Showing posts with label बाबा मंदीर. Show all posts
Showing posts with label बाबा मंदीर. Show all posts

Friday, 9 November 2012

सिक्किमचा सफरनामा - भाग ७ : नथुला पास - ऐकत्या कानांची खिंड...


मुंबईवरून व्हाया कोलकत्ता गंगटोकला पोचून २ दिवस झाले होते. आसपासचे स्थळदर्शनही आटोपले होते. आता आज लक्ष्य होते ते भारत - चीन सिमेवर असणार्‍या नथु-ला अर्थात ऐकत्या कानाच्या खिंडीची भेट. पहाटे ६ वाजता जाग न येते तर नवल. मोकळ्याहवेत बाहेर येउन बसावे. सांगितल्या वेळेत बरोबर चहा-कॉफी हजर असावी. सोबत एम.जी.रोड वरील बेकरीमधील खारी, टोस्ट नाहीतर बटर कुकीज. अहाहा!!!


सकाळ ताजीतवानी आणि प्रसन्न. :) आवज नाही, गोंगाट नाही की प्रदुषण नाही. निवांत आवरून घेतले की नाश्ता तयार. आज तर प्रधान बाईंनी कहर केला. चक्क छोले-पुरी. कसे नाही कसे म्हणावे याला!!! थंड वातावरणात थोडे जास्तच खाल्ले जाते नाही का. श्रीला तिच्या दातांचा विसर पडला होता. शमिका आणि राजीव दोघेही त्यांचे व्याप ठाण्यालाच सोडून आले होते. राजीव काकांना बघून तर मी थक्क व्हायचो. खाण्याच्या बाबतीत त्यांनी थंडी जास्तच मनावर घेतली होती. ;)


नथु-ला येथे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडून परमीट मिळवावे लागते. स्थानिक एजंट हे काम तसे सहजपणे करुन देतात. पण एका दिवसात इथे जाणार्‍या गाड्यांची संख्या लष्कराने २०० अशी ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे जायला मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामानाने उत्तर सिक्किमचे परमीट सहज मिळून जाते. रस्त्याची एकुण अवस्था बघता हा आकडा २०० का? हे उत्तर सहज मिळते. खरेतर हा रस्ता अधिक उत्तम स्थितीत असणे गरजेचे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन त्यांच्या हिमांक प्रकल्पातून लडाखमध्ये उत्तम काम करत आहेत. त्यामानाने हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे. तुम्हाला पाठीचे / मानेचे दुखणे असेल तर हा प्रवास नक्की टाळा. किंवा प्रवासाआधी एकदा रस्त्याची किमान अवस्था विचारून पहा.



अतिशय अरुंद आणि वळणा-वळणाच्या उंचसखल आणि खडबडीत अश्या रस्त्याने हळु हळु उंची गाठत आपण नथु-लाकडे सरकत असतो. अचानक दिसते ती लांबचलांब गाड्यांची रांग. पण ह्या सर्व गाड्या थांबून का राहिल्या आहेत बरे? पुढे जाउ देत आहेत ना? की इथुनच मागे फिरायचे? मग लक्ष्यात येते की दरड कोसळलेली आहे आणि लष्कराचे जवान अथक प्रयत्न करून मार्ग मोकळा करण्याच्या मागे लागले आहेत. रांगेत गाडी उभी करत आमचा ड्रायव्हर सत्या खाली उतरला.


सत्या - जल्दी खुले तो अच्छा है. २ बजे के पहले लास्ट पोस्ट पे नही पहुचे तो नथु-ला जानेको नही मिलेगा.
मी - लेकीन हमारे पास परमीट है ना. फिर क्यु नही जाने देंगे?
सत्या - वो उनपे है. उपर जानेतक ५ बार परमीट चेक करते है. पॉपकॉर्न खाओ.
श्री - पॉपकॉर्न क्यु?
सत्या - ज्यादा ऑक्सिजन मिलेगा. नही तो अब आगे सास लेना मुश्किल होता जायेगा.

