Wednesday, 3 February 2010

ट्रेक टू अरावली - 'माउंट अबू'कडे प्रयाण ... !

ट्रेकच्या चौथ्या दिवशी सकाळी अखेर सर्व 'जडबुद्धी' लोकांचे शेवटचे घोराख्यान संपले. आम्ही उठून निघायची तयारी केली. गेस्टहाउसच्या बाहेर पडलो. जंगलातली सकाळ म्हणजे कशी एकदम आल्हाददायक ताजीतवानी असते. हळूवार वाहणारे वारे आणि पानांची होणारी सळसळ, त्यामधून येणारे पक्ष्यांचे गुंजन, सर्वच कसे एकदम मनाला नवी चेतना देणारे. नळावरती थंडगार पाण्याखाली हात घालून तोंड धुवून घेतले आणि ब्रश तोंडात घातला तर... अररर... हे काय टूथपेस्टच्या जागी झाडपोला मलम...!!! डोळ्यावर होती-नव्हती ती झोप उडली. सकाळ-सकाळ तोंडाची चव बिघडली. नशीबाने दिपककडे एक ब्रश होता. मग तो घेतला आणि दात घासले. ख़राब झालेला ब्रश कागदात गुंडाळून सामानात कोंबला. लक्ष्यात ठेवा... निसर्गात काही म्हणजे काहीही टाकायच्या विरोधात आहोत आम्ही.

"मागे ठेवायच्या त्या फ़क्त पाउलखूणा आणि सोबत घ्यायच्या त्या फ़क्त आठवणी."



नाश्त्याला चक्क पोहे बनवले होते. ते सुद्धा अनुजाने. आज नाश्ता काय आहे ते बघायला घुसली किचनमध्ये आणि पोहे बघून मग त्याला ज़रा आपला 'होममेड टच' देत बसली. मस्त झाले होते पोहे. आटपुन तिकडून निघालो आणि 'मुछाला महावीर'कडे निघालो. आज फ़क्त ३ किमी. ट्रेककरून आमचा प्रवास संपणार होता. तेंव्हा घाई तशी नव्हतीच. वाट सुद्धा सपाट होती. जंगल विरळ होत चाललेले स्पष्ट दिसत होते. तासाभरात ट्रेक संपवून बाहेर पडलो आणि 'मुछाला महावीर'कडे मोर्चा वळवला. हे एक जैनमंदीर आहे. मार्बलवरील अतिशय सुंदर कारागिरी येथे बघायला मिळते. दर्शन घेउन तिकडून बाहेर पडलो तर बाजुला एक जलजीरा वाला उभा होता. मग काय म्हटले होउन जाऊ दे एक-एक ग्लास लिंबूपाणी. तिकडून निघालो ते थेट ट्रकमध्ये बसून पुन्हा बेसकैंपकडे. ४५ मिं.मध्ये रणकपुरला पोचलो. निघायच्या आधी मस्त पैकी जेवलो. भाटीकडून ट्रेक पूर्ण केल्याची सरटिफिकेट्स घेतली आणि फालना स्टेशनकडे निघालो. इथ पर्यंत आलोच आहोत तर जाता-जाता 'माउंट आबू' बघून जाऊ असा प्लान केला होता. फालनाला पोचलो त्या दिवशी १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन होता. ऐश्वर्या आमच्यात सर्वात लहान मग तिचा खोटा-खोटा वाढदिवस साजरा करायचा कीडा डोक्यात आला. दिपक आणि संजूला खादाडीचे सामान आणायला पाठवले. ते दहीकचोरी, समोसे, कांदाभजी असा भरगच्च मेनू घेउन आले. अनुजा स्टेशनवर हातगाडीवाल्याकडून ऐश्वर्याला गिफ्ट म्हणुन एक छोटासा आवाज करणारा ससा घेउन आली. मग स्टेशन वरतीच तिचा वाढदिवस सेलेब्रेट केला. सोलिड मज्जा आली. त्यानंतर गाडी यायच्या आत खादाडी पूर्ण केली. दिपक आमच्याबरोबर येणार नव्हता. तो थेट घरी जाणार होता. त्याला टाटा केले आणि आम्ही आबूला जायला निघालो. तासाभरात आबूरोडला पोचलो.


