही सरळ कुल्लू - भूंतरच्या मार्गाला लागलो. इतके दिवस आम्ही कमी रहदारीच्या भागातून बाईक्स चालवत होतो. आज मात्र रहदारी जास्त जाणवत होती. तेंव्हा जास्त वेगाबरोबर जास्त काळजी घेणे आवश्यक होतेच.
मनालीहून निघाल्या पासून बियास नदी आपल्याला सोबत करते. डाव्या हाताला नदी आणि उजव्या हाताला डोंगर आणि मध्ये 'S' आकाराच्या वळणा-वळणाचा रस्ता पतलीकूहल, कुल्लू करत भुन्तरपर्यंत जातो. आत्ता कुल्लूजवळ बियासनदीवर ब्रिज बांधल्यामुळे कुल्लू मार्केटमध्ये घुसावे लागत नाही. त्याने बराच वे ळ वाचतो. भुन्तरला पोचलो तेंव्हा २ वाजत आले होते. जेवायचा अजुन काही पत्ता नव्हता तेंव्हा किमान एक चहा घ्यावा म्हणून थांबलो. खरे तर ऐश्वर्याला सफरचंद घ्यायची होती म्हणून तिने सर्वांना थांबवले होते. सफरचंद घेतली पण चहा घेतलाच नाही. भलताच राडा झाला एकडे. रस्त्याच्या कडेला उभे असताना एका स्थानिक मुलाचा मनाली, साधनाला धक्का लागला (की त्याने जाणून बुजून मारला) ह्यावरून त्याची आणि अभीची बाचाबाची झाली. आणि मग ती बा-चा-बा-ची इथपर्यंत गेली आणि हाणामारीला सुरवात झाली. हे सर्व इतक्या पटकन घडले की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. २ एक मिनिटात सर्व शांत झाले पण मग गर्दी जमली आणि आता हे प्रकरण काहीही चुक नसताना आपल्यालाच महाग पडणार अशी चिन्हे दिसू लागली. 'उसने अपूनको १० मारा, अपूनने दोहि मारा लेकिन क्या सॉलिड मारा' ह्या स्टाइलने आम्ही मारामारी करू शकत होतो पण ५ मुली आणि ५ बाइक्स सोबत असताना असे करणे अविवेकीपणा ठरला असता. तेंव्हा तिकडून शिस्तीत निघालो आणि मंडी - बिलासपुरच्या रस्त्याला लागलो.


आता रस्त्याच्या कडेला छान-छान सफरचंदाची झाडे, गुलाबाच्या बागा अशी दृश्‍ये होती. पुढे लगेच मंडी बोगदा लागला. हा बोगदा जवळ-जवळ ३ किमी लांब आहे. आणि हो आतमध्ये लाइटस नाहीत बरं का. तेंव्हा सावधान. तो पार केला आणि मंडीला पोचलो. ४ वाजून गेले होते. भुका लागल्या होत्या. तेंव्हा आता जेवाय करायला थांबणे गरजेचे होते. जेवण उरकतो तोपर्यंत मागून गाडीमधून बाकीचे मेम्बर्स सुद्धा येऊन पोचले. नेहमी गोंधळ घालत गप्पा मारत असणारे सर्वजण आज असा शांततेत जेवण का करत आहेत असा त्यांना प्रश्न पडला होता. झाला प्रकार कोणालाच माहीत नव्हता. ५ वाजता तिकडून निघालो तेंव्हा गाडी पुढे निघून गेली. आम्ही मागाहून निघालो. अभी - अमेय पुढे तर अमेय म्हात्रे आणि आदित्य मागे. मी मध्ये राहून सरवण मध्ये समान अंतर ठेवायचा प्रयत्न करत होतो. अचानक माझ्या म्हणजे बाइक्सच्या हा.. :P मागच्या चाकात हवा कमी होत आहे असे जाणवल्याने मी बाइक स्लो केली. आदित्य , अमेय सुद्धा पुढे निघून गेले. हळू हळू बाइक चालवत एके ठिकाणी हवा भरली आणि पुढे निघालो. अंधार पडत यायला लागला होता. आता मी थोडा वेग वाढवून पुढे गेलेल्या इतर बायकर्स ना गाठण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात एका हॉटेल मध्ये चहा घ्यायला सर्वजण थांबलेले दिसले. म्हणजे थांबले होते माझ्यासाठी पण मग नुसते थांबून काय करायचे? मग लगेच चहा हवा ना...  