Tuesday, 29 September 2009

लडाखचा सफरनामा - फोटू-ला - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !

आज होता मोहिमेचा चौथा दिवस. बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ठरल्याप्रमाणे सर्वजण द्रासवरुन लेहकडे कुच झाले. आज कारगीलमार्गे 'नमिके-ला' आणि 'फोटू-ला' असे २ पास फत्ते करत लेहच्या पठारावर उतरायचे होते. जम्मूपासून निघालेले आम्ही १५ वेडे अथकपणे ५०९ की.मी. चे अंतर पार करत आपल्या लक्ष्याकडे झेप घेत होतो. आजचे अंतर होते ३१९ की.मी. आणि हे अंतर आज आम्ही काहीही झाले तरी गाठणार होतोच. आज पुन्हा एकदा मी आणि अमेय साळवी सर्वात पुढे सुटलो. पाहिले लक्ष्य होते ५७ की.मी. वर असणारे कारगील.  पोटात काहीतरी टाकल्याशिवाय काही सूचायचे नाही आणि जमायचे देखील नाही हे पक्के ठावुक असल्याने तासा-दिडतासामध्ये तिकडे पोचून पहिले  उदरभरण करायचे असे ठरवून आमचे घोडे सुसाट दामटवले.



पुन्हा काही वेळात डाव्या हाताला 'द्रास वॉर मेमोरिअल' लागले. पण न थांबता 'बाये का सल्युट' देत आम्ही भरधाव तसेच पुढे निघालो. वळणा-वळणाच्या त्या रस्त्यावरुन सकाळच्या  प्रहरी बाइक पळवायला मज्जा येत होती. ठंडी नव्हती पण हवेत थोड़ासा गारवा होता. मस्त वाटत होते. एके ठिकाणी रस्ता आम्हाला वर-वर घेउन गेला. उजव्या हाताला डोंगर तर डाव्या हाताला खाली सिंधूनदीचे पात्र. मी सर्वात पुढे होतोच. अचानक रस्ता झपकन असा उजवीकडे वळला की मला रिअक्शन टाइम खुप कमी मिळाला. पण तितक्याच वेगाने मी बाइक उजवीकडे वळवली. जरा समोर गेलो असतो तर काय झाल असत ते सांगायला नकोच. एकदम छाती भरून आली आणि मी बाइक स्लो केली. एकदम मनात काहीतरी विचार येउन गेला. हूश्श्श्... आता वर-वर गेलेला तो रस्ता आता जोरात खाली उतरु लागला आणि त्या ठिकाणी डाव्या हाताने नदीचा अजून एक फाटा येउन मिळत होता. सुंदर दृश्य होते ते. विविध रंगाची फूले तिकडे फुलली होती. बाजुलाच आर्मीच्या महार रेजिमेंटची छोटीशी पोस्ट होती आणि उजव्या हाताला त्याच रेजिमेंटचे एक शहीद स्मारक होते. आम्ही सर्वच तिकडे फोटोग्राफी करायला थांबलो. द्रास - कारगिलच्या मध्ये ताबारेषा अतिशय जवळ म्हणजे अवघे ८-१० की.मी इतकी जवळ आहे आणि सिंधूनदीचे अनेक फाटे-उपफाटे भारत - पाकिस्तान सरहद्दीमधून पार होतात. ह्या संपूर्ण भागावर लक्ष्य ठेवण्यासाठी जागो जागी छोटे-छोटे बंकर्स उभारून पोस्ट तयार केल्या आहेत. कमीतकमी सैन्यानिशी जास्तीतजास्त भागावर लक्ष्य ठेवता येइल अशी रचना येथे केली आहे. नदीच्या पलीकडे जायला आर्मीने ठिकठिकाणी छोटे-छोटे पुल बांधले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला प्रवेश निषिद्ध आहे. पलिकडच्या बाजूला डोंगरांवर जाणाऱ्या वाटा स्पष्ट दिसतात. त्या नक्कीच 'बॉर्डर पीलर'कडे जात असतील.




