Wednesday, 23 September 2009

लडाखचा सफरनामा - 'द्रास'ला पोचता-पोचता ... !

"कोंबडी पळाली ... तंगडी धरून ... लंगडी घालाया लागली ..." ह्या गाण्याने सर्वजण पहाटे सव्वाचारला जागे झाले. आधी 'पहाटे-पहाटे मला जाग आली' ... हे गाणे लावणार होतो पण लवकर आणि उशिरा झोपलेले सर्वजण उठावे म्हणुन मुद्दामून मी हे गाणे गजर म्हणुन लावले होते. आंघोळी वगैरे करायच्या नव्हत्याच त्यामुळे फटाफट बाकीचे उरकले, सामान बाहेर काढले आणि ५ वाजता निघायला आम्ही तयार झालो. सोनमर्ग सारख्या उंच ठिकाणी किमान पहाटे तरी थंडी वाजेल हा आमचा भ्रम निघाला. एका साध्या टी- शर्ट मध्ये मी पहाटे ५ वाजता तिकडून बाइक वरुन निघालो. खाली मार्केट रोडला आलो तर आमचा ड्रायवर अजून गाड़ीमध्ये झोपलेलाच होता. त्याला उठवला. त्याला बोललो,'गाड़ी मध्येच झोपायचे होते तर खाली कशाला आलात? वर तिकडेच झोपायचा होत ना गाड़ी लावून. आता अजून उशीर होणार निघायला' काही ना बोलता तो आवरायला गेला. बाजुलाच एक होटेल सुरू झालेले दिसले तिकडे चहा सांगितला आणि बाकिच्यांची वाट बघत बसलो. एक तर मोबाइल नेटवर्क नव्हते त्यामुळे वरती फोन सुद्धा करता येइना. श्रीनगर सोडले की कुठलेच नेटवर्क लागत नाही. तसे BSNL लागते अध्ये-मध्ये. अखेर ६ नंतर सर्वजण खाली पोचले. नाश्ता उरकला आणि झोजी-ला मार्गे कुच केले द्रास - कारगीलकडे.आज सर्वात पुढे मी-शमिका होतो. माझ्या मागून अमेय-दिपाली आणि बाकी सर्व त्यामागे होते. सोनमर्ग सोडले की लगेच 'झोजी-ला'चा भाग सुरू होतो. 'ला' - म्हणजे इंग्रजीमधला 'पास' हे लक्ष्यात आला असेलच तुम्हाला. बरेच पण 'झोजिला पास' असे जे म्हणतात ते चुकीचे आहे. तासाभरात झोजी-लाची 'घुमरी' चेकपोस्ट गाठली. इकडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आणि माणसाला नाव, गाड़ी नंबर आणि तुमचे लायसंस नंबर याची नोंद करावी लागते. तिकडे आपल्या बायकर स्टाइलने बाइक सर्वात पुढे टाकली आणि चारचाकी गाड्यांच्या पुढे आपला नंबर लावून पुढे सटकलो सुद्धा. आज आम्हाला कुठेच जारही वेळ घालवायचा नव्हता. सोनमर्गच्या ८९५० फुट उंचीवरुन आता आम्ही हळू-हळू वर चढत १०००० फुट उंचीपर्यंत पोचलो होतो. संपूर्ण रस्ता हा कच्चा आहे. कुठे मातीच माती तर कुठे वरुन वाहत येणारे पाण्याचे प्रवाह. सलग ५-१० मी. रस्ता सलग चांगला असेल तर शपथ. तरी नशीब उन्हाळ्याचा अखेर असल्याने वाहून येणारे पाणी कमीच होते. सोनमर्गनंतरचा सर्व भाग हा L.O.C. म्हणजेच 'ताबा सिमा रेषा'च्या अगदी जवळ आहे. जस-जसे पास चढू लागलो तस-तसे एक-एक शहिद स्मारक दिसू लागले. १९४८ पासून येथे अनेक वीरांनी आपल्या मात्रुभूमीच्या रक्षणार्थ जीवन वेचले आहे. त्यासर्वांच्या आठवणीत येथे छोटी-छोटी स्मारके उभी केली गेली आहेत. काही ठिकाणी थांबत तर काही ठिकाणी मनोमन वंदन करत आम्ही अखेर झोजी-लाच्या सर्वोच्च उंचीवर पोचलो. ११५७५ फुट...

