Wednesday, 2 December 2009

लडाखचा सफरनामा - 'बियास'च्या सोबतीने ... !

विचार करता करता रात्री झोप कधी लागली समजलेच नाही. सकाळी बियास नदीच्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने जाग आली. पुन्हा एकदा निघायची तयारी सुरू केली. ८ वाजता नाश्ता करायला मार्केटमध्ये जायचे होते. अभी-मनाली आणि अमेय मात्र गाडी हायर करायला आधीच पुढे गेले होते. मार्केटमध्ये बारीक - सारिक खरेदी करून ११ च्या आसपास मनाली सोडायचे असे पक्के केले होते. नाश्ता झाल्यावर सर्वजण खरेदीला लागले तर मी, अभी आणि अमेय आमच्या ओळखीच्या एका मित्राला, 'गोकुळ'ला भेटायला गेलो. गोकुळ आम्हाला दिल्लीपर्यंत दुसरी गाडी करून देणार होता. त्याच्याबरोबर चहा पिता-पिता गप्पा मारत बसलो होतो. काल रात्रीपासून फोन सुरू झाले होते तेंव्हा अधूनमधून फोन सुद्धा येत होते. ह्या तासाभरात फोनवर बऱ्याच गोष्टी कळल्या. दिघेफळला विट्ठलचे वडील वारले होते. तिकडे दुसरीकडे शमिकाच्या दिल्लीच्या आजीचे दोन दिवसांपूर्वी देहावसान झाले अशीही बातमी कळली. एक बातमी चांगली येत नव्हती... आत्ता आम्हा दोघांना दिल्ली लवकरात लवकर गाठणे आवश्यक होते. पण त्याला किमान २ दिवस तरी लागणार होतेच. बायकर्सनी निघायला १२ वाजवले. तर गाडीमधून येणारे १ नंतर निघणार होते. तितक्या वेळात ते ओल्ड मनाली मधले हिडिंबा माता मंदिर पाहून आले. आम्ही मागच्या वेळी ते पाहिले असल्याने तिकडे काही वळलो नाही. आम्ही सरळ कुल्लू - भूंतरच्या मार्गाला लागलो. इतके दिवस आम्ही कमी रहदारीच्या भागातून बाईक्स चालवत होतो. आज मात्र रहदारी जास्त जाणवत होती. तेंव्हा जास्त वेगाबरोबर जास्त काळजी घेणे आवश्यक होतेच.
मनालीहून निघाल्या पासून बियास नदी आपल्याला सोबत करते. डाव्या हाताला नदी आणि उजव्या हाताला डोंगर आणि मध्ये 'S' आकाराच्या वळणा-वळणाचा रस्ता पतलीकूहल, कुल्लू करत भुन्तरपर्यंत जातो. आत्ता कुल्लूजवळ बियासनदीवर ब्रिज बांधल्यामुळे कुल्लू मार्केटमध्ये घुसावे लागत नाही. त्याने बराच वे ळ वाचतो. भुन्तरला पोचलो तेंव्हा २ वाजत आले होते. जेवायचा अजुन काही पत्ता नव्हता तेंव्हा किमान एक चहा घ्यावा म्हणून थांबलो. खरे तर ऐश्वर्याला सफरचंद घ्यायची होती म्हणून तिने सर्वांना थांबवले होते. सफरचंद घेतली पण चहा घेतलाच नाही. भलताच राडा झाला एकडे. रस्त्याच्या कडेला उभे असताना एका स्थानिक मुलाचा मनाली, साधनाला धक्का लागला (की त्याने जाणून बुजून मारला) ह्यावरून त्याची आणि अभीची बाचाबाची झाली. आणि मग ती बा-चा-बा-ची इथपर्यंत गेली आणि हाणामारीला सुरवात झाली. हे सर्व इतक्या पटकन घडले की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. २ एक मिनिटात सर्व शांत झाले पण मग गर्दी जमली आणि आता हे प्रकरण काहीही चुक नसताना आपल्यालाच महाग पडणार अशी चिन्हे दिसू लागली. 'उसने अपूनको १० मारा, अपूनने दोहि मारा लेकिन क्या सॉलिड मारा' ह्या स्टाइलने आम्ही मारामारी करू शकत होतो पण ५ मुली आणि ५ बाइक्स सोबत असताना असे करणे अविवेकीपणा ठरला असता. तेंव्हा तिकडून शिस्तीत निघालो आणि मंडी - बिलासपुरच्या रस्त्याला लागलो.


