Wednesday, 16 September 2009

लडाखचा सफरनामा - पूर्वतयारी ... !

लडाखला जाण्याचे २००३ पासून मनात होते. दरवर्षी एप्रिल महिना आला की लडाखचा विषय उचल खायचा आणि जून सुरू होता-होता ह्या-ना-त्याकारणाने 'ह्या वर्षी नाही रे शक्य. पुढच्या वर्षी बघू.' अश्या एका वाक्याने तो गुंडाळला जायचा. ह्यावर्षी मात्र जानेवारी महिन्यातच मी हा विषय उचलला आणि अभिजितला म्हटले,"काहीही झाले तरी ह्यावर्षी लडाख सर करायचेचं." अभिसुद्धा वाट बघत होताच. मग सुरू झाली तयारी एका अविस्मरणीय प्रवासाची. एक असा प्रवास जो आम्हाला आयुषभरासाठी अनेक आठवणी देउन जाणार होता. काही गोड तर काही कटु. आमच्यात नवे बंध निर्माण करणार होता तर मनाचे काही बंध तोडणार सुद्धा होता. पूर्व तयारीची संपूर्ण अघोषित जबाबदारी प्रामुख्याने अभिने उचलली होती. त्याला हवी तिथे आणि जमेल तशी मदत मी करणार होतो. ह्या बाइक ट्रिपमध्ये भारत-चायना सीमेवर असणारे १५००० फुटांवरील 'पेंगोंग-त्सो''त्सो-मोरीरी' आणि '१८३८० फुटांवरील जगातील सर्वोच्च उंचीचा रस्ता खरदूंग-ला' ही मुख्य उदिष्ट्ते होती. तसेच झोजी-ला, द्रास - कारगिल ह्या 'ऑपरेशन विजय' च्या रणभूमीला भेट देणे हे सुद्धा आम्हाला अनुभवायचे होते. १९९९च्या कारगिल युद्धाला बरोबर १० वर्षे पूर्ण होत होती आणि १५ ऑगस्टचे निम्मित साधून आमच्या लडाखच्या सफरीचा योग जूळून आला होता.
एक मेल टाकली आणि बघता बघता १५ जण तयार झाले. अभि आणि माझ्या बरोबर मनाली, ऐश्वर्या, पूनम, कविता, दिपाली, अमेय साळवी, अमेय म्हात्रे, आदित्य आणि शोभित असे पटापट तयार झाले. आशिष, कुलदीप, शमिका, साधना आणि उमेश हे जायच्या आधी काही दिवसात टीममध्ये आले तर कविताचे ऐन वेळेला काही कारणाने यायचे रद्द झाले. जेंव्हा लडाखला जायचे ठरले तेंव्हा बाइकने जायचेचं असे काही पक्के नव्हते पण मला स्वतःला आणि इतर अनेकांना लडाख बाइकवरुन करायची उत्कट इच्छा होती. अखेर ऑगस्ट ८ ते २२ असा कालावधी नक्की करून आम्ही तयारीला लागलो. खर्चाचे गणित जूळवणे, बाइकवरुन जाण्याचा रूट ठरवणे, त्यासाठी लागणारी तयारी, जमेल तिकडचे रहायचे बुकिंग करणे, ११ हजार आणि अधिक फुटांवर स्वतःच्या आणि बाइकच्या तब्येतीची काळजी घेणे ह्या अश्या अनेक बाबींवर अभिने मेल्स टाकायला सुरवात केली होती. बाइक रायडर्समध्ये म्हणजेच मी, अभिजित, अमेय साळवी, अमेय म्हात्रे, आदित्य यांच्यात ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले आणि त्यासाठी आम्ही ६-७ जूनला 'राजमाची बाइक ट्रिप'ला गेलो. ह्या ट्रिपचा आम्हाला लडाखला बराच फायदा झाला.


