Wednesday, 20 June 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग २ : गंगटोकच्या दिशेने... !

कामावरून परतल्यावर तसा फार वेळ हातात नव्हता. पुढच्यावेळी लागण्याऱ्या व्हिसासाठी आवश्यक ते सोपस्कार अगदी १४ तारखेच्या रात्रीपर्यंत सुरूच होते.  कुठल्याही कारणाने मी माझे फिरायला जाणे रद्द करणार नव्हतोच त्यामुळे कागदपत्र सबमिट करायचे काम अनघाच्या खांद्यावर सोपवले आणि १५ तारखेला पहाटेच घर सोडले. विमानप्रवास करून दुपारी कोलकत्ता येथे पोचलो. दुपारच्या १२ वाजताच्या भर उन्हात कोलकत्ता विमानतळावरून चितपूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. मेगा कॅब्सच्या नशिबाने आम्हाला ए.सी.कॅब मिळाली होती त्यामुळे जरा गारवा होता. बाहेर बघवत नव्हते इतके रणरणते उन. आमचा सारथी ज्या गल्ल्यांमधुन आम्हाला नेत होता त्यापाहुन मला आपल्याकडच्या  गोवंडी-मानखुर्द नाहीतर मस्जिद बंदर सारख्या भागाची आठवण होत होती. अजुन काही लिहायला नकोच. एकदाचे चितपुर येथे पोचलो. कॅब सोडण्याआधी हेच ते स्टेशनना जिथुन आपली ट्रेन सुटणार आहे याची खात्री करुन घेतली आणि स्टेशनच्या क्लॉकरुमकडे मोर्चा वळवला. जवळचे सर्व सामान तिथे टाकुन खांदे मोकळे करुन घेतले आणि उदरभरण करण्यासाठी एखादे चांगले हॉटेल शोधण्यासाठी बाहेर पडलो.

'यहां आसपास कुछ नही मिलेगा' हे ४ लोकांकडुन ऐकल्यावर पुन्हा एकदा टॅक्सी घेउन मोर्चा हॉटेल शोधायला. यावेळी पिवळी टॅक्सी आणि त्यामुळे बाहेरचा उन्हाचा भपका जाणवु लागला. दुपारचे १ वाजुन गेले होते. पोटात कावळे ओरडत असल्याने 'कोई अच्छेसे ए.सी. रेस्टॉरंट लेके चलो' असे चक्रधारीला सांगुन आम्ही ४ जण टॅक्सीच्या बाहेर डोकावुन डोकावुन एखादे चांगले हॉटेल दिसते का ते बघत होतो. आमचा चक्रधारी त्याच्या हिशोबाने अच्छा हॉटेल दाखवत होता जी आम्हाला जमणारी नव्हती. विश्वास बसणार नाही पण तब्बल १ तास झाला तरी आम्हाला किमान स्वच्छ आणि नीट बसुन खाता येईल असे हॉटेल मिळेना. अखेर पार्क स्ट्रिट नामक ठिकाणी ती टॅक्सी सोडली आणि पायी फिरु लागलो. २ वाजुन गेले होते आणि आता जे हॉटेल समोर दिसेल त्यात शिरायचे असे आम्ही ठरवले होते. २:३० वाजता अखेर एक हॉटेल मिळाले. त्याचे नाव काय किंवा आम्ही काय खाल्ले असा प्रश्न विचारु नका. पोटभर खायला मिळाले हेच मनी चिंतुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. स्टेशनला परत जाताना मध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल बघुन, हावडां ब्रिज बघुन परत जायचे असे ठरले.


