Thursday 3 December 2009

लडाखचा सफरनामा - ये दिल्ली है मेरे यार ... !

'संपतोय की नाही' असे वाटणार्‍या त्या दिवसाचा अखेर काळ पहाटे ४ वाजता अंत झाला होता. त्यानंतर बिछान्यावर पडल्या पडल्या मला झोप लागली. पण तासाभरात पहाटे ५ वाजता कसल्याश्या वासाने मला श्वास गुदमरून जाग आली. बघतो तर काय... माझ्या अवघ्या मीटरभर बाजूला एसीच्या पॉवरसप्लायमधून प्रचंड धूर निघत होता. संपूर्ण खोली धुराने भरली होती. काही क्षणात तो आता पेट घेईल अशी वेळ आली होती. मी पटकन शमिकाला उठवले आणि सर्व सामानघेउन खोली बाहेर पडलो. सकाळी लगेच निघायचे असल्याने सर्व सामान बॅगेतच होते. बाजूच्या खोली मधून अमेय आणि कुलदीपला उठवून शमिकाबरोबर थांबायला सांगितले आणि मी पुन्हा खिडक्या उघडायला खोलीत शिरलो. त्या २-३ मिन. मध्ये धूर इतक्या प्रमाणात वाढला होता की आतसुद्धा जाता येत नव्हते. मी तसाच मागे आलो आणि वॉचमनला बोलवायला गेलो. ते दोघेतिघे आले आणि मग खालून मेन पॉवरसप्लाय कट केला तेंव्हा कुठे धूर यायचा थांबला. आम्ही मग दुसर्‍या खोलीत झोपायला गेलो. तास-दोनतास झोपून लगेच उठलो आणि आवरायला लागलो. ९ वाजता आम्हाला दिल्लीसाठी निघायचे होते ना.

कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. मी आज गाडीमध्ये बसायचा निर्णय घेतला आणि बाइक आशिषने घ्यायचे ठरले. निघायच्या आधी कुणाल आम्हाला भेटायला आला होता. त्याला खरंतर आम्हाला चंदिगढ फिरवायचे होते पण आम्हाला ते काही जमले नाही. त्याला टाटा करून हॉटेल वरुन निघालो आणि सर्वांनी गरजेपुरते पेट्रोल भरून घेतले. आणि मग सुरू झाला शेवटच्या २०० किमी.चा प्रवास. सकाळी निघताना नाश्ता केला नव्हता आणि लंचला कुठे थांबणार नव्हतो म्हणून एक 'ब्रंच' करायचे ठरले. अंबाला येथे हायवेलाच 'सागररत्न' म्हणून एक मस्त साउथ इंडियन हॉटेल आहे. तिकडे तासभर फूरसत मध्ये जेवलो. काहीच घाई नव्हती कारण दुपारी ४ पर्यंत दिल्लीगाठून 'इंडियागेट'ला पोचणे सहज शक्य होते. आम्ही कुरुक्षेत्र - पानिपत - सोनिपत पार करत वेगाने दिल्लीकडे सरकत होतो. खरं तर ह्या ठिकाणी सुद्धा जायचे होते मला. पण वेळे अभावी ते शक्य नव्हते. ४ वाजता आम्ही बरोबर आय.एस.बी.टी. (ISBT) पार करत दिलीमध्ये प्रवेश केला आणि आमचे स्वागत करायला वादली वारा आणि प्रचंड पावसाने तिकडे हजेरी लावली. पाउस अस्सा लागला की काही मिन.मध्ये सगळीकडे प्रचंड ट्रॅफिक जमले आणि पुन्हा एकदा आमच्या वेळेचा बोजवारा उडाला. बायकर्स कुठे आहेत? आपण कुठे आहोत याचा काही-काही पत्ता लागत नव्हता. ट्रॅफिक मध्ये २-३ तास असेच वाया गेले. अंधार सुद्धा पडला आणि 'इंडिया गेट'ला पोचायची शक्यता धूसर झाली.

८ वाजायच्या आधी आम्हाला बाइक्स स्टेशनला नेउन लोड करणे सुद्धा गरजेचे होते तेंव्हा आता सर्व बायकर्सनी थेट दिल्ली स्टेशन गाठायचे आणि गाडीने चाणक्यपुरी मधले  व्हाय.एच.ए.आई. (YHAI) गाठायचे असे फोनवर ठरले. मध्ये एकेठिकाणी राजपुताना रायफल्सचे मुख्यालय दिसले. देशाचा झेंडा हातात घेउन कारगिल युद्धात विजयश्री खेचून आणणार्‍या जवानांचे स्मारक पाहून गेल्या १२ दिवसांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. तिकडून मी गाडी घेऊन चाणक्यपुरीला पोचलो आणि जागा ताब्यात घेऊन सामान सेट केले. एव्हाना अभी, अमेय, आशिष, कुलदीप आणि आदित्य दिल्ली स्टेशनला बाइक्स लोड करायला पोचले होते. आमच्या बाइक्सचे पेपर्स नेमके माझ्याकडे असल्याने मला पुन्हा ते घेउन स्टेशनला जाणे भाग होते. शिवाय मला आणि शमिकाला तिच्या मामाकडे सुद्धा जायचे होतेच. मग आम्ही पुन्हा निघालो त्या ट्राफिक मधून रस्ता काढत. ह्यावेळी गाडी नव्हती, निघालो होतो रिक्शा मधून. कसेबसे ते स्टेशनला पोचलो. फोन वर, 'अरे इकडे SBI ATM च्या बाजूला उभा आहे रे, झाड, एक मोठे झाड दिसते का?' असे लैंडमार्क शोधत-शोधत भेटलो त्यांना. पेपर्स दिले आणि मामाकडे जाउन येतो म्हणुन तिकडून निघालो. विकासपुरीला मामाकडे पोचलो. त्यांना भेटलो. शमिकाला तिकडेच रहा आज. उदया सकाळी मी परत घ्यायला येइन, असे सांगून मी निघालो पुन्हा चाणक्यपुरीला यायला निघालो. ११ वाजता पोचलो तेंव्हा सर्वजण बाईक्स लोड करून पोचले होते. आता अखेरच्या सामानाची बांधाबंध सुरू झाली. 'अरे हे तुझे इतके दिवस माझ्याकडे पडले आहे. हे घे.' 'माझे नहीं आहे रे ते, कोणाचे काय-काय उचलतोस तू. तुलाच लक्ष्यात नसते' असे करत करत प्रत्येकाने आपापले आणि बहुदा काही दुसऱ्याचे सुद्धा सामान बांढले. मोजुन १-२ असलेल्या चार्जिंग पॉइंट्सवर बरेच मोबाएल वेटिंग वर होते. 'बास झाल रे इतका घरी जाईपर्यंत. आता हा लाव चल.' असे करता करता १ वाजून गेले. अर्धे झोपले म्हणुन मी आणि अभी लैपटॉप घेउन खोली बाहेर बसलो होतो. मी माझी आणि शमिची टिकिट्स बदलून संध्याकाळची करून घेतली.


