"ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीचं स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते."
ज्यांनी 'आपल्या उदयासाठी स्वतःचा आज दिला' अश्या वीर जवानांचे स्मरण आणि आपल्या आयुष्यातले काही क्षण त्यांना अर्पण करावे याहेतूने आम्ही 'द्रास वॉर मेमोरिअल'ला भेट द्यायला निघालो होतो. डाक बंगल्यावरुन बाहेर पडतानाच समोर 'टायगर हिल' दिसत होते. त्याच्या बाजुलाच पॉइंट ४८७५ म्हणजेच ज्याला आता 'कॅप्टन विक्रम बत्रा टॉप' म्हणतात ते दिसत होते. संध्याकाळ होत आली होती. उमेश आणि साधनाला इकडे बरेच शूटिंग करायचे असल्याने ते बाइकवरुन आधीच पुढे गेले होते. जेणेकरून अंधार पडायच्या आधी त्यांना सर्व शूट करता येइल.
द्रासवरुन पुढे कारगीलकडे निघालो की ७ की.मी वर डाव्या हाताला वॉर मेमोरिअल आहे. द्रासमध्ये सध्या पंजाबची माउंटन ब्रिगेड स्थित आहे. २६ जुलै २००९ रोजी संपूर्ण भागात आर्मीने १० वा कारगील विजयदिन मोठ्या उत्साहात आणि मिश्र भावनांमध्ये साजरा केला. एकीकडे विजयाचा आनंद तर दूसरीकडे गमावलेल्या जवानांचे दुखः सर्व उंच पर्वतांच्या उतारांवर '10th Anniversary of Operation Vijay' असे कोरले आहे. खरं तरं २६ जुलैलाच या ठिकाणी यायची इच्छा होती. मात्र मी कामावर असल्याने ते शक्य झाले नाही. तेंव्हा १५ ऑगस्टला जोडून या ठिकाणी भेट द्यायची असे आधीच नक्की झाले होते. लडाख मोहिमेचे महत्वाचे उद्दिष्ट हेच होते. २० एक मिं. मध्ये मेमोरिअलला पोचलो. परिसर अतिशय शांत आणि पवित्र वाटत होता. सध्या ह्या स्मारकाची जबाबदारी '२ ग्रेनेडिअर' ह्या रेजिमेंटकडे आहे. 'Indian Army - Serving God and Country With Pride' हे प्रवेशद्वारावरचे वाक्य वाचून नकळत डोळे पाणावले गेले. मुख्य प्रवेशद्वारापासून खुद्द स्मारकापर्यंत जाणाऱ्या पदपथाला 'विजयपथ' असे नाव दिले गेले आहे. या पदपथावरुन थेट समोर दिसत होते एक स्मारक. ज्याठिकाणी पर्वतांच्या उत्तुंग कडयांवर आपल्या जवानांनी प्राणांचे बलिदान दिले त्याच ठिकाणी त्या वीरांचे एक सुंदर स्मारक उभे केले आहे.