जेंव्हा थांबलो होतो तेंव्हा लक्ष्यात आले की भूक वाढते आहे... अभिने आणलेली चिक्की पोटात ढकलली आणि पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला अजून एक मेमोरियल दिसले. मी बाइक उजव्या हाताला नेउन थांबवली. त्यावर लिहिले होते 'हर्का बहादुर मेमोरियल'. ह्या मेमोरियलबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. बहुदा हे नविन बांधले गेले आहे की काय अशी शंका आली. पण नाही हे मेमोरियल तर इकडे खुप आधीपासून आहे असे कळले. त्या स्मारकाच्या समोर असणाऱ्या ब्रिजला 'हर्का बहादुर ब्रिज' असे नाव आहे. १९४८ मध्ये काश्मिरवर जेंव्हा आक्रमण झाले तेंव्हा हा ब्रिज 'सुभेदार हर्का बहादुर' यांनी २३ नो. १९४८ रोजी जिंकून पाकिस्तानी सैन्याची अगेखुच रोखली होती. त्यांना मनोमन वंदन करत आम्ही पुन्हा एकदा वेगाने कारगीलकडे सरकलो.



राहिलेले ५ की.मी अंतर पार करून सकाळी ८ वाजता आम्ही कारगीलमध्ये पोचलो. ठरल्याप्रमाणे गाड़ी आर्मी बेसकडे निघून गेली होती. आम्ही मात्र नाश्ता करायला एक होटेल शोधले. 'होटेल शहनवाझ' एकदम छोटूसे होते पण जागेपेक्षा कार्यकारणभाव महत्वाचा नाही का ??? गरमागरम पराठे दिसल्यावर आम्ही बाइक्स् बाजूला पार्क केल्या आणि घुसलो आत. इतके जण सकाळी-सकाळी बघून तो पण गांगरला बहुदा. पण मग नवाझ साहब सुरू झाले. तो बनवतोय आम्ही खातोय ... तो बनवतोय आम्ही खातोय ... कोणी थांबतच नव्हते. एकदाचे उदरभरण झाले आणि मग आम्ही पुढे निघालो.



कारगीलची उंची ८५४० फुट आहे आणि  हे लडाखमधले दूसरी सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे. अर्थात लेह पाहिले. मार्केटमधून बाहेर पडले की २ रस्ते लागतात. समोर जाणारा रस्ता 'झंस्कार'ला जातो तर डावीकडचा रस्ता ब्रिज पार करून वर चढतो आणि पुढे लेहकडे जातो. ह्याच ठिकाणी उजव्या हाताला कारगील ब्रिगेड स्थित आहे. साधना आणि उमेशला इकडे बरेच शूटिंग करायचे होते पण अजून परमिशन मिळत नव्हती. शेवटी असे ठरले की गाड़ी मागे राहील आणि काम झाले की बाइक्सना कव्हर करेल. साधना - उमेशला शूटिंग संपवायला २ तास मिळणार होते. सोबत अमेय म्हात्रे, शोभीत आणि पूनम होतेच. अमेयने कारगील लायब्ररीला देण्यासाठी काही पुस्तके आणली होती. तीही त्यास तिकडे द्यायची होती. आम्ही बाकी सर्व १० जण मात्र पुढे निघालो. ब्रिज पार करून लेहच्या रस्त्याला लागलो. जसे वर-वर जाऊ लागलो तसे सिंधू नदीकाठी वसलेल्या कारगीलचा नजारा दिसू लागला. पण आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली. सोनमर्ग - झोजी-लापर्यंत असणारा निसर्ग आता वेगळे रूप दाखवू लागला होता. आता हिरवा निसर्ग नव्हता तर सर्व काही रखरखीतपणा होता. पण त्याचे सौंदर्य सुद्धा वेगळेचं होते. खाली नदीकाठी मात्र शेती दिसत होती. डोंगर मात्र उघडे बोकडे. श्रीनगर पासून बाइक्स् मध्ये पेट्रोल नव्हते ते इकडे टाकुन घेतले आणि मग पुढचे लक्ष्य होते - 'मुलबेक'.



