Friday 2 October 2009

लडाखचा सफरनामा - लडाखचे अंतरंग ... !

आज बरेच दिवसांनंतर तसा थोडा निवांतपणा होता. ना लवकर उठून कुठे सुटायचे होते ना कुठे पुढच्या मुक्कामाला पोचायचे होते. काल रात्री लेहला आल्यापासून जरा जास्त बोललो किंवा जिने चढ-उतर केले की लगेच दम लागत होता. रात्री नुसते सामान खोलीमध्ये टाकेपर्यंत धाप लागली होती. सकाळी ८ वाजता आम्ही नाश्ता करायला टेबलावर हजर होतो. मस्तपैकी लडाखी ब्रेड सोबत चहा - कॉफी, बटर - जाम आणि ज्यांना हवे त्यांना ऑमलेट असा नाश्ता तयार होता. साधना काल रात्री १२ वाजता आल्यानंतर काहीही न खाता झोपली होती. त्यामुळे ती कालचे तिचे किस्से सांगण्यात मग्न होती. ते दोघे मागे राहिले होते न काल. फोटू-लाच्या छोटूश्या रस्त्यावरुन अंधारातून वेडीवाकडी वळणे घेत येताना दोघेही आम्हाला सारखे फोन करत होते. पण फोन लागतील तर ना इकडे. साधनाने नंतर सांगितले मला की तिला त्यांचा 'दि एंड' होणार असेच वाटत होते. आज सकाळी मात्र खुश होती एकदम. सर्वच आनंदात होते तसे. मोहिमेचा पहिला टप्पा सुखरूपपणे पार झालेला होता. नाश्ता करता करता सर्वजण आप-आपल्या घरी आणि मित्र-मैत्रिणींना फोन करत होते. मोकळ्या हवेवर फूलबागेच्या शेजारी बसून गप्पा टाकत नाश्ता करायला काय मस्त वाटत होते. खरचं. मस्तच होते ते गेस्ट हाउस. छोटेसे असले तरी अगदी घरासारखे. पुढचे ४ दिवस तर आम्ही त्याला आपले घरच बनवून टाकले होते. हवे तेंव्हा या आणि हवे तेंव्हा जा. नबी आणि त्याच्या कुटूंबाने देखील आमचे अगदी घरच्यांसारखे आदरातिथ्य केले.



नाश्ता आटोपल्यानंतर ठरल्या प्रमाणे मी, अभिजित, आदित्य, अमेय साळवी, कुलदिप असे ५ बायकर्स बाइक रिपेअरसाठी घेउन गेलो. तिकडे गेले ३ दिवस ऐश्वर्याची तब्येत खालीवर होत असल्याने पूनम तिला घेउन जवळच्या हॉस्पिटलला गेली. मनाली, उमेश आणि आशिष गेस्ट हॉउसच्या फुलबागेत फोटो टिपत बसले होते. शमिका आणि दिपाली 'असीम' म्हणजे नबीच्या पोराबरोबर खेळत होत्या. कसला गोड पोरगा होता. अवघ्या काही मिनिटांमध्ये मस्त मिक्स झाला तो आमच्यात. मज्जा, मस्ती आणि मग त्याचे फोटो काढणे असे सर्व प्रकार सुरू होते. साधना आणि उमेशला गेल्या ४ दिवसातले केलेले शूटिंग ऑफिसला पाठवायचे असल्याने ते त्यावर काम करत बसले होते. आमचा ड्रायवर आज जम्मूला परत जाणार होता; तेंव्हा शूटिंगच्या टेप्स त्याच्याबरोबर पाठवून द्यायच्या होत्या. १२ वाजता आम्ही सर्व बाइक्स रिपेअर करून घेउन आलो. लंच झाला की आसपास फिरायला जायचे असा प्लान केला. ऐश्वर्याने मात्र बाहेर न पडता पूर्ण दिवसभर आराम करायचा असे ठरवले होते. दुपारचे जेवण झाल्यावर ३ वाजता आम्ही फिरायला बाहेर पडलो. दुपारी ३ वाजता सुद्धा लेह मार्केटमध्ये बरीच गजबज होती. आमचे गेस्ट हाउस मार्केटच्या पलिकडच्या टोकाला असल्याने मार्केट मधुनच जावे लागायचे. मार्केटमधून खाली उतरून खालच्या चौकात आलो की एक मोठी कमान लागते. लडाखी पद्धतीचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार. काल रात्री आलो तेंव्हा नीट बघता आले नव्हते तेंव्हा आत्ता जरा नीट थांबून पाहिले. इकडून रस्ता अजून खाली उतरत जातो आणि त्या मुख्य चौकात येतो. इकडून समोरचा रस्ता श्रीनगरकडे जातो. त्याच रस्त्याने आम्ही काल आलो होतो. डाव्या हाताचा रस्ता जातो सरचूमार्गे मनालीकडे. या ठिकाणी डाव्या हाताला लेह सिटीमधला एकमेव पेट्रोलपंप आहे. तेंव्हा आम्ही आमच्या लंचनंतर बाइक्सना सुद्धा त्यांचा खाऊ दिला हे सांगायला नकोच.