त्या विजयपथावरुन चालताना मला आठवत होती १० वर्षांपूर्वीची ती एक-एक चढाई... एक-एक क्षणाचा दिलेला तो अथक लढा. धारातीर्थी पडलेले ते एक-एक जवान आणि ते एक-एक पाउल विजयाच्या दिशेने टाकलेले. १९९८ चा हिवाळ्यामध्येच पाकिस्तानी सैन्याने घुसखोरीची संपूर्ण तयारी केली होती. या ऑपरेशनचे नाव होते 'अल-बदर'. पाकिस्तानी ६२ नॉर्थ इंफंट्री ब्रिगेडला याची जबाबदारी दिली गेली होती. झोजी-ला येथील 'घुमरी' ते बटालिक येथील 'तुरतुक' ह्या मधल्या द्रास - कारगील - तोलोलिंग - काकसर - बटालिक ह्या १४० की.मी च्या पट्यामध्ये ५००० पाकिस्तानी सैनिकांनी सुयोग्य अश्या ४०० शिखरांवर ठाणी प्रस्थापित केली होती. हा साराच प्रदेश उंचचं-उंच शिखरांनी व्यापलेला. हिवाळ्यामध्ये तापमान -३० ते -४० डिग. इतके उतरल्यावर माणसाला इकडे राहणे अशक्य. भारतीय सेना हिवाळ्याच्या सुरवातीला विंटर पोस्टवर सरकल्याचा फायदा घेत करार तोडून पाकिस्तानी सैन्याने ह्या संपूर्ण भागात घूसखोरी केली आणि १९४८ पासून मनाशी बाळगगेले सुप्तस्वप्न पुन्हा एकदा साकारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपलीच इंच-इंच भूमी पुन्हा मिळवण्यासाठी मग भारतीय सेनेने एक जबरदस्त लढा देत पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवून दिले. जगातल्या लढण्यासाठी अत्यंत प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या युद्धभूमीवर अवघ्या ३ महिन्यांच्या आत त्यांनी शत्रूला खडे चारून अक्षरश: धुळीत मिळवले. झोजी-ला ते बटालिक ह्या २५० की.मी. लांब ताबारेषेचे संरक्षण हे १२१ इंफंट्री ब्रिगेडचे काम होते. ह्या भागात १९४८ मध्ये झालेल्या घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने मोठ्या मुश्कीलीने हा भूभाग परत मिळवला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये सुद्धा ह्या भागात तुंबळ लढाया झाल्या होत्या.
४ मे ला बटालिकच्या जुब्बार टेकडी परिसरात घूसखोरी झाल्याची बातमी मिळाल्यानंतर आर्मीची हालचाल सुरू झाली. ७-८ मे पासून परिसरात जोरदार तोफखाने धडधडू लागले आणि पाहिल्या काही चकमकी घडल्या. पुढच्या काही दिवसात संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे हे लक्षात आल्यावर वातावरणाशी समरस होत भारतीय सेना पुढे सरकू लागली. पण हे सर्वसामान्य लोकांसमोर यायला मात्र २५ मे उगवला. जागतिक क्रिकेट करंडकाच्या सोहळ्यात गुंतलेल्या भारतीयांना - खास करून पत्रकारांना इतर गोष्टींकडे बघायला वेळ होताच कुठे???
२६ मे रोजी वायुसेनेची लढाउ विमाने 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू करीत आसमंतात झेपावली. दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी फ्लाइट ले. नाचिकेत यांचे विमान 'फ्लेम आउट' झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले तर त्यांना शोधण्यात स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा हे पाकिस्तानी सैन्याच्या हातात सापडले. या नंतर मात्र वायुसेनेने मिराज २००० ही लढाउ विमाने वापरली ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या कुमक आणि रसद वर परिणाम झाला. 'ऑपरेशन सफेद सागर' हे 'ऑपरेशन विजय'च्या जोडीने शेवटपर्यंत सुरू होते.
दुसरीकडे भारतीय सेनेने २२ मे पासून सर्वत्र चढाई सुरू केली होती. १५००० फुट उंचीच्या तोलोलिंग आणि आसपासच्या परिसरात म्हणजेच एरिया फ्लैट, बरबाद बंकर या भागात १८ ग्रेनेडिअर्सने हल्लाबोल केला. ह्या लढाई मध्ये ३ जून रोजी ले. कर्नल विश्वनाथन यांना वीरमरण आले. ११ जूनपर्यंत बोफोर्सने शत्रूला ठोकून काढल्यावर १२ जून रोजी तोलोलिंगची जबाबदारी २ 'राजरीफ'ला (राजपूत रायफल्स) देण्यात आली. १२ जूनच्या रात्री मेजर गुप्ता काही सैनिकांसोबत मागच्याबाजूने चाल करून गेले. ह्या लढाईमध्ये मेजर गुप्ता यांच्या सोबत सर्वच्या सर्व जवान शहीद झाले पण तोलोलिंग मात्र हाती आले. भारतीय सेनेचा पहिला विजय १२ जूनच्या रात्री घडून आला. त्यानंतर मात्र भारतीय सेनेने मागे पाहिले नाही. एकामागुन एक विजय सर करीत ते पुढे सरकू लागले. १४ जूनला 'हम्प' जिंकल्यावर २ राजरिफच्या जागी तिकडे १३ जैकरीफ (J & K रायफल्स) ने ताबा घेतला आणि १४ जूनला त्यांनी 'रोंकी नॉब' जिंकला.