डाव्याहाताला दुरवर जुब्बार - बटालिकच्या डोंगरसरी साद घालत होत्या.ह्याच ठिकाणाहून तर सुरू झाली होती घुसखोरी. बटालिकच्या भागात मुख्य ३ रिड्ज आहेत.जुब्बार, कुकरथांग-थारू आणि खालुबार. ह्या ठिकाणी ठाणी बनवून 'चोरबाटला' खिंड जिंकून लेहच्या काही भागावर कब्जा करायचा पाकिस्तानचा डाव स्पष्ट झाला होता. भारतीय सेनेतर्फे १२ जैकरीफ (J & K रायफल्स), १ बिहार आणि १/११ गुरखा रायफल्स यांना ह्या भागाची जबाबदारी दिली गेली होती. २९ मे रोजी 'मेजर सर्वानन' यांनी जुब्बारवर जबर हल्ला चढवला. शेवटच्या अवघ्या २०० मी अंतरावर असताना त्यांच्यावर शत्रुने बेधुंद गोळीबार सुरू केला. त्यांच्या सोबत सर्वात पुढे 'लान्सनायक शत्रुघ्नसिंग' आणि जवान प्रमोद होते. इतक्यात एका गोळीने प्रमोदचा वेध घेतला. तो क्षणात खाली कोसळला. मेजर सर्वानन यांनी शत्रुघ्नसिंगच्या पाठीवर थाप मारत 'बढ़ते रहो' असा इशारा केला. ते स्वतः त्याला ओलांडून पुढे जातात न जातात तोच ३ गोळ्या त्यांच्या डोक्यातून आरपार गेल्या आणि ते जागीच कोसळले. शत्रुघ्नसिंगच्या पायात सुद्धा गोळ्या घुसल्या होत्या पण बहुदा त्याला थंडीमूळे तितकी वेदना जाणवत नव्हती. आपला पहिला हल्ला फसला आहे हे समजुन आल्यानंतर तो ४-५ तास निपचित पडून राहिला. अंधार पडल्यावर त्याने रांगायला सुरवात केली. उजव्या पायाला आधार मिळावा म्हणुन त्याने बूटाच्या लेसने तो डाव्या पायाला बांधला. दिवसा झोपून रहायचे आणि रात्री मुंगीच्या वेगाने रांगत तळाकडे सरकत रहायचे हा त्याचा क्रम ७-८ दिवस सुरू होता. एव्हाना पायाची जखम पूर्णपणे चिघळून त्यात अळ्या होऊ लागल्या होत्या. अखेर तो आपल्या सैनिकांना सापडला. स्वतःच्या मनोबलावर त्याने खरच पुनर्जन्म मिळवला होता. अखेर २९ जून रोजी १ बिहारने जुब्बारचे ओब्झरवेशन पोस्ट जिंकून शत्रूला मागे रेटले.


अखेरच्या हल्ल्यासाठी १ बिहारला मदत म्हणुन २२ ग्रेनेडिअर्सची १ कंपनी आणली गेली. ५ जुलैच्या संध्याकाळी थोडे उशिराने शत्रूची मोठी कुमक येताना दिसल्यावर 'रॉकेट साल्वो'ने (MBRL) अचूक मारा केला आणि क्षणार्धात तो साठा उद्वस्त केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै आपण जुब्बार टॉप जिंकून घेतला. लागलीच पुढे आगेकुच करत १ बिहारने ७ जुलै रोजी पॉइंट ४९२४ सुद्धा जिंकला. तिकडे दुसरीकडे १२ जैकरीफ आणि १/११ गुरखा रायफल्स यांनी खालुबार भागात पॉइंट ४८१२, पॉइंट ५२५०, पॉइंट ५२८७ हे सर्व जिंकून घेतले होते. खुद्द खालुबारच्या लढाईमध्ये १/११ गुरखा रायफल्सच्या 'लेफ्ट. मनोजकुमार पांडे' यांनी असीम पराक्रम केला. खांदयात आणि पायात गोळ्या लागलेल्या असताना देखील आपल्या तुकडीसकट त्यांनी शत्रुच्या बंकर्सवर 'आयो गुरखाली'ची आरोळी ठोकत हल्ला चढवला. खालुबार हाती आले पण लेफ्ट. मनोज पांडे यांना वीरमरण आले. अर्थात त्यांचे हे शौर्य परमवीर चक्रच्या मानाचे ठरले. पॉइंट ५२०३, पॉइंट ४१०० आणि आसपासचा सर्व भाग १२ जुलैपर्यंत भारतीय सैन्याने ताब्यात घेतला होता. चोरबाटला खिंडीवर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव पूर्णपणे फसला होता... आपल्या सैन्याच्या विरश्रीला - बलिदानाला मनोमन एक सलाम केला आणि  आमचा वेळेचा डाव मात्र फसू नये म्हणुन आम्ही आता वेगाने पुढे निघालो.




