Friday, 6 August 2010

लेहमध्ये ढगफुटी ... :(

आज सकाळी-सकाळी समजले कि लेह-लडाख भागात अचानक झालेल्या ढगफुटीने अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे बळी गेले आहेत तर मालमत्तेचीही बरीच हानी झाली आहे. मनाली ते लेह महामार्ग बंद झालेला असून वाटेमधले काही ब्रिज पडले आहेत. गेल्यावर्षी आम्ही काही जणांनी बाईकवरून जम्मू - श्रीनगर - द्रास - कारगिल - लेह आणि मग - सरचू - मनाली मार्गे दिल्ली असा १३ दिवसांचा प्रवास यशस्वी केला होता. आज ह्याबाबत लिहिण्याचे कारण असे कि गेल्यावर्षी नेमके ६ ऑगस्ट या तारखेलाच आम्ही आमचा प्रवास सुरु केला होता. आज त्या मोहिमेला १ वर्ष पूर्ण होत आहे. आज हि बातमी वाचल्यानंतर तो केलेला सर्व प्रवास जसाच्यातसा डोळ्यासमोरून तरळून गेला. आम्हाला वाटेमध्ये मदत करणारे ते लोक, लष्कराचे जवान, आम्ही लेहमध्ये जिथे राहिलो ते 'नबी'चे घर, त्याचे कुटुंब, आमचा ड्रायव्हर तेनसिंग हे सर्व सुखरूप असतील अशी मनाला खात्री आहे...

सप्टेंबर ते डिसेंबर २००९ ह्याकाळात केलेल्या लडाखवरील माझ्या लिखाणाला अनेकांनी प्रतिसाद दिला. २०१० सालासाठी लडाखला जाणारे उत्सुक असलेल्या अनेकांनी मला वैयक्तिकरित्या संपर्क साधून माहिती घेतली आणि मोहिमा आखल्या. आज त्यापैकी काही लेह-लडाख करून सुखरूप परत आलेले आहेत तर काही नेमके तिकडे अडकले आहेत. काही वाटे मध्ये सुद्धा असतील. काही जे अजून निघायचे आहेत त्यांनी निराशेने आपल्या मोहिमा एक तर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. तिथली परिस्थिती गंभीर आहे. दळण-वळण आणि संपर्क पुन्हा स्थापित करायला पुढचे काही दिवस नक्कीच जाणार आहेत. लष्कराने पुन्हा एकदा जोमाने काम सुरु केले आहे. B .R .O . म्हणजे बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने तर आपले कार्य एकदम जोरात सुरु केले असेल याची मला खात्री आहे. त्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही...

लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना... मृत्युमुखी पडलेल्या सदैव मदतीस तत्पर आणि मनमिळावू अश्या तिथल्या स्थानिक लोकांना मनापासून श्रद्धांजली... का कोण जाणे माझे मन पुन्हा एकदा लवकरच लडाखकडे जावे असे म्हणते आहे...

5 comments:

 1. लडाखवरील आलेली आपत्ती दूर होवो आणि तिकडे गेलेले सर्वजण सुखरूप असोत हीच प्रार्थना.

  ReplyDelete
 2. फारच भीषण परिस्थिती ओढवलीये. :( मन:पूर्वक श्रध्दांजली.

  एक वर्ष झालंही तुमच्या ट्रिपला... दिवस किती भरभर जातात नं...

  ReplyDelete
 3. रोहन नेमकी तुझ्या मनस्थिती सारखीच काही माझी मनस्थिती आहे. कारण २००८ मध्ये मी ही याच दरम्यान लेह-लडाख मध्ये होते आणि सगळे डोळ्या समोर सारखे तरळतेय.
  (B .R .O . म्हणजे बोर्डर रोड ऑर्गनायझेशनने तर आपले कार्य एकदम जोरात सुरु केले असेल याची मला खात्री आहे. त्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरू शकत नाही...)जाऊन आलेली कोणती व्यक्ती हे अमान्य करणार नाही
  सर्व मृताना मन:पूर्वक श्रध्दांजली.

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...