आमच्या समोर होती नजर जाईल तितक्या दूरपर्यंत पसरलेली उंचचं-उंच शिखरे आणि त्यामधून नागमोडी वळणे घेत वाहत येणारी सिंधू नदी. झोजी-ला वरुन दिसणारे ते नयनरम्य दृश्य डोळे भरून पाहून घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. चढायला जितका वेळ लागला तितकाच वेळ उतरायला लागणार होता कारण रस्ता तसाच खराब होता. मध्येच कुठेशी चांगला रस्ता लागला की आम्ही सर्वजण गाड्या सुसाट दामटवायचो. ९ च्या आसपास झोजी-ला पार करून 'मेणामार्ग' चेक पोस्टला १०३०० फुट उंचीवर उतरलो. इकडे सुद्धा पुन्हा नाव, गाड़ी नंबर आणि लायसंस नंबर याची नोंद केली. डाव्या बाजूला बऱ्याच चारचाकी गाडया थांबून होत्या. चौकीवर असे कळले की पुढचा रस्ता अजून सुद्धा बंदच असून दुपारपर्यंत सुरू व्हायची शक्यता आहे. आता आली का पुढची अडचण. काय करायचे ह्याचा विचार सुरू असतानाच एक व्यक्ती आली आणि आम्हाला विचारू लागली. कुठून आलात? आम्ही म्हणालो 'महाराष्ट्र म्हणजे मुंबई - ठाणे वरुन आलोय.' ती व्यक्ती होती आपल्या मराठीमधले कलाकार 'प्रदीप वेलणकर'. त्यांनी MH-02, MH-04 अश्या नंबर प्लेट बघून लगेच ओळखले असणार की हे तर मराठी मावळे. काहीवेळ त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि आम्ही पुढे निघालो. जिथपर्यंत रस्ता सुरू आहे तिथपर्यंत जाउन बसायचे आणि रस्ता सुरू झाला की पुढे सुटायचे असे ठरले. मेणामार्ग वरुन थोडेच पुढे 'माताईन' गाव आहे. तिथपर्यंत पोचायला फारवेळ लागला नाही. १० वाजता आम्ही तिकडे पोचलो होतो. गेल्या २४ तासांपासून ब्रिजच्या दोन्ही बाजूला वाहनांची ही.... लांब रांग लागली होती. ड्रायवरने गाडी रांगेत लावली. आम्ही मात्र बाइक्सवर अगदी पुढपर्यंत गेलो. ब्रिजच्या आधी थोडा उतार होता तिकडे गाड्या लावल्या आणि काय चालू आहे ते बघायला पुढे गेलो. B.R.O. चे काही कामगार आणि तिकडच्या पोस्टवरचे जवान भरभर काम उरकत होते. एक मेजर आणि एक कर्नल कामावर देखरेख करत सर्वांना सुचना देत होते. उमेश आणि साधने इकडे काही शूटिंग केले. कुलदीप आल्यापासून फोटो काढत कुठे गायब झाला ते पुढचे तास दोनतास कोणालाच माहीत नव्हते. आशिष तर सर्वात पुढे जाउन नदी किनारी उभा राहून कामावर देखरेख करू लागला. मी तिकडे थोडावेळ थांबलो मग कंटाळा आला. पुन्हा माघारी आलो आणि आम्ही गप्पा मारत बसलो.अजून १ तासाभरात ब्रिज सुरू होईल अशी आशा होती. पण कसले काय १२ वाजत आले तरी अजून सुद्धा ब्रिज उघडायचा पत्ताच नाही. श्या ... आता आज सुद्धा आम्ही काही लेह गाठु शकणार नव्हतो हे निश्चित होते. किमान कारगील तरी गाठू अशी आशा होती. पण नंतर मनात विचार आला की आज ब्रिज ओपन झालाच नाही तर ??? लटकलो ना. एक तर पुन्हा झोजी-ला क्रोस करून मागे सोनमर्गला जा; नाहीतर इकडेच कुठेतरी रहायची सोय बघा. आधीच सॉलिड भूक लागली होती. आशिष आणि मनाली काही खायला मिळते का ते बघायला गेले पण आसपास काही म्हणजे काही मिळत नव्हते. अभि आणि मी नकाशा काढून पुढचे अंतर किती आहे, संध्याकाळ पर्यंत कुठपर्यंत जाता येईल, तिकडे रहायची सोय काही आहे का... ह्या सगळ्याचा विचार करत बसलो होतो. आसपास अजिबात झाडी नव्हती आणि उन तळपत होते म्हणुन २ बाइक्सच्या मध्ये एक चादर अडकवली आणि त्या सावलीमध्ये ३-४ घुसले. बाकी