मजल दरमजल करत आता आम्ही पोचलो 'लोचुम्ब' ह्या ठिकाणी. छोटेसे गाव होते आणि त्यामधून जाणारा फारतर चार-सव्वाचार फुट रुंद रस्ता. पुढे बघतो तर काय हे ट्राफिक. वाहनांची मोठी रंग लागलेली. कळले की समोरून आर्मीचा कोंव्होय येतोय. चांगल्या ५०-६० गाड्या आहेत. आम्ही बाइक कधी उजव्या तर कधी डाव्याबाजूने काढत पुढे सरकत राहिलो. अखेर एके ठिकाणी मात्र अडकलोच. ट्रकच्या उजव्याबाजूने बाइक जेमतेम जाइल इतकीच जागा होती. शिवाय उजव्या बाजूला ६-८ फुट खोली होती. अभिने बाइक पुढे टाकली आणि त्याची अंगाने बारीक डिस्कवर निघून सुद्धा गेली. आशिषने कुलदीपची यामाहा तर अशी झुपकन काढली की उतरून पुढे फोटो काढायला गेलेला कुलदीप मागे फिरेपर्यंत आशिष ट्रकच्या त्याबाजूला पोचला सुद्धा होता. आता होत अमेय. त्याने गाडी टाकली खरी पण एका क्षणाला त्याला असे कळले की आता पुढे जायचे असेल तर उजवा पाय टेकवून बाइक उजवीकडे झुकवायला हवी. तो उजवीकडे पाय टेकवणार तोच त्याला कळले की अरे... पाय टेकवायला तर जागाच नाही आहे. :O एव्हाना बाइकचा तोल उजव्याबाजूला जायला सुद्द्धा लागला होता. आता अमेय आणि मागे बसलेली दिपाली हमखास पडणार होते. पण नेमके त्याच वेळेला दीपालीने तिच्या डाव्या हाताने सहजच ट्रकला पकडले. खरंतरं तिला माहितच नव्हते की बाइक उजव्या बाजूला पडणार आहे. नशीब पडायचे वाचले दोघे. तिला तसेच पकडायला ठेवायला सांगून मग अमेयने बाइक कशीतरी पुढे काढली. त्या मागुन आदित्यने ऐश्वर्याला आणि मी शमिकाला खाली उतरायला सांगीतले. बाइक्स पुढे काढल्या आणि ट्राफिक सुटायची वाट बघू लागलो. जवळ-जवळ ४० मिं. नंतर अखेर पुढे जायला वाट मिळाली.