आसपासच्या गावामधले बरेच लोक पॉपकॉर्न विकत बसले होते. आम्ही सहज खायला म्हणून ते घेतलेही पण त्याने जास्त ऑक्सिजन कसा मिळेल हे काही मला अजुन कळले नाहिये. :)



नथु-लाकडे जाणारा रस्ता सोंग्मो उर्फ चांगू लेकवरून पुढे जातो. १२,४०० फुटांवर असलेले हे एक ग्लेशियर लेक आहे. लेकच्या आजुबाजुला चिक्कर उपहारगृह आहेत. पण नुडल्स सोडुन काही खायला मिळेल तर शप्पथ!!! लडाखला आणि इथेही हे एक लक्षात आलयं ते म्हणजे नाश्ता मजबुत करून निघा आणि दिवसाअखेर पुन्हा व्यवस्थित जेवा. दिवसभर फिरताना तुम्हाला धड काही खायला मिळेल याची शाश्वती नाही. :)




ज्या लोकांना नथु-लापर्यंत जाण्याचा परवाना मिळत नाही त्यांना किमान चांगू लेक आणि बाबामंदिरपर्यंत नक्की जाता येते. आमचे मुख्य लक्ष्य नथु-ला असल्याने इथे आणि बाबामंदिरला न थांबता आम्ही थेट पासपर्यंत पोचलो. जसे जसे आपण वर जातो तसा निसर्ग अधिकच खुलतो. बर्फाच्छादित दोंगर आणि त्यातून उगम पाउन चांगू लेक मध्ये मिळणारे पाण्याचे ओढे. नथु-ला म्हणजे सिक्किम भेटीमधले माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे स्थळ होते. पुर्व सिक्किममध्ये १४,१४० फुटांवर असलेल्या या खिंडीमधून चीनच्या ताब्यात असणार्‍या तिबेटमध्ये प्रवेश करता येतो. प्राचीन काळचा हा सिल्क रुट. १९६२ च्या युद्धानंतर हा मार्ग बंद करण्यात आला होता. भारत-चीन मधील करारानंतर २००६ मध्ये नथु-ला पुन्हा सुरु केला गेला. दरवर्षी येथून भारतातर्फे २९ तर चीन तर्फे १५ वस्तुंची देवाण-घेवाण, खरेदी-विक्री होते.



नथु-ला पोस्टकरता थोड्या पायर्‍या चढून तारेच्या कुंपणापर्यंत जावे लागले. वाटेत डाव्या हाताला भारतीय लष्कराने शहीद स्मारक उभे केले आहे. थोडेवरती आपला तिरंगा वार्‍यावर अभिमानाने फडकत उभा आहे. पायर्‍या चढताना सावकाश. कारण विरळ हवेनी आपल्याला लगेच त्रास होउ शकतो. डोके जड होणे, श्वास घेण्यात अडचण येणे हे तर सर्रास. अगदी ६-८ पायर्‍या चढून थांबत गेलो तरी हरकत नाही. आम्ही चढत असताना एक जोडपे त्यांच्या लहानश्या मुलाला घेउन, खरतरं अक्षरशः खेचत,  आमच्याही जास्त वेगाने,वर जाताना पाहून, थांना काही बोलणार तेवढ्यात वरून खाली येणारा एक सुभेदार त्यांना थांबवत ओरडलाच. इथे येणार्‍या पर्यटकांची काळजीही हे जवान लोक घेत असतात.



पोस्टच्या बाजूला भारतातर्फे येथे एक इमारत उभारली गेली आहे. चीनतर्फे त्याहून मोठी इमारत उभारली गेली आहे. दोन्ही इमारतीत फारतर १२-१५ मिटरचे अंतर असेल. मध्ये असलेल्या तारेच्या कुंपणापलिकडे चिनी शिपाई उभे असतात. त्यांच्या तोंडावर अजिबात स्मितहास्य नसते. अर्ध्यातासाहून अधिक काळ इथे राहिल्यास विरळ हवेचा अधिक त्रास होउ शकतो हे पाहून इथे फार वेळ थांबू नका अशी विनंती पोस्टवरच्या जवानांकडून केली जाते.



गंगटोकवरून सकाळी ८ वाजता निघुनही खराब रस्ते आणि हवामान यामुळे नथु-लापर्यंत पोचायला किमान ५-६ तास लागतात. खुद्द पोस्टवर ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ काढता येत नाही. पण आयुष्यात एकदातरी अनुभवावा असा हा प्रवास.