आता लक्ष्य होते पॉइंट ५१४०. ह्यावर १३ जैकरीफ दक्षिणेकडून, २ नागा बटालियन पश्चिमेकडून तर १८ गढवाल पूर्वेकडून चाल करून गेल्या. २० जून रोजी पहाटे ३:३५ ला कॅप्टन विक्रम बत्राच्या डेल्टा कंपनीने पश्चिमेकडच्या भागावर पूर्ण भाग हातात घेतला. १६००० फुट उंचीवर त्यांचे शत्रुशी रेडियो वर संभाषण झाले. पलीकडचा आवाज बोलत होता, 'शेरशहा, ऊपर तो आ गए हो, अब वापस नही जा सकोगे.' शेरशहा हे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे लढाईमधले टोपण नाव होते. शेरशहा कडून लगेच प्रत्युत्तर गेले. 'एक घंटे मे देखते है, कौन ऊपर रहेगा.' आणि १ तासात त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. समोरून येणाऱ्या गोळीबाराला न जुमानता ५ जवान घेउन ते शत्रुच्या खंदकला भिडले. २ संगर उडवले आणि शत्रुच्या ३ सैनिकांशी एकट्याने लढून ठार केले. पॉइंट ५१४० जिंकल्यावर रेडियोवर आपल्या कमांडिंग ऑफिसर ला सांगितले. 'सर, ये दिल माँगे मोअर'. पुढे पॉइंट ४८७५ च्या लढाईमध्ये ५ जुलै रोजी शेरशहा उर्फ़ कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. तर ४ जुलै रोजी 'रायफलमन संजय कुमार' यांनी पॉइंट ४८७५ वर अत्तुच्च पराक्रम करत १३ जैकरीफला 'फ्लैट टॉप'वर विजय प्राप्त करून दिला. ह्या दोघांना 'परमवीर चक्र' प्रदान केले गेले.
यानंतर पॉइंट ५१००, पॉइंट ४७००, थ्री पिंपल असे एकामागुन एक विजय मिळवत भारतीय सेनेने अखेर ३ जुलैच्या रात्री १६५०० फुट उंचीच्या टायगर हील वर हल्लाबोल केला. ८ सिख, १८ गढवाल आणि १८ ग्रेनेडिअर्सने आपापले मोर्चे जिंकत आगेकूच सुरू ठेवली होती. ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव यांनी ह्या लढाईमध्ये अत्तुच्च पराक्रम केला. त्यांना 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले. अखेरचा हल्ला १८ ग्रेनेडिअर्सच्या कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी चढवला आणि विजय प्राप्त केला. 'Sir. I am on the Top' अशी आरोळी त्यांनी रेडियोवर ठोकली.
जब्बार - बटालिक ह्या भागातल्या लढाया आपण पुढच्या भागात बघुया. पण एक किस्सा सांगतो. कारगील येथील पॉइंट १३६२० ह्या ठिकाणी लढाईमध्ये कश्मीरासिंगचा एक हातच धडा वेगळा झाला. त्याने स्वतःचा हात स्वतःच उचलून घेतला आणि इतर सैनिकांनी त्याला आर्मी हॉस्पिटलकडे नेले. वाटेमध्ये तो आपल्या लढाईची झटपट त्या २ सैनिकांना सांगण्यात मग्न होता. अचानक एकाने विचारले,"कश्मीरा, टाइम काय झाला असेल रे?" कश्मीराने उत्तर दिले,"माझ्या त्या तुटलेल्या हातावर घड्याळ आहे. तूच बघ ना."
दोस्तहो ... आता काय बोलू अजून ??? खरंतरं मला पुढे काही लिहायचे सुचत नाही आहे. इतकच म्हणीन.
"When you go home, tell them of us & say,
for your tomorrow we gave our today"
ऑपरेशन विजयमध्ये शहीद आणि जखमी झालेल्या सर्व १०९१ अधिकारी आणि जवानांची नावे...