तिकडून १५ मिन. मध्ये निघालो आणि पुढे निघालो. चंदिगढसाठी अजुन १०० किमी. अंतर जायचे होते. कितीही बाइक चालवली तरी रस्ता काही संपत नव्हता. तिकडे चंदिगढमध्ये माझा मित्र कुणाल आमची वाट बघत होता. पुन्हा सर्वांना भुका लागल्याने 'कीरतपूर साहेब'च्या अलीकडे अखेर १०:३० च्या सुमारास जेवायला थांबलोच एके ठिकाणी. अजुन ८० किमी अंतर जायचे होते. त्यात पुन्हा एकदा ह्या पुढचा रस्ता म्हणजे आनंदीआनंद होता. आम्ही बाइकट्रिप साठी येणार म्हणून सर्व ठिकाणच्या रस्त्यांची कामे सरकारने काढली होती की काय असा प्रश्न पडला होता मला. धुळीने भरलेल्या त्या कच्च्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या गाड्यांच्या प्रखर हेडलाइटस मध्ये बाइक चालवणे हे खरोखरच दिव्य होते.

१२ वाजत आले होते आणि सतत १२ तास रायडिंग करून सर्वच थकले होते. गाडी बरीच पुढे निघून गेल्याने आता रायडर्स किंवा पीलियन बदलणे सुद्धा शक्य नव्हते. गेल्या ११ दिवसांच्या रायडिंग मध्ये 'कधी संपणार हा रस्ता' अशी भावना मनात येत होती. तिकडे अभी सॉलिड झोपेत बाइक चालवत होता. त्याच्या मागून येणार्‍या अमेयला हा आता बाइक वरतीच झोपेल की काय अशी शंका येत होती. मनाली अभीला जागे ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न करत होती. मागे अमेय आणि दीपालीची अखंड बडबड सुरुच होती. अश्या निर्जन रस्त्यावर कुत्रा सोडा पण एक चिटपाखरू सुद्धा नव्हते. दूरदूर वर लाइटस नव्हते. त्यामुळे ह्या अनोळखी भागात थांबणे ही शक्य नव्हते. अखेर एके ठिकाणी कुठल्याश्या कंपनीच्या गेटवर लाइटस मध्ये थांबलो. मागून अभी - अमेय आल्यावर पुढे निघालो. मध्येच एके ठिकाणी ट्रॅफिक लागले रस्त्यावर. बघतो तर रेल-वे फाटक. मी, आदित्य आणि अमेय फाटक पार करून पुढे असलेल्या पेट्रोल पंपावर थांबलो. अभी आज भलताच स्लो झाला होता. तो मागाहून आल्यावर आम्ही परत पुढे निघालो. एव्हाना गाडी हॉटेल 'पार्क व्यू'ला पोचली होती आणि आशिष व उमेश कुणालला जाउन भेटले होते. तो त्याची गाडी घेऊन आम्हाला शोधत मागे यायला निघाला. अखेर एक-एक करून आम्ही हॉटेलला पोचलो तेंव्हा पहाटेचे ३:३० झाले होते. १५ तास बाइक चालवुन आमचे काय झाले होते ते वेगणे सांगायला नकोच...

'तुम सब नहाके फ्रेश हो जाओ. मे खाना लेके आता हु' असे बोलून कुणाल गेला. खरे तर कोणालाच काही खाण्याची इच्छा नव्हती पण मी त्याला बोललो. 'सब थक गये है यार. सोने दे उन्हे. कल सुबह देखेंगे.' तो मात्र मानला नाही. मानला तर पंजाबी कसला. 'तू पंजाब आया और मैने खातीर ना की तो मेरी तो नाक कट गाई यार.' असे बोलून तो खायला आणायला गेला. मी सुद्धा आवरून घेतले. आंघोळ केल्यावर मात्र मलापण भूक लागली. अभी-मनाली आणि साधना मात्र आडवे झाले होते कुणालने आणलेले बटर चिकन, रोटी आणि राइस खाउन बाकी सर्वांच्या जान मे जान आ गयी. पहाटे ४ वाजता अखेर सर्वजण आपआपल्या खोल्यात जाउन गुडूप झाले. एका 'संपतोय की नाही' असे वाटणार्‍या दिवसाचा अखेर अंत झाला होता. पण अजुन काहीतरी घडणे बाकी होते. आमच्या खोलीमध्ये तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... बघुच पुढील भागात काय झाले ते...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !
.
.
.

Tuesday, 1 December 2009

लडाखचा सफरनामा - रोहतांगचा चिखल सारा ... !


लेहच्या ११००० फुटावर ४-५ दिवसांच्या वास्तव्यात रात्री सुद्धा काही थंडी लागली नव्हती. काल रात्री मात्र सरचूला आलो तेंव्हा बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. तरी सुद्धा १५००० फुटावर  रात्री जाणवायला हवी इतकी काही जाणवली नाही. पहाटे सर्वजण उठले तेंव्हा मात्र बऱ्याच जणांना थंडी जाणवत होती. मला मात्र तसे काहीच वाटत नव्हते. का कोण जाणे... असो. सकाळी ६ वाजता नित्यनियमाने आवराआवरी केली आणि आमच्या नाश्त्याआधी बाईक्सना सुद्धा नाश्ता देणे आवश्यक आहे हे कळून आले. खास करून अमेय आणि कुलदीप यांच्या बाईक्स पेट्रोल पित होत्या. तेंव्हा आदित्य पेट्रोल आणायला ड्रायव्हरला घेउन परत १० किमी. मागे गेला. बराच वेळ होता म्हणुन आसपासचे फोटो काढत बसलो. रात्री इकडे आल्याने कैंपसाइट नेमकी कशी आहे ते सकाळी कळले. रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार गालिच्यावर डोंगरांच्या पाय्थ्याला असणाऱ्या या साइटचे सौंदर्य काही वेगळेच होते. दुरवर बारालाच्छा-लाचे पर्वत दिसत होते. पहाटे-पहाटे त्या पर्वतांवर जमलेल्या ढगांमुळे मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली. काही वेळात त्याच दिशेला आम्हास कुच व्हायचे होते. आमची पेटपूजा आणि सर्वांच्या बाईक्सची पेट्रोलपूजा झाल्यावर आम्ही बारालाच्छा -लाच्या दिशेने निघालो. एव्हाना सर्वजण आटपून निघायला तयार झाले होते. निघायच्या आधी साधनाच्या पेटंट पोस 'चला तरं मग' च्या स्टाइलमध्ये एक ग्रुप फोटो काढला.

सरचूवरुन पुढे निघालो तेंव्हा ७:३० होउन गेले होते. ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे पुढे रोहतांग जवळ पाउस नक्की आपल्याला गाठणार तेंव्हा आत्ता जास्तीतजास्त अंतर कमीतकमी वेळात पार करायला हवे होते. बारालाच्छा-ला पार करताना १३२८९ फुट उंचीचा फार त्रास झाला नाही. तासाभरात तो पार करून 'झिंग-झिंग बार' या ठिकाणी आम्ही पोचलो. 'झिंग-झिंग बार' म्हणजे खादाडीचे ठिकाण. एक छोटेसे पण मस्तसे टुमदार टेंट होटेल आहे इकडे. तिकडे नाश्ता घेतला. एक जोडपे हे होटेल चालवते. त्यांच्या मुलाने म्हणजे समीरने आम्हाला त्याची छोटी सायकल चालवून दाखवली. वेळ मस्त गेला तिकडे. पण उशीर सुद्धा झाला. ड्रायव्हरसाठी हे सर्व नेहमीचेच होते तेंव्हा तो बोंबा मारत होता पण आम्हाला मात्र हे सर्व नवीन आणि वेगळे होते ना. तिकडून निघायला जवळ-जवळ ९:३० होउन गेले. 'जिस्पा'च्या दिशेने पुढे निघालो तशी झटाझट उंची कमी होत होती. 