जून संपता-संपता नाही म्हटले तर बरीच तयारी झाली होती आणि म्हटले तर बरीच राहिली सुद्धा होती. मी पूर्ण जुलै महिना कामावर मेक्सिकोला जाणार असल्याने माझी सर्व तयारी मी आधीच पूर्ण केली. मी नसल्याने आमच्या बाइकच्या तयारीची जबाबदारी आशीषदादाकड़े होती. सगळ्याची तयारी शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होती. निघायच्या ५ दिवस आधी म्हणजेच २ ऑगस्टला अभिने शेवटची ग्रुप मीटिंग घेतली. त्यात असे ठरले की अभिजित हे ट्रिप 'लिड' करेल. सर्वानुमते निर्णय घेतले तरी अंतिम निर्णय त्याचा असेल. त्याच्या अनूपस्थितीत मला 'डेप्युटी लीडर'ची जबाबदारी दिली. आमच्या दोघांशिवाय प्रत्येकाला अनुभव मिळावा म्हणुन 'दररोज वेगवेगळा लीडर' ठेवायचा असे ठरले होते. लडाखची सर्व पूर्वतयारी झाली होती. ग्रुप मीटिंग झाल्यावर सर्व बायकर्स् तिकडून निघाले ते थेट वांद्रे (बांद्रा) स्टेशनला बाइकस लोड करायला .....
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - जम्मूसाठी रवाना ... !
.
.
.

12 comments:

 1. उत्सुकता आहे पुढच्या भागांची. माझे ही ते स्वप्न आहे, एकदा तरी जाईनच.. ते ऑक्सीजन कमी असते म्हणे तिथे, त्यामुळे जरा भिती वाटते इतकेच.

  पुढच्या सफरींचे अधुन मधुन फोटो मात्र टाक नक्की

  ReplyDelete
 2. ऑक्सीजन कमी असतो रे ... पण त्यामुळे भीतीचे कारण नाही. Systematic Aclamatize झालात तर काहीच प्रॉब्लम येत नाही. आमच्यापैकी कोणाला सुद्धा काही विशेष त्रास झाला नाही. अगदी १८३८० फुटला सुद्धा... आणि हो पुढच्या भागात फोटो तर येतीलच... अगदी भरभरून ...

  ReplyDelete
 3. गेल्यावर एक दिवस आराम करायचा. अगदी काहिच करायचं नाही. तिथल्या हवामानाची सवय होते. अरे तु मला सांगितलं नाहिस कांही मदत हवी कां ते.. तुझ्या मित्राचा पण फोन आला नाही , तेंव्हा मला वाटलं की तुला अजुन वेळ आहे जायला.. असो .. ट्रिप छान झाली.. वाचुन बरं वाटलं.. मी पण हार्ड कोअर बाईकर. पण हल्ली वयोमाना प्रमाणे बाइक चालवणं थांबवलंय. बुलेट कोपऱ्यात पडुन आहे.. टायर्स फ्लॅट.. बॅटरी डाउन.. :(
  चल.. नंतर लिहिन सावकाश..

  ReplyDelete
 4. अरे दादा ... मी म्हटले होते ना तूला ....अगदीच गरज पडलीच तर कॉल करीन...

  अरे तू सुद्धा हार्डकोअर बायकर ... सही. तुझे त्यावरचे अनुभव ऐकायला देखील आवडेल मला...

  ReplyDelete
 5. रोहन, सुरवात मस्त झाली. मी फोटो तर पाहिलेच आहेत.:) आता सगळे डिटेल्स येऊ देत पटापट.

  ReplyDelete
 6. एकदा बाइकवरुन मुंबई ते कर्नाळा गेले होते त्याची उगाच आठवण झाली. पुढचा भाग वाचायला नक्की आवडेल. बाइकवरुन लडाख म्हणजे सही...

  ReplyDelete
 7. वेळात वेळ काढुन लिखाणाची सुरवात झाली म्हणायचे ............

  ,आता सकाळ सकाळ मस्त तुझ्या लिखाणाची मेजवानी मिळणार .!

  ReplyDelete
 8. hey nice man, waiting for the next

  ReplyDelete
 9. अपर्णा, भानस ताई, अनुजा आणि अमेय ... लवकरात लवकर लिहायचा माझा सुद्धा प्रयत्न आहे ... :)

  ReplyDelete
 10. आम्ही वाटच बाघतोय रे

  ReplyDelete
 11. हा सफरनामा नक्कीच अविस्मरणीय असेल. . . पुढील पोस्टची वाट बघतोय. . .त्यासोबत फोटो सुद्धा!!!!

  ReplyDelete
 12. होय मनमौजी ... हा सफरनामा खरेच अविस्मरणीय होता. pudhcha भाग टाकला आहे की ... फोटो लिंक सुद्धा येतील लवकरच...

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...