स्मारकासमोर २ मिं. नतमस्तक होउन त्यांना मूक श्रद्धांजली वाहिली आणि बाजूला असलेल्या शहीद ले. मनोज पांडे 'एक्सिबिट'मध्ये गेलो. प्रवेशद्वारातून आत गेलो की समोरच शहीद ले. मनोज पांडे यांचा डोक्यावर काळी कफनी बांधलेला आणि हातात इंसास रायफल असलेला अर्धाकृति पुतळा आहे. त्यांच्यामागे भारताचा तिरंगा आणि ग्रेनेडिअर्सचा कलर फ्लॅग आहे. उजव्या हाताला 'कारगील शहीद कलश' आहे. ह्यात सर्व शहीद जवानांच्या पवित्र अस्थि जतन केल्या गेल्या आहेत. कारगील लढाईमध्ये वापरलेल्या, शत्रुकडून हस्तगत केलेल्या अश्या बऱ्याच गोष्टी आत मांडल्या आहेत. या लढाईमध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र मिळालेल्या वीरांचे फोटो आहेत. तोलोलिंग, पॉइंट ४८७५, टायगर हिल वर कोणी कशी चढाई केली त्याचे मोडल्स बनवलेले आहेत. लढाईचे वर्णन करणारे शेकडो फोटो येथे आहेत. हे फोटो बघताना उर जसा अभिमानाने भरून येतो तश्या हाताच्या मुठी सुद्धा घट्ट होतात. आपल्या सैनिकांनी जे बलिदान दिले आहे ते पाहून डोळे भरून येतात. एक वेगळीच विरश्री अंगात भिनते. कुठल्या परिस्थितिमध्ये आपल्या वीरांनी हा असीम पराक्रम केला हे एक्सिबिट बघून लगेच समजते. काहीवेळ तिकडे असणाऱ्या सैनिकंशी बोललो. अधिक माहिती घेतली.
पाकिस्तानी सैन्याकडून हस्तगत केलेली काही युद्ध सामुग्री ...
८ वाजत आले होते तेंव्हा तिकडून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा मेमोरियल समोर उभे राहिलो. दिवस संपला होता. एक जवान शहीद स्मारकासमोर ज्योत पेटवत होता. त्याला प्रतिसाद म्हणुन बहूदा ते शहीद वीर वरुन म्हणत असतील. 'कर चले हम फिदा जान और तन साथियों ... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...' तिकडून निघालो तेंव्हा आमच्यापाशी एक अनुभव होता. असा अनुभव जो आम्हाला कधीच विसरता येणार नव्हता. ते काही क्षण जे आम्हाला त्या थरारक रणभूमीवर घेउन गेले होते. शहीद कॅप्टन विक्रम बत्राचा फोटो आणि शहीद ले. मनोज पांडे यांचा पुतळा पाहून अंगावर अवचित उठलेला तो शहारा मी जन्मभर विसरु शकणार नाही. त्या सर्व ज्ञात-अज्ञात सैनिकांचे स्मरण करण्यासाठी मी इकडे पुन्हा-पुन्हा येइन. जसे-जेंव्हा जमेल तसे...
पुन्हा एकदा माघारी निघालो. ८:३० वाजता डाक बंगल्यावर पोचलो. ड्रायवर अजून सोबतचं होता. आम्हाला उदया लेहला सोडुनच तो परत जाणार होता. जेवणानंतर उदयाचा प्लान ठरवला. कारगील बेसला जास्त वेळ लागणार असल्याने साधना, उमेश, अमेय म्हात्रे, ऐश्वर्या आणि पूनम गाडीमधुन येणार होते. बाकी सर्व बायकर्स पुढे सटकणार होते. सकाळी ६ ला निघायचे असे ठरले आणि सर्वजण झोपेसाठी पांगलो. मी आणि साधना मात्र उद्याच्या कारगीलभेटीसाठी काही नोट्स काढत बसलो होतो. ११ वाजून गेले होते. अखेर उदया नेमके काय-काय करायचे ते ठरले आणि आम्ही सुद्धा गुडुप झालो. द्रास पाठोपाठ आता उदया कारगील शहर बघायचे होते आणि त्याहून पुढे जाउन कुठल्याही परिस्थितीमध्ये लेह गाठायचे होतेच...
.
.
