Tuesday 26 January 2010

ट्रेक टू अरावली - राजस्थान ... सुरवात ... !

सलग ४ महीने 'लडाख'वरील लिखाण पूर्ण केल्यानंतर महीनाभर ह्या ब्लॉगला थोडा आराम दिला होता. पण माझा आराम सुरू नव्हता. इतर ब्लोग्सवर 'सह्यभ्रमंती' आणि 'इतिहासा'वरील लिखाण सुरू होते. शिवाय 'खादाडी' चालू होतीच. तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी रिकामेपणा जाणवत होता. आपण सुरू केलेला कुठला ही ब्लॉग थंड पड़ता कामा नये असे सारखे वाटत होते. शेवटी २००८ साली नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये केलेल्या भटकंतीवर लिखाण करायचे ठरवून टाकले. पण बऱ्याच गोष्टी आठवत नव्हत्या तर काही अर्धवट आठवत होत्या. नेमकी त्या दिवशी रात्री उशिराने ऐश्वर्या 'रेघेवर सदृश्य' झाली. म्हणजे 'ऑन-लाइन' आली असे म्हणायचे आहे हो... :) मग काय विचारता ... जवळ-जवळ तासभर तिच्याबरोबर गप्पा टाकल्या आणि आख्खा ट्रेक पुन्हा जागा केला. तर झाले असे होते .... जून २००८ ची गोष्ट. एके दिवशी आमचा खंदा प्लानर अभिजित Y.H.A.I. म्हणजे यूथ होस्टेलच्या ट्रेक्सबद्दल माहिती घेउन आला. "अरे, नोर्थ इस्टचा एक मस्त ट्रेक आहे. जाउया का?" पण माझ्या सुट्टीच्या तारखा आणि ट्रेकच्या तारखा जमत नव्हत्या. पण थंड बसतोय तो अभ्या कसला.. त्याने दुसरी माहिती काढली. "अरे, नोव्हेंबर महिन्यात राजस्थान स्टेटचा पण एक ट्रेक आहे. अरावली - रणकपुर - कुंभळगड़ ट्रेकिंग एक्सपिडिशन २००९.  तो करुया. तारखा पण फिट बसत आहेत." अभि-मनाली आणि मी तयार होतोच. अजून कोण-कोण येणार असे अनेकांना विचारल्यावर 'मी नक्की येणार' असे ऐश्वर्या एका पायावर उड्या मारत म्हणाली. ह्या पोरीला फिरायला आणि खादाडी करायला कधीही कुठेही सांगा. अशीच उड्या मारत तयार. आई शप्पथ.. खरच.. सांगतोय. असे का म्हणतोय ते पुढे-पुढे येईलच... :) माझ्याबरोबर पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड मोहीम केलेल्या आणि नुकत्याच लडाखवरुन परतलेल्या  अनुजाने सुद्धा यायचे नक्की केले. याशिवाय अभिचे संजीव उर्फ़ संजू आणि दिपक हे २ मित्र सुद्धा यायला तयार झाले. संजू हा 'संस्कृत शिक्षक' आहे तर दीपक L.I.C. मध्ये कामाला आहे. अशी एकुण ७ जणांची टिम तयार झाली. आकडा नकी झाल्यावर अभिजितने ट्रेन आणि ट्रेक अश्या दोन्ही तारखा नक्की करून टाकल्या. राजस्थान यूनिटचे 'रतनसिंग भाटी' यांना आम्ही नेमके कुठल्या तारखेला येतोय ते कळवले. आणि सुरू झाली अजून एक भ्रमणगाथा ...


९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता बोरीवली स्टेशनवरुन अरवली एक्सप्रेस पकडायची होती. मी, दिपक, अभिजित आणि मनाली ठाण्याहून संध्याकाळी निघालो. बाकी सर्व थेट बोरीवलीलाच भेटणार होते. कविता आम्हाला ट्रेनवर भेटायला येणार होती. गंमत म्हणजे संध्याकाळ ऐवजी ती सकाळीच ९ वाजता आम्हाला भेटायला बोरीवली स्टेशनला जाउन पोचली. मी सांगताना चुक केली की तिने ऐकताना ते माहीत नाही पण तिला एक हेलपाटा पडला हे नक्की. मग संध्याकाळी ती परत स्टेशनला आली. सर्वजण ९ च्या आसपास बोरीवलीला येउन पोचले होते. काही मिनिट्समध्ये ट्रेन येणार आणि आम्ही आमचा प्रवास सुरू करणार इतक्यात... "मला जाम भूक लागली आहे. ह्या ट्रेनमध्ये रात्री खायला मिळेल का रोहन... आपण काहीतरी खायला घेउन येऊया." - ऐश्वर्या उवाच. मग अभि आणि संजू दोघेजण पुन्हा स्टेशनच्या बाहेर गेले आणि समोसा, ढोकळा असे पटकन संपणारे, भूक भागवणारे पदार्थ घेउन आले. ते आले तरी गाडी काही अजून येत नव्हती. न राहून ते पदार्थ हादडणार तितक्यात गाडी आली. कविताला टाटा केला आणि आम्ही प्रवासाला सुरवात केली. ट्रेनमध्ये दिल्लीच्या मनोमयी दीदी सुद्धा होत्या. 'मनोमयी दीदी' म्हणजे अभि, संजू आणि दिपकच्या YHAI ट्रेक फ्रेंड. त्या महाराष्ट्र यूनिटच्या ट्रेकवरुन राजस्थान आणि मग तिकडून आपल्या घरी दिल्लीला जाणार होत्या. आता आम्ही ८ जण असल्याने एक आख्खा बर्थ आमचाच होता. तेंव्हा तंगडया पसरल्या आणि गप्पा टाकत बसलो. त्या सोबत खादाडी सुरू झालीच होती. चांगले १२-१५ समोसे होते आणि ढोकळा अर्धा किलो तरी होता वाटते. या शिवाय अनुजाने घरून कोलंबी भात बनवून आणला होता तर दिपकने बोंबिल फ्राय. आयला आता हे माहीत असते तर समोसा ढोकळा आणला असता का? मग काय ... आम्ही तर सुटलो होतो. मी आणि ऐश्वर्या, त्यात अनूजा आणि संजू म्हणजे कसली तगडी टिम होती विचार करा.



खाता-खाता अनुजा लडाख बद्दलच्या गोष्टी सांगत होती तर मध्येच दिपक-अभि-संजूच्या 'हर की दुन'च्या गोष्टी सुरू व्हायच्या. इतके