पहाटे-पहाटे खोलीच्या छतामधून बारीक माती पडू लागल्याने मला आणि अभिला जाग आली. काय होतय ते समजतच नव्हते. नंतर कळले की छपरावार कोणीतरी नाचत असल्यामुळे असे होत आहे. ते कोणीतरी म्हणजे अमेय साळवी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप होते हे नंतर कळले. पहाटे-पहाटे फोटो काढायला हे तिघे छपरावार चढले होते. मला जाग आल्यावर मी इतर सर्वांना जाग आणली हे वेगळे सांगायला नकोच. ७ वाजता चहा घेउन आम्ही निघायची तयारी करू लागलो. पण पूनम काही सापडेना. कुठे गेली होती काय माहीत? नंतर ह्या तिघांचे अजून उपद्व्याप समजले. पूनम सुद्धा छतावर चढल्यानंतर ह्यांनी खालची शिडीच काढून घेतली होती. १५-२० मिं. वरतीच बसून होती. आरडा-ओरडा करत होती. शेवटी तिला खाली घेतले आणि ८ वाजता आम्ही सरचूच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी त्सो-मोरिरीचे सौंदर्य कालच्यापेक्षा वेगळे भासत होते. कालच्या कच्च्या रस्त्याने पुन्हा त्सो-मोरिरीला वळसा मारत आम्ही वाळूच्या पठाराकडे निघालो. वाळू कालपेक्षा जास्त भुसभूशीत जाणवत होती. आमच्या बाईकचा स्पीड फारतर तासाला २० किमी. इतका सुद्धा नव्हता. तेनसिंगला मात्र त्या कच्च्या रस्त्यावरून निघायची भलतीच घाई झाली होती बहुदा. अखेर त्याने चुक केलीच. वाळूच्या त्या रस्त्यात त्याने गाड़ी भलत्याच चिकिच्या बाजूने नेली आणि ...सामानाच्या वजनाने ती अख्खी गाड़ी वाळूमध्ये बसली. त्यात तेनसिंगने गाड़ी काढ़ण्यासाठी ती अजून रेस केली. आता तर ती अक्षरशः रुतली. मागुन येणाऱ्या बायकर्सना ह्याची काही कल्पनाच नव्हती. 'बाजुच्या दुसऱ्या रस्त्याने पुढे या' असे सांगायला दिपाली आम्हाला हातवारे करत होती. अभीला काही ते कळले नाहीत आणि तो पण त्याच रस्त्याने पुढे शिरला. आता त्याची बाईक सुद्धा वाळूत फसली. मग मात्र बाकी आम्ही सर्वजण उजव्या हाताने पुढे गेलो. बघतो तर.. गाड़ी अख्खी बसलेली. पुन्हा एकदा सर्व सामान उतरवले आणि मग 'इरादा पक्का तर दे धक्का' सुरू झाले. आजुबाजुने जाणाऱ्या अनेक गाड्यांचे ड्रायव्हर सुद्धा आमच्या मदतीला आले.अखेर अखेरचा 'दे धक्का' करून गाड़ी चांगल्या रोडला आणली.
त्यानंतर आमची हालत काय झाली होती ते खालच्या फोटोंवरुन समजेल. सकाळी ८ वाजता सुद्धा तिकडे असे सणसणीत ऊन होते की चांगलीच धाप लागली होती. पाणी प्यालो.. ताजेतवाने झालो आणि मग पुढे निघालो. चांगला १ तास वाया गेला होता.
बाईक्स वरुन उतरलो तेंव्हा आमचा अवतार काय होता... बाईक वर वाळू, सामानावर वाळू, कपड्यांवर - बूटात - अंगावर सर्वत्र वाळूच-वाळू. वाळूमय झालो होतो आम्ही पूर्णपणे. हात आणि तोंड धुवून जेवायला बसलो. 'जे असेल ते आण रे' ... सवयीप्रमाणे तोंडातून वाक्य गेलं. बघतो तर काय... इकडे तर रोटी/चपाती, मसूरची आमटी, भात, अंड आणि मग्गी. वा. मस्त जेवण झाले. तिकडून निघालो तेंव्हा १ वाजून गेला होता. म्हणजे तेनसिंगने गाडी पांगला पोचवली सुद्धा असणार. आता आम्हाला सुद्धा लवकरात लवकर पांगला पोचणे आवश्यक होते. नशीब पुढचा रस्ता परत पक्का होता. १० मिं. मध्ये रस्त्यावर तेनसिंग गाडी घेउन उभा असलेला दिसला. म्हटले हा अजून इकडे काय करतोय. बघतोय तर गाडी मध्ये सामान नहीं की इतर टीम मेम्बर्स सुद्धा नाहीत. तेनसिंग त्यांना मेनरोडला पुढच्या गाड़ी मध्ये बसवून पुन्हा आम्हाला बघायला मागे आला होता. शिवाय पांगच्या दिशेने जाणारा एक शोर्टकट सुद्धा त्याला आम्हाला दाखवायचा होता. अजून एक वाळूने भरलेला कच्चा रस्ता.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - २१ लूप्स टू सरचू ... !.
.
.
sahi :)
ReplyDeleteparaticha pravas suddha thrilling hota mhanaycha !
pan gud yaar tumhi koni panic zala nahit...
ya trip madhe tumhi saglya prakarchya rastyavar gadi chalavali mhanaychi tar :) i m really jealous of u !!!
do let me know about ur next trip to Ladakh i would like to join u :)
खरच पूनम ... इतके विविध आणि भन्नाट अनुभव आले ना ... अजून कही पुढच्या भागांमध्ये येतीलच ... ;)
ReplyDeleteआणि हो पुढच्या ट्रिप चे प्लानिंग सुरू झाले आहे ... :D