लढाईचे संदर्भ - 'डोमेल ते कारगील' - लेखक मे. जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे. आणि
www.bharat-rakshak.com
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - 'फोटू-ला' - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !
.
.
.
speechless...
ReplyDeletetu jashi pravas varnana rangavtos tyapramane ha post pan faar pragalbhatene lihila aahes...
hats off to them and u too :)
रोहन काय प्रतिक्रिया देऊ सुचत नाही आहे. आजची पोस्ट खूप भावपूर्ण आहे!!!
ReplyDelete'आपल्या उदयासाठी स्वतःचा आज दिला' . . .Very True!!!
मला कळतय मनमौजी ... मला वाटते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अश्या ठिकाणी जावे जेथे त्यांना सैनिकांशी संवाद साधता येइल ... आपले ते एक कर्तव्य आहे खरंतरं.
ReplyDeleteहोय पूनम ... तरी सुद्धा बरेच लिहिले नाही असे वाटते आहे.. :(
अप्रतिम शब्दांकन रोहन. वाचता वाचता डोळे भरून आलेत.या सगळ्यांच्या अथक परिश्रमांमुळे व बलीदानामुळे आज आपण आहोत याचे स्मरण सतत आहेच व ते राहो. सलाम!
ReplyDeleteमला वाटते ते स्मरण सतत राहो यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अश्या ठिकाणी जावे जेथे त्यांना सैनिकंशी संवाद साधता येइल...
ReplyDeleteअफलातून लिहिलंयस......तुझ्या डोळ्यांत तिकडे तो अनुभव घेउन पाणी आलं पण तू त्याचं एवढं जिवंत वर्णन केलंयस की वाचून खरंच डोळे पाणावतात......आणि प्रत्येक भारतीयाचे पाणावतीलच ह्यात काही नवल नाही.......हे वाचून खरंच सुन्न व्ह्यायला होतं......काय जीवन जगत असतील आपले जवान.....आणि आपण......किती आत्मकेन्द्री!!!! 'कॅप्टन विक्रम बत्रा, फ्लाइट ले. नाचिकेत, स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा, ले. कर्नल विश्वनाथन, मेजर गुप्ता, 'रायफलमन संजय कुमार', ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव, कश्मीरासिंग ही नावं किती जणाना माहिती आहेत??? हे रिअल हिरोज आजच्या तरुणांचे हिरो का नाहित?? मिडिया फिल्मस्टार्सच्या बारीक सारीक बातम्या देते मग ह्यांच्याबद्दल का नाही??? अश्या अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवलंय ह्या पोस्टमुळे.............
ReplyDeleteतुझं लिखाण अतिशय डिटेल झालंय............सर्व शहीद जवानांना सलाम..........आणि तू तुझ्या लिखणातून आम्हांला तिथला अनुभव अनुभवायला दिलास त्याबद्दल खुप खुप आभार..........नक्किच ही पोस्ट अनेकांना 'द्रास वॉर मेमोरिअल' ला भेट देण्याची प्रेरणा देणारी आहे ह्यात काही शंका नाही...........
होय अमृता ... मला वाटते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अश्या ठिकाणी जावे जेथे त्यांना सैनिकंशी संवाद साधता येइल...
ReplyDeleteहाताच्या बोटावर मोजण्याएवढीच लोक आहेत असा आदर्श घेणारी... त्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांचेच काम आहे आता हा आदर्श पुढे देण्याचा आणि पुढे नेण्याचा ... !!!
.रोहन,
ReplyDeleteमन भरुन आलं. मी स्वतः पण बरेचदा बॉर्डरवर गेलेलो आहे. मिल्ट्री, नेव्ही, आणि आर्मी सगळ्याच विभागांना भेट दिलेली आहे. पण तुझी ही लडाख भेटीची सिरिज मात्र अगदी मनाला भिडली बघ. असं वाटलं.. अरे मला कां नाही जाणवलं?? पण नंतर लक्षात आलं, की माझी व्हिजिट बिझिनेस टुर असते, आणि तुझी तशी नव्हती , त्यामुळे अगदी मनाला भिडली बघ. तो कारगिल कलश बघुन खुप वाईट वाटलं. ते एक पुस्तक होतं, सोल्जर्स डायरी.. वाचलं कां? खुपच सुंदर आहे ते पुस्तक.. जरुर वाच...इतक्या सुंदर पोस्ट करता मनापासुन आभार.. मी युजवली कधी फॉर्मली आभार वगैरे मानत नाही.. हे अगदी मनापासुन आहे बरं कां!!