चौकातून निघालो आणि मनालीकडे जाणाऱ्या रस्ताने १८ की. मी. अंतर पार करून काही मिनिटात थेट 'ठिकसे गोम्पा'ला पोचलो. (इकडे मात्र 'गोन्पा' असे लिहिले होते) 'गोम्पा'ला मराठीमध्ये 'विहार' असा शब्द आहे. आपल्याकडे कार्ला-भाजे सारख्या बुद्ध गुंफांचे विहार प्रसिद्द आहेतच. ठिकसेकडे येताना मध्ये 'सिंधूघाट दर्शन' आणि 'शे पॅलेस' ही ठिकाणे लागतात. मात्र आम्ही ह्या जागांवर परत येताना वळणार होतो. एका छोट्याश्या डोंगरावर ठिकसे गोम्पा वसलेली आहे. पाहिल्या-पहिल्याच एकदम प्रसन्न वाटले. ठिकसे ही लडाख भागामधल्या अत्यंत सुंदर गोम्पांपैकी एक असून १४३० साली बनवली गेली आहे. प्रवेशद्वार विविध रंगांनी सजवलेले आहे. आत गेलो की उजव्या हाताला अनेक प्रकारची फूले त्यांच्या रंगांनी आपले लक्ष्य वेधून घेतात. डाव्या हाताला काही दुकाने आहेत. येथे काही खायला आणि काही माहिती पुस्तके मिळतात. गोम्पामध्ये प्रवेश करण्यासाठी ३०/- प्रवेश फी द्यावी लागते.






थोड्या पायऱ्या चढून वर गेलो. रस्त्यावरुन येताना जसे ठिकसेचे सुंदर दृश्य दिसत होते तसेच दृश आता ठिकसेवरुन सभोवताली दिसत होते. नकळत आम्ही सर्व फोटो टिपायला थांबलो. आशिष मात्र एकटाच अजून थोडा वर पोचला होता. आम्ही जेंव्हा अजून वर जाण्यासाठी पुढे निघालो तेंव्हा आशिष कमरेवर हात ठेवून वरतून आमच्याकडे बघत होता.  डोक्यावरती काउबॉय हॅट, अंगात फुल स्वेटर आणि जिन्स... मागुन येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे एक वेगळाच इफेक्ट तयार झाला होता. ते बघून मला उगाच याराना पिच्चरमधल्या 'ये सारा जमाना ... ' गाण्यामधल्या अमिताभच्या जॅकेटची आठवण झाली. त्यात नाही का ते लाइट्स लावले आहेत. तसाच चमकत होता दादाचा स्वेटर. पुन्हा त्याचे फोटो शूट झाले आणि मग आम्ही अजून वर निघालो. कुठल्या ही गोम्पामध्ये तुम्हाला खुप फिरत्या घंटा बघायला मिळतील. गोम्पामधली घंटा क्लॉकवाइज म्हणजेच आपण देवाला प्रदक्षिणा मारतो त्याच दिशेने फिरवायची असते. चांगला दिड-दोन मीटरचा व्यास असतो एका घंटेचा. ती घेउन गोल-गोल फिरायचे. तिला वरच्या बाजूला एक लोखंडी दांडी असते ती दुसऱ्या दांडीला आपटून घंटानाद होतो. या संपूर्ण मार्गावर उजव्या हाताला छोट्या-छोट्या घंटा बनवलेल्या आहेत. त्या सर्व फिरवत वर जायचे. मजेचा भाग सोडा पण फिरत्या घंटा म्हणजे गतिमानतेचे आणि समृद्धीचे प्रतिक मानल्या गेल्या आहेत. तीच गतिमानता आणि समृद्धी भगवन गौतम बुद्ध सर्वांना देवोत हीच सदभावना ठेवून आत प्रवेश केला.