तिकडून निघालो तेंव्हा ११:१५ वाजले होते. आता कुठे ही न थांबता मुलबेकला पोचलो. कारगील नंतर लडाखमध्ये प्रवेश केला की सर्व काही बदलते. निसर्ग आणि राहणारी लोक सुद्धा. लोचुम्बपासून सर्व बुद्धधर्मीय लडाखी लोकांची वस्ती सुरू होते. मुलबेक येथून बौद्धमठ म्हणजेच गोम्पा (Monestry) सुरू होतात. मुलबेकचे मुख्य गोम्पा डोंगरावर आहे तर रस्त्याच्या उजव्या हाताला अजून एक गोम्पा आहे. आम्ही बरोबर १२ वाजता तिकडे पोचलो. तिकडून कारगीलमध्ये साधनाला कॉल केला तेंव्हा कळले की त्यांना अजून वेळ लागणार असल्याने त्यांनी गाडी पुढे पाठवून दिली आहे आणि ते स्वतः काम झाले की वेगळी गाडी करून रात्रीपर्यंत लेहला पोचतील. भूका लागल्या होत्या तेंव्हा गोम्पा बघून खादाडी करायची असे ठरले. गोम्पाच्या बाहेरच फिरती घंटा आहे. प्रत्येक गोम्पा बाहेर अशी १ तरी घंटा आपल्याला बघायला मिळतेच. खिडक्या आणि दरवाजे असे सर्वत्र असणारे रंग आपले लक्ष्य वेधून घेतात. मुलबेक गोम्पामध्ये प्रवेश केल्या-केल्या एक मोठी कोरलेली प्रतिमा आहे. ती कोणाची आहे ते कळायला मार्ग नाही. तिकडे असलेले मोन्क (मराठी शब्द आठवतच नाही आहे) काही बोलायला तयार नव्हते. आतमध्ये एक चांगला ५ फुट मोठा दिवा होता. तो कधीच विझत नाही. तिकडे बुद्ध प्रतिमेला नमन केले आणि समोर असलेल्या छोट्याश्या दुकानामध्ये शिरलो. त्याच्याकडे खायला काहीच नव्हते त्यामुळे फ़क्त चहा - बिस्किट खाल्ले आणि तसेच न जेवता पुढे सुटलो.



१२:३० ला तिकडून निघालो तेंव्हा सर्वांनी पाणी भरून घेतले. आता पुढे बराच वेळ पाणी सहज मिळत नाही. दुपारच्या त्या रखरखत्या उन्हामध्ये आम्ही १०४२० फुट उंचीवरुन अजून वर-वर चढत होतो. आता लवकरचं नमिके-ला लागणार होता. ह्या संपूर्ण रस्त्यात न एक झाड़ होते न एके ठिकाणी पाणी. वाळवंटचं होते हे एक प्रकारचे. हिवाळ्यामध्ये इकडे 'कोल्ड डेसर्ट' बनते. हा संपूर्ण रस्ता कच्चा होता. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. BRO चे हजारो कामगार कामावर लागले होते. तासाभरात मी-शमिका आणि अभि-मनाली १२००० फुट उंचीवर नमिके-लाच्या 'वाखा' पोस्टला पोचलो. खाली बघतो तर बाकी ३ बायकर्स थांबले होते. म्हटले ब्रेक घ्यायला थांबले असतील. पण नाही.. बघतो तर काय कुठल्यातरी एका बाइकला बाकी पिलियन रायडर्स धक्का देत होते. अभ्या आपला इतक्या लांबून आणि वरतून त्यांना हाका मारतोय. जाणार होत्या का त्यांना ऐकायला. नशीब मागुन येणाऱ्या एका गाड़ीसोबत आशिषने निरोप धाडला की कुलदिपची यामाहा हाचके खाते आहे. चढत नाही आहे. मग काहीवेळ आशिषने यामाहा सिंगल रायडर आणली आणि कुलदिप दुसऱ्या एका गाडीमध्ये लिफ्ट घेउन वाखापर्यंत आला. तिकडे पुन्हा थोडा वेळ दम घेतला आणि कुलदिपच्या गाडीला दम घेऊ दिला. पुढे तसा चढ नव्हता. नमिके-ला पार करून आम्ही पुन्हा ११७२५ फुट उंचीवर 'खांग्रन'ला उतरलो. तिकडे चेकपोस्टला पुन्हा एंट्री केली आणि पुढे सटकलो. आता रस्ता पुन्हा वर चढू लागला. दूर-दूर पर्यंत सावली नव्हती. सर्वत्र वेगवेगळ्या रंगांचे उघडे डोंगर पाहण्यासारखे होते. कधी लालसर तर कधी तपकिरी, कधी हिरवट मातीचे तर कधी पिवळ्या. त्या-त्या रंगांची खडी रस्त्यावर पसरलेली असायची. त्या खडीवरुन बाइक सरकू नये ही सावधगिरी बाळगत ते आगळे-वेगळे सृष्टिसौंदर्य अनुभवत आम्ही पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी पुन्हा आर्टिलरीच्या ४-६ गाड्या समोरून आल्या. बोफोर्स तोफा घेउन त्या द्रास - कारगीलकडे जाताना दिसल्या. उगाचच मनात वेगळाच विचार येउन गेला. तो झटकून पुढे निघालो. पुढे काही वेळात अचानक कुठून तरी हाक आली. 'जय महाराष्ट्र...' खरंतरं मी दचकलोच. बाजूला बाइक थांबवली तर रस्त्याचे काम करणाऱ्यावर देखरेख करणारा एकजण धावत आला. साताऱ्याचा निघाला की तो. आम्हाला भेटून त्याला एकदम बरे वाटले. आम्हाला सुद्धा त्याला भेटून बरे वाटले. थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो...




