'एक निवांत दिवस' लिहिता-लिहिता मध्ये बरेच दिवस निवांतपणे गेले. कामावरून आल्यावर दिवाळीच्या सुट्टीमध्ये सलग निवांतपणे लिखाणाला मात्र वेळ देता आला नाही. त्यामुळे पुढच्या लिखाणाला खिळ बसली होती. त्याबद्दल वाचकांची दिलगिरी व्यक्त करून पुन्हा जोमाने सुरू करतोय उरलेला 'लडाखचा सफरनामा' ...
![]()
सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की १५ ऑगस्टचा दिवस तसा मोकळाच होता. आजच्या दिवसात दुपारी शॉपिंग उरकून बघायच्या राहिलेल्या
'अलत्ची गोम्पा' आणि
'मॅग्नेटिक हिल' ह्या जागा बघायच्या होत्या. दुपारच्या जेवणापर्यंत शॉपिंग उरकायचे आणि लंच करून फिरायला निघायचे असे ठरले. आता सुरू झाली मार्केटमधली भटकंती. कूणी ह्या दुकानात शिरले तर कोणी त्या. कोणी बघतय शॉल तर कोणी लडाखी ड्रेस. सर्वजण मस्तपैकी खरेदीमध्ये गुंतले होते. साधना आणि उमेश आमच्या सर्वांचे खरेदी करतानाचे शूट्स घेत होते. मी माझी खरेदी उरकली आणि 'टी-शर्ट'वाला शोधत फिरत होतो. लडाखला एम्ब्रॉयडरी केलेले खुप छान छान टी-शर्ट मिळतात. मी खुप सारे बनवून घेतले तसे. शिवाय आम्ही सर्वांनी एक टिम टी-शर्ट बनवून घ्यायचे ठरवले.
काळ्या रंगाच्या टी-शर्टवर 'जम्मू ते लेह' आणि 'लेह ते दिल्ली' असा नकाशा बनवून घेतला. ह्या संपूर्ण रस्तामध्ये जी-जी महत्वाची ठिकाणे आणि पासेस आम्हाला लागले ते उंचीसकट त्यावर शिवून घ्यायचे होते. कारागीर ईब्राहीम भाईला सर्व डिटेल्स दिले आणि १ दिवसात ऑर्डर पूर्ण करून ठेवायला सांगितली. हे सर्व होईपर्यंत सर्वजण खरेदी संपवून एका होटेलमध्ये घुसले होते. जेवाय-जेवाय (हा आपल्या
'पंकज'चा खादाडी शब्द) केले आणि भटकायला निघालो.
![]()
दुपारी अलत्ची गोम्पासाठी (काही ठिकाणी 'अलची' असा देखील उल्लेख आहे.) खालत्सेच्या दिशेने निघालो. १२ तारखेला या रस्तावरुन आलो होतो ते
क्षण अन क्षण आम्हाला आठवत होता. अभिजित-मनाली आज फॉर अ चेंज गाडीमध्ये बसले होते. बाकी आम्ही सर्वजण बाइक्स ७०-८० च्या स्पीडला टाकत एकदम फुल तू राम्पार्ट रो... :) ४ च्या आसपास डावीकडे अलत्ची गोम्पाचा बोर्ड दिसला. अमेय आणि कुलदिप फोटो काढत राहिल्या मुळे बरेच मागे पडले होते. आशिष त्यांच्यासाठी फाट्यावर थांबला होता. नाहीतर वळायचे कुठे ते कळले नसते ना त्यांना. मी आणि अमेय म्हात्रे हायवे सोडून डावीकडे ब्रिज पार करत सिंधूनदी पलिकडे गेलो आणि पुढे लगेच मॉडर्न व्हिलेज ऑफ़ अलत्ची लागले. असेच एक मॉडर्न व्हिलेज लेह सिटीबाहेर आर्मी बांधते आहे. नाव काय माहीत का... 'साबू व्हिलेज'... मला तो चाचा चौधरी मधला साबू आठवला एकदम. हा.. हा.. अलत्ची गावत पोचलो आणि १००० वर्षे जुने
'अलत्ची गोम्पा' बघायला गेलो. गोम्पाकडे जाताना आजूबाजूला सगळीकडे
सफरचंद,
पीच आणि
जर्दाळूची झाडे होती. खुद्द गोम्पा मध्ये प्रवेश केल्या-केल्या समोरच एक जर्दाळूचे झाड़ होते आणि त्याला अश्शी खालपर्यंत जर्दाळू लागलेली होती. आम्ही काय केले असेल ते सांगायला नकोच. गोम्पा राहिले बाजुलाच आणि आम्ही तुटून पडतो त्या जर्दाळूच्या झाडावर. शमिकाने तर एकदम असा हल्लाबोल केल की काय विचारूच नका. हे तोड़.. ते काढ.. गाडीच्या हेलमेट मध्ये भरून घेतली इतकी जर्दाळू तोडली. गोम्पा बघत बघत खायला झाली असती ना...!!!