आता रस्त्याच्या कडेला छान-छान सफरचंदाची झाडे, गुलाबाच्या बागा अशी दृश्‍ये होती. पुढे लगेच मंडी बोगदा लागला. हा बोगदा जवळ-जवळ ३ किमी लांब आहे. आणि हो आतमध्ये लाइटस नाहीत बरं का. तेंव्हा सावधान. तो पार केला आणि मंडीला पोचलो. ४ वाजून गेले होते. भुका लागल्या होत्या. तेंव्हा आता जेवाय करायला थांबणे गरजेचे होते. जेवण उरकतो तोपर्यंत मागून गाडीमधून बाकीचे मेम्बर्स सुद्धा येऊन पोचले. नेहमी गोंधळ घालत गप्पा मारत असणारे सर्वजण आज असा शांततेत जेवण का करत आहेत असा त्यांना प्रश्न पडला होता. झाला प्रकार कोणालाच माहीत नव्हता. ५ वाजता तिकडून निघालो तेंव्हा गाडी पुढे निघून गेली. आम्ही मागाहून निघालो. अभी - अमेय पुढे तर अमेय म्हात्रे आणि आदित्य मागे. मी मध्ये राहून सरवण मध्ये समान अंतर ठेवायचा प्रयत्न करत होतो. अचानक माझ्या म्हणजे बाइक्सच्या हा.. :P मागच्या चाकात हवा कमी होत आहे असे जाणवल्याने मी बाइक स्लो केली. आदित्य , अमेय सुद्धा पुढे निघून गेले. हळू हळू बाइक चालवत एके ठिकाणी हवा भरली आणि पुढे निघालो. अंधार पडत यायला लागला होता. आता मी थोडा वेग वाढवून पुढे गेलेल्या इतर बायकर्स ना गाठण्याचा प्रयत्न करत होतो. इतक्यात एका हॉटेल मध्ये चहा घ्यायला सर्वजण थांबलेले दिसले. म्हणजे थांबले होते माझ्यासाठी पण मग नुसते थांबून काय करायचे? मग लगेच चहा हवा ना...  तिकडून १५ मिन. मध्ये निघालो आणि पुढे निघालो. चंदिगढसाठी अजुन १०० किमी. अंतर जायचे होते. कितीही बाइक चालवली तरी रस्ता काही संपत नव्हता. तिकडे चंदिगढमध्ये माझा मित्र कुणाल आमची वाट बघत होता. पुन्हा सर्वांना भुका लागल्याने 'कीरतपूर साहेब'च्या अलीकडे अखेर १०:३० च्या सुमारास जेवायला थांबलोच एके ठिकाणी. अजुन ८० किमी अंतर जायचे होते. त्यात पुन्हा एकदा ह्या पुढचा रस्ता म्हणजे आनंदीआनंद होता. आम्ही बाइकट्रिप साठी येणार म्हणून सर्व ठिकाणच्या रस्त्यांची कामे सरकारने काढली होती की काय असा प्रश्न पडला होता मला. धुळीने भरलेल्या त्या कच्च्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या गाड्यांच्या प्रखर हेडलाइटस मध्ये बाइक चालवणे हे खरोखरच दिव्य होते.