'दारचा'ला पोचलो आणि पावसाचे आगमन झाले. अगदी भुरभूरत पडणारा पाउस. अंगाला न लगता भिजवणारा. जिस्पा मागे टाकत किलोंगच्या दिशेने निघालो तसे पाउस वाढतोय हे लक्ष्यात आले. वळणा-वळणाच्या त्या रस्त्याचा मनालीला गाडीमध्ये बसून त्रास व्हायला लागला होता तेंव्हा ती पुन्हा अभीच्या मागे बाईकवर बसली आणि शोभित गाडीमध्ये आला. पावसामुळे बायकर्स मागे पडले होते आणि आम्ही गाडी मधून वेगाने पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी 'स्पिती व्ह्याली' कडे जाण्याचा रूट दिसला. ट्रेक्किंगसाठी हा एक परवानी असलेला भाग. किलोंगला पोचलो आणि बायकर्सची वाट बघत थांबलो ज़रा. एक चहा घेतला आणि ज़रा मोकळे सुद्धा झालो. ;) पावसाने भलतीच गर्दी केली होती. मागुन एक एक बायकर येताना दिसू लागले तसे आम्ही पुढे निघालो.ह्या पुढचा संपूर्ण रस्ता म्हणजे स्वर्गाकडे जाणारा की काय असेच वाटत होते. डोंगरांची आणि झाडांची दाटी वाढली होती पण रस्त्याची रुंदी काही वाढत नव्हती... एका बाजूला पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला दरी. आपल्या माळशेज - ताम्हीणी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये जसे हिरवेगार दृश्य दिसते तसे काहीसे दृश्य सगळीकडे दिसत होते. मधून-मधून एखादा धबधबा डोंगरातून डोके वर काढी. दुरवरच्या पर्वतांवर वृक्ष आता त्या कडयान्ना भीत नव्हते. कितीही उंच आणि सरळसोट कडा असला तरी त्याला न जुमानता ते सूचिपर्णी वृक्ष आकाशाला भिड़त होते. त्यांच्या पायथ्याला खाली दरीपर्यंत हिरवळीचे गालीचे पसरलेले होते. दरीमध्ये फुलांनी, छोट्या छोट्या घरान्नी आणि रस्त्यांनी नक्षीकाम केले होते. आता आम्ही गोंधला, सिस्सू पार करत 'काकसर'कडे निघालो होतो. (बटालिकचे काकसर हे नव्हे. ते द्रास जवळ येते.) सिस्सू येता येता आम्ही घाटाच्या रस्त्याने पूर्ण खाली उतरत नदीकाठी आलो आणि ब्रिज पार करत दुसऱ्या बाजुला पुन्हा वर चढू लागलो. जेंव्हा बऱ्यापैकी उंचीवर गेलो तेंव्हा उजव्या हाताला एक भला मोठा धबधबा नजरेस पडला. बाजुच्या फोटो मध्ये बघाल तर २ टप्प्यामध्ये पडणाऱ्या ह्या धबधबाचा १ टप्पा किमान ४००-५०० फुट होता. वरच्या ग्लेशिअर मधून निघून तो नदीसोबत पुढच्या प्रवासाला निघाला होता. ते दृश्य पाहण्यासाठी काही क्षण तिकडे थांबलोच. "चलो अभी. खाना भी खाना है आगे जाकर." ड्रायव्हरच्या वाक्याने भानावर आलो आणि पुढे निघालो. २ वाजत आले होते. पावसात भिजतभिजत सर्व 'काकसर'ला पोहोचलो आणि एक मस्त होटेल सापडले. तिकडचा हिमाचली टोपी आणि कोट घातलेला मालक 'चाचा' पण मस्त होता. गरमागरम रोटी आणि सोबत चण्याची भाजी. सोबत कसलीसी चटणी होती. नंतर डाळभात.