![]()
अलत्ची गोम्पामध्ये फोटो काढायला बंदी आहे शिवाय प्रवेश करायला ३० रुपये प्रवेश फी आहे. रिनचेन झांग्पो (Rinchen Zangpo) याने १००० साली ह्या गोम्पाची स्थापना केली. बाहेरील ३ मजली बांधकाम पूर्णपणे लाकडाचे आहे. येथे एकुण ३ विहार आहेत. पहिल्या विहारात मातीच्या बनवलेला अत्यंत जुन्या ३ बुद्ध मुर्त्या येथे आहेत. २ मजली तरी नक्की असाव्यात. हा प्राचीन कलेचा वारसा जपला नाही तर लवकर त्या नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. पुढच्या विहारामध्ये सुद्धा काही जुन्या बुद्ध मुर्त्या आहेत पण येथे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भिंतीवर काढलेली निरनिराळ्या देवांची भित्तिचित्रे. ह्यामध्ये आम्हाला ३ ठिकाणी चक्क 'श्री गणेशाची प्रतिमा' आढळून आली. बाकी बरीच चित्रे आता पाण्यामुळे अस्पष्ट झाली आहेत. तिसऱ्या आणि सर्वात शेवटच्या विहारामध्ये सर्वात विलोभनीय आहे डाव्या भागात असलेली
सहस्त्रहस्त असलेली भगवान बुद्ध यांची धातूची मूर्ती. या शिवाय उजव्या भागात भगवान् बुद्ध आणि त्यांचा परिवार यांच्या धातूच्या प्राचीन मुर्त्या आहेत. ह्या सर्व मुर्त्या अतिशय सुंदर असून त्यांची चांगली निगा राखली गेली आहे. त्यांचे दर्शन घेउन ५ वाजता तिकडून निघालो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
![]()
परतीच्या मार्गावर सासपोल मध्ये रस्त्याच्या बाजूला असलेली सफरचंदाची झाडे पाहून मोह आवरला नाही. शेवटी बाईक रस्त्याच्या बाजूला लावली आणि चढलो बाजुच्या भिंतीवर. झाडाची एक डहाळी रस्त्यावर बाहेर आली होती त्यावरून सफ़रचंद तोडली. लहानपणी कुठे कोणाच्या बागेत असे आंबे नाहीतर चिकू तोडायचो त्याची आठवण आली एकदम. पुढे निघालो तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागणाऱ्या छोट्या-छोट्या गावांमधून लडाखी घरांचे दर्शन होत होते.