बाबामंदिर म्हणजे १३,१२३ फुट उंचीवर बांधलेली हरभजन सिंग यांची समाधी आहे. मुळ समाधी जिथे आहे तिथे सपाटी नसल्याने, आणि पर्यटकांसाठी पुरेशी जागा नसल्याने, जवळच सपाटी बघून आता बाबा मंदिर उभारण्यात आले आहे. हरभजन बाबा यांना आजही सर्व लष्करी सोई पुरवल्या जातात. दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी त्यांने सामान जीपमध्ये ठेवून एक जवान न्यु-जलपायगुडी येथे पोचवतो आणि तिथून ते सामान पंजाब मधील त्यांचा गावी पोचवले जाते. हरभजन बाबा हे चीन सिमेवरील संकटांची चाहुल २-३ दिवस आधीच भारतीय जवानांना देतात अशी इथे श्रद्धा आहे.


मंदिरासमोर एक छानसे दुकान आहे. इथे तुम्हाला नथु-ला पास करून आल्याचे सर्टिफिकेट बनवून घेता येते. परतीच्या मार्गावर पुन्हा एकदा चांगु लेकला थांबून याकची सवारी करण्याची इच्छाही भागवून घेता येते. आम्ही मात्र ते काही केले नाही. ३ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा कंबरतोड प्रवास पुर्ण करत आम्हाला गंगटोकमध्ये पोचायचे होते. पोचलो तेंव्हा ७ वाजले होते. त्यामुळे घरी जाण्याचा प्रस्ताव रद्द करत आम्ही थेट एम.जी.रोड कडेच मोर्चा वळवला. आज पुन्हा मोमो खायची इच्छा जागी झाली होती. :)

क्रमश...

Saturday, 23 June 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग ४ : फुलले रे क्षण माझे...

दुसर्‍या दिवशी पहाटे ६ वाजताच जाग आली. खरंतरं ९ वाजता फिरायला निघायचे होते पण आसपास काही फोटो घेउया म्हणुन खोलीबाहेर पडलो. आम्ही ज्या घरात राहत होतो त्याच्या अंगणात अनेक प्रकारची फुलझाडे लावलेली होती. तिथे काही फोटो घेतले. सुर्य कधीच वर आला होता. पुन्हा एकदा त्या क्युट मग्स मधुन चहा-कॉफी झाली आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो.

आज गंगटोकच्या आसपासची काही ठिकाणे बघायची होती. त्यात जोरगाँग मॉनेस्ट्री, गणेश टोक, मॅजेस्टिक व्ह्यु पॉईंट, फुलांचे प्रदर्शन, रोप-वे, नामग्याल ईंस्टिट्युट ऑफ तिबेटोलॉजी (NIT), बनझांकरी धबधबा आणि शक्य झाल्यास रुमटेक मॉनेस्ट्री  देखील पाहायची होती. या सर्व ठिकाणांचे बरेच फोटो असल्याने ह्या एका दिवसाचेच मी २-३ भाग करणार आहे. :) 

त्या दिवशी आमच्या राहत्या घराबाहेर, जोरगाँग मॉनेस्ट्री बाजुला आणि फुलांच्या प्रदर्शनात घेतलेले हे काही फोटो...







एका फांदीला ६-६ गुलाब.. :)




लिली..





हे काय आहे?










ऑर्निथोगॅलम...  लोकल नाव - चेमची-रेमची


गुलाबाचा वेल. बघुनच वेडं व्ह्यायला होईल इतके गुलाब...




सिनेरिरिया..




हायड्रेंगिया...






सफेद लिली..


पॅफियोपेडिलम.. 


निओरोल्गिआ.. 








अ‍ॅलस्ट्रोमेरिया..


सिक्कीमचा सफरनामा - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...

Wednesday, 20 June 2012

सिक्कीमचा सफरनामा - भाग २ : गंगटोकच्या दिशेने... !

