Friday, 4 December 2009

लडाखचा सफरनामा - सारांश .. अर्थात माझ्या मनातला ... !

गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा सफ़रनामा आजच्या ह्या पोस्टने संपतोय. आज हा सारांश पोस्ट लिहिताना माझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत??? अगदी मोकळेपणाने सांगायचे झाले तर मनात खुप समिश्र भावना आहेत. ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. हाहा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. ;) जितक्या जोमाने मी सप्टेम्बर – ऑक्टोबर  मध्ये लिखाणाला सुरवात केली तितक्या जोमात मला पुढे म्हणजे नोव्हेंबरमध्ये लिखाण करता आले नाही. त्यामुळे वाचकांची वाचण्याची लिंक तूटली हे नक्की. पण काही वाचकांनी माझ्याकडे पुढच्या लिखाणाची सारखी मागणी करत मला लिखाण लवकरात लवकर पूर्ण  करावयास हवे ही जाणीव करून दिली. त्या सर्वांचे खरच आभार.

लडाख मोहिमेच्या १३ दिवसांच्या आणि त्या आधीच्या तयारीचा सफरनामा मी अगदी मोकळेपणाने मांडला. पण आज थोड़े मनातले लिहायचे म्हटले आहे तर विचार काही करून कागदावर उतरायला तयार नाहीत. डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे नुसती. बघुया किती प्रश्न कागदावर उतरवता येतात आणि किती प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता येतात ते.

अगदीच सुरवात करायची झाली तर.. आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे  विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती  गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???


माझ्या दृष्टीने अगदी अपयश म्हणता नाही आले तरी हे पूर्ण यश नक्कीच नव्हते. अनेक उणीवा आणि त्रुटी त्यात राहिल्या. हवी तशी एकत्र सुरवात करता आली नाही आणि शेवट तर निराशाजनक ठरला. दिल्लीमध्ये 'इंडियागेट'ला 'अमर जवान ज्योती' येथे नतमस्तक होउन मोहिमेचा शेवट करायचा असे माझे मत होते आणि अभीने त्याला मान्यता दिली होती. पण तसे होऊ शकले नाही. कारणे काहीही असोत. पण ते धैय गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मी कधीच विसरु शकणार नाही. मला हे सुद्धा माहीत नाही की आमच्यापैकी किती मेंबर्सना त्याबद्दल वैषम्य वाटत असेल. मी मात्र आजही तितकाच खिन्न आहे जितका दिल्लीवरुन निघताना होतो. एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला की ती गोष्ट कशी पुर्णच गोड लागते, तसे काही येथे घडले नाही. पण ह्या सर्व गोष्टींकडे मी नकारात्मक दृष्टीने बघतोय असे नाही. सकारात्मक दृष्टीने बघायचे झाल्यास असे म्हणता येइल की ह्या चूकांमूळे आता आम्हाला ही किंवा अशीच एखादी मोहिम पूर्णपणे यशस्वी करून दाखवावी लागेल. तेंव्हा कुठे मन शांत होइल आणि त्याचे प्लानिंग सुरू देखील झाले आहे. (माझ्यापुरते)

आज ३ महिन्यांनी सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे...कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राद्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत.

ही ब्लॉगपोस्ट संपवायच्या आधी मला खास करून इकडे 'अभिजित'चा विशेष उल्लेख करायला अतिशय आनंद होतोय. गेल्या सर्व पोस्ट्समध्ये त्याने ह्या मोहिमेत किती मोलाची भूमिका बजावली हे वाचक जाणतातच. तरीसुद्धा त्याचा उल्लेख केल्याशिवाय ही पोस्ट संपवणे योग्य ठरणार नाही. ट्रिपच्या प्लानिंगपासून ते ट्रिप पूर्ण होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी त्याने एकट्याने ज्याप्रकारे पेलली (जे फ़क्त त्यालाच शक्य होते) त्यासाठी त्याला खरच हाट्स ऑफ. उगाच आभार वगैरे मानत नाही मी, कारण ते त्याला आवडणार देखील नाही. मी त्याला जमेल तशी मदत करेन असे जरी ठरले होते, तरीपण माझ्या कामाच्या व्यापामुळे ते शक्य तर झाले नाहीच, उलट माझा अधिक व्याप त्याला सहन करावा लागला. त्याने माझ्याकडे कुठलीही तक्रार न करता ट्रिपचाच एक भाग म्हणुन मान्य केला हा त्याच्या मनाचे मोठेपण.