३ वाजता तिकडून पुढे निघालो. मनाली साठी अजून ७० किमी अंतर जायचे होते आणि मध्ये उभा होता 'रोहतांग पास'. इकडे पडलेल्या धो-धो पावसाने आमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याची आम्हा कोणालाच कल्पना नवहती. ड्रायव्हरला होती नक्कीच पण तो काही आधी आम्हाला तसे बोलल नाही. इकडून १४ किमी. 'रोहतांग टॉप' आणि पुढे ८ किमी उतरून पलिकडे 'मोहरी' हा बेस. बस ड्रायव्हर इतकेच सांगत होता. सकाळपासून बाईकवर असलेले भिडू आता गाडीत बसले आणि गाडीमधले बाईकवर. काकसरवरुन निघालो तेंव्हा समोर रोहतांग टॉपला असणारे पावसाळी ढग बरेच काही सांगून जात होते. निघाल्यावर अवघ्या मिनिटाभरात आत्ता पर्यंत पक्का असलेला रस्ता कच्चा झाला आणि सुरू झाला एक 'चिखलराडा' जो पुढचे २ तास सुरू होता. संपूर्ण १४ किमीच्या चढणीवर एके ठिकाणी सुद्धा रस्ता चांगला राहिलेला नव्हता. मोठ्या मोठ्या वाहनांनी होत्या-नव्हत्या रस्त्याचे कल्याण करून ठेवले होते. हे एक-एक मोठे-मोठे खड्डे. त्या खद्यांमधून चिखल निघून रस्त्यावर छोटे-छोटे डोंगर बनले होते. झिप-झाप-झुप अशी वेडीवाकडी बाईक चालवत चिखलाने आणि पाण्याने खड्डे चुकवत आम्ही टॉपकडे निघालो होतो. चारचाकी गाडयान्ना काय मागुन वेगाने येत होर्न मारायला. बालान्स तर बाइकवर आम्हाला करावा लागतो ना. तरी बराचवेळ आमची गाडी मागुन आम्हाला कव्हर फायर देत होती. हे.. हे.. जसजसे वरवर जाऊ लागलो तशी वळणे अधिक शार्प होऊ लागली. ह्यात प्रॉब्लम असा होता की जाणाऱ्या-येणाऱ्या गाडयान्नी रस्त्यावरचा सर्व चिखल एका कोपऱ्यात येउन जमा केला होता. त्यातून बाईक वर चढवणे आता अजून कठीण झाले होते. जवळून टर्न मारावा तर बाईक टायरला तितकी ग्रिप मीळणे शक्य नव्हते. शिवाय वरुन पाउस सुरूच होता की. पडायची भीती जास्त होती. तेंव्हा गरज पडली की पुन्हा मागच्याला उतरवून बाईक वर चढ़वायची असे प्रकार सुरू झाले. गेले २ दिवस वाळवंटामध्ये अनुभव घेउन आता तो चिखलात राबवत होतो आम्ही.

अखेर तासा-दीडतासाने सर्वजण कुठे टेकत, कुठे थांबत पावसात भिजत रोहतांगटॉपला पोचले. आणि मग सुरू झाला उतरणीचा प्रवास. हलक्या वजनाचे अभी-मनाली आधीपासून पुढेच होते. अमेय साळवीची बाईक ज़रा बसकी आणि मोठ्या हँडलची असल्याने तो बराच आरामात येत होता. मी, कुलदीप आणि आदित्यमध्ये होतो. सर्वांच्या मानाने बहुदा कुलदीपला जाड टायरच्या यामाहाचा ग्रिपसाठी बराच फायदा झाला इकडे. उतरणे अधिक कठीण जाणवत होते. कोपऱ्यावरचा चिखल वाढला होता आणि त्यातून बाईक्स सरकू लागल्या होत्या. आता कितीही उशीर होत असला तरी घाई करायची नाही हे स्पष्ट तत्व होते. एकेठिकाणी मागुन येणाऱ्या ट्रकला पुढे जाऊ देण्यासाठी मी अगदीच बाजुला गेलो. आता वाटल पडलोच. नशिबाने वाचलो. दुसऱ्या एके ठिकाणी तर पुढच्या गाडीच्या इतक्या जवळ आलो की आता थांबावे लागणार स्पष्ट होते. पण पाय टेकायचे कुठे? दोन्ही बाजुला फुट-अर्धाफुट चिखल. ट्रकच्या टायरने बनलेल्या रूटवरुन बाईक हाकत होतो आम्ही. अखेर एके ठिकाणी उजवा