आता आम्ही फोटू-ला (व्हिडियो बघा) चढू लागलो होतो. एकदम मस्त रस्ता सुरू झाला होता. 'फोटू-ला'चा नविनच बनवलेला चकचकित डांबरी रस्ता. बाइकचा स्पीड वाढवला आणि वेळ मारायला लागलो. गोल गोल फिरवत वर नेणारा तो रस्ता मला भलताच आवडला. झोजी-ला आणि नामिके-लाच्या कच्च्या रस्त्यांनंतर हा रस्ता म्हणजे एक सुखद धक्काच होता म्हणा ना. कुलदिप पुन्हा बराच मागे राहिला होता. पण आता फोटू- लाच्या टॉप पॉइंटला जाउनाच थांबायचे असे आम्ही ठरवले. बरोबर ३:१५ वाजता आम्ही 'फोटू-ला'च्या टॉपला होतो. आत्तापर्यंतची गाठलेली सर्वोच्च उंची. १३४७९ फुट. फोटू-ला हा श्रीनगर ते लेह ह्या मार्गावरचा सर्वोच्च उंच पॉइंट आहे. काही वेळात मागुन अमेय-दिपाली आणि आदित्य-ऐश्वर्या येउन पोचले. पण कुलदिप आणि आशिषचा काही पत्ता नव्हता. एका येणाऱ्या ट्रकला थांबवून विचारले,"कोई बाइकवाला दिखा क्या रुका हुआ? कोई मेसेज है क्या?" तो ट्रकवाला बोलला,"मेसेज नाही. आदमी है." बघतो तर काय त्या ट्रक मधुनच आशिष खाली उतरला. कुलदिप मागुन यामाहा सिंगल राइड करत पोचलाच. कुलदिपच्या मागुन आमची सपोर्ट वेहिकल सुद्धा येउन पोचली. ४ वाजत आले होते. साधनाला फोन केला तर ती मुलबेकच्या आसपास पोचल्याचे कळले. अजून बरेच अंतर जायचे होते आणि पोहचेपर्यंत रात्र होणार हे नक्की होते. आता अजून उशीर न करता आम्ही सर्व निघालो ते लेहच्या पठारावर उतरून 'लामायुरु' गोम्पाकडे...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... !
.
.
.

15 comments:

  1. रोहन,आज तर खूपच मजल मारली की तुम्ही.ग्रेट.सुभेदार हर्का बहादुर यांच्याबद्दल आधी कधीच ऐकले नव्हते.तसेच मेजर सर्वानन, जवान प्रमोद व शत्रुघ्नसिंग व लेफ्टनंट मनोजकुमार पांडे यांचा पराक्रमही तुझ्यामुळे कळला. या सगळ्या वीरांना सलाम. असे अनेक जण असतीलच.वाचताना मन भरून आले. या सगळ्यांच्या पराक्रम व बलीदानामुळे आज आपण सुरक्षित आ्होत.त्रिवार सलाम.
    शहनवाझ ने तुमची खातीरदारी सहीच केली म्हणायची,:)
    ह्म्म, हे फार चढाचे रस्ते ना. बारीकसारीक प्रॊब्लेम्सना तोंड देत देत तुम्ही टप्पा गाठलात हे महत्वाचे.इथले सृष्टीसौंदर्य अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे व नयनरम्य आहेच. एकदा गेले की आयुष्यभरासाठी प्रेमात पडायला होतेच. गोम्पांबद्दल फक्त ऐकूनच होते आज फोटोत पाहीले. :)
    पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

    ReplyDelete
  2. हो असे अनेक ज्ञात-अज्ञात वीर आहेत जे आपल्याला ठावुकच नसतात :( आणि हो ना... ती मजल तर मारायचीच होती नाहीतर संपूर्ण वेळेचे गणित फसले असते.
    बाकी गोम्पांबद्दल पुढच्या भागांमध्ये येईलच कारण लडाख आणि गोम्पां हे पक्के समीकरण आहे...

