Friday, 9 November 2012

सिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड...


मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्थात ऐकत्या कानाच्या खिंडीची भेट. पहाटे ६ वाजता जाग न येते तर नवल. मोकळ्याहवेत बाहेर येउन बसावे. सांगितल्या वेळेत बरोबर चहा-कॉफी हजर असावी. सोबत एम.जी.रोड वरील बेकरीमधील खारी, टोस्ट नाहीतर बटर कुकीज. अहाहा!!!


सकाळ ताजीतवानी आणि प्रसन्न. :) आवज नाही, गोंगाट नाही की प्रदुषण नाही. निवांत आवरून घेतले की नाश्ता तयार. आज तर प्रधान बाईंनी कहर केला. चक्क छोले-पुरी. कसे नाही कसे म्हणावे याला!!! थंड वातावरणात थोडे जास्तच खाल्ले जाते नाही का. श्रीला तिच्या दातांचा विसर पडला होता. शमिका आणि राजीव दोघेही त्यांचे व्याप ठाण्यालाच सोडून आले होते. राजीव काकांना बघून तर मी थक्क व्हायचो. खाण्याच्या बाबतीत त्यांनी थंडी जास्तच मनावर घेतली होती. ;)


नथु-ला येथे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडून परमीट मिळवावे लागते. स्थानिक एजंट हे काम तसे सहजपणे करुन देतात. पण एका दिवसात इथे जाणार्‍या गाड्यांची संख्या लष्कराने २०० अशी ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे जायला मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामानाने उत्तर सिक्किमचे परमीट सहज मिळून जाते. रस्त्याची एकुण अवस्था बघता हा आकडा २०० का? हे उत्तर सहज मिळते. खरेतर हा रस्ता अधिक उत्तम स्थितीत असणे गरजेचे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांच्या हिमांक प्रकल्पातून लडाखमध्ये उत्तम काम करत आहेत. त्यामानाने हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. तुम्हाला पाठीचे / मानेचे दुखणे असेल तर हा प्रवास नक्की टाळा. किंवा प्रवासाआधी एकदा रस्त्याची किमान अवस्था विचारून पहा.अतिशय अरुंद आणि वळणा-वळणाच्या उंचसखल आणि खडबडीत अश्या रस्त्याने हळु हळु उंची गाठत आपण नथु-लाकडे सरकत असतो. अचानक दिसते ती लांबचलांब गाड्यांची रांग. पण ह्या सर्व गाड्या थांबून का राहिल्या आहेत बरे? पुढे जाउ देत आहेत ना? की इथुनच मागे फिरायचे? मग लक्ष्यात येते की दरड कोसळलेली आहे आणि लष्कराचे जवान अथक प्रयत्न करून मार्ग मोकळा करण्याच्या मागे लागले आहेत. रांगेत गाडी उभी करत आमचा ड्रायव्हर सत्या खाली उतरला.


सत्या - जल्दी खुले तो अच्छा है. २ बजे के पहले लास्ट पोस्ट पे नही पहुचे तो नथु-ला जानेको नही मिलेगा.
मी - लेकीन हमारे पास परमीट है ना. फिर क्यु नही जाने देंगे?
सत्या - वो उनपे है. उपर जानेतक ५ बार परमीट चेक करते है. पॉपकॉर्न खाओ.
श्री - पॉपकॉर्न क्यु?
सत्या - ज्यादा ऑक्सिजन मिलेगा. नही तो अब आगे सास लेना मुश्किल होता जायेगा.

