Thursday 28 January 2010

ट्रेक टू अरावली - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

स्वतः घोरून-घोरून, आमच्या जिवाला घोर लावून आणि आम्हाला जागे ठेवून ते 'घोरटे' (घोरून आमची झोप चोरणारे म्हणुन घोरटे) निवांतपणे झोपले होते. आम्ही मात्र उशिरापर्यंत जागे होतो. अखेर रात्री उशिराने कधीतरी आम्हाला झोप लागली. तरी सकाळी जाग लवकरच आली. हिमालयातील ट्रेक्सप्रमाणे पहाटे लवकर उठून बर्फ वितळातयच्या आधी जास्तीत-जास्त ट्रेक करायचा असे काही इकडे नव्हते. रात्रभर 'घोरून लढाई' केलेले काही वीर अजून सुद्धा अंथरुणात निपचीत पडलेले होते. आम्ही उठून आवरून घेतले. आंघोळ करायची नव्हतीच. का काय? डोंगरात आल्यावर डोंगरातले नियम पाळावे लागतात. तेंव्हा नको ते आंघोळ वगैरे करायचे विचार मनात आणायचे नाहीत. आम्ही नाश्त्याची आणि नाश्ता आमची वाट बघत होताच. उदरभरण झाले आणि मग आम्ही निघायची तयारी केली. सॅक्स पाठीवर मारल्या आणि 'मालघाट'कडे निघालो. रणकपुर पासून मालघाटचे जंगल अवघे ६ किमी लांब आहे. जायचा रस्ता पक्का डांबरी आहे तेंव्हा आम्ही ट्रक मध्ये बसलो आणि मालघाट जंगलाच्या गेटकडे निघालो. काही मिनिट्समध्ये मालघाटच्या गेटवर पोचलो. इथपासून १३ किमी. ट्रेककरून संध्याकाळ पर्यंत 'फूटादेवल' याठिकाणी पोचायचे होते. आता सकाळचे किती वाजले होते ते माहीत नाही पण थोड़े-थोड़े ऊन लागायला लागले होते. ऐश्वर्याने तिच्या खिशातून एक छोटीशी डब्बी काढली. त्यात ओठान्ना लावायचे 'फ्रूटफ्लेव्हर बाम' होते. खरंतरं लावायचे कमी आणि खायचे जास्त... :D निघायच्या आधी मग आम्ही सुद्धा ते फ्रूटफ्लेव्हर बाम खाऊन.. म्हणजे लावून घेतले.. संजूने भाटीसरांची एक छोटीशी मुलाखत घेतली. की ट्रेक कसा आहे ... जायचा रूट काय-काय आहे वगैरे वगैरे .. आमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये आम्ही सर्वात तरुण होतो. तेंव्हा आम्ही पटापट ट्रेक करत पुढे जाऊ आणि ज़रा वयस्कर असलेले थोड़े मागे राहतील असा भाटीचा अंदाज होता बहुदा. पण हे काय? सुरुवातच आम्ही 'जाऊ दे त्याना पुढे आपण सावकाश जाऊ मागुन आणि कव्हर करू' ह्या सह्याद्री स्टाइलने केली. आमच्या सर्वांच्या सॅक्समध्ये कपडे कमी आणि खायचे सामान जास्त भरले होते. शिवाय फालनावरुन घेतलेली केळी आणि मोसंबी सर्वांच्या साइड पॉकेटला लटकत होती. ती संपवणे गरजेचे होते... तेंव्हा जसा ट्रेक सुरू झाला तसे आम्ही सुद्धा सुरू झालो. जणू काही ट्रेक फ़क्त १ दिवसाचा आहे ह्या स्पीडने आम्ही खात होतो आणि त्याविरुद्ध ट्रेक बहुदा १०-१२ दिवस मोठा आहे ह्या स्पीडने चालत होतो. मस्त मज्जा करत. घाई काय होती. उगाच आपले पुढे पळत जाउन भोज्जा करायचा ह्यात कसली मज्जा येते लोकांना काय माहीत. आमच्यात पण असे होते काहीजण. अरे लोकांनो ट्रेकची मज्जा घ्या. निसर्ग बघा. गप्पा टाकत जा. नाहीतर १०-१५ वर्षांनी हे असे लिहायला घेतले ना की काही आठवणार नाही... :) मग बोलाल अरे हां तेंव्हा तर १०-१० की दौड़ करून पोचलो होतो नेक्स्ट डेस्टीनेशनला...