स्टेशनला पोचल्या-पोचल्या थेट धाव मारली ती रबडीच्या स्टालकडे. दही-दुधाचे प्रकार न आवडणाऱ्या अभ्याने सुद्धा मस्त आडवा हात मारला. उभे-आडवे हात मारल्यावर तिकडून बाहेर पडलो, एक जीप भाड्याने घेतली आणि थेट पोचलो माउंट आबूला. तिकडच्या YHAI होस्टेलला पोचायला ज़रा उशीर झाला तर आम्ही सांगून ठेवलेल्या रूम्स त्यांनी दुसऱ्या कोणाला देऊन टाकल्या होत्या. चायला... मग मिळेल त्या कुठल्याश्या एका खोलीत आम्ही सेट झालो. ८ वाजत आले होते. संध्याकाळच्या खादाडीसाठी बाहेर पडलो. नॉन-व्हेज मिळते का कुठे ते बघत बघत एक चाटवाला सापडला. मग होटेलसाठी पुढची शोध मोहिम होईस्तोवर पोटात काहीतरी असावे असे सर्वांचे संगनमत ठरले. त्या चाटवाल्याबरोबर बोलता-बोलता कळले की तो आधी पुण्याला होता. मुंबई-पुण्याकडच्या लोकांना चाट कशी लागते तशी बनवून दिली एकदम त्याने. व्यवस्थित मराठी येत होते त्याला. नंतर शेजारी असणाऱ्या एका होटेल मध्ये गेलो. नॉन-व्हेज होते पण बकवास... टेस्टची टोटल वाट लागली. इकडे गेल्यावर व्हेजच खावे हेच खरे. पोट भरले होते तरीपण मार्केटमधून आइसक्रीम खाऊन आलो. आज रात्री मात्र 'नो घोरायण'. सर्व कसे शांत-शांत वाटत होते. मला तर बराच वेळ झोप लागेला.. घोराख्यान मिस करतोय की काय असे वाटत होते. अखेर झोप लागली.
सकाळी उठलो आणि आवरून घेतले. आज अर्ध्या दिवसात माउंट आबू मधल्या काही महत्वाच्या जागा बघायच्या होत्या. आम्ही फिरायला एक गाडी केली अणि 'महादेव मंदिर'कडे प्रस्थान केले. तिकडे पोचलो तर बाहेरच एकजण डालिंब घेउन बसला होता. मी आणि ऐश्वर्याने अभिकडे (आमचा खजिनदार...) 'घे.. ना..' ह्या अर्थाने पाहिले. झाली सुरू आजची खादाडी. तिकडून मग ब्रम्हकुमारी मंदिरावरुन पुढे जात 'गुरुशिखर'ला पोचलो. हे राजस्थानमधले सर्वात उंच शिखर आहे. बऱ्यापैकी वरपर्यंत गाडी जाते. मग पुढे चढून जावे लागते. पण फारवेळ नाही लागत. शिवाय वाटेवर खायची दुकाने आहेतच. तेंव्हा.....!!!  माथ्यावर गुहेमध्ये दत्तात्रयांचे मंदीर आहे. तिकडे दर्शन घेउन खाली उतरलो. सकाळभरात काही जागा बघून आम्ही 'दिलवाडा मंदिर' बघायला पोचलो. आत तशी गर्दी होती म्हणुन आधी जेवून घ्यायचे ठरले. आजूबाजुला आपल्याला हवे तसे काही धड मिळेल असे वाटत नव्हते. तरी एका होटेलमध्ये गेलो. त्याच्याकडे डोसा, सांबर, थाळी असे प्रकार होते. मग थोड़ा आडवा हात मारून घेतला. तुम्ही कधी माउंटआबूला गेलात तर 'दिलवाडा मंदिर' न बघता येऊ नाका. येथले सर्वात मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे हे. अतिशय सुंदर कलाकुसर केलेले जैन मंदीर हे ११ व्या शतकात बांधले गेलेले आहे. आतमध्ये एकुण ५ मंदिरे आहेत. आपण आत गेलो की २०-२५ जणांच्या ग्रुपला एक असा माहितिगार देतात. अर्थात तो थोड़ेफार पैसे मागतो पण माहिती मस्त देतो. इकडून मग आम्ही 'अचलगढ़'ला गेलो. हा किल्ला सुद्धा राजा कुंभा यांनी बांधलेला आहे. पण माथ्यावर फार काही राहिलेले नाही. अनुजा आणि संजू तर वरती आलेच नाहीत. खालती खरेदी करत बसले. मी, अभि, मनाली आणि ऐश्वर्या वरती जाउन भटकून आलो. ४ वाजत आले होते. तेंव्हा आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.