आशिष म्हणजे माझा दादा आधी सुट्टी मिळत नसल्याने लडाखला येणार नव्हता पण अखेर मी त्याला येण्यासाठी तयार केलेच. तो असल्याने मला बाईक लोड करणे आणि परत आणणे याचे टेंशन राहिले नाही. त्याने ती जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडून माझ्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. उमेश, अमेय साळवी, अमेय म्हात्रे आणि कुलदीप यांनी ह्या ट्रिपमध्ये अनेक उत्कृष्ट फोटो काढले. त्यांनी ते मला विनासायास येथे वापरायला उपलब्ध करून दिल्याबद्दल खरच धन्यवाद. शमिका आणि मनालीने माझ्या आणि अभीच्या मागे चालत्या बाईकवर बसून अनेक चांगले फोटो टिपले. मनालीने तर काही व्हीडिओस देखील घेतले जे मला ब्लॉगसाठी खुपच उपयुक्त ठरले. साधना आणि उमेशने ह्या मोहिमेचे IBN-लोकमतसाठी संपूर्ण शूटिंग केले जे २ भागात दाखवण्यात आले. त्यातला १५ ऑगस्टचा भाग तर अप्रतिमच झाला होता. ह्या ट्रिपमध्ये सर्वात जास्त मज्जा ज्यांनी केली ते दिपाली आणि शोभित. अभिला सर्वात कमी त्रास ह्या दोघांनी दिला असेल. नाहीच दिला असे म्हटले तरी हरकत नाही. आदित्य, पूनम आणि ऐश्वर्या ह्या अंबरनाथच्या टीमने देखील ह्या ट्रिपमध्ये जान आणली.

या लेखातून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या ब्लॉग लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की आमचा हा सफ़रनामा तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

आज हा सफ़रनामा संपतोय याचा अर्थ हा ब्लॉगसुद्धा बंद असा होत नाही. ह्या ब्लॉगचे नाव ‘माझे भारत भ्रमण’ असे आहे. तेंव्हा काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात माझी अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन... तो पर्यंत 'टाटा' ...
.
.
.

25 comments:

 1. रोहन,
  या सफरनाम्याच्या निमित्ताने आम्हालाही लडाख - आणि आसपासची सफर घडवुन आणलीस. बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या - माहित झाल्या... सैनिक आणि त्यांचे जीवन यांचे अगदी जवळुन दर्शन घडवलेस - अनेक आभार!

  अरे हां - तु तुझ्या या 'लडा़खनाम्याची इ-बुक' काढणार आहेस ना? १ जानेवारी २०१०? वाट बघतोय !

  ReplyDelete
 2. धन्यवाद दिपक ... तुझ्या त्या 'pdf क्रेअटर'ने आणि महेंद्रदादाच्या आयडीयाने मी ह्या लिखाणाचे इ-बुक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. :)

  ReplyDelete
 3. रोहन,

  सगळे पोस्टस संपले की मगच तुला प्रतिक्रिया द्यायची असं पहिली पोस्ट वाचल्यावर ठरवलं होतं...
  तुझे हे सगळे ब्लॉग्स मी न चुकता वाचत होते...खरं सांगायचं तर..रोज न विसरता चेक करत होते की आज तू काय नविन लिहिलंयस....
  तुमची सफर जितकी सुंदर झाली असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने सुरेख या सगळ्या आठवणी आहेत ज्या ब्लॉगरुपाने आमच्यासमोर आल्या...तुझ्या प्रत्येक पोस्टसोबत मी सुद्धा ती भटकंती,ती मौजमजा,तो थरार अनुभवला...
  तुझ्या फोटोजमधुन मी सुद्धा कल्पनेत का होइना लडाख फिरुन येउ शकले...
  याबद्दल मी तुझी खुप खुप आभारी आहे...
  बाइक वर जाउ शकेन का ते माहिती नाही..पण लेह-लडाख-कारगिल ला मी आयुष्यात एकदातरी जरुर जाणारच..
  (आणि मला खात्री आहे की हा ब्लॉग वाचणार्‍या प्रत्येकाने मनात कुठेतरी असं नक्की ठरवलं असणार)

  तुझ्या पुढच्या भटकंतीची आणि नवीन पोस्टसची मी आतुरतेने वाट पाहीन...
  तुमच्या संपूर्ण ग्रुपला माझ्यतर्फे खुप खुप शुभेच्छा...