व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल हा १९२१ साली बनवला गेला आहे. आता आतमध्ये म्युझियम आहे. कधी जाणार असाल तर दुपार टाळा. ४ नंतरच जा. परिसर छान हिरवागार ठेवला आहे पण आत हॉलमध्ये भयंकर गरम होते. दर सोमवारी हॉल बंद असतो. मी ह्या हॉलबद्दल काही लिहिणार नाही आहे. कारण मला कोलकत्ता सोडुन सिक्किमकडे सरकायचे आहे. त्याक्षणी देखील हेच वाटत होते. तुम्हाला अधिक महिती हवी असेल तर विकिपेडिया जिंदाबाद. हे तिथे घेतलेले काही फोटो.
तासाभरात तिथुन निघालो. नव्या हुबळी आणि जुन्या हावडा ब्रिजला फेरी मारुन पुन्हा एकदा स्टेशनकडे यायला निघालो. वाटेत चिनुक्सच्या अन्नः वै प्राणा:ची आठवण झाली. त्याचे कारण असे की बंगाली मिठायांचे दुकान दिसले. मग कुठल्याही दुकानात बंगाली मिठाई खाण्यापेक्षा के.सी.दास शोधुया म्हणुन पुन्हा एकदा आम्ही चक्रधारीला पिडायला सुरु केला. दुर्दैव म्हणजे कोणालाच जवळपासचे के.सी.दासचे दुकान माहित नव्हते. अखेर बर्‍याच वेळाने एका सदगृहस्थान आम्हाला अचुक पत्ता सांगितला. १० मिनिटात टॅक्सी तिथे जाउन पोचली. बघतो तर काय... के.सी.दास कपड्यांचे दुकान... देवा!!! आता संध्याकाळचे ६ वाजुन गेले होते आणि आम्हाला स्टेशनला परतायचे होते. जिथे होतो (देव जाणे नेमके कुठे होतो :P) तिथुन स्टेशनला जाताना एखादे दुकान असावे अशी एक भोळीभाबडी आशा मला अजुनही असल्याने मी एका माणसाला 'यहां कोई के.सी.दास - मिठाई दुकान है क्या?' असे विचारताच त्याने अत्यंत आनंदात मला पत्ता सांगायला सुरुवात केली. ह्यावेळी मी चक्रधारीला बाजुलाच उभा करुन ठेवला होता. त्याला विचारले 'कैसे जानेका सम्झा?' तो पुन्हा एकदा. 'हा पता है.' असे म्हणुन टॅक्सीकडे जाउ लागला. तिथुन निघलो आणि अखेर के.सी.दास नावाच्या दुकानासमोर पुन्हा एकदा आमची गाडी उभी राहिली. ह्यावेळी हे मिठायांचेच दुकान होते. दुकान लहानसेच होते. दुकानाच्या पाटीवर 'Founder of Rosgolla' असे लिहिले होते. आम्ही ४-५ पदार्थ खाउन पाहिले. याचसाठी केला होता अट्टहास!!! ह्यापेक्षा १०० पटीने उत्तम बंगाली मिठाई तर आपल्याकडे मुंबई-पुण्यात मिळते.


अखेर तिथुन आमचा लवाजमा निघाला आणि बर्रोबर ७ वाजता स्टेशनला पोचला. क्लॉक रुम मध्ये ठेवलेले सामन ताब्यात घेतले आणि वेटिंग रुममध्ये जाउन फ्रेश झालो. नव्याने बांधलेले स्टेशन त्यामुळे वेटिंग रुम चकाचक. तास-दोनतास आराम करुन, स्वतःच्या आणि फोनच्या बॅटर्‍या चार्ज करुन फलाटावर लागलेल्या गाडीकडे मोर्चा वळवला. ठरल्या वेळेच्या आधीच ट्रेन येउन उभी राहिली होती. ९ वाजता आम्ही त्यात स्थानापन्न झालो आणि खर्‍र्‍या अर्थाने आमचा प्रवास सिक्किमच्य दिशेने सुरु झाला. विमान प्रवासासाठी पहाटे लवकर उठलो होतो आणि दुपारभर उन खाउन डोके धरल होते. रात्री १० वाजता जे झोपलो ते थेट सकाळी ७ वाजता डोळे उघडले.


राजीवकाका बहुदा कधीच उठले होते आणि त्यांनी नाश्त्याची तयारी करुन ठेवली होती. चहा-कॉफी, डोसा मग पुन्हा चहा-समोसा, कटलेट, ऑमलेट असा भरगच्च नाश्ता झाला. ट्रेन २ तास लेट होती. डब्यात सोबत २ बंगाली तरुण होते. ते आसाममध्ये कामाख्या येथे जात होते. त्यांच्याशी सिक्किम बद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. वेळ पटकन निघुन गेला. आम्हाला न्यु जलपायगुडीला (एनजेपी) पोचायला ११ वाजले. सोनमने घ्यायला पाठवलेली गाडी कधीचीच पोचलेली होती. त्यात बसलो आणि सिक्किमच्या अधिक जवळ जायला निघालो.अवघ्या तासाभराच्या प्रवासात निसर्ग दुसरेच रुप दाखवु लागला होता. सुरुवातच रस्त्याच्या दोहो बाजुंना बहरलेल्या बोगन वेलीच्या झाडांनी झाली. त्यानंतर काही वेळातच घाट रस्ता सुरु झाला आणि आपण सिक्किममध्ये आता प्रवेश करणार न समजलो. एक डोंगर पार करुन गाडी पलिकडे उतरु लागली आणि आम्हाला तिस्ता नदीचे पहिले दर्शन झाले. गुरुडोंगमारजवळ उगम पाउन इथपर्यंत वाहत येणारी, रंगपो-रंगीत नद्यांना कवेत घेणारी आणि पुढे ब्रह्मपुत्रेत मिसळुन जाणारी तिस्ता. सिक्किमची खरिखुरी जिवनदायिनी तिस्ता. लडाखला सिंधुनदी पाहुन किंवा मंत्रालयमला तुंगभद्रा पाहुन मला जे भाव मनात अले होते तेच भाव आत्ताही मनात सहज उमटले.ड्रायव्हरने गाडी बाजुला घेतली आणि ५ मिनिट थांबुया असे म्हणाला. आम्ही तेवढेच फोटो काढुन घेतले. नदीचे पाणी गढुळ होते. याचा अर्थ वरती पाउस सुरु होता आणि बरीच माती वाहुन येत होती. दुरवर असणारे काळे धग आम्हाला बहुदा जरा चुणुक दाखवणार होते. पुन्हा मार्ग्क्रमण सुरु झाले आणि आम्ही अखेर सिक्किमच्या प्रवेशद्वारात येउन पोचलो.'सिक्किममध्ये तुमचे स्वागत आहे.' हे वाक्य वाचुन मोजुन १०० मिटर पुढे जातो-न-जातो तोच सोसाट्याचा वारा वाहु लागला आणि तुफान पाउस. अवघ्या काही क्षणात पावसाने जणु आमच्यावर झडपच घातली होती. तश्यात जरा पुढे जातोच तो  ढगांच्या गडगडाटाप्रमाणे आवाज झाला. आमच्या पुड्गची गाडी थांबली तसे आम्हीही थांबलो. बघतो तर रस्त्यावर एक मोठे झाडं आडवे पडले होते. सोसाट्याच्या आणि वादळी वार्‍या-पावसापुढे त्याचा टिकाव लागला नव्हता.