काहीजण गाडीमध्ये बसले तर काही समोर असणाऱ्या शाळेत जाउन बसले. एका जागी थांबून मला आता कंटाळा यायला लागला होता. म्हणुन मी आसपास फोटो काढायला गेलो. उत्तुंग कडे असणारे डोंगर आणि त्याला न जुमानता अगदी वर टोकाशी भिडणारे पांढरेशुभ्र ढग ह्यांचा एकच मेळ जमला होता. त्या दोघांनी आकाशात एक सुंदर चित्र निर्माण केले होते. पायथ्याला पसरलेले हिरवे गालीचे त्या दृश्याच्या सौंदर्यात अधिक भर टाकत होते. काहीवेळ फोटो काढले आणि पुन्हा गाडीपाशी आलो. हाताशी वेळ होता तेंव्हा म्हटले चला, ब्लॉगसाठी नोट्स काढूया. मी आणि साधना गप्पा मारत-मारत नोट्स काढू लागलो. तितक्यात एक मुलगा कुठूनसा आला आणि ओरडू लागला. 'बाबा MH-04 गाडी'. त्याच्यामागुन त्याचा तो बाबा आला आणि त्यांनी विचारले 'ठाणे का?' मी म्हटले 'होय'. मी असे ऐकून होतो की लडाखला जाणाऱ्या लोकांमध्ये मराठी लोकांचा बराच वरचा नंबर आहे. गेल्या ३-४ दिवसात ते प्रकर्षाने जाणवत होते. मुंबईवरुन आलेल्या त्यालोकांशी काहीवेळ गप्पा मारल्या. आल्यापासून तसा गायब असलेला कुलदीप कुठूनसा आला आणि ऐश्वर्या, आदित्य, पूनम आणि अमेयला घेउन नदीकाठी फोटोग्राफी करायला गेला. मी आणि साधना पुन्हा आपल्या नोट्स काढायच्या कामाला लागलो. ३ वाजत आले तशी आर्मीच्या लोकांची हालचाल सुरू झाली. 'ये वाली गाडी पीछे लो. सामनेसे अभि गाडियां आने वाली है.' ब्रिज सुरू होण्याची लक्ष्यणे दिसू लागली तर. आम्ही भराभर बाइक्सवर सवार झालो आणि त्या ट्राफिकमधून जाण्यापेक्षा बाजुच्या गवतात बाइक टाकल्या. आणि सुसाट ब्रिज पार झालो. इकडून द्रास अवघे ४० की.मी होते. तेंव्हा आता थेट द्रासला जाउन थांबायचे, काहीतरी खायचे आणि द्रासचे 'वॉर मेमोरियल' बघायचे असे ठरले. पुढचा रोड इतका मस्त होता की आम्ही बाइक किमान ८० च्या स्पीडला पळवत होतो. झोजी-ला वरुन द्रासला जाताना डाव्या बाजूला आर्मीचे 'High Altitude Training School' आहे. त्याच्या लगेच पुढे जम्मू आणि काश्मिर रायफल्सचे ट्रेनिंग स्कुल आहे. त्याला आता कॅप्टन विक्रम बत्रा (PVC) यांचे नाव देण्यात आले आहे. ४० मिं. मध्ये आम्ही द्रास मध्ये पोचलो होतो. द्रास ... ऊँची ९८५० फुट फ़क्त. तरीसुद्धा जगातली लोकवस्ती असलेली दुसऱ्या क्रमांकाची थंड जागा असे ज्याचे वर्णन केले जाते ते द्रास. छोटुसे आहे द्रास. फार मोठे नाही. गावामधून जाणाऱ्या रस्त्यावरच दुकाने आहेत. आम्ही एक ठिकसे होटेल शोधले आणि शिरलो आत. 'होटेल दार्जिलिंग'. जे होते ते पोटात टाकले. काही फोन करायचे होते ते केले. हे सर्व आटपेपर्यंत ५ वाजत आले होते आणि आमच्यामागुन सर्व चारचाकी गाड्या कारगीलकडे रवाना झाल्या होत्या. आता कारगीलला जाउन रहायची जागा मिळणे थोड़े कठिण वाटत होते तेंव्हा आज द्रासलाच रहायचे असे ठरले. शिवाय सकाळी बरी असलेली ऐश्वर्याची तब्येत आता पुन्हा ख़राब व्हायला लागली होती. सर्वानुमते आम्ही आज एकडेच रहायचे ठरवले आणि जागेच्या शोधात निघालो. २ मिं. वरच सरकारी डाक बंगला होता तिकडे खोल्या मिळाल्या. ६ वाजता सर्व सामान खोलीत टाकले आणि निघालो द्रासचे 'वॉर मेमोरियल' बघायला... नेमक्या काय भावना होत्या आमच्या 'वॉर मेमोरियल' ला जाताना???
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... !
.
.
.