माझ्या काश्मिर व्हिजिटमधे पंधरा दिवसात खुप सैनिकांशी संवाद पण साधला, आमच्या बरोबर बरंचसं घरच्या खायच्या वस्तु नेल्या होत्या . आम्ही जेंव्हा पहलगामला राफ्टींग करता गेलो होतो, तिथे काही मराठी बोलणारे सैनिक दिसले. त्यांच्याशी खुप गप्पा मारल्या. त्यांना पण खुप बरं वाटलं. आमच्या जवळच्या चकल्या, चिवडा शंकरपाळे आणि बेसनाचे लाडु त्यांच्या बरोबर शेअर केले तर त्यांना झालेला आनंद अगदी अवर्णनिय होता. शब्द नाही तर डॊळे बोलतात.. त्यांचे डोळे सगळं काही बोलुन गेले...
मस्तंच आहे रे तुझं पोस्ट...
रोहन,
ReplyDeleteमानले लेका, तुला! काय लिहावं हेच सुचत नाही...!
पोस्ट वारंवार वाचली... "शेरशहा ", "कश्मीरासिंग" - यांचे पॅरेग्राफस् पुन्हा - पुन्हा वाचले. भावनांना शब्दांत सांगणे शक्य नाही. जवानांच्या - शहिदांच्या त्यागाची - सामर्थ्याची आणि बलिदानाची अनुभुति करुन दिल्याबद्दल तुझे आणि टीमचे अनेक आभार!
दादा.. आत्ता आलो की मी नक्की वाचीन ते पूस्तक.. बाकी 'शब्द नाही तर डॊळे बोलतात.. त्यांचे डोळे सगळं काही बोलुन गेले..' असे अनुभव बरेच आले आम्हाला सुद्धा... येतीलच पुढे. आणि आभार कसले मानतोस रे .... मला वाटतय की हे सुद्धा आपले एक कर्तव्य आहे. आज प्रत्येकजण उठून सीमेवर नाही जाऊ शकत. तेंव्हा माझ्यासारख्या लोकांचे काम आहे त्या भावना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे.
ReplyDeleteदिपक ... आम्हाला जी अनुभूति आली ती मांडतोय तुमच्यापुढे ... तुमच्या कमेंट्स वाचून मला हे सर्व शब्दात मांडता आले ह्यासाठी मी स्वतः समाधानी आहे.
rohan, khup mhanje khupach chaan lihilayes. aamhi je anubhaval, maagchya aani hya tour madhe sudhha te hi kahi vegal navhat hya peksha pan tuzya sarkha shabdat etakya sundar ritine nahi mandata yet re. [:-)]
ReplyDeleteespecialy kargil day la jevha 'Grenadier Yogendra Singh Yadav (PVC)' hyanna samor pahil na tevhacha anubhav tar kharach avismarniy aahe.....
thanx... tuzya hya blog mule saglya aathvani parat tajya hotahet.
jyanna shakya nahi tyanchya paryant hya bhavana pohchvnyach khup chaan kaam kartoyes. [:-)] keep it up.
ek aavarjun sangavas vaatat ki aaplya pratyekachya 'friend list' madhe nidan 1 tari sainik asailach hava.
ममता ... तू घेतलेला 'सलाम सैनिक' चा अनुभव मी चुकवलाय :( ... त्याची ही थोडी भरपाई समज.. ह्यावर्षी सुद्धा मला तुझ्यासोबत तिकडे यायचे होते पण कामावर असल्याने जमले नाही. बघुया पुढच्या वर्षी जमते का ... :) आणि तू बोलली नाहीत आधी की तू खुद्द त्यांना भेटून आलीस .. :D मस्त...