आसपासच्या गावामधले बरेच लोक पॉपकॉर्न विकत बसले होते. आम्ही सहज खायला म्हणून ते घेतलेही पण त्याने जास्त ऑक्सिजन कसा मिळेल हे काही मला अजुन कळले नाहिये. :)नथु-लाकडे जाणारा रस्ता सोंग्मो उर्फ चांगू लेकवरून पुढे जातो. १२,४०० फुटांवर असलेले हे एक ग्लेशियर लेक आहे. लेकच्या आजुबाजुला चिक्कर उपहारगृह आहेत. पण नुडल्स सोडुन काही खायला मिळेल तर शप्पथ!!! लडाखला आणि इथेही हे एक लक्षात आलयं ते म्हणजे नाश्ता मजबुत करून निघा आणि दिवसाअखेर पुन्हा व्यवस्थित जेवा. दिवसभर फिरताना तुम्हाला धड काही खायला मिळेल याची शाश्वती नाही. :)
ज्या लोकांना नथु-लापर्यंत जाण्याचा परवाना मिळत नाही त्यांना किमान चांगू लेक आणि बाबामंदिरपर्यंत नक्की जाता येते. आमचे मुख्य लक्ष्य नथु-ला असल्याने इथे आणि बाबामंदिरला न थांबता आम्ही थेट पासपर्यंत पोचलो. जसे जसे आपण वर जातो तसा निसर्ग अधिकच खुलतो. बर्फाच्छादित दोंगर आणि त्यातून उगम पाउन चांगू लेक मध्ये मिळणारे पाण्याचे ओढे. नथु-ला म्हणजे सिक्किम भेटीमधले माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे स्थळ होते. पुर्व सिक्किममध्ये १४,१४० फुटांवर असलेल्या या खिंडीमधून चीनच्या ताब्यात असणार्‍या तिबेटमध्ये प्रवेश करता येतो. प्राचीन काळचा हा सिल्क रुट. १९६२ च्या युद्धानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता. भारत-चीन मधील करारानंतर २००६ मध्ये नथु-ला पुन्हा सुरु केला गेला. दरवर्षी येथून भारतातर्फे २९ तर चीन तर्फे १५ वस्तुंची देवाण-घेवाण, खरेदी-विक्री होते.नथु-ला पोस्टकरता थोड्या पायर्‍या चढून तारेच्या कुंपणापर्यंत जावे लागले. वाटेत डाव्या हाताला भारतीय लष्कराने शहीद स्मारक उभे केले आहे. थोडेवरती आपला तिरंगा वार्‍यावर अभिमानाने फडकत उभा आहे. पायर्‍या चढताना सावकाश. कारण विरळ हवेनी आपल्याला लगेच त्रास होउ शकतो. डोके जड होणे, श्वास घेण्यात अडचण येणे हे तर सर्रास. अगदी ६-८ पायर्‍या चढून थांबत गेलो तरी हरकत नाही. आम्ही चढत असताना एक जोडपे त्यांच्या लहानश्या मुलाला घेउन, खरतरं अक्षरशः खेचत,  आमच्याही जास्त वेगाने,वर जाताना पाहून, थांना काही बोलणार तेवढ्यात वरून खाली येणारा एक सुभेदार त्यांना थांबवत ओरडलाच. इथे येणार्‍या पर्यटकांची काळजीही हे जवान लोक घेत असतात.पोस्टच्या बाजूला भारतातर्फे येथे एक इमारत उभारली गेली आहे. चीनतर्फे त्याहून मोठी इमारत उभारली गेली आहे. दोन्ही इमारतीत फारतर १२-१५ मिटरचे अंतर असेल. मध्ये असलेल्या तारेच्या कुंपणापलिकडे चिनी शिपाई उभे असतात. त्यांच्या तोंडावर अजिबात स्मितहास्य नसते. अर्ध्यातासाहून अधिक काळ इथे राहिल्यास विरळ हवेचा अधिक त्रास होउ शकतो हे पाहून इथे फार वेळ थांबू नका अशी विनंती पोस्टवरच्या जवानांकडून केली जाते.गंगटोकवरून सकाळी ८ वाजता निघुनही खराब रस्ते आणि हवामान यामुळे नथु-लापर्यंत पोचायला किमान ५-६ तास लागतात. खुद्द पोस्टवर ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अनुभवावा असा हा प्रवास.बाबामंदिर म्हणजे १३,१२३ फुट उंचीवर बांधलेली हरभजन सिंग यांची समाधी आहे. मुळ समाधी जिथे आहे तिथे सपाटी नसल्याने, आणि पर्यटकांसाठी पुरेशी जागा नसल्याने, जवळच सपाटी बघून आता बाबा मंदिर उभारण्यात आले आहे. हरभजन बाबा यांना आजही सर्व लष्करी सोई पुरवल्या जातात. दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी त्यांने सामान जीपमध्ये ठेवून एक जवान न्यु-जलपायगुडी येथे पोचवतो आणि तिथून ते सामान पंजाब मधील त्यांचा गावी पोचवले जाते. हरभजन बाबा हे चीन सिमेवरील संकटांची चाहुल २-३ दिवस आधीच भारतीय जवानांना देतात अशी इथे श्रद्धा आहे.