कुठे माती-विटांची तर कुठे सीमेंटची घरे. पण काही वैशिष्ट्ये असलेली. मोठ्या-मोठ्या लाकडी खिडक्या आणि त्यावर नक्षिकाम असणारी घरे. घरांच्या छतावर चारही बाजूने मातीचे साचे करून त्यात छोटी झाडे लावलेली असतात. या शिवाय शुभचिन्हे म्हणुन छतावर बहुरंगी पताका ज्याला 'प्रेयर फ्लाग्स' असे म्हणतात त्या लावतात. छोटेसे पण टुमदार असे हे लडाखी घर.
![]()
सफरचंद खाऊन निघालो ते थेट निम्मू पार करत
'मॅग्नेटिक हिल'ला पोचलो. इकडे रस्त्याच्या मधोमध एक चौकोन काढला आहे. त्यात गाडी उभी केली की मॅग्नेटिक इफेक्ट जाणवतो. या ठिकाणी मॅग्नेटिक इफेक्ट जास्त असल्याचे बरेच ऐकले होते. वेगाने जाणाऱ्या गाडीचा स्पिड सुद्धा कमी होतो, एक्सेलरेट केली तरी गाडी पळत नाही असे ऐकले होते. त्यामुळे सर्व प्रकार करून पाहिले. कुलदीपने तर चौकोनामध्ये स्वतः उभे राहून उड्या मारून पाहिल्या. मी म्हटले
'तुझ्या अंगात काय मेटल आहे का?' हाहा.. आदित्यला बाईकवर इफेक्ट जाणवत होता मात्र मला अजिबात जाणवला नाही. माझे वजन जास्त असेल बहुदा .. हाहा. म्हणुन मग मी बाईक रस्त्यावरुन खाली टाकली आणि अक्षरशह: त्या 'हिल' वरती जिथपर्यंत बाईक जाईल तिथपर्यंत नेली. चढवताना मज्जा आली पण जशी ती चढायची थांबली तशी फिरवताना मात्र लागली बरोबर. कशीबशी न पड़ता फिरवली आणि सुसाट वेगाने उतरायला लागलो. एकतर तिकडे रस्तावरुन उमेश शूट करत होताच. अर्ध तास तिकडेच नव-नवीन प्रयोग करत होतो आम्ही. जसा अंधार पडत आला तसे आम्ही तिकडून निघालो आणि लेह मधली आमची शेवटची संध्याकाळ एन्जॉय करत सिटीकडे निघालो. परतीच्या वाटेवर अतिशय सुंदर असा सूर्यास्त आम्हाला बघायला मिळाला. डोंगर, सूर्यकिरणे आणि ढग यांचा सुंदर मिलाफ.
८ वाजता सर्वजण गेस्टहॉउस वर पोचल्यावर 'जेवायला कुठे जायचे' हा एक यक्ष प्रश्न होता. २ दिवस ड्रीमलैंड मध्ये जेवलो होतो तेंव्हा तिकडे नको जायला असे ठरले होते. मी आणि शमिने म्हटले तुम्ही सर्व फ्रेश व्हा, आम्ही जाउन मस्त जागा शोधतो. ड्रीमलैंडच्या अगदी टोकाला 'मोनालिसा' म्हणुन मस्त गार्डन रेस्तरंट सापडले. टेबल बुक केले आणि परत होटेल वर आलो. आज जेवणासोबत चिकन आणि वेज 'मोमोस' खाल्ले. दिसायला आपल्या उकडीच्या मोदकांसारखे असतात. जेवण आटपून ११ वाजता होटेल वर परत आलो. उदया सकाळी खर्दुन्ग-ला साठी लेह सोडायचे होते. सामानाची बांधाबांध केली आणि झोपी गेलो. आजच्या लेह मधल्या झेंडावंदना नंतर उदया झेंडा रोवायचा होता तो जगातल्या सर्वोच्च रस्त्यावर. तो क्षण अनुभवायला आम्ही सर्वच उत्सुक होतो. आता प्रतीक्षा होती ती उद्याच्या सुर्योदयाची.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - खर्दुंग-ला १८३८० फुट उंचीवर ... !
.
.
.