Tuesday, 2 February 2010

ट्रेक टू अरावली -'कुंभळगड़' मार्गे 'ठंडीबैरी' ... !

कालरात्री आमच्या 'एक्टिंग एपिसोड' नंतर सुद्धा आम्हाला थोडेसे 'घोरायण' ऐकावे लागले होतेच. ह्या ट्रेकमध्ये सकाळी खाणे आणि रात्री घोराख्यान ऐकणे हेच सुरू होते. गेल्या २ दिवसात रणकपूर मार्गे फूटादेवल आणि तिकडून कुंभळगड़ असा पल्ला आम्ही गाठला होता. आज सकाळी लवकरच निघायचे म्हणून आवरा-आवरी सुरू होती इतक्यात ग्रुपमधले एक काका शुजची जोड़ी घेउन आले. 'अरे ये शुज मेरे बैग मी शायद २ दिन से है. मेरे तो नहीं है. आपमेसे किसके है क्या?' २ दिवसापासून अभिचे गायब असलेले शुज कुठे गेले होते ते आम्हाला आत्ता समजले. ह्या काकाने स्वतःचे समजुन ते बैगमध्ये घातले होते आणि अभि आपला २ दिवस फ्लोटर्सवर ट्रेक करतोय. अखेर अभिच्या शुजची आणि पायाची भेट झाली. अभि मात्र वाटत असुनही त्या काकांना काही विशेष बोलला नाही. संजूने मात्र त्याचा ठेवणीतला शब्द वापरलाच. 'जड़ बुद्धि'च आहे हां. 'जड़ बुद्धि' हा संजूचा खास शब्द. संस्कृत शिक्षक असल्याने एखाद्या घडलेल्या गोष्टीवर मध्येच टिपणी म्हणुन एखादे सुभाषीत सुद्धा सोडायचा तो. कोणी काही मंदपणा केला की तो झाला जड़बुद्धि.


आज ट्रेकचा महत्वाचा दिवस होता. आम्ही निघालो आणि ८ वाजता कुंभळगड़चा पहिला दरवाजा 'हनुमान पोल' पार करून आत प्रवेश करते झालो. प्रवेश केल्या-केल्या समोर जे दिसले ते अतिभव्य होते. किमान १० माणसी उंच असा 'राम पोल' हा गडाचा दुसरा दरवाजा आणि त्याला संरक्षित करणारे त्याचे बुलंद भक्कम तट-बुरुज. अवर्णनीय आणि अप्रतिम असे ते दृश्य होते. डोळ्यात साठवलेले ते दृश्य मग कमेरा मध्ये सुद्धा साठवले. आम्हाला गड़ बघायला ३ तास दिले होते शिवसिंगने. मग सामान तिकडेच ठेवले आणि आम्ही त्या बुलंद किल्ल्यात प्रवेश करते झालो. 

कुंभळगड़ ---  राजा कुंभा यांनी १५व्या शतकात हां किल्ला बांधला. ह्या किल्याला ३६ किमी लांब तटबंदी आहे... होय..होय.. मी '३६' बोलतोय. ३.६ नाही... चीनच्या भिंतीनंतर जगातली ही सर्वात लांब सलग भिंत आहे. नव्हते ना माहीत.. तिकडे जाईपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. ती संपूर्ण तटबंदी बघून ट्रेकचे सार्थक झाले एकदम. बालेकिल्यावरून ह्या संपूर्ण तटबंदीचे आणि त्यावर असणाऱ्या बुलंद बुरुजांचे दृश्य एकदम जबरदस्त दिसते. तटबंदी चांगली ६-८ मीटर रुंद आहे. शिवाय आतल्या बाजूने सुद्धा १० एक मीटर खोल. किल्यात उतरायला ठिकठिकाणाहून बांधीव वाटा आहेत. (यांना बहुदा आपल्याकडे फांजी म्हणतात.. आत्ता नक्की आठवत नाही) किल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपतीचे मंदीर आहे. तिकडून पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रशत्र बरं का.. एकावेळी २ हत्ती जातील डुलत-डुलत जातील ईतका. तो सुद्धा अतिशय सुस्थितीत. दोन्ही बाजूला छानपैकी तांबडया रंगाच्या दगडांची तटबंदी आणि फुलांच्या बागा. आपण जस-जसे वर-वर जातो तसा उजव्या हाताला असणारा किल्ल्याचा प्रशत्र भाग दृष्टीक्षेपात येतो. किल्यात दुरवर असणारे 'जैनतीर्थ' हे या गडामधील सर्वात जून बांधकाम आहे. त्या अलीकडे निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर आहे. यात असणारी शिवपिंडी ५ फुट उंच आहे. राजा कुंभा म्हणे इतका उंच आणि भारदस्त होता की तो जमीनीवर बसून पिंडीवर अभिषेक करत असे. बाजुलाच प्रचंड मोठा सभामंडप आहे. एकामागुन एक दरवाजे पार करत आपण वर-वर जात असतो. मध्ये एकेठिकाणी 'भैरू का शीर' म्हणुन समाधीस्थळ आहे. शीर इकडे आणि त्याच्या भैरूचे धड मात्र वरती 'बदाम महल'मध्ये आहे. ह्या मागची कथा काही कळली नाही. ६ व्या दरवाज्यानंतर डाव्या हाताला एक वास्तू आहे. हे आहे 'महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ' ...  ७ व्या दरवाज्यानंतर मात्र रस्ता लहान होतो. इकडून बालेकिल्ला सुरू होतो. बालेकिल्ल्यावर 'बदाम महल' आहे. अर्थात राजनिवासस्थान. आजही संपूर्ण वास्तु नीट जपलेली आहे. महालाचा काही खाजगी भाग सोडला तर संपूर्ण महाल बघता येतो. मौर्य साम्राज्याच्या राजा संप्रती याचे दुसऱ्या शतकात येथे राज्य होते असे काही पुरावे आहेत. पण सध्या जे अतिभव्य रूप या किल्ल्याला आहे त्याचे संपूर्ण श्रेय राजा कुंभा यांचे आहे.



महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ ... 




निळकंठेश्वर महादेवाचे मंदीर ...


अवघ्या ३ तासात सर्व किल्ला बघून ३६ किमी. तटबंदीवरुन फेरा मारणे अशक्य होते. तेंव्हा गडावरील सर्व महत्वाची स्थळे बघून आम्ही खाली परतलो संपूर्ण गड़ बघून झाल्यावर तिकडेच असणाऱ्या राजस्थान टुरिझमच्या होटेलमध्ये गेलो. किमान ओमलेट तरी मिळेल ह्या आशेने. आणि काय आश्चर्य... होते की तिकडे. मग आम्ही ३ दिवसांपासून सुरू असलेला आमचा 'नॉन-व्हेज उपवास' मोडीत काढला.ओमलेट नाश्ता झोडला आणि ११ वाजता आम्ही पुन्हा एकदा 'राम पोल'कडे परतलो. शिवसिग आमची वाट बघत होताच. "चलो चलो. आप सबसे पिछे हो. बाकी सब आगे निकल गये." आम्ही म्हटले,"जाने दो. जिसके लिए यहातक आये कमसे कम वो किला तो ढंग से देख लेते. आप चलो हम आते है." पुन्हा एकदा 'राम पोल'चे ते अतिभव्य दृश्य डोळे भरून बघून घेतले आणि पुढच्या वाटेला लागलो. आता खरंतरं आमचा परतीचा ट्रेक सुरू झाला होता. आज दुपारभरात १३ किमी.चे कुंभळगड़ जंगल पार करत 'ठंडीबैरी' या ठिकाणी असणाऱ्या कैंपसाइटला पोचायचे होते. कुंभळगड़ मागे टाकत आम्ही आता जंगलाच्या दिशेने निघालो. जस-जसे पुढे जात होतो तशी वाट उतरत होती. गडाचा बदाम महाल मात्र मागे अजून सुद्धा साद घालत होताच. आमच्या बराच वेळ आधी निघालेले पुढच्या ट्रेकर्सचे आवाज येऊ लागले होते. नंतर तर वाट एकदम खाली उतरायला लागली. बघतो तर काय... पुढे शिवसिंग पाठीवर ३ सॅक्स घेउन वाट उतरत होता. कोणा दोघा ट्रेकर्सनी (? ह्यांना ट्रेकर्स का म्हणावे???) त्यांचे सामान उचलत नाही म्हणुन शिवसिंग गाइडकडे दिले होते. ते २ कोण असणार हे सुद्धा आम्हाला ठावूक होते. शिवसिंगपर्यंत जाउन पोचलो आणि त्याला म्हणालो,"आपका बैग हमें देदो. थोड़ा सामान कम हो जाएगा" तो मात्र काही तयार झाला नाही. त्याला आणि इतर २ जणांना पार करत आम्ही वेगाने उतरु लागलो.