मंदिरासमोर एक छानसे दुकान आहे. इथे तुम्हाला नथु-ला पास करून आल्याचे सर्टिफिकेट बनवून घेता येते. परतीच्या मार्गावर पुन्हा एकदा चांगु लेकला थांबून याकची सवारी करण्याची इच्छाही भागवून घेता येते. आम्ही मात्र ते काही केले नाही. ३ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा कंबरतोड प्रवास पुर्ण करत आम्हाला गंगटोकमध्ये पोचायचे होते. पोचलो तेंव्हा ७ वाजले होते. त्यामुळे घरी जाण्याचा प्रस्ताव रद्द करत आम्ही थेट एम.जी.रोड कडेच मोर्चा वळवला. आज पुन्हा मोमो खायची इच्छा जागी झाली होती. :)

क्रमश...

Thursday, 8 November 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग ६ : उर्वरित गंगटोक...

गंगटोक शहर तसे खुपसे गजबजलेले आहे. सपाटी तशी इथे कमीच. शहराच्या मध्यभागात आणि आसपास असलेली डोंगर उतारावर असलेली घरे आणि इमारती सोडल्या तर इतरस्र तशी शांतता असते. गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, फुलांचे प्रदर्शन, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT) ही गंगटोकच्या आसपासची काही बघण्यासारखी ठिकाणे. एका दिवसात हे सर्व पाहून होते.

इंदिरा बायपास रोड जवळच आमचे राहते घर होते. तिथून जरा वरच्या बाजुला गेले की मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट आहे. इथे जाण्याचे एकमेव कारण म्हणजे येथून कांचनजुंगा (तिथे लोक कांचनझोंगा असे म्हणतात) दिसते. जर आकाश  साफ असेल तरच इथे जाण्यात अर्थ नाहीतर वेळ फुकट. तिथे वरती टोकाला एक छानसे दुकान आहे. काही शॉपिंग करायची असेल तर.... इथे मुळीच करू नका. :D मार्केट मध्ये त्याच वस्तू अधिक स्वस्त आहेत.. 

वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे लिकर्स.. अगदी कॉफी ते चेरीपासून सर्व...काही लाकडाचे मुखवटे.. २ वर्षापुर्वी लडाखला गेलो होतो तेंव्हा सर्वत्र फडकणारे प्रेअर फ्लॅग्स पाहिले होते. इथे मात्र जरा वेगळेच प्रेअर फ्लॅग्स बघायला मिळाले. आमचा ड्रायव्हर सत्याच्या मते एखाद्या विशिष्ट भागाच्या किंवा गावाच्या वेशीवर ते लावले जातात. रस्त्याला जिथे घातक वळणे असतात किंवा रस्ता खचून अपघत होण्याची चिन्हे असतात तिथे ते हमखास लावले जातात.