वाट एकदम सोपी होती. मध्येच कच्चा गाडीरस्ता लागायचा. आम्ही निवांतपणे बसायचो. धमाल गप्पा टाकत पुढे जायचो. आमचा ट्रेक गाईड शिवसिंग बोंबा मारू लागला की मग थोड़े पुढे सरकायचे. वाट सरत होती... मोसंबी संपत होती... आणि सॅक्स हलक्या होत होत्या. एके ठिकाणी मध्येच ऐश्वर्याला बीटल्स दिसले. हिरवे-हिरवे आणि त्यावर काळे ठिपके. ३ जणांचे कुटुंब होते त्यांचे एक. तिकडे त्यांचे फोटोसेशन झाले. मग ऐश्वर्याला ते उचलून घ्यायची हुक्की आली. मग त्यांचे तिच्याबरोबर पुन्हा एकदा फोटोसेशन झाले. पुन्हा बीटल्सना त्यांच्या घरी सोडले अणि आम्ही पुढे निघालो. वळणा-वळणाचा रस्ता हा हळू-हळू वर चढत होता. पण अगदीच हळू. नाहीतर आपला सह्याद्री. असा चढतो-उतरतो की काय विचारू नका. ह्या संपूर्ण प्रदेशात तसा पाउस कमी. त्यामुळे आपल्यासारखी गर्द झाड़ी नव्हती पण थोर वृक्ष मात्र होते. मधुनच पक्ष्यांचे आवाज कानी पडायचे. याशिवाय एखादा जोक झाला की 'संजू' या प्राण्याचे सुद्धा आवाज मोठ्याने ऐकू यायचे. आम्ही ७ जण सर्वात शेवटी 'व्यू जंगल पॉइंट'ला पोचलो. सर्वजण आधीपासून तिकडे जाउन टेकले होतेच. मालघाट जंगलाचे इकडून मस्त दर्शन होत होते. ज्या रूटने आलो तो थोड़ाफार दिसत सुद्धा होता. ते दृश्य बघत ज़रा तिकडे विसावलो तर शिवसिंग लगेच म्हणाला,"चलो. थोड़ा आगेही खाना खाने रुकना है. आप पहेले दिनसे ही पीछे, तो पूरा ट्रेक पिछेही रहोगे." मी म्हटले,"शिवसिंगजी हम आगे जानाही नही चाहते. आप चलिए. हम आ जायेंगे." तो आपला निघाला पुढे. आम्ही फारवेळ गप्पा मारत बसलो नाही कारण दुपार होउन गेली होती आणि भूका लागल्या होत्या. (इतके खाऊन पुन्हा भूका कश्या लागतात.. काय कळत नाय राव..) जरा पुढे गेलो तर उजव्याहाताला खाली एक ओढा दिसला. तिकडे सर्वजण जेवत होते. आम्ही सुद्धा मोर्चा तिकडे वळवला आणि ओढयाकाठी जेवून घेतले. २ वाजून गेले होते. तिकडून पुढे निघालो आणि फुट देवलच्या दिशेने निघालो. काही वेळात जंगलाची ह्या बाजूची भिंत दिसू लागली. त्याचबाजुला आमच्या पुढे काही शर्यतीतले ट्रेकर्स दिसत होते. अचानक शिवसिंग डावीकडच्या एका कच्च्या वाटेने आत घुसला. आम्हाला कळले की हा शोर्टकट आहे. आम्ही त्याच्यामागून त्या वाटेने अर्धे अंतर वाचवून एकदम पुढे पोचलो. आता जंगलाची भिंत ओलांडून आम्ही बाहेर पडलो आणि एका टेकडीला वळसा घालून 'फूटादेवल' गावाकडे निघालो. तितक्यात शिवसिंग बोलल. "इस पहाड के बायेसे से जायेंगे. और एक शोर्टकट है. बाकी लोगोंको जाने दो दाये के रास्तेसे" पहिल्याच दिवशी पठ्याला कळले होते की हे कुठल्या पद्धतीचे ट्रेकर्स आहेत ते. शिवसिंगने दाखवलेल्या शोर्टकटने आम्ही १० मिनिट्समध्ये गावाच्या वेशीवर जाउन पोचलो. ते सुद्धा सर्वांच्या पुढे. "कितना स्लो चलते है.. कितना पीछे रहते है" अशी बडबड करणारे आता गप्प होते. गावात शिरल्या-शिरल्या लगेचच जैनमंदिराबाजुला असणाऱ्या जागेमध्ये आमची कैंपसाईट सेट केली गेली होती. तिकडे जाउन एका बाजुला सामान टाकले. एका बाजुला झोपणे सोइस्कर होते कारण रात्री चहुबाजूंनी हल्ला झाला की आमची काय गत होणार होती ते आम्हाला माहीत होते.