संध्याकाळी निघायच्या आधी मार्केटशेजारी 'नक्की लेक'ला जायचे होतेच. हां तलाव म्हणे कामगारांनी कुठलीही यंत्र न वापरता हाताच्या नखांनी खोदून बनवला आहे. म्हणुन याला नक्की लेक म्हणतात. संध्याकाळी लोकांची तुंबळ गर्दी होती इकडे. शनीवार होता न. त्या गर्दीत मनाली, ऐश्वर्या आणि अनुजा शिरल्या. खरेदीसाठी अवघा दिडतास हातात होता. त्यानंतर ट्रेन पकडायला गाडीने पुन्हा आबूरोडला पोचायचे होते. रात्री ८:३० वाजता सर्व लवाजम्यासकट आम्ही आबूरोडकडे प्रस्थान केले. गाडीमध्ये माणसे कमी आणि सामान जास्त होते. मी तर मागच्या सिटवर एक सामान होउनच पडलो होतो. गोल-गोल फिरत खाली उतरणाऱ्या त्या रस्त्यामुळे चक्कर येत होती. वर आमचा ड्रायव्हर बहुदा एक्स-फोर्मुला-१ होता बहुदा... ९:३० वाजता त्याने आम्हाला स्टेशनला सोडले. नशीब 'पोचवले' नाही. ट्रेन यायला अजून २ तास होते. मग पुन्हा एकदा होटेलचा शोध सुरू झाला. स्टेशन बाहेरच्या रबडी वाल्याकडून २ किलो. रबडी विकत घेतली आणि होटेलची माहिती सुद्धा. ह्या होटेलमध्ये मात्र डोसा चांगला मिळाला. मी, अनुजा आणि ऐश्वर्या खाऊन आलो तर अभि, मनाली आणि संजूसाठी पार्सल घेउन आलो. रात्री ट्रेन येईपर्यंत स्टेशनला पकलो होतो. अखेर एकदाची ट्रेन आली आणि आम्ही पकायचे थांबलो. ट्रेनमध्ये गेल्यावर सरळ आडवे झालो. सकाळी जाग आली तर अभी ट्रेकचा हिशोब करत बसला होता. मनाली त्याला आकडे सांगत होती. अनुजा ऐश्वर्याने नुकतीच विकत घेतलेली मोसंबी सोलत बसली होती आणि संजू फोनवर कोणाला तरी त्याचे संस्कृत पांडित्य ऐकवत होता. मी उठून बसलो... अर्धा झोपेत होतो पण अजून सुद्धा आठवत होते ते गेले ५ दिवस. ज्यात आम्ही खा..खा..खाल्ले आणि हुंदड..हुंदड..हुंदडलो. आवरून बसलो. सकाळी ८ वाजता बोरीवली यायच्या आधी आबू वरुन विकत घेतलेली २ किलो रबडी संपवायला विसरलो नाही आम्ही...!!!
.
.

9 comments:

  1. हा हा हा.. आता कसं बरं वाटलं. back to khadadi :)..

    jokes apart पण खुपच माहितीपूर्ण वर्णन केलयस रे.. आणि आधी कामेंटायला विसरलो.. ते घोराख्यान आणि जडबुद्धी शॉल्लीट आणि या पोस्ट मधलं "मी तर मागच्या सिटवर एक सामान होउनच पडलो होतो." लय भारी

    ReplyDelete
  2. वा वा मस्तच....
    ही पोस्ट तु नक्कीच "खाण्यासाठी जन्म आपला....." ब्लॉग मद्धे पण टाकलीस तरी हरकत नाही... :-)
    मज्जा आली वाचायला...तोंडाला पाणी सुटलं प्रत्येक पदार्थाचं नाव वाचुन....
    आणि ट्रेक चं वर्णन पण मस्त..."दिलवाडा मंदीर" खरंच सुंदर आहे....माझ्यापण राजस्थान ट्रिप च्या आठवणी जाग्या झाल्या..
    आता पुढच्या भ्रमंतीच्या प्रति़क्षेत आहे :-)

    ReplyDelete
  3. जळव जळव लेका... आता तर तुझ्याकडे दोन ट्रेक उधार आहेत माझे. आणि त्याच्या दुप्पट खादाडी.
    पुण्याला आलास की मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस. ’लवंगी मिरची’ला जाऊ आपण.

    ReplyDelete
  4. हेरंब .. शेवटी आपला पण काही standard हाय की नाय ... हाहाहा :D

    स्मिता... पुढची भ्रमंती आता पुढच्या महिन्यात... पुन्हा हिमालायत घुसतोय... :)

    पंकज .... ट्रेक तर करुच.. आता तुझी माझी जोड़ी आहेच (ट्रेकसाठी रे...) आणि होय १३ तारखेला तिकडे डिनरचा प्लान नक्की करुया का??? बोल तू ... !!!

    ReplyDelete
  5. आईशप्पथ! रोहन अरे काय ट्रेकला गेलता की नुसते खादडायला. आणि तेही इतके चांगले चांगले पदार्थ. एकदम मस्तच. नशीब जोडीला काय काय पाहिले तेही लिहितो आहेस...:D. वर्णन एकदम झक्कास. आमचा योग कधी येतोय कोण जाणे.

    ReplyDelete
  6. हेहीह .. मी म्हटले होते णा... आगे आगे देखो.. खाते है क्या... :)

    आपण जुलैमध्ये येथे येणे केलेत तर 'तो' योग निश्चित आहे ... हे ध्यानात घ्यावे... :D

    ReplyDelete
  7. too gud Rohan :)
    khoop ch sahi hote saglech post
    mala ya trek chi mahiti de na

    aani ho, tujhya next Himalaya trek posts chi vaat baghtie !

    ReplyDelete
  8. Rohan, very nice to see a dedicated travel blog. Do keep writing.

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...