  -स्मिता श्रीपाद

  ReplyDelete
 4. रोहन पहिल्या दिवसापासून तुझ्याबरोबर लडाखची सफर करते आहे. खरेच खूप मजा आली. अनेक नवीन गोष्टी कळल्या...तसेच अडचणीही. अडचणींना तुम्ही सगळ्यांनी तोंड दिलेत, फारसे काही अनुचित न घडता ही सफर पार पडली हे श्रेयच आहे. फोटो-व्हिडीओज सहीच आहेत. नवीन कोणी अश्या सहलीला तेही बाईकवर जाण्याचा विचार करत असतील त्यांना ही माहीती नक्कीच उपयोगी पडेल. मला खूप आवडली सफर. अरे वा! इ-बुक काढतो आहेस का? सहीच. शुभेच्छा. :)

  ReplyDelete
 5. खुप सुंदर झालंय पोस्ट. जे जाणार असतिल, त्यांच्यासाठी एक रेडी रेकनर होईल ते. लवकर काढ ई बुक.. वाट पहातोय. आज पुन्हा शेवटचे तिन् पोस्ट्स एकदम वाचले.. लिंक अजिबात तुटलेली नाही..

  ReplyDelete
 6. स्मिता ताई ... धन्यवाद. एक मूक वाचक म्हणुन तुम्ही माझा ब्लॉग दररोज वाचायचात हे ऐकून खुप बरे वाटले. आता ह्या ब्लॉग वर लिखाण २ महिन्यांनी.. तो पर्यंत माझा 'सह्यभ्रमंती' ब्लॉग बघायला विसरु नका ... :)

  ReplyDelete
 7. भानस ताई ... तुमच्यासारख्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळे तर मी माझे लिखाण पूर्ण करू शकलो. ते तुम्हाला अवदले याचे मला खुप समाधान आहे. खुप खुप आभार.

  ReplyDelete
 8. विमानतळावर बसून वाचून काढलास का रे संपूर्ण. हाहा... छान छान... इ-बुक जानेवारी मध्ये निघेल. थोड़ी प्रतीक्षा करा ... पिच्चर निघाल्यावर त्याची DVD लगेच थोड़ी बाजारात येते ... :D

  ReplyDelete
 9. रोहन तू आम्हाला फिरवून आणलस बघ!!! उगाच भारताबाहेरच्या जागांचे कौतूक करण्यात रममाण आम्ही.....लडाख चे सौंदर्य तुझ्या नजरेतून आणि थरार तुझ्याबरोबर प्रवास करून अनुभवला....Thank you.
  ई-बुक लवकर आण.....

  ReplyDelete
 10. तन्वी.. खुप खुप आभार ... मला इतके लिहिता आले आणि तुम्हा सर्वांना आवडले ह्या बाबतीत मी स्वतः समाधानी आहे... भेटुच पुढची सफ़र घेउन लवकरच...

