Friday 9 November 2012

सिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड...


मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्थात ऐकत्या कानाच्या खिंडीची भेट. पहाटे ६ वाजता जाग न येते तर नवल. मोकळ्याहवेत बाहेर येउन बसावे. सांगितल्या वेळेत बरोबर चहा-कॉफी हजर असावी. सोबत एम.जी.रोड वरील बेकरीमधील खारी, टोस्ट नाहीतर बटर कुकीज. अहाहा!!!


सकाळ ताजीतवानी आणि प्रसन्न. :) आवज नाही, गोंगाट नाही की प्रदुषण नाही. निवांत आवरून घेतले की नाश्ता तयार. आज तर प्रधान बाईंनी कहर केला. चक्क छोले-पुरी. कसे नाही कसे म्हणावे याला!!! थंड वातावरणात थोडे जास्तच खाल्ले जाते नाही का. श्रीला तिच्या दातांचा विसर पडला होता. शमिका आणि राजीव दोघेही त्यांचे व्याप ठाण्यालाच सोडून आले होते. राजीव काकांना बघून तर मी थक्क व्हायचो. खाण्याच्या बाबतीत त्यांनी थंडी जास्तच मनावर घेतली होती. ;)


नथु-ला येथे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडून परमीट मिळवावे लागते. स्थानिक एजंट हे काम तसे सहजपणे करुन देतात. पण एका दिवसात इथे जाणार्‍या गाड्यांची संख्या लष्कराने २०० अशी ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे जायला मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामानाने उत्तर सिक्किमचे परमीट सहज मिळून जाते. रस्त्याची एकुण अवस्था बघता हा आकडा २०० का? हे उत्तर सहज मिळते. खरेतर हा रस्ता अधिक उत्तम स्थितीत असणे गरजेचे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांच्या हिमांक प्रकल्पातून लडाखमध्ये उत्तम काम करत आहेत. त्यामानाने हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. तुम्हाला पाठीचे / मानेचे दुखणे असेल तर हा प्रवास नक्की टाळा. किंवा प्रवासाआधी एकदा रस्त्याची किमान अवस्था विचारून पहा.



अतिशय अरुंद आणि वळणा-वळणाच्या उंचसखल आणि खडबडीत अश्या रस्त्याने हळु हळु उंची गाठत आपण नथु-लाकडे सरकत असतो. अचानक दिसते ती लांबचलांब गाड्यांची रांग. पण ह्या सर्व गाड्या थांबून का राहिल्या आहेत बरे? पुढे जाउ देत आहेत ना? की इथुनच मागे फिरायचे? मग लक्ष्यात येते की दरड कोसळलेली आहे आणि लष्कराचे जवान अथक प्रयत्न करून मार्ग मोकळा करण्याच्या मागे लागले आहेत. रांगेत गाडी उभी करत आमचा ड्रायव्हर सत्या खाली उतरला.


सत्या - जल्दी खुले तो अच्छा है. २ बजे के पहले लास्ट पोस्ट पे नही पहुचे तो नथु-ला जानेको नही मिलेगा.
मी - लेकीन हमारे पास परमीट है ना. फिर क्यु नही जाने देंगे?
सत्या - वो उनपे है. उपर जानेतक ५ बार परमीट चेक करते है. पॉपकॉर्न खाओ.
श्री - पॉपकॉर्न क्यु?
सत्या - ज्यादा ऑक्सिजन मिलेगा. नही तो अब आगे सास लेना मुश्किल होता जायेगा.

आसपासच्या गावामधले बरेच लोक पॉपकॉर्न विकत बसले होते. आम्ही सहज खायला म्हणून ते घेतलेही पण त्याने जास्त ऑक्सिजन कसा मिळेल हे काही मला अजुन कळले नाहिये. :)



नथु-लाकडे जाणारा रस्ता सोंग्मो उर्फ चांगू लेकवरून पुढे जातो. १२,४०० फुटांवर असलेले हे एक ग्लेशियर लेक आहे. लेकच्या आजुबाजुला चिक्कर उपहारगृह आहेत. पण नुडल्स सोडुन काही खायला मिळेल तर शप्पथ!!! लडाखला आणि इथेही हे एक लक्षात आलयं ते म्हणजे नाश्ता मजबुत करून निघा आणि दिवसाअखेर पुन्हा व्यवस्थित जेवा. दिवसभर फिरताना तुम्हाला धड काही खायला मिळेल याची शाश्वती नाही. :)




ज्या लोकांना नथु-लापर्यंत जाण्याचा परवाना मिळत नाही त्यांना किमान चांगू लेक आणि बाबामंदिरपर्यंत नक्की जाता येते. आमचे मुख्य लक्ष्य नथु-ला असल्याने इथे आणि बाबामंदिरला न थांबता आम्ही थेट पासपर्यंत पोचलो. जसे जसे आपण वर जातो तसा निसर्ग अधिकच खुलतो. बर्फाच्छादित दोंगर आणि त्यातून उगम पाउन चांगू लेक मध्ये मिळणारे पाण्याचे ओढे. नथु-ला म्हणजे सिक्किम भेटीमधले माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे स्थळ होते. पुर्व सिक्किममध्ये १४,१४० फुटांवर असलेल्या या खिंडीमधून चीनच्या ताब्यात असणार्‍या तिबेटमध्ये प्रवेश करता येतो. प्राचीन काळचा हा सिल्क रुट. १९६२ च्या युद्धानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता. भारत-चीन मधील करारानंतर २००६ मध्ये नथु-ला पुन्हा सुरु केला गेला. दरवर्षी येथून भारतातर्फे २९ तर चीन तर्फे १५ वस्तुंची देवाण-घेवाण, खरेदी-विक्री होते.