बघता-बघता अवघ्या २० मिनिट्समध्ये अनेक जणांना मागे टाकत खालच्या सपाटीला पोचलो सुद्धा. कुठे जाउन थांबायचे ते शिवसिंगला विचारून ठेवलेले होतेच. बोराची झाडे आणि शेजारी एक थंड पाण्याची विहीर होती. तिकडे जाउन टेकलो. शिवसिंग आणि मागुन येणाऱ्या काही लोकांकडून समजले की २-३ जण रस्ता चुकले. मग शिवसिंग, अभि आणि संजू पुन्हा त्यांना शोधायला मागे गेले. आम्ही तोपर्यंत जेवणाची तयारी केली. यथेच्छ पोटोबा केला आणि थोडा वेळ निवांत पडलो. अभि आणि मनाली बोराच्या झाड़ावर चढून बसले होते तर त्या झाड़ाखाली अनुजा ताणून देऊन चक्क झोपली होती. तिला जेवण चढले होते बहुदा. दिपक तर विहिरीच्या काठावर वामकुक्षी घेत होता आणि संजू तोंडाला साबण लावून बसला होता. मी ह्या सर्वांचे फोटो काढत होतो. पण ऐश्वर्या कुठे होती??? बघतो तर दुसऱ्या एका बोराच्या झाड़ाखाली ही पोरगी बोरं खात बसली होती. आता काय बोलावे हेच समजेना... मला माझा मित्र विवेकचे वाक्य आठवले.

आपल्याला २ वेळाच भूक लागते. 'एकदा खाण्याआधी' आणि 'दुसरी खाण्यानंतर'... हे बहुदा ऐश्वर्याला तंतोतंत लागु पड़ते... 



ऐश्वर्या... बोरे.. 'आयमिन पुरे' ...

 

दिपक... ए... दिपक...

संस्कृतपंडित संजू...


तासभर झाल्यावर शिवसिंगने 'आगे बढो'चा इशारा दिला. ह्यावेळी मात्र आम्ही सर्वात पुढे सटकलो. रस्ता अगदी सरळ होता. चुकायचा प्रश्न नव्हता. आम्ही आज खाताना गप्पा कमी मारत होतो. जंगलातून जाताना आवाज जितका कमी कराल तितके वन्यजीव दिसायची शक्यता अधिक. थोड्याच वेळात बाजूच्या झाड़ीतून काहीतरी पळाले. बघतोय तर मोठी जंगली कोंबडी होती. फोटो काढता येइल इतका अवसर मात्र तिने काही दिला नाही. आमच्यात सर्वात पुढे दिपक होता. त्याला स्पष्टपणे आणि मला ओझरते रानडुक्कर दिसले. चाहुल लागल्या-लागल्या ते पसार झाले. नंतर काही दिसले नाही. अगदी माकडे सुद्धा नाही. पक्षी साद घालायचे मात्र दर्शन द्यायचे नाहीत. आज आमचा चालायचा वेग जोरात होता. एकतर वाट सरळ आणि जंगलातील होती. ४ च्या सुमारास कुंभळगड़च्या जंगलातून बाहेर पडून ठंडीबैरी गावाकडे पोचलो. छोटेसे गाव होते एकदम. गावाच्या थोडेच पुढे राजस्थान वनखात्याचे गेस्टहाउस आहे. तिकडे जाउन पोचलो. गेस्टहाउस मध्ये २ मोठी खोली आणि एक लहान खोली होती. लहान खोलीत २ बेड सुद्धा होते. ते अर्थात मुलींनी पटकावले. आम्ही मोठ्या खोलीत जमीनीवर अंथरुण घालून सामान सेट करून टाकले. आज बाहेर झोपणे शक्य नसल्याने त्या खोलीत 'घोरायण' ऐकावे लागणार होते. संध्याकाळ झाली तसे आम्ही आसपास भटकायला बाहेर पडलो. जास्त लांब जाऊ नका असे आम्हाला सांगितले होते. जवळच एक तलाव होता तिकडे गेलो आणि अंधार पड़ेपर्यंत परत आलो. मध्ये-मध्ये मोरांचे आवाज ऐकायला यायचे पण दिसत नव्हते कुठे. आज ट्रेकची शेवटची रात्र होती. उदया सकाळी इकडून निघून मुछाला महावीर बघून पुन्हा रणकपूरला पोचायचे होते. तेंव्हा आजचा डिनर ख़ास राजस्थानी होता. 'दाल-बाटी-चोरमा' ... बाटी थोड़ी कड़क झाली होती पण मग एकदाच सर्व फोडून घेतल्या आणि मग नरम होण्यासाठी दाल मध्ये बुडवून ठेवल्या. तेवढ्या वेळात आपला 'चोरमा' खाणे सुरू होतेच. त्यानंतर पुन्हा दाल-बाटी. चांगले ४५ मिनिटे जेवण झाले. जेवण झाल्यावर ९ वाजता गेस्ट हाउसच्या गच्चीवर जाउन बसलो. इतर कोणी कैंपफायर करायला नव्हतेच. तेंव्हा मग पुन्हा 'लाफ्टर चैलेंज राजू' सुरू झाले. काही वेळाने अभिला डोंगरामागून उजेड येताना दिसला. आम्हाला आधी वाटते की कुंभळगड़च्या लाइट्सचा प्रकाश इथपर्यंत येतोय की काय.पण नाही लाईट डोंगरातून वर आला तेंव्हा कळले की तो तर चंद्र होता. आम्ही गप्पा टाकत बसलो होतो तोच त्या गेस्टहाउसचा एक माणूस आला. गच्ची बंद करायची आहे असे सांगून उगाच आम्हाला खाली पाठवून दिले. कैंपलीडर आम्हाला कैंपफायर सुद्धा करू देईना. मग अभि भडकला आणि जाउन भाटीला बडबडला. YHAI नॅशनल ट्रेक्समध्ये कसे कैंपफायर केले जाते, कैंपलीडर सर्वांना कसा त्यासाठी तयार करतो वगैरे-वगैरे. गच्चीवर नाही तर गेस्टहाउसच्या बाहेरच आम्ही १०:३० पर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग झोपायला गेलो. सर्वजण झोपले होते पण मुलांच्या खोलीत दुसऱ्या दिवशीचे सामान लावत आम्ही चौघे दंगा करत बसलो होतो. शेजारी घोरायण सुरू झाले होते. संजू मध्येच जोरात ओरडायचा की सर्व शांत व्हायचे आणि पुन्हा काही सेकंदात सुरू... मी आणि दिपक हसून हसून वेडे झालो होतो. दिपक जास्त हसला की मी 'राजू'च्या स्टाइलमध्ये दिपक.. ए.. दिपक... असे बोलायचो की मग संजू फुटायचा.. अभि मात्र 'चायला गप्प बसा रे' आता असे बोलायचा मध्येच. स्वतःला कितीही त्रास झाला तरी लोकांना त्रास होऊ नये ह्यासाठी अभि सदैव तत्पर... पण मी मात्र जे लोक आम्हास त्रास देतील त्यांस आम्ही कसे ते सोडावे??? ह्या वृत्तीचा... रात्री बऱ्याच उशिराने आम्ही गुडुप झालो. उदया सकाळी-सकाळी निघून परतीच्या मार्गाला लागायचे होते... आणि मग तिथून 'माउंट आबू'ला जायचे बाकी होतेच की...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !
.
.