गोम्पाच्या मुख्यभागात प्रवेश केला की प्रशस्त्र मोकळी जागा आहे. आतमध्ये बोद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रार्थना सभागृह आहे. आम्ही गेलो तेंव्हा नेमकी तिथल्या लामांची प्रार्थना सुरू होती. खुप जुन्या ग्रंथांचे ते मोठ्याने पठण करत होते. त्यांचा तो आवाज संपूर्ण खोलीमध्ये घुमत होता. आम्ही अर्थात अनवाणी पायांनी कुठलाही आवाज न करता आत गेलो. आतील संपूर्ण बांधकाम लाकडाचे आहे. सभागृहाच्या शेवटी अजून एक खोली होती. तेथे भगवन गौतम बुद्ध आणि काही इतर जणांच्या मुर्त्या होत्या. फ्लॅश न वापरता फोटो घ्यायला परवानगी होती. त्या पाहून आणि  फोटो काढून बाहेर आलो. लामांचे पठण करून संपले होते. आम्ही आता प्रार्थना सभागृह पाहिले. दलाई लामांचा फोटो आणि इतर अनेक जुन्या मुर्त्या तेथे होत्या. पण नेमकी माहिती द्यायला कोणी नव्हते तिथे.




तिथून बाहेर पडलो आणि समोर असणाऱ्या पायऱ्या चढून खोलीमध्ये गेलो. शेवटच्या पायरीवर पाउल ठेवल्यानंतर अवाक् बघत रहावे असा नजारा होता. भगवन गौतम बूद्धांची जवळ-जवळ ३ मजली उंच मूर्ती डोळे दिपवून टाकत होती. जितकी प्रसन्न तितकीच प्रशत्र. अहाहा... मुकुटापासून ते खाली पायांपर्यंत निव्वळ सुंदर... रेखीव... अप्रतिम कलाकुसर... कितीतरी वेळ मी त्या मूर्तीकडे पाहतच बसलो होतो. मूर्तीला प्रदक्षिणा मार्ग आहे. आपण प्रवेश करतो तो खरंतरं २ रा मजला आहे. त्यामुळे बाकी मूर्ती खाली वाकून बघावी लागते. संपूर्ण मूर्तीचा फोटो वाइडलेन्सने तरी घेता येइल का ही शंकाच आहे. मूर्ती समोर काही वेळ बसलो आणि मग तेथून निघालो. बाहेर पडलो तरी माझ्या मनातून ती मूर्ती काही जात नव्हती. साधना आणि उमेशला मात्र काय-काय शूट करू असा झाल होत. एक टेक घेताना कधी साधना चुकत होती तर कधी उमेशला हवी तशी फ्रेम मिळत नव्हती. शोंत.. घेता-घेता ४ वेळा पायऱ्या चढ़-उतर केल्या तिने. चांगलीच दमली होती ती. अखेर तिकडून निघालो आणि बाइक्स काढल्या. आता पुढचे लक्ष्य होते 'शे पॅलेस'. लेहच्या दिशेने घोडे म्हणजे आमच्या बाइक्स पळवल्या आणि १० मिं. मध्ये 'शे पॅलेस 'पाशी येउन पोचलो.









'शे' हे मुळात गोम्पा होते. १६५० मध्ये देलडॉन नामग्याल (King Deldon Namgyal) या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे 'सिंगाय नामग्याल' (Singay Namgyal) यांच्या आठवणीमध्ये राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज निवासस्थान होते. आता सध्या येथे फार कोणी रहत नाही. गोम्पाची काळजी घेणारे काही लामा आहेत बास. राजवाडा म्हणण्यासारखे सुद्धा काही राहिलेले नाही येथे. खुपश्या खोल्या बंदच आहेत. असे म्हणतात की ह्या राजवाडयाखाली २ मजली तळघर आहे. काय माहीत असेलही. पण आम्ही काही ते शोधायचा प्रयत्न केला नाही. एक चक्कर मारली आणि 'शे'चे आकर्षण असलेल्या बुद्ध मूर्तीला भेट द्यायला गेलो. ठिकसेप्रमाणे येथे सुद्धा ३ मजली उंच बुद्ध मूर्ती आहे. तितकी रेखीव नाही पण भव्य निश्चित आहे. आम्ही येथे पोचलो तर एक मुलगी बुद्धमूर्तीचे स्केच काढत होती. सुंदर काढले होते तिने स्केच. काही वेळात तिकडून निघालो आणि पुन्हा खाली आलो. लेह-लडाखमध्ये जिथे पाहाल तिथे तुम्हाला स्तुपाशी साधर्म्य दर्शवणारे एकावर एक दगड रचलेले दिसतील. कधी कुठे डोंगरावर तर कुठे छोट्याश्या प्रस्तरावर. शे मध्ये असे चिक्कार छोटे-छोटे दगडी स्तूप दिसले. मग मी सुद्धा एक बनवला आणि त्याचा छानसा फोटो घेतला. फोटो खरच मस्त आला आहे. मला स्वतःला खुप आवडला. बघा तुम्हाला आवडतो का ते.