नथु-ला पोस्टकरता थोड्या पायर्‍या चढून तारेच्या कुंपणापर्यंत जावे लागले. वाटेत डाव्या हाताला भारतीय लष्कराने शहीद स्मारक उभे केले आहे. थोडेवरती आपला तिरंगा वार्‍यावर अभिमानाने फडकत उभा आहे. पायर्‍या चढताना सावकाश. कारण विरळ हवेनी आपल्याला लगेच त्रास होउ शकतो. डोके जड होणे, श्वास घेण्यात अडचण येणे हे तर सर्रास. अगदी ६-८ पायर्‍या चढून थांबत गेलो तरी हरकत नाही. आम्ही चढत असताना एक जोडपे त्यांच्या लहानश्या मुलाला घेउन, खरतरं अक्षरशः खेचत,  आमच्याही जास्त वेगाने,वर जाताना पाहून, थांना काही बोलणार तेवढ्यात वरून खाली येणारा एक सुभेदार त्यांना थांबवत ओरडलाच. इथे येणार्‍या पर्यटकांची काळजीही हे जवान लोक घेत असतात.



पोस्टच्या बाजूला भारतातर्फे येथे एक इमारत उभारली गेली आहे. चीनतर्फे त्याहून मोठी इमारत उभारली गेली आहे. दोन्ही इमारतीत फारतर १२-१५ मिटरचे अंतर असेल. मध्ये असलेल्या तारेच्या कुंपणापलिकडे चिनी शिपाई उभे असतात. त्यांच्या तोंडावर अजिबात स्मितहास्य नसते. अर्ध्यातासाहून अधिक काळ इथे राहिल्यास विरळ हवेचा अधिक त्रास होउ शकतो हे पाहून इथे फार वेळ थांबू नका अशी विनंती पोस्टवरच्या जवानांकडून केली जाते.



गंगटोकवरून सकाळी ८ वाजता निघुनही खराब रस्ते आणि हवामान यामुळे नथु-लापर्यंत पोचायला किमान ५-६ तास लागतात. खुद्द पोस्टवर ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अनुभवावा असा हा प्रवास.



बाबामंदिर म्हणजे १३,१२३ फुट उंचीवर बांधलेली हरभजन सिंग यांची समाधी आहे. मुळ समाधी जिथे आहे तिथे सपाटी नसल्याने, आणि पर्यटकांसाठी पुरेशी जागा नसल्याने, जवळच सपाटी बघून आता बाबा मंदिर उभारण्यात आले आहे. हरभजन बाबा यांना आजही सर्व लष्करी सोई पुरवल्या जातात. दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी त्यांने सामान जीपमध्ये ठेवून एक जवान न्यु-जलपायगुडी येथे पोचवतो आणि तिथून ते सामान पंजाब मधील त्यांचा गावी पोचवले जाते. हरभजन बाबा हे चीन सिमेवरील संकटांची चाहुल २-३ दिवस आधीच भारतीय जवानांना देतात अशी इथे श्रद्धा आहे.


मंदिरासमोर एक छानसे दुकान आहे. इथे तुम्हाला नथु-ला पास करून आल्याचे सर्टिफिकेट बनवून घेता येते. परतीच्या मार्गावर पुन्हा एकदा चांगु लेकला थांबून याकची सवारी करण्याची इच्छाही भागवून घेता येते. आम्ही मात्र ते काही केले नाही. ३ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा कंबरतोड प्रवास पुर्ण करत आम्हाला गंगटोकमध्ये पोचायचे होते. पोचलो तेंव्हा ७ वाजले होते. त्यामुळे घरी जाण्याचा प्रस्ताव रद्द करत आम्ही थेट एम.जी.रोड कडेच मोर्चा वळवला. आज पुन्हा मोमो खायची इच्छा जागी झाली होती. :)

क्रमश...

3 comments:

  1. माझं इथे जाणं राहून गेलं.
    पुन्हा कधी जाणं होतं कोण जाणे. :०

    ReplyDelete
  2. जाशील रे कधीतरी. पण जितक्या लवकर जाशील ते उत्तम.. :) येत्या एप्रिल मध्ये सुट्टी काढ आणि जाऊनच ये कसा :)

    ReplyDelete
  3. नथुला-पासचा अनुभव अविस्मरणीय़ होता. आत्ता पोस्ट वाचताना पुन्हा सारे आठवून रोमांच उभे राहीले. बॉर्डरला-तारेच्या कुंपणाशी जाऊन उभे राहील्यावर वेगळ्याच भावना मनात येतात. बाबा मंदिराचे महत्व व जोपासना ज्या पध्दतीने आजही केली जाते आहे ते पाहून मन थक्क झाले.

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...