  ReplyDelete
 11. रोहन, तुझ्या “लडाखचा सफरनामा” मधील शेवटच्या पोस्टबद्दल अगदी नेहमीप्रमाणे अतिशय उत्सुकता होती....काय असेल शेवटचा पोस्ट? कसा असेल संपूर्ण सफरनाम्याचा सारांश? शेवटच्या 2-3 पोस्टस वाचताना तर ही उत्सुकता शिगेला पोहचली होती...आणि फायनली काल ती पोस्ट पब्लिश झाली!!!!  ती वाचताना आम्हाला जशी आता लडाखवरील पोस्ट वाचयला मिळणार नाही याची रूखरूख लागलीय तशीच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त रूखरूख तुला तुझं लडाखचं लिखाण थांबल्यामुळे लागलीय हे शब्दाशब्दांतून जाणवत होतं....लडाखला जाण्याकरता तू घेतलेले initiatives, सर्वांना येण्यासाठी प्रोत्साहीत करणं, तिकडे असतानाही इकडच्यांशी संपर्कात राहणं आणि तिथल्या अनुभवांचं इत्यंभूत चित्र सर्वांसमोर आपल्या लिखाणातून उभं करणं.....त्यासाठी तिकडे असताना टिपलेल्या बारीक बारीक गोष्टी, त्यांच्या घेतलेल्या नोट्स, एका मागून एक सलगतेने पोस्ट पब्लिश करण्यासाठी चाललेली तुझी धडपड, त्यात शमीचं आजारपण, लिखाण होत नसल्याने तुझी होणारी तगमग.....खरंच सगळी तारेवरची कसरतच होती!!! पण तू ते सगळं लीलया निभावलंस आणि आम्हा सर्वांना वाचनाचा एवढा छान आनंद दिलास....  तिकडे प्रत्यक्ष जाऊन येणं, अनुभवणं आणि त्यावर लिखाण करणं यामुळे तुझी किती जास्त involvement झाली असेल त्यात....तरिही किती अलिप्ततेने, तटस्थपणे संपूर्ण मोहिमेच्या यशापयशाचा धांडोळा घेतलायस....मोहिमेत राहिलेल्या त्रुटींचाही परामर्श अगदी मोकळेपणाने मांडला आहेस....हे खरंच appreciating आहे.....ते सर्वांनाच जमतं असं नाही....असाच रहा!!!  तु असाच लिहित रहा.....लडाखचं लिखाण संपल्याची खंत आहेच पण तुझ्या पुढील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतेय.....त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!!!

  ReplyDelete
 12. अमृता.. प्रत्येक चांगल्या गोष्टीला कधी ना कधी शेवट यायचाच. तुम्हा सर्वांना लिखाण वाचून आनंद झाला ह्यातच मला अधिक आनंद आहे.

  सफ़रनामा संपलाय पण मनातले विचार काही संपलेले नाहीत.. कधी संपणार सुद्धा नाहीत. कारण विचार आहेत तोवर आठवणी आहेत. अश्याच काही आठवणी घेउन भेटू पुन्हा लवकरच ...

  ReplyDelete
 13. रोहन तसं सर्वांनाच माहित होतं की हा सफ़रनामा संपणार पण म्हणून तू लिहिलंस त्याचं महत्त्व कमी होत नाही. मला माहित नाही याआधी तू अशा प्रकारच्या मोहिमा केल्यास का? पण पेला अर्धा भरलेला पाहून शेवट कर; कारण मोठमोठे प्रोजेक्ट्स पण डेड-लाईन मिस करतात आणि वर त्यात नंतर बग्ज येतात. ही तर वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी डोकी एकत्र करून केलेली आणि एकही अपघात न होता म्हणजे यशस्वी केलेली मोहिम असंच म्हणणं योग्य ठरेल.
  आणि हो इ-बुकच्या नोंदणीत माझंही नाव घाल. पुढच्या मोठ्या मोहिमेला मला यायला मिळेल का असा विचार करतेय पण माहित नाही सर्वच जुळून आलं तर तुझ्या टिमचा भाग व्हायला नक्की आवडेल...
  तुझ्या पुढच्या पोस्टची वाट पाहातेय...

  ReplyDelete
 14. पुणे-सातारा आणि कोकण सोडले तर मी बाहेर कुठे बाईक नेलेली नव्हती. ही अशी सर्वांनी केलेली पहिलीच ट्रिप होती. हाहा.. 'इ-बुक'ची नोंदणी वाढत चालली आहे... पुढच्या मोहिमेची तयारी सुद्धा सुरू आहे. जमल तर याच ... :)

  ReplyDelete
 15. Hey khoop ch sahi Rohan :)
  hats off to you and ur team :)

  aani kharach rukh rukh aahe pan tujha likhan asach chalu rahnar asa aikun jara bara vattay :)

  aani ho mala pan e-book :)
  btw gr8 work...keep it up

  ReplyDelete
 16. धन्यवाद पूनम ... तू माझ्या मागे लागुन-लागुन लिखाण पूर्ण करून घेतलेसच ... भेटू पुन्हा अशीच एक भ्रमंती घेउन... कदाचित तेंव्हा तू सुद्धा असशील माझ्यासोबत .. हो की नाही ? ;)