गणेशटोक हे डोंगरच्या एका टोकावर वसलेले श्री गणेशाचे अष्टकोनी मंदिर आहे. गाभार्‍यात अष्टविनायकाचे दर्शनही घेता येते. खालच्या बाजुला थोड्या सपाटीवर एक छोटासा कॅफेटेरिया आहे. समोरच्या मोकळ्या जागेत पारंपारिक सिक्किमी आणि तिबेटी कपडे घालून फोटो काढता येतात. ३०-४० रुपये असा दर असतो.


थून थेट आम्ही गेलो गंगटोक रज्जुमार्ग उर्ग रोप-वे. रोप-वे जिथून सुरु होतो तिथे सिक्किम राज्याचे विधान भवन आहे. रोप-वे राईड तशी छोटी आहे आणि त्यासाठी बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे तिकिट काढुन अजुन किती वेळ लागेल याचा अंदाज घ्यावा आणि काहीतरी खायला / जेवायला जावे. नाहीतरी दुपार झालेली असतेच. :)


रोप-वे राईड जिथे संपते तिथेच जवळ नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी आहे. १९५८ साली तिबेट मधून सिक्किम मध्ये आलेल्या दलाई लामा यांनी या वास्तुचे उद्घाटन केले. त्या वेळचे राजे नामग्याल यांनी या वास्तुसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला. तिबेट्ची संस्कृती, सण-परंपरा आणि ईतिहास याची जपणुक, ठेवण आणि अभ्यास हे एन. आय.टी.चे धैय आहे. ही वास्तु तिबेटी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना देखील आहे. आतमध्ये प्रवेश करण्याकरिता प्रत्येकी १० रुपये फक्त शुल्क भरावे लागते. प्रदर्शनातील गोष्टींचे विनापरवानगी फोटो घेणे प्रतिबंधित आहे. बाहेरून मात्र तुम्ही फोटो घेउ शकता.


माझ्या आवडी-निवडी पाहता आजच्या दिवसातली ही मला आवडलेली सर्वात सुंदर इमारत होती. एकंदरित दिवस्भरात गंगटोक आणि परिसरातील महत्वाच्या स्थळांना भेट देउन झाली होती. आता घरी परतणे, खरेतर एम.जी. रोड वर परतणे गरजेचे होते. कशाला.. दिवसाभराची शॉपिंग करायला आणि गुलाबजाम खायला...

क्रमशः.....

Tuesday, 3 July 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...

आम्ही गंगटोक स्थलदर्शनमध्ये आज २ मॉनेस्ट्री पाहणार होतो. एक शहराच्या अगदी जवळच असलेली जोरगाँग आणि दुसरी दक्षिण सिक्किम मधील रुमटेक. ह्या दोन्ही मॉनेस्ट्रींबद्दल थोडीफार माहिती आणि फोटो...गंगटोकच्या ईंदिरा गांधी बायपास रोडवरुन गणेशटोककडे जाण्याच्या वाटेवरच जोरगाँग मॉनेस्ट्री आहे. आकाराने लहान असली तरी प्रथम दर्शनी 'रुप मनोहर' उठुन दिसते. आकर्षक रंगसंगतींमध्ये सजवलेल्या दारं-खिडक्या आणि कमानी हे तिबेटियन संस्कृतीत सर्वत्र दिसते. तिबेटचे १४ वे दलाई लामा यांनी खुद्द २१ वर्षांपुर्वी या मॉनेस्ट्रीची मुहुर्तमेढ रोवली होती.


आतमध्ये प्रवेश केल्यावर लक्ष्यात आले की रंगकाम सुरु आहे. बुद्धमुर्ती देखील नव्याने बनवण्यात येत होती. या खेरिज आतमध्ये खेंपो बोधीसत्व, गुरु पद्मसंभव आणि चोग्याल त्रायसाँग यांच्या मुर्ती आहेत.धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांनी ८ व्या शतकात भारतात अनेक तिबेटी तरुण पाठवुन बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक संतांना तिबेट मध्ये बोलावणे धाडले होते. पुधे त्यांनी तिबेट मध्ये 'सम्ये' बुद्ध विद्यापिठाची स्थापना केली जिथे बुद्ध धर्मावरील सर्व लिखाण संस्कृत मधुन तिबेटियन भाषेत भाषांतरीत केले गेले.