ReplyDeletehi rohan,,,
ReplyDeleteरोहन....काय लिहू मी....सगळ्यांनी जवळ जवळ माझे सगळेच शब्द तुझ्यापर्यंत पोचवलेत..तुमचे सर्व फोटो पहिले....ब्लॉग वाचले...आणि फार काही शूर नसली तरी काहीशी तशीच कामगिरी आज ऑफिस मध्ये बसून तुझे सर्व ब्लॉग वाचून मी केली....(कार्यालयात ओर्कुटींग चालत नाही).....नाचरे ने ब्लॉग बद्दल सांगितला तशी मी तुझे ब्लॉग शोधात होते....आज मिळाले.....जातायत कुठे माझ्या तावडीतून.....हा निव्वळ पोरकटपणा होता....(जस्ट किडिंग)
...कदाचित माझं लिखाण म्हणजे तुला कुठलासा ब्लॉग वाचल्यासारखा वाटेल....पण खरच प्रत्येकाने एकदा तरी अशा ठिकाणी भेट द्यायला हवीच ना....काहीना वाटेल बोलणं आणि लिहिण सोप्प आहे,,,,पण प्रत्यक्ष जाणे नाही ...पण आपण नाही का नवस पूर्ण करायला थोडे कष्ट घेत..,तेव्हा नाही का डोंगर- दर्या पार करून जात आपण.... देवाने आपलं गाऱ्हाणं ऐकल्यावर....मग इथे तर कुठलीही अपेक्षा न करता हे सैनिक आपल्या प्राणांचे रक्षण करतातच ना...मग आयुष्यातून एकदा जर थोडा वेळ आणि पैसा त्यांच्यासाठी खर्च केला तर काय फरक पडतो एवढा........
फोटो बघून, हे वाचून अंगावर अक्षरशः काटा आला...साग्लाकाही आत्ता इथे माझ्या नजरेसमोर घडतंय असं वाटून गेलं एक क्षण...
अप्रतिम लिखाण....नयनरम्य छायाचित्रे, श्वास रोखून ठेवणारी प्रवास वर्णने आणि डोळ्यांच्या कडा पाणावनार्या या तुझ्या ब्लॉगला माझे शतश: प्रणाम...!!!!
वंदना ... तू माझा ब्लॉग शोधून काढून वाचलास आणि त्यावर इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीस. मला खरच खुप आनंद झाला. बाकी जे काही लिहिला आहेस ते तुझ्या मनीचे प्रमाणिक भाव आहेत हे मला सुद्धा कळतय की... :)
ReplyDeleteIts such a touchy write up... One of the best from you... And am so proud of you for that...
ReplyDeleteThnx Shalmalee ... I will try to write my best in future ... :)
ReplyDeleteanyways whatever i have written is just a reflection of everyones mind :) isnt it ... ?
नखशिखांत खिळवून ठेवलस. अक्षरशः कंठ दाटून आला. वेड रे वेड...
ReplyDeleteरोहन, काटा आला अंगावर... अभिमान वाटतो मला आपल्या जवानांचा. आणि कीव येते स्वतःची... जेव्हा आपण आपल्या साध्या साध्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही....आपल्या देशाची जबाबदारी आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे हे आपण समजून घेत नाही....
ReplyDeleteरोहन,
ReplyDeleteसुंदर लिहीले आहेस तू.
अभिनंदन.
तुझ्या मनात सैनिकांबद्दल ज्या भावना आहेत त्याच सर्व भारतियांच्या मनात कायम स्वरुपी रहातील तो सुदिन म्हणायचा.
जयंत कुलकर्णी.
www.jayantpune.wordpress.com
Farach sundar aani angavar kata aananra
ReplyDeletesalam aaplya sarv jawanana !
abhiman ahe ya shur sainikancha, aani dhikkar ahe ya rajkarnyancha, jyani ya veeranche kafan sudha vikayla kami nay kele.
ReplyDeleteRohan tu khupach changal kam kel, ha kargil vijay kasa milala he fakt utjamule kalu shakal mala, ani ho tuji permission asel tar nakkich ha lekk tuja navane maja bhagakde publish karel! Lokana pan kalayla hav ki aapan jya aaramane jeevan jagtoy tyat hya veerancha sinhacha vata aahe!
ReplyDeleteMasta Rohan Khup Sundar Mahiti aani Varnan kelele aahes...!!! :)
ReplyDelete