14 comments:

 1. sahii hotahet post.....next post chi waat baghayala lavnaare :P

  ReplyDelete
 2. होय 'सिंपली अमी' .. :) ... कामात असल्याने मला सुद्धा पुढचे लिखाण करायला वाट बघावी लागते आहे ... :( टाकतोय लवकरच पुढचे भाग ... :)

  ReplyDelete
 3. khoop bhari :)
  kharach vaat baghayla lavtaat pudhchya post chi...
  mala pan ekda tari karaychay Leh Ladakh !
  tujhya blog mule ti ichcha ajun balaavlie :)

  ReplyDelete
 4. ह्या ब्लॉगमुळे बहुदा पुढच्या वर्षी लडाखला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार वाटते ... हीही.. :D

  ReplyDelete
 5. हा शेवटचा फोटो मला तुफान आवडला. मी लडाखला जाईन तेव्हा पहिली ट्रिप तरी SUVनेच करीन. आधी फोटोग्राफी. आणि मग बाईक ट्रिप त्याच्या पुढच्या वर्षी.

  ReplyDelete
 6. शेवटचा लॅंडस्केप फोटो.

  ReplyDelete
 7. Photos तर Awesome आहेत dada

  ReplyDelete
 8. अरे व्वा खुपच सुंदर होतेय तुझे लिखाण,आणी महत्वाचे म्ह्यणजे कोणताही मुद्दा सुटात नही तुझ्या लिखाणातुन. लहान सहान गोष्टीही खुप
  चांगल्या प्रकारे लिहिल्या आहेत .

  मस्ताच !!!!!!!

  ReplyDelete
 9. होय अनू... तिकडच्या तिकडे नोट्स काढल्याने बराच फायदा झाला. तूला वाचताना आणि फोटो बघताना तुमच्या 'सलाम सैनिक' मोहिमेची athvan येत असेल ना ??? बाकी ती मोहिम मी मिस् केलीच :(

  धन्यवाद मनमौजी ... :)

  ReplyDelete
 10. रोहन, फोटो सही आहेत. वाचतेय,:) अरे हे वाचून बरेच लोक नक्कीच विचार करतील. बरेचदा जावे असे मनात असते पण कुठेतरी शंका घुटमळत असतात. अश्या सविस्तर लिखाणामुळे मदत होतेच.

  ReplyDelete
 11. तुझा सफरनामा अगदी सोबत सफारीचा आनंद देणारा आहे. कदाचित, माझ्या "बकेट लिस्टम"ध्ये "बाईकिंग टु - लेह - लद्दाख" नमुद असेल!

  ReplyDelete
 12. अरे, ऐश्वर्याला बरं कधी वाटलं?? मला वाचताना कळतंय कि केव्हढ्या अडचणींना तुम्ही तोंड दिलयत!! पण तरी देखील मला हेवाच वाटतोय!! :)

  ReplyDelete
 13. Apratim !!
  Jivanmacha khara aanand tumhi sagale bhatake loka gheta

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...