    ReplyDelete
  3. शेवटचा फोटो किलर आहे मित्रा... मला लवकरच जायला पाहिजे.

    ReplyDelete
  4. असे अजून काही किलर फोटो येणार आहेत मित्रा ... तयार रहा ;) आणि लवकरच म्हणजे तूला जायला अजून किमान १० महीने आहेत ... :) सो होल्ड युअर होर्सेस ... :D

    ReplyDelete
  5. लान्सनायक शत्रुघ्नसिंग ह्यांची ७-८ दिवसांची झुंज एकदमच थरारक आहे......एवढे दिवस कश्या सहन केल्या असतील त्यांनी वेदना......कल्पनातीत आहे......खरंच!!! असे किती जवान असतील आणि किती प्रसंग.....ज्या जनतेसाठी एवढा त्याग केला जातो ती जनता मात्र ह्यापासून किती अनभिज्ञ!!! (अर्थात त्यात माझाही समावेश आहेच)...... तुझ्या लिखाणामुळे ही खंत जास्त बळावत चाललीय.....

    लडाखचे अवर्णनीय निसर्ग सौंदर्य अनुभवणे आणि बाइक चालवताना सतर्क राहणे ही तारेवरची कसरतच होती नाही का??? आणि त्यात येणार्‍या अडचणींना सामोरे जाणे....हे सर्व तुम्ही सर्वांनी ती लिलया पेललेत हे खरंच कौतुकास्पद आहे.....

    ReplyDelete
  6. आपण सर्वच अनभिज्ञ आहोत. :( त्याचीच थोडी उणीव भरून काढायला गेलो होतो. आणि हो बाइक चालवताना सतर्क राहणे गरजेचे असल्याने निसर्ग सौंदर्य अनुभवायला थांबावे लागायचे मध्येच... शिवाय फोटो काढता यायचे नाहीत हवे तसे. शमिकाने मात्र बरेच छान फोटो घेतले मागे बसून ... :)

    ReplyDelete
  7. फ़ोटो छानच आहेत आणि वर्णनाबद्द्ल करावं तेवढं कौतुक कमीच..मला वाटतं मॉन्क म्हणजे भिक्खु असेल का मराठीत??? बघ पटलं तर टाक...:)

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. मला तोच शब्द आठवला होता पण पटला नाही. अजून कुठला तरी शब्द असायला हवा... :)

    'लामा' हा योग्य शब्द आहे ना.. आता हाच शब्द वापरीन.

    ReplyDelete
  10. as usual gr8 :) agdi dolyasamor ubha rahtay sagla :)
    aani kay re, vatavaranatlya itkya badalane tras nahi zala na kunala?

    ReplyDelete
  11. तसा त्रास झाला काही लोकांना पण विशेष नाही ... :)

    ReplyDelete
  12. नेहमीप्रमाणेच आजची पोस्ट पण मस्त आहे. त्या सोबत नवीन माहिती पण मिळाली. शत्रुघ्नसिंग यांच्या विषयी प्रथमच वाचतोय. त्यांच्या शौर्याला सलाम!!! शेवटुन २रा फोटो तर भन्नाट आहे!!!!

    ReplyDelete
  13. होय मनमौजी ... तो फोटू-लाचा रस्ता मला खरच जाम आवडला. धन्यवाद .. !

    ReplyDelete
  14. रोहन, अपर्णाचा ‘भिक्खु’ शब्द बरोबर आहे. लामा म्हणजे साधनेच्या एका विशिष्ट पातळीला पोहोचलेला भिक्खु. सगळे monk लामा नसतात.

    ReplyDelete
  15. आह्हा... वाचताना पुन्हा थरकाप उडाला...

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...