कामावरून परतल्यावर तसा फार वेळ हातात नव्हता. पुढच्यावेळी लागण्याऱ्या व्हिसासाठी आवश्यक ते सोपस्कार अगदी १४ तारखेच्या रात्रीपर्यंत सुरूच होते.  कुठल्याही कारणाने मी माझे फिरायला जाणे रद्द करणार नव्हतोच त्यामुळे कागदपत्र सबमिट करायचे काम अनघाच्या खांद्यावर सोपवले आणि १५ तारखेला पहाटेच घर सोडले. विमानप्रवास करून दुपारी कोलकत्ता येथे पोचलो. दुपारच्या १२ वाजताच्या भर उन्हात कोलकत्ता विमानतळावरून चितपूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. मेगा कॅब्सच्या नशिबाने आम्हाला ए.सी.कॅब मिळाली होती त्यामुळे जरा गारवा होता. बाहेर बघवत नव्हते इतके रणरणते उन. आमचा सारथी ज्या गल्ल्यांमधुन आम्हाला नेत होता त्यापाहुन मला आपल्याकडच्या  गोवंडी-मानखुर्द नाहीतर मस्जिद बंदर सारख्या भागाची आठवण होत होती. अजुन काही लिहायला नकोच. एकदाचे चितपुर येथे पोचलो. कॅब सोडण्याआधी हेच ते स्टेशनना जिथुन आपली ट्रेन सुटणार आहे याची खात्री करुन घेतली आणि स्टेशनच्या क्लॉकरुमकडे मोर्चा वळवला. जवळचे सर्व सामान तिथे टाकुन खांदे मोकळे करुन घेतले आणि उदरभरण करण्यासाठी एखादे चांगले हॉटेल शोधण्यासाठी बाहेर पडलो.





'यहां आसपास कुछ नही मिलेगा' हे ४ लोकांकडुन ऐकल्यावर पुन्हा एकदा टॅक्सी घेउन मोर्चा हॉटेल शोधायला. यावेळी पिवळी टॅक्सी आणि त्यामुळे बाहेरचा उन्हाचा भपका जाणवु लागला. दुपारचे १ वाजुन गेले होते. पोटात कावळे ओरडत असल्याने 'कोई अच्छेसे ए.सी. रेस्टॉरंट लेके चलो' असे चक्रधारीला सांगुन आम्ही ४ जण टॅक्सीच्या बाहेर डोकावुन डोकावुन एखादे चांगले हॉटेल दिसते का ते बघत होतो. आमचा चक्रधारी त्याच्या हिशोबाने अच्छा हॉटेल दाखवत होता जी आम्हाला जमणारी नव्हती. विश्वास बसणार नाही पण तब्बल १ तास झाला तरी आम्हाला किमान स्वच्छ आणि नीट बसुन खाता येईल असे हॉटेल मिळेना. अखेर पार्क स्ट्रिट नामक ठिकाणी ती टॅक्सी सोडली आणि पायी फिरु लागलो. २ वाजुन गेले होते आणि आता जे हॉटेल समोर दिसेल त्यात शिरायचे असे आम्ही ठरवले होते. २:३० वाजता अखेर एक हॉटेल मिळाले. त्याचे नाव काय किंवा आम्ही काय खाल्ले असा प्रश्न विचारु नका. पोटभर खायला मिळाले हेच मनी चिंतुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. स्टेशनला परत जाताना मध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल बघुन, हावडां ब्रिज बघुन परत जायचे असे ठरले.


व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल हा १९२१ साली बनवला गेला आहे. आता आतमध्ये म्युझियम आहे. कधी जाणार असाल तर दुपार टाळा. ४ नंतरच जा. परिसर छान हिरवागार ठेवला आहे पण आत हॉलमध्ये भयंकर गरम होते. दर सोमवारी हॉल बंद असतो. मी ह्या हॉलबद्दल काही लिहिणार नाही आहे. कारण मला कोलकत्ता सोडुन सिक्किमकडे सरकायचे आहे. त्याक्षणी देखील हेच वाटत होते. तुम्हाला अधिक महिती हवी असेल तर विकिपेडिया जिंदाबाद. हे तिथे घेतलेले काही फोटो.