परत येताना उमेश आणि अमेयने काही मस्त फोटो घेतले. खास करून उमेश आज फुल फॉर्ममध्ये होता. काय ती एक-सो-एक फ्रेम पकडत होता आणि अंगल घेत होता. उमेशने काढलेला 'कलर फ्लॅग्स'चा हा फोटो हा आमच्या लडाख मोहिमेमधला सर्वोत्कृष्ट फोटोंपैकी एक आहे. ५ वाजून गेले होते आणि अजून २ ठिकाणी जायचे होते आम्हाला. तेंव्हा इकडून सुटलो आणि थेट पोचलो 'सिंधूघाट' येथे.







सिंधू नदीवर बांधलेला हा एक साधा घाट आहे. खरे सांगायचे तर ह्यापेक्षा जास्त सुंदर आणि स्वच्छ सिंधू नदी आम्ही आधीच्या ५ दिवसात पाहिली होती. शिवाय इकडे प्रवाह तितका खळखळ वाहणारा सुद्धा नव्हता. संथ होते सर्व काही. नदीपलीकडचे डोंगर मात्र सुरेख दिसत होते. लडाखमधल्या डोंगरांच्या रंगांनी मला खरच वेड लावले. त्यावर झाडे नसून सुद्धा किती छान दिसायचे ते. वेगळ्याच पद्धतीचे सौंदर्य होते ते. इकडे फोटो मात्र मस्त काढले आम्ही. माझा आणि आशीष दादाचा तसेच माझा आणि शमिकाचा (आख्या ट्रिपमधला एकमेव क्लोज़ फोटो) असे काही मस्त फोटो आले आहेत. इकडे काही मराठी लोक भेटले. त्यांनी सुद्धा विचारपुर केली बरीच. कुठून आलात? बाइक्स वर? अरे बापरे !!! .. वगैरे झाले. तिकडून निघालो ते थेट लेह सिटीमध्ये असणाऱ्या शांतीस्तूप येथे.









शांतीस्तूपला पोचलो तेंव्हा खरंतरं अंधार पडायला फार वेळ नव्हता. पण संध्याकाळचा चहा-कॉफी काही झाली नव्हती म्हणुन पटकन चहा-कॉफी मारुया असे ठरले. उमेश, साधना आणि आशिष मात्र आधीच पुढे निघून गेले होते. त्यांना माहीत पण नव्हते की आम्ही मागे थांबलो आहोत. १५-२० मिं. मध्ये मी पुढे जाउन वर पोचलो. शांतिस्तूप हे एक प्रकारचे शिल्प आहे. स्तुपापर्यंत चढून जायला पायऱ्या आहेत. तेथे 'बुद्धजन्म' आणि 'धम्मचक्र' अशी २ प्रकारची चित्रे काढलेली आहेत. स्तुपासमोर प्रशत्र मोकळी जागा असून येथून लेह सिटीचे सुंदर दृश्य दिसते. काही मिनिटे इकडे बसलो. बाजुलाच साधना आणि उमेशची शूटिंगची लगबग सुरू होती आणि आशिष त्यांचे फोटो काढत होता. अंधार पडायच्या आत त्यांना आजचा क्लोसिंग शॉट घ्यायचा होता. इतक्यात स्तुपाच्या पायर्‍यांवरुन व्हायोलिनचे सुर ऐकू येऊ लागले. बघतो तर काय. एक लामा मस्त व्हायोलिन वाजवत होता. कुठलीशी छानशी शांत धून होती. त्या नयनरम्य संध्याकाळला साजेल अशीच. त्याच मुडमध्ये तिकडून निघालो. आज निवांतपणे बरेचसे लेहदर्शन झाले होते. आता अजून एक लक्ष्य होते. काय विचारताय!!! मार्केटमध्ये जाउन हॉटेल ड्रिमलँड शोधायचे. त्याकामाला २ जण लागले बाकी आम्ही बायकर्स पेट्रोलपंपला पोचलो. उदयाच्या घोड़दौडीसाठी टाक्या फूल करून घेतल्या. तितक्यात ड्रिमलँडचा पत्ता लागल्याची खबर आली. हा... हा... मग आमचा मोर्चा तिकडे वळला. सर्वजण ९ वाजता बरोबर हॉटेल ड्रिमलँडला पोचलो. काय-काय जेवलो ते माझ्या फूड ब्लॉग वर लिहेनच मी. पण बरेच दिवसांनी एकदम 'ठिकसे' जेवलो... :D जेवण आटपून गेस्ट हाउसला पोचलो आणि ११ वाजता मीटिंग घेतली. लडाखमधले पहिले मोठे लक्ष्य उदया पूर्ण करायचे होते आणि आम्ही सर्व त्यासाठी सज्ज झालो होतो...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - 'चांग-ला' १७५८६ फुट उंचीवर ... !
.
.
.

12 comments:

  1. mastch re dada.. ata tar mi asmit chya magech lagliye ki apan pan ekda leh ladakh bike safar karaychich.. ;)... bol yeshil ka aamchya sobat parat.. pan arthat kahi varshanni haan..

    baki liihil khupch mast aahe.. jhakkas ekdam.. ani tujha ani shamika cha photu pan lay bhari.. ;)..

    ReplyDelete
  2. लडाखला बटर आणि नमक वाली चाय प्यायलास की नाही? त्या बद्दल नाही लिहिलं कुठे. नुसतं प्रवास वर्णन काय लिहितोस, सोबत चांगली खादाडी कुठे आणि काय केली ते पण लिही जरा. :)

    ReplyDelete
  3. हेय रोहन पुन्ना एकदा लेह सफ़र झाल्या सरखे वट्टेय रे

    ReplyDelete
  4. अनुजा ... तुम्ही तर खुपच दिवस राहिला होतात की. मस्तच फिरला असाल.

    किर्ती ... मी येइन की नाही ते माहीत नाही पण तू आणि अस्मित नक्की जाउन या.

    ReplyDelete
  5. दादा .. बटर वाली चाय प्यायलो.. पण नमकवाली नाही :( खरं सांगायचा तर खादाडी फारशी नाही झाली लडाख ट्रिपमध्ये. जिकडे जे मिळायचे ते खायचो. :)

    ReplyDelete
  6. Rohan really great work man......
    It's been like ,yesterday only we've been there.....

    ReplyDelete
  7. होय रे अमेय ... मला सुद्धा लिहिताना तसच वाटतय ... :) हा बघ निघालो मी 'चांग-ला'ला...:D

    ReplyDelete
  8. रोहन आजच्या भागात बरीच माहिती मिळाली. शिवाय तू सविस्तर लिहीलीस व बरोबरीने फोटोही जोडल्याने अजूनच चांगले वाटले. दगडांचा, फ्लॆगचा व तुझा-शमिकाचा फोटो आवडला मला.:)

    ReplyDelete
  9. धन्यवाद भानस ताई ... तरी थोडा घाईत झाल्यासारखा वाटला हा भाग. अजून असे काही मस्त फोटो येतीलच पुढे.

    ReplyDelete
  10. khoop interesting aani mahitipurna hota ha post.. ekdum aavadla :)
    aani he asach shantistup bahutek darjeeling/ Gangtok la pahilyasarkha aathavtay..

    baki photos khoop mast aahe aani post la anurup pan :)

    ReplyDelete
  11. फ्लॅगचा फोटो तर नाद खुळा आहे!!!!! अरे यार खूप नवीन माहिती मिळत आहे!!! बाकी पोस्ट नेहमीप्रमाणेच उत्तम आहे!!

    ReplyDelete
  12. धन्यवाद पूनम आणि मनमौजी... काही फोटो खरच मस्त आले. ब्लॉग लिहायचा हे आधीपासून डोक्यात असल्याने तसे-तसे फोटो घेत गेलो आम्ही... :D

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...