खेंपो बोधीसत्व हे धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन भारतातुन तिबेटमध्ये गेलेले पहिले बुद्ध संत होते. त्यांनी तिबेटमधील भिक्षुंमध्ये सुरु केलेली 'विनय परंपरा' आजही तिबेटसह सिक्किम, नेपाळ आणि भुतानमध्ये सुरु आहे.


गुरु पद्मसंभव हे भारतातील ८व्या शतकात होउन गेलेले एक थोर बुद्ध संत होते. तिबेट मधील धर्मगुरु चोग्याल त्रायसाँग यांच्या बोलावण्यावरुन ते तिबेट मध्ये गेले आणि तिथे त्यांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला. ते तंत्र विद्येचे देखील जाणकार होते. पुढे ते नेपाळ, सिक्किम आणि भुतान येथे गेले आणि या प्रदेशांत त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.


या तीन धर्मगुरुंना 'खें - लोप - चो - सम' असे संबोधले जाते.
खें - खेंपो बोधीसत्व, लोप - गुरु पद्मसंभव आणि चो - चोग्याल त्रायसाँग.
रुमटेक मॉनेस्ट्री ही गंगटोक वरुन १४ किलोमिटर अंतरावर आहे. बुद्ध महायान पंथात एकुण ४ उपशाखा आहेत. त्यातील एक आहे काग्यु. या काग्यु महायनाचे एकुण ३०० बुद्ध मठ संपुर्ण जगात असुन त्याचे मुख्यालय म्हणजे ही रुमटेक मॉनेस्ट्री होय. या काग्युचे १६ वे धर्मगुरु गॅल्वा करमाप्पा यांचे वास्तव्य येथेच असते त्यामुळे इथे सुरक्षा व्यवस्था आहे. गाडी घेउन आत जाणे अशक्य. चालत जेवढा रस्ता पार करावा लागतो त्याच्या डाव्या बाजुला एका रांगेत हजारो प्रेयर व्हील्स लावलेली आहेत. मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये फोटो घेता येत नाहीत. बाहेरुन घ्यायला हरकत नाही.
आम्ही आत जाणार इतक्यात एका सिक्किमिज गाईडने मला 'माहिती हवी का?' असे चक्क मराठीत विचारले. पहिले २ सेकंद मला कळलेच नाही पण मग लक्षात आले की अरे हा तर चक्क मराठीत बोलतोय. आम्ही त्याला गाईड म्हणुन सोबत घेतले. त्याने आम्हाला बहुतेक माहिती मराठीतुन दिली. काही इंग्रजी-हिंदी मधुन. महाराष्ट्रातुन दरवर्षी इतके पर्यटक सिक्किमला जातात की त्याने मराठी शिकुन घेतली असावी. :) हे नक्कीच सुखावणारे होते.तिथे पोचलो तेंव्हा ४ वाजुन गेले होते आणि ५ नंतर इथे कोणालाही प्रवेश नसतो. इथे दिक्षा घेणारे सर्व भिक्षु प्रश्न-उत्तराचा खेळ खेळत होते.मॉनेस्ट्रीच्या भिंतींवर अनेक चित्रे रंगवलेली आहेत. खालील ४ चित्रे ही मॉनेस्ट्रीची रक्षा करणार्‍या द्वारपालांची आहेत. सर्वात शेवटी आहेत आपले बाप्पा. बुद्ध संस्कृतीत गणपतीचे उल्लेख कुठे कुठे येतात ते ठावुक नाही पण असे चित्र लेहच्या अल्ची मॉनेस्ट्रीमध्ये देखील पाहिल्याचे स्मरते.
सिक्कीमचा सफरनामा - भाग ६ : गंगटोक स्थळदर्शन (उर्वरीत) ...