संध्याकाळ होत आली तसे आम्ही आसपास भटकायला निघालो. जैन मंदिरासमोरच एक पडके शंकरमंदिर होते. तिकडे शेजारी राहणारे पुजारी चक्क मराठी आणि आपल्या 'कल्याण'चे निघाले. नाव लक्ष्यात नाही आता त्यांचे. तिकडूनच पुढे खाली अजून एक देऊळ आहे. पण आम्ही अंधार पडत आलेला म्हणुन खालपर्यंत गेलो नाही. कैंपसाईटकडे परत फिरलो. दिपक आणि संजू मात्र जाउन आले. त्यांना परतायला अंधार झाला म्हणुन कैंपलिडर बडबड करत होता. राजस्थानमध्ये नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते असे ऐकून होतो. पण आम्हाला मात्र अजिबात थंडी वाजत नव्हती. जेवण बनत होते तोपर्यंत तिकडेच बाजुला असणाऱ्या एका दुकानातून ज्यांना हवे त्यांनी घरी फोन केले. रात्री जेवणानंतर जास्तच धमाल आली. अनुजाच्या मोडक्या डाव्या हाताला आणि माझ्या मोडक्या उजव्या पायाला ऐश्वर्याच्या मोडक्या पायाची सोबत मिळाली. त्याचे झाले असे.. की आमचे जेवण सुरू होते तेंव्हा दुरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. त्यावरून मी काहीतरी जोक मारला आणि ऐश्वर्याला हसण्यासाठी तितके कारण पुरेसे होते. खरेतरं तिला हसायला कारण लागत नाही. हसता-हसता ती मागे सरकली आणि धापकन पडली. पाय मुरगळला आणि दुखत होता तरी मध्येच हसणे सुरूच होते तिचे. माझ्या पायासाठी आणलेले एक्स्ट्रा क्रेप बाँडेज तिला दिले लावायला मग. रात्री पुन्हा एकदा ग्रुपमधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) गुडुप झाले. आम्ही फ़क्त ७ जण जागे होतो कैंपफायर करायला. ११ वाजता झोपायला गेलो तेंव्हा घोरण्याची कोंपिटीशन सुरू झाली होती. आज मी घोरणाऱ्या  सर्वांच्या अंगावरुन नाचत थैमान घालेन की काय असे वाटत होते. पण तसे काही मी केले नाही. आज मात्र कालपेक्षा सुरात घोरत होते ३-४ जण. भांडत नव्हते. प्रत्येकाने आपापला टाइमस्लोट घेतला होता. इकडून एकदा तर तिकडून एकदा असे आवाज यायचे. मध्येच संजू खोटे-खोटे त्यापेक्षा जोरात घोरायचा... मी, अभि अणि दिपकची हसून हसून पुरेवाट. आमच्यासारखे अजून २-३ पीड़ित होते. राजस्थान मधलेच होते ते तिघे. त्यातला एकजण उठला आणि त्याच्या पासून दुरवर घोरणाऱ्या एकाला त्याने उशी फेकून मारली. घोरणाऱ्या व्यक्ति अचानक शांत झाली, कुस बदलली आणि पुन्हा घोरायला लागली. आता आम्ही असे फुटलो की काही विचारू नका. अखेर रात्री उशिराने पुन्हा एकदा आमच्या झोपेने घोरण्यावर मात केली आणि आम्ही निद्रेच्या अधीन झालो. उदया सकाळी आम्हाला 'वीरों का मठ' मार्गे कुंभळगड़ येथे पोचायचे होते. कुंभळगड़ - जेथे जन्म झाला महाराणा प्रताप यांचा...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !
.
.

10 comments:

  1. Great writing and snaps. I liked the phrase "Ghorate" :) suites perfect!

    -Niranjan (http://sukameva.blogspot.com)

    ReplyDelete
  2. मस्त मजा येतीये...’घोरटे’ काय!!!!
    बीटल्स चे फोटो जाम आवडलेत.....घोरण्याचा टाईमस्लॉट सही....लिही पटकन पुढचे.....

    ReplyDelete
  3. ब्लॉगवर स्वागत निरंजन ..

    तन्वी. होय... पुढचे लिहितोच आहे आत्ता ... :)

    ReplyDelete
  4. chan majaa yetie :)
    asach lihit chal roj :P

    aani ho, mala nakki de purna mahiti, aamcha group tayar ch aahe so we'll plan for this :)

    ReplyDelete
  5. बीटल्स आणि अरावलीचा फोटो फारच सुंदर आहे ...

    घोरटे :D

    घोरट्यांवर उपाय एकच ... घोराख्यान सुरू होण्यापूर्वी आपण झोपलं पाहिजे :)

    ReplyDelete
  6. गौरी ... घोराख्यान - मस्त शब्द आहे.. पुढच्या भागात वापरतो.

    ReplyDelete
  7. इतके खाऊन पुन्हा भूका कश्या लागतात.. काय कळत नाय राव..) आता हे काय आम्ही सांगायला पाहिजे का?

    "घोरायण" मस्त वाटले असेल जंगलात.

    ReplyDelete
  8. 'घोराख्यान' नंतर 'घोरायण' वा.. वा.. अजुन एक शब्द. पुढच्या भागात आता हां सुद्धा वापरतो ... :D

    ReplyDelete
  9. हाहा.... ’घोरटे’... एका मस्त शब्दाची भर पडली. बीटल्सचा फोटो छान आहे.मजा येतेय वाचायला.

    ReplyDelete
  10. घोरटे,घोराख्यान, घोरायण हो ना ... मस्त शब्दाची भर पडली आहे. हेहे ... :)

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...