बघता-बघता गाड्यांची रांग लागली. रस्ता सुरु होईपर्यंत आम्हाला मात्र आता तास-दोनतासांची निश्चिंती होती. दुपारचे २ वाजले होते आणि भुक लागलेलीच होती. खरेतर जिथे जाउन राहणार होतो त्यांनाच जेवण बनवायला सांगितले होते पण ट्रेन लेट आणि आता हा उशीर त्यामुळे फोन करुन ते रद्द केले आणि गाडी जिथे उभी होती तिथेच शेजारी असणार्‍या हॉटेलात मोर्चा वळवला. सिक्किममध्ये प्रवेश केल्या-केल्या माझे मोमोज खायचे स्वप्न पुर्ण होणार होते. २ प्लेट मोमो आणि ऑमलेट असा हलकासा फराळ करुन आम्ही भुक शमन करुन घेतले. चहा हवाच होता. तासा-दिडतासाने रस्ता सुरु झाला. त्यानंतर कुठेही न थांबता आणि कुठलाही अडथळा न येता आम्ही संध्याकाळी ५ वाजता ठरल्या ठिकाणी म्हणजे आशिष-खीम या होम स्टेच्या दारात होतो.मिसेस प्रधान यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला आमच्या रुम्स दाखवल्या. प्रथमदर्शनी मला त्यांचे घर खुपच आवडले. तळ मजल्यावर आमच्य रुम्स होत्या आणि एक सामायिक हॉल होता. तिथे वेताचे सोफा, मोडे वगैरे होते. त्यावर बसुन जरा निवांत होतो तोच चहा आला. ते मग्स कसले क्युट होते!!! हे इथे मिळतात तर नक्की विकत घ्यायचे, हे शमिचे पहिले वाक्य. शॉपिंग सुरु!!!  :P
संध्याकाळ होत आली होती आणि एक चक्कर एम.जी.रोड येथे मारावी असे सर्वांचे मत बनले. लगेच तयार झालो आणि कुच केले एम.जी.रोडच्या दिशेने...

क्रमशः ... सिक्कीमचा सफरनामा - भाग ३ : एम.जी.रोड...

6 comments:

 1. वाह वाह... येऊ देत पुढे..

  ReplyDelete
 2. रोहणा, तुझ्या समोर बसून ऐकतेय असंच वाटतंय हं. :)

  ReplyDelete
 3. गंगटोकला जाता जाता खाल्लेल्या न्युडल्सची चव अजूनही रेंगाळतेय. खरे तर न्युडल्स तेच पण कलकत्यात गाळलेला घाम, साधे जेवणासाठी हॉटेल शोधताना झालेली प्रचंड दमछाक- गाळलेला घाम, त्यानंतर ट्रेनचा प्रवास, न्युजलपायगुडीला उतरल्यावर सिक्कीम येऊ घातलेयची जाणीव आणि तशात अचानक सुरू होऊन धुवांधार कोसळणारा पाऊस, सोबत धुक्याची चादर, झाड तोडायला किती वेळ लागेल हे कळत नसल्यामुळे आलेला किंचितसा वैताग... आणि समोर आलेले वाफाळते न्युडल्स.... बेष्टच! :)

  ReplyDelete
 4. kiti bhaaree lihilays..
  jaayachi ichchha vayala lagaliye malaa aata.. :)

  ReplyDelete
 5. हॉटेल शोधण्यासाठीची दमछाक लक्षात येते आहे :) :)

  फ़ोटु आवडले....पुढे याहुन धमाल असणार हे नक्की.. बर झाल आत्ता ब्लॉग वाचायला घेतला ते ;)

  ReplyDelete
 6. बाबा.. :)

  अनघा.. पण त्याने ट्रीप हुकल्याची भरपाई होणार नाहीये. :P

  श्री ताई.. छोटीसी पोस्टाच लिहिलीस की. :D

  योगिनी.. मालकांना सांगा आणि निघा सफारीला.. ;)

  योगेश... मी पुन्हा लिहायला घेतलाय म्हणजे तुला वाचायला घ्यावे लागणारच ना रे.. :D

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...