  ReplyDelete
 17. Hi Rohan,

  Kasa aahes? Mi tuzha pahila blog vachla hota..tevha tharavle ki mi he sagle follow karen pan ek pan vachnar nahi... ani mi vachle nahit..karan mala purn story ekdum vachaychi hoti :)... Ti mi ata suru karnar aahe... I am really honoured to meet a friend like u on a very unlikely spot of Johor Bahru :).. trying to save our lifes from the instructors.. U take care and keep writing...maze marathi likhan tuzya itke changle nahiye...

  Regards,
  Vishal

  ReplyDelete
 18. मस्तच सफर झाली लडाखची. कुठे फार न धडपडता, बहुसंख्य नियोजित जागा पहून, वेळेचं गणित बऱ्यापैकी सांभाळत तुम्ही सगळ्यांनी ती पूर्ण केली, आणि सुंदर फोटो, भरपूर माहिती अस्स मस्त सफरनामा तयार झालाय. या सगळ्यात इतका गुंतलेला असतानाही तू तटस्थपणे काय जमलं, काय राहिलं याचा आढावा घेतला आहेस. सहीच!

  इ-बुक पूर्ण झालं का?

  ReplyDelete
 19. धन्यवाद विशाल ... :) अवर्जुन लिहिल्याबद्दल.

  ReplyDelete
 20. गौरी .. इतके सर्व १-२ दिवसात वाचून काढलेस .. खरच धन्यवाद ... :)

  मोहीम बऱ्याच अंशी यशस्वी झाली. 'इ-बुक'ला ज़रा मुहूर्त मिळत नाही आहे. पण फेब्रुवारी मध्ये येइल बहुदा.

  ReplyDelete
 21. रोहनराव !! नमस्कार !!

  मी अमोल नाईक, आपण राजा शिवाजी च्या फोटो प्रदर्शनात भेटलो होतो !!
  आठवलं का ??

  काय लिहिलयस पठ्ठया !! जिंकलंस लेका !!
  आज सकाळी ऒफ़िसला आल्यापासून सगळा सफ़रनामा वाचून काढला !!
  कसलं सही लिहिलं आहेस अरे !!
  मला तुझ्या टीमचा एक सदस्य असल्यासारखं वाटत होतं ... आणि सोबतीला फोटो आणि व्हिडीओ... झक्कास्स !!!!

  पुण्यात आलास तर सांगशील ... आपण नक्की भेटू मित्रा !!

  माझ्या मनातल्या सुप्त विचारांना(लेह-लडाख बाईक सफ़र) हवा दिल्याबद्दल धन्यवाद !!!
  --
  अमोल नाईक
  मोबाईल : ०९८८१४९३३०३

  ReplyDelete
 22. अमोल... नाव लक्ष्यात आहे.. चेहरा मात्र लक्ष्यात नाही. क्षमस्व... सर्व लिखाण एकसाथ वाचून काढलेत आणि आपल्याला आवडले हे ऐकून आनंद झाला. :) पुण्याला अध्ये मध्ये येणे होतेच... :)

  ReplyDelete
 23. केव्हढं धाडसाचं काम होतं हे नाही का? मला एकदम अभिमानाच वाटतोय बाबा तुमचा सगळ्यांचा! आणि तुमच्या मराठमोळ्या झाशीच्या राण्यांचा! :D

  ReplyDelete
 24. Aaj office madhe basun sakalpasun ha blogach vachatey -
  ka kon jane ha shevatacha bhag vachatana ekdum dole bharun aale - shaletlya shevtachya diwashi jasa feeling asata na manat ki aata udyapasun shala nahi mhanun potat ek khadda padato tasa kahisa vattay -
  Hats off to you Rohan and your team
  Its been a privilage to read your blog

  ReplyDelete
 25. Rohan,

  Mast lihililela Safarnama Ahe ha... Mazyasarkhya Bhatkyasathi ekdam upyukt.. Ebook kadhale asashil tar link pathaw ani saglya jaganche patte ani contact numbers sudha.

  Punha jar plan karnar asashil tar I am in from delhi :)

  ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...