१२ वाजत आले होते आणि सतत १२ तास रायडिंग करून सर्वच थकले होते. गाडी बरीच पुढे निघून गेल्याने आता रायडर्स किंवा पीलियन बदलणे सुद्धा शक्य नव्हते. गेल्या ११ दिवसांच्या रायडिंग मध्ये 'कधी संपणार हा रस्ता' अशी भावना मनात येत होती. तिकडे अभी सॉलिड झोपेत बाइक चालवत होता. त्याच्या मागून येणार्‍या अमेयला हा आता बाइक वरतीच झोपेल की काय अशी शंका येत होती. मनाली अभीला जागे ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न करत होती. मागे अमेय आणि दीपालीची अखंड बडबड सुरुच होती. अश्या निर्जन रस्त्यावर कुत्रा सोडा पण एक चिटपाखरू सुद्धा नव्हते. दूरदूर वर लाइटस नव्हते. त्यामुळे ह्या अनोळखी भागात थांबणे ही शक्य नव्हते. अखेर एके ठिकाणी कुठल्याश्या कंपनीच्या गेटवर लाइटस मध्ये थांबलो. मागून अभी - अमेय आल्यावर पुढे निघालो. मध्येच एके ठिकाणी ट्रॅफिक लागले रस्त्यावर. बघतो तर रेल-वे फाटक. मी, आदित्य आणि अमेय फाटक पार करून पुढे असलेल्या पेट्रोल पंपावर थांबलो. अभी आज भलताच स्लो झाला होता. तो मागाहून आल्यावर आम्ही परत पुढे निघालो. एव्हाना गाडी हॉटेल 'पार्क व्यू'ला पोचली होती आणि आशिष व उमेश कुणालला जाउन भेटले होते. तो त्याची गाडी घेऊन आम्हाला शोधत मागे यायला निघाला. अखेर एक-एक करून आम्ही हॉटेलला पोचलो तेंव्हा पहाटेचे ३:३० झाले होते. १५ तास बाइक चालवुन आमचे काय झाले होते ते वेगणे सांगायला नकोच...

'तुम सब नहाके फ्रेश हो जाओ. मे खाना लेके आता हु' असे बोलून कुणाल गेला. खरे तर कोणालाच काही खाण्याची इच्छा नव्हती पण मी त्याला बोललो. 'सब थक गये है यार. सोने दे उन्हे. कल सुबह देखेंगे.' तो मात्र मानला नाही. मानला तर पंजाबी कसला. 'तू पंजाब आया और मैने खातीर ना की तो मेरी तो नाक कट गाई यार.' असे बोलून तो खायला आणायला गेला. मी सुद्धा आवरून घेतले. आंघोळ केल्यावर मात्र मलापण भूक लागली. अभी-मनाली आणि साधना मात्र आडवे झाले होते कुणालने आणलेले बटर चिकन, रोटी आणि राइस खाउन बाकी सर्वांच्या जान मे जान आ गयी. पहाटे ४ वाजता अखेर सर्वजण आपआपल्या खोल्यात जाउन गुडूप झाले. एका 'संपतोय की नाही' असे वाटणार्‍या दिवसाचा अखेर अंत झाला होता. पण अजुन काहीतरी घडणे बाकी होते. आमच्या खोलीमध्ये तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... बघुच पुढील भागात काय झाले ते...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !
.
.
.

5 comments:

 1. अरे बापरे! जरा गडबडच झाली की रे रोहन सगळी. :( ह्म्म्म्म...परक्या प्रदेशात हाणामारी बरोबर मुली....उगाच भलते डेअरींग नकोच. रस्ता/दिवस संपतच नव्हता हे अगदी कळतेय... शमिकाच्या आजीचे ऐकून वाईट वाटले.

  ReplyDelete
 2. होय ना ... बरीच गड़बड़ झाली होती खरंतरं ... कसे बसे निभावले.. नाहीतर उगाच प्रॉब्लम... :)

  ReplyDelete
 3. खरंच तुमचा परतीचा प्रवास म्हणजे सर्व रायडर्सनी पार केलेलं अग्निदिव्यच म्हणावं लागेल.....
  हॅट्स ऑफ टू यु ऑल!!!
  कुणालचं अतिथ्य तर आहेच पण तसंही
  “खाण्यासाठी जन्म आपुला” हे ब्रीद वाक्यच असलेल्यांनी एवढ्या रात्री (एवढं) खाणे स्वाभाविकच आहे...ही ही ही.....

  ReplyDelete
 4. अग्निदिव्य वगैरे नाही पण एक सोलिड हटके अनुभव होता हे नक्की... आणि म्हटल्या प्रमाणे .. स्टानडरड्स मेंटेन करावे लागतात ... हेहे... तेंव्हा खाना तो जरुरी है .. ;)

  ReplyDelete
 5. are sahich ! vachtana bhari vattay pan tyatun paar padtana tumchi vaat lagli asel na :D
  aani to Mandi cha bogda sahiye pan :)

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...