तासाभरात तिथुन निघालो. नव्या हुबळी आणि जुन्या हावडा ब्रिजला फेरी मारुन पुन्हा एकदा स्टेशनकडे यायला निघालो. वाटेत चिनुक्सच्या अन्नः वै प्राणा:ची आठवण झाली. त्याचे कारण असे की बंगाली मिठायांचे दुकान दिसले. मग कुठल्याही दुकानात बंगाली मिठाई खाण्यापेक्षा के.सी.दास शोधुया म्हणुन पुन्हा एकदा आम्ही चक्रधारीला पिडायला सुरु केला. दुर्दैव म्हणजे कोणालाच जवळपासचे के.सी.दासचे दुकान माहित नव्हते. अखेर बर्‍याच वेळाने एका सदगृहस्थान आम्हाला अचुक पत्ता सांगितला. १० मिनिटात टॅक्सी तिथे जाउन पोचली. बघतो तर काय... के.सी.दास कपड्यांचे दुकान... देवा!!! आता संध्याकाळचे ६ वाजुन गेले होते आणि आम्हाला स्टेशनला परतायचे होते. जिथे होतो (देव जाणे नेमके कुठे होतो :P) तिथुन स्टेशनला जाताना एखादे दुकान असावे अशी एक भोळीभाबडी आशा मला अजुनही असल्याने मी एका माणसाला 'यहां कोई के.सी.दास - मिठाई दुकान है क्या?' असे विचारताच त्याने अत्यंत आनंदात मला पत्ता सांगायला सुरुवात केली. ह्यावेळी मी चक्रधारीला बाजुलाच उभा करुन ठेवला होता. त्याला विचारले 'कैसे जानेका सम्झा?' तो पुन्हा एकदा. 'हा पता है.' असे म्हणुन टॅक्सीकडे जाउ लागला. तिथुन निघलो आणि अखेर के.सी.दास नावाच्या दुकानासमोर पुन्हा एकदा आमची गाडी उभी राहिली. ह्यावेळी हे मिठायांचेच दुकान होते. दुकान लहानसेच होते. दुकानाच्या पाटीवर 'Founder of Rosgolla' असे लिहिले होते. आम्ही ४-५ पदार्थ खाउन पाहिले. याचसाठी केला होता अट्टहास!!! ह्यापेक्षा १०० पटीने उत्तम बंगाली मिठाई तर आपल्याकडे मुंबई-पुण्यात मिळते.


अखेर तिथुन आमचा लवाजमा निघाला आणि बर्रोबर ७ वाजता स्टेशनला पोचला. क्लॉक रुम मध्ये ठेवलेले सामन ताब्यात घेतले आणि वेटिंग रुममध्ये जाउन फ्रेश झालो. नव्याने बांधलेले स्टेशन त्यामुळे वेटिंग रुम चकाचक. तास-दोनतास आराम करुन, स्वतःच्या आणि फोनच्या बॅटर्‍या चार्ज करुन फलाटावर लागलेल्या गाडीकडे मोर्चा वळवला. ठरल्या वेळेच्या आधीच ट्रेन येउन उभी राहिली होती. ९ वाजता आम्ही त्यात स्थानापन्न झालो आणि खर्‍र्‍या अर्थाने आमचा प्रवास सिक्किमच्य दिशेने सुरु झाला. विमान प्रवासासाठी पहाटे लवकर उठलो होतो आणि दुपारभर उन खाउन डोके धरल होते. रात्री १० वाजता जे झोपलो ते थेट सकाळी ७ वाजता डोळे उघडले.


राजीवकाका बहुदा कधीच उठले होते आणि त्यांनी नाश्त्याची तयारी करुन ठेवली होती. चहा-कॉफी, डोसा मग पुन्हा चहा-समोसा, कटलेट, ऑमलेट असा भरगच्च नाश्ता झाला. ट्रेन २ तास लेट होती. डब्यात सोबत २ बंगाली तरुण होते. ते आसाममध्ये कामाख्या येथे जात होते. त्यांच्याशी सिक्किम बद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. वेळ पटकन निघुन गेला. आम्हाला न्यु जलपायगुडीला (एनजेपी) पोचायला ११ वाजले. सोनमने घ्यायला पाठवलेली गाडी कधीचीच पोचलेली होती. त्यात बसलो आणि सिक्किमच्या अधिक जवळ जायला निघालो.