9 comments:

  1. मस्तच रे रोहन...
    वाचते आहे...
    घोरायण,'जड़ बुद्धि' ,सगळ मस्तच :-)
    आणि " आपल्याला २ वेळाच भूक लागते. 'एकदा खाण्याआधी' आणि 'दुसरी खाण्यानंतर'... हे बहुदा ऐश्वर्याला तंतोतंत लागु पड़ते... " हे सगळ्यात भारी...पुढचा भाग लवकर टाक..

    ReplyDelete
  2. स्मिता... आज शेवटचा भाग टाकतो ... :)

    ReplyDelete
  3. वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच ... फक्त त्या ‘दोन वेळा भूक लागते’ विधानाविषयी एक शंका ... खातांनासुद्धा भूक लगू शकेल असं वाटलं मला मागचा भाग वाचून :D

    ReplyDelete
  4. गौरी होय गं ... तुझे बरोबर आहे ...आकडा ३ वर जाऊ शकतो ... :D

    ReplyDelete
  5. nice pictures.

    kiti wel lagla paythyapasun gadawar jayla?

    ReplyDelete
  6. रोहन,पहिला व दुसरा फोटो खूपच आवडला. कुंभळगड खासच दिसतोय. खरेच किती वेळ लागला रे वर पोचायला.... गडावर बरं का....:).
    बाकी आपण ट्रेकला जाऊ तेव्हां मला मस्त मस्त खादाडी मिळणार हे नक्की. मस्त झालीये पोस्ट.

    ReplyDelete
  7. गडापर्यंत गाडी जाते तेंव्हा पोचायला काहीच त्रास नाही... आणि हो खादाडी तर होणारच. तुम्ही सुद्धा काही कमी नाही त्यात... :)

    ReplyDelete
  8. sahich aahe ekdum :)
    sagle photos zakkas
    jewanachya velicha saglyancha varnan faarach aavadla :)
    aani 2 vela bhook lagte te pan ekdum bhari !!

    ReplyDelete
  9. तुमचे फोटो खुप छान आहेत. मलाही फिरायला खुप आवडते पन कॉलेज मुळे माला जास्त फिरायाला भेटतच नाही.

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...