पाय टेकलाच. टेकल्या-टेकल्या लागला सरकायला. परत उचलला आणि टेकवला. पण तो कसला राहतोय. सरकतोच आहे तो आपला. मनात आले आता पडलोच आपण पक्के चिखलात. पण नाही. कसाबसा काही सेकंद उभा राहिलो आणि लगेच बाईक त्या गाडीच्या पुढे टाकली. आता मागुन येणाऱ्या एका सुद्धा गाडीला मी पुढे जाऊ देत नव्हतो. बरोबर ना... रिस्क कोन ले? बऱ्यापैकी खाली आल्यावर चिखल कमी झाला. पाउस सुद्धा बंद झाला होता. २ तास त्यांने पक्की परीक्षा पहिली होती रायडिंगची. ज़रा खाली 'मोहरी' दिसत होते आणि एकदम दुरवर बिआस नदीकाठचे मनाली शहर सुद्धा. बिआस नदी रोहतांग मधुनच उगम पवते. मोहरीला पोचलो, चहा घेतला आणि पुन्हा एकदा मोकळे झालो. फार वेळ नव्हता थांबायला. त्यात पूनम आणि ऐश्वर्याने पावभाजी ऑर्डर केल्याचे कळताच मी डाफरलो त्यांच्यावर.सर्वजण तिकडून चहा घेउन आणि पूनम - ऐश्वर्या पावभाजी खाऊनच तिकडून निघाल्या. अजून मनाली गाठायला २ तास होते.इकडून पुढचा रस्ता एकदम मस्त होता. मख्खन के माफिक स्मूथ. संध्याकाळ होत आली होती तेंव्हा समोरून येणारे ट्राफिक सुद्धा फार नव्हते. गुलाबा (९३९७ फुट) - केठी - पालचन अशी गावे मागे टाकत आम्ही मनालीला जवळ करत होतो. इतक्यात पुढे रस्त्यावर ट्राफिक दिसले. ही..... लांब रांग. बघतोय तर एका ट्रकचा विली झाला होता. फोटो बघा म्हणजे कळेल मी काय बोलतोय ते. भन्नाटच प्रकार होता हा. लोखंडी सळ्यान्नी ओव्हरलोड केलेला ट्रक सरळ-सरळ उभा झाला होता. नशीब त्या ड्रायव्हरचे डावी-उजवीकडे नाही कलंडला. सर्व बायकर्स इकडे येउन पोचलो त्या आधीच गाडी इकडे पोचली होती. आम्ही येउन पोचलो तसे जमलेले सर्व देशी -विदेशी पर्यटक आमचे इतर टीम मेंबर्स असे सर्वजण टाळ्या वाजवायला लागले. त्या टाळ्या रोहतांगच्या यशस्वी रोहणासाठी होत्या. काहीवेळ खरेच मस्त वाटते आम्हाला. आता आम्ही त्या ट्राफिकमधून बाईक्स पुढ पर्यंत काढल्या. ट्रकच्या बाजूने पुढे जायला वाट दिसली तिकडून बाइक्स एक-एक करून पुढे काढल्या. आमचे ५ मेंबर्स गाडीसकट मात्र मागे अडकले होते. पण म्हणुन आम्ही सुद्धा तिकडे थांबून न रहता पुढे जाउन बाकी व्यवस्था बघणे महत्वाचे होते. गरज पडलीच तर मनालीहून त्यांच्यासाठी दुसरी गाडी पाठवणे महत्वाचे होते. अंधार पड़ता-पड़ता भांग गाव पार करत मनालीमध्ये प्रवेश केला आणि नदीकाठचे होटेल बिआस गाठले. अडकलेल्या मेंबर्सचा अपडेट घ्यावा म्हणुन फोन केला तर ते सुद्धा तिकडून निघाले असे कळले. गाडी आली तेंव्हा ९ वाजले होते. सामन रूम्स मध्ये लावले आणि अंगावरचा चिखल राडा साफ़ करून 'चंद्रताल'ला जेवायला गेलो. ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती... झोपायला ११ वाजले. बिछान्यावर पडलो तेंव्हा मला आजची बाईक राईड राहून राहून आठवत होती. अगदी आत्ता सुद्धा तितकीच लक्ष्यात आहे... रोहतांगचा चिखलराडा पार करून आता आम्ही उदया बिआसच्या सोबतीने 'चंदिगढ़'साठी निघणार होतो...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा -बिआसच्या सोबतीने ... !
.
.
.