अवघ्या तासाभराच्या प्रवासात निसर्ग दुसरेच रुप दाखवु लागला होता. सुरुवातच रस्त्याच्या दोहो बाजुंना बहरलेल्या बोगन वेलीच्या झाडांनी झाली. त्यानंतर काही वेळातच घाट रस्ता सुरु झाला आणि आपण सिक्किममध्ये आता प्रवेश करणार न समजलो. एक डोंगर पार करुन गाडी पलिकडे उतरु लागली आणि आम्हाला तिस्ता नदीचे पहिले दर्शन झाले. गुरुडोंगमारजवळ उगम पाउन इथपर्यंत वाहत येणारी, रंगपो-रंगीत नद्यांना कवेत घेणारी आणि पुढे ब्रह्मपुत्रेत मिसळुन जाणारी तिस्ता. सिक्किमची खरिखुरी जिवनदायिनी तिस्ता. लडाखला सिंधुनदी पाहुन किंवा मंत्रालयमला तुंगभद्रा पाहुन मला जे भाव मनात अले होते तेच भाव आत्ताही मनात सहज उमटले.











ड्रायव्हरने गाडी बाजुला घेतली आणि ५ मिनिट थांबुया असे म्हणाला. आम्ही तेवढेच फोटो काढुन घेतले. नदीचे पाणी गढुळ होते. याचा अर्थ वरती पाउस सुरु होता आणि बरीच माती वाहुन येत होती. दुरवर असणारे काळे धग आम्हाला बहुदा जरा चुणुक दाखवणार होते. पुन्हा मार्ग्क्रमण सुरु झाले आणि आम्ही अखेर सिक्किमच्या प्रवेशद्वारात येउन पोचलो.



'सिक्किममध्ये तुमचे स्वागत आहे.' हे वाक्य वाचुन मोजुन १०० मिटर पुढे जातो-न-जातो तोच सोसाट्याचा वारा वाहु लागला आणि तुफान पाउस. अवघ्या काही क्षणात पावसाने जणु आमच्यावर झडपच घातली होती. तश्यात जरा पुढे जातोच तो  ढगांच्या गडगडाटाप्रमाणे आवाज झाला. आमच्या पुड्गची गाडी थांबली तसे आम्हीही थांबलो. बघतो तर रस्त्यावर एक मोठे झाडं आडवे पडले होते. सोसाट्याच्या आणि वादळी वार्‍या-पावसापुढे त्याचा टिकाव लागला नव्हता.





बघता-बघता गाड्यांची रांग लागली. रस्ता सुरु होईपर्यंत आम्हाला मात्र आता तास-दोनतासांची निश्चिंती होती. दुपारचे २ वाजले होते आणि भुक लागलेलीच होती. खरेतर जिथे जाउन राहणार होतो त्यांनाच जेवण बनवायला सांगितले होते पण ट्रेन लेट आणि आता हा उशीर त्यामुळे फोन करुन ते रद्द केले आणि गाडी जिथे उभी होती तिथेच शेजारी असणार्‍या हॉटेलात मोर्चा वळवला. सिक्किममध्ये प्रवेश केल्या-केल्या माझे मोमोज खायचे स्वप्न पुर्ण होणार होते. २ प्लेट मोमो आणि ऑमलेट असा हलकासा फराळ करुन आम्ही भुक शमन करुन घेतले. चहा हवाच होता. तासा-दिडतासाने रस्ता सुरु झाला. त्यानंतर कुठेही न थांबता आणि कुठलाही अडथळा न येता आम्ही संध्याकाळी ५ वाजता ठरल्या ठिकाणी म्हणजे आशिष-खीम या होम स्टेच्या दारात होतो.



मिसेस प्रधान यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला आमच्या रुम्स दाखवल्या. प्रथमदर्शनी मला त्यांचे घर खुपच आवडले. तळ मजल्यावर आमच्य रुम्स होत्या आणि एक सामायिक हॉल होता. तिथे वेताचे सोफा, मोडे वगैरे होते. त्यावर बसुन जरा निवांत होतो तोच चहा आला. ते मग्स कसले क्युट होते!!! हे इथे मिळतात तर नक्की विकत घ्यायचे, हे शमिचे पहिले वाक्य. शॉपिंग सुरु!!!  :P




संध्याकाळ होत आली होती आणि एक चक्कर एम.जी.रोड येथे मारावी असे सर्वांचे मत बनले. लगेच तयार झालो आणि कुच केले एम.जी.रोडच्या दिशेने...

क्रमशः ... सिक्कीमचा सफरनामा - भाग ३ : एम.जी.रोड...