पहाटे ३:३० वाजता सर्वांचा पुन्हा एकदा गलका सुरू झाला. पहाटे-पहाटे फ्लाइट्स असल्याने ४:३० पर्यंत निघणे आवश्यक होते. ४ वाजता बाहेर पडलो. जायच्या आधी साधनाने सर्वांचे बाइट्स रेकोर्ड करून घेतले. त्या सर्वांना सोडून मी, साधना आणि उमेश परत खोलीत येउन पडलो. साधना आणि उमेश ज़रा उशिराने दुसऱ्या फ्लाइटने जाणार होते. ते सुद्धा पहाटे ६:३० नंतर निघाले. जाता-जाता ते इंडियागेट वर काहीवेळ थांबून एक क्लोसिंग शोट घेउन मगच पुढे जाणार होते. ते दोघे गेल्यावर मात्र मला तिकडे १ क्षण सुद्धा जड जात होता. इतक्या दिवसात अश्या शांततेत एकता राहणे हे काय असते ते माहीत नव्हते ना. तिकडे ते १० जण एकाच फ्लाइटमधून मुंबईला निघालेले. काय गोंधळ घातला असेल फ्लाइटमध्ये देवजाणे. मी माझे सामान बांधले, चेकआउटच्या फ़ोर्मालिटीज पूर्ण केल्या आणि विकासपुरीला पोचलो. तिकडून दुपारच्या फ्लाइटने मी सुद्धा संध्याकाळपर्यंत १४ दिवसाच्या प्रवासानंतर 'जिवाची मुंबई' करत मुंबईला पोचलो. १४ दिवसांच्या एका अविस्मरणीय अश्या प्रवासानंतर मनात खुप विचार सुरू होते... आजही आहेत... आणि  पुढेही राहतील... ते विचार अजून तुमच्या समोर लिहायचे आहेत. तेंव्हा भेटूया लडाखचा सफरनामाच्या शेवटच्या भागात ... मोहिमेचा सारांश घेउन ...
.
.
.
अंतिम भाग : लडाखचा सफरनामा - सारांश .. अर्थात माझ्या मनातला ... !
.
.
.

5 comments:

  1. sahiiiiiiiii :)
    pan aata rukhrukh lagun rahtie... itke diwas roj post chi vaat pahayche, aata last post aani mag sampla !

    neways tumcha paraticha pravasahi kahi kami dhadasi nahie... mala next trip che details de na :)

    ReplyDelete
  2. थोड़ी रुखरुख मला सुद्धा लागली आहे पूनम. पण काळजी नको. हा सफरनामा संपला म्हणजे काय ब्लॉग संपत नाही आहे. ;) पुन्हा एकदा आपली सह्यभ्रमंती घेउन भेटुच की. त्या ब्लॉगकडे २ महीने दुर्लक्ष्य झाले आहे. :(

    ReplyDelete
  3. Can’t wait…..सारांशाचा पोस्ट लवकरात लवकर येऊ दे.......

    हे सर्व वाचताना “लडाखचा सफरनामा” संपणार याची बोचणारी जाणीव होतेय.....जर वाचताना ही आमची अवस्था असेल तर तुम्हा सर्वांची ही 13-14 दिवसांची भ्रमणयात्रा संपवताना काय अवस्था झाली असेल याची पुसटशी कल्पना येतेय....खरंच आयुष्यातले काही क्षण तिथेच थांबून रहावेत असे असतात नाही का?? जगायला पुन्हा पुन्हा नवी उमेद देणारे......

    ReplyDelete
  4. खरे सांगायचे तर नेमके काय वाटत होते ते मला किंवा फार तर अभिलाच माहिती ... असो ... उदया हा सफ़रनामा संपलेला असेल ... :)

    ReplyDelete
  5. मस्तच झालाय लडाखचा सफरनामा. इतक्या अवघड वाटेवरून सगळे जण फारसं न धडपडता, बहुतेक कार्यक्रम पूर्ण करून, वेळेचं गणित बऱ्यापैकी जमवत भटकून आलात, आणि मस्त फोटो आणि इतकी माहिती शेअर केलीत ...
    तू या सगळ्यात इतका गुंतलेला असूनसुद्धा तटस्थपणे काय जमलं, काय राहिलं याचाही हिशोब इथे मांडला आहेस हे भावलं.
    अजून भ्रमंतीचे सफरनामे येऊ देत!

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...