रस्त्याच्या दोन्ही बाजुला आता ऊसच-उस होता. पण एक मिळेल तर शप्पथ. ऐश्वर्याचे 'मला ऊस.. मला ऊस..' सुरूच होते. शेवटी म्हटले 'आता त्या शेतात घुस.' जागोजागी ऊस आणि त्याच्या बाजुला बैलजोड़ीचे रहाट. दूरच्या शेतात एक मस्त दृश्य टिपायला मिळाले. आपल्या बैलजोड़ी सोबत शेतकरी रहाटावर पाणी उपसत होता आणि ते पाणी पाटातून वाहत शेताकडे जात होते. ते दृश्य टिपायला मी एकटाच मागे थांबलो होतो. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. काही वेळात मी पुढे जाउन पोचलो तर सर्वजण रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसले होते आणि उरलेली सिताफळे आणि मोसंबी खात होते. कितीही खाल्ली तरी मन भरेना अशी गोड गोड सिताफळे होती ती. बाजुच्या एका गावातली शाळात सुटली होती आणि लहान लहान मूले सर्वांकडे पेन मागत होती. (लडाखमध्ये सुद्धा आम्हाला हाच अनुभव बऱ्याच ठिकाणी आला की मूले खाऊ किंवा पैसे ऐवजी पेन मागत आहेत) आमच्याकडे मात्र त्यांना द्यायला पेन काही नव्हते... :(
आता कुंभळगड़ अगदीच जवळ आले होते. आम्ही आता 'आरेठ की भागल' या गावातून पुढे निघालो. गावातल्या शाळेसमोर एका पिंपळाच्या झाडावर चिक्कार वटवाघुळे लटकली होती. चक्क दुपार असून सुद्धा. थोड़े पुढे जातो तोच आमचा गाईड शिवसिंग म्हणाला,"यहाँसे आगे जा रहे हे; तो मेरे घर भी चलिए". अरेच्या हे तर त्याचेच गाव होते. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. काहीजण मात्र 'नही-नही हम आगे जायेंगे' करत पुढे निघून गेले. कसे असतात ना काही लोक. तो इतका घरी बोलावतोय आणि हे आपले सुटले आहेत. आम्ही मात्र त्याच्या घरी गेलो. चांगले १ मजले घर होते. खालची खोली बंद होती. बहुदा सामानाची असावी. बाहेर छोटासा गोठा होता. त्यात एक गाय आणि तिचे वासरू होते. आम्ही जीनेचढून वर गेलो. छोटीशी गच्ची होती आणि मागे खोल्या. आम्ही गच्चीवर विसावलो. शिवसिंगने आतून २-३ कटोरी भरून दही आणले. ऐश्वर्याला देत म्हणाला,"ये भी चख के देखिये." मग त्याने बाकीच्यांना सुद्धा दही दिले. इतके गोड दही नाही बा मी चाखले कधी. काही वेळात आम्ही तिकडून निघालो आणि पुढच्या मार्गाला लागलो. आता उसाची शेती संपली होती आणि रस्त्याच्या बाजुला झाडांवर सिताफळे दिसत होती. गावानंतर कच्चा रास्ता संपला आणि आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. कुंभळगड़चा बोर्ड सुद्धा दिसला. थोडेसे पुढे लगेच रस्त्याच्या बाजुला 'लकी होटेल' लागले. आमचा आजचा ठिकाणा हाच होता.
दररोज रात्री ८ ते ८:३० ह्या अर्ध्या तासात इकडे 'लाईट शो' असतो. पहिल्या रामपोल दरवाजा ते वरच्या बदाम महालापर्यंत सर्वत्र यल्लो लाइट्स लावलेले आहेत. अत्यंत सुंदर दिसतो कुंभळगड़. आपल्याकडे कधी करणार असे टुरिझम देवजाणे. तिकडे अर्धातास थांबुन आम्ही काही फोटो घेतले आणि मग जेवणासाठी होटेलवर परतलो. जेवल्यानंतर सुद्धा आम्ही बराच वेळ गप्पा मारत होटेल बाहेर रस्त्यावर बसलो होतो. झोपायला म्हणून आत गेलो तेंव्हा घोरण्याचा इतका आवाज येत होता की असह्य झाले होते. शेवटी सामान उचलले आणि बाहेर येउन झोपलो. आत्ता कुठे ९:३० होत होते आणि ह्यांचे फुल ऑन 'घोरायण' सुरू झाले होते. ऐश्वर्या, मनाली आणि अनुजा सुद्धा त्यांच्या खोलीमधून बाहेर येउन आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक माझ्या अंगात काय आले माहीत नाही पण मी 'राजू श्रीवास्तव'ची एक्टिंग सुरू केली. त्या नंतर जे काही घडले ते अवर्णनीय आहे. राजूने लाफ्टर चाल्लेंज मध्ये जे-जे एपिसोड करून दाखवले ते-ते सर्व मी तसेच्या तसे डायलोंग आणि एक्टिंग सकट प्रेझेंट केले. खरंतरं हां कैंपफायर आयटम होता. संजू, अनुजा आणि ऐश्वर्या इतके जोरात हसत होते की झोपलेले जागे झाले आणि घोरणारे सुद्धा उठले. सत्संग प्रवचन पासून शोलेवाला, आणि डिनर पासून ते न्यूज़ रीडर पर्यंत असे सर्वच्यासर्व आयटम मी १ तास करून दाखवले. संजू पायवर घेउन आणि लोळून-लोळून राक्षसी हास्यासकट फुटला होता. अखेर १०:३० वाजता मुलींच्या खोली मधून एक बाई बाहेर आली आणि तिने कैंपलिडरकडे तक्रार केली. आम्ही म्हटले १०:३० तक तो कैंपफायर का टाइम होता हे सर. पण मग आम्ही झोपून गेलो. त्या एकतासात जी काही मज्जा आली ती पुन्हा नाही आली कधी. मला सुद्धा आता ते सर्व डायलोंग पाठ राहिलेले नाहीत. पुन्हा एकदा राजूचे सर्व एपिसोड बघावे लागतील बहुदा... :D हाहा.. गेले २ दिवस आम्हाला जागे ठेवून स्वतः घोरायण करणारया घोरटयान्ना आज आम्ही जागे ठेवले होते. थोड्या वेगळ्या स्टाइलने. शेवटी ११ वाजता आम्ही गुडुप झालो. सकाळी लवकरच निघायचे होते... कुंभळगड़ बघायला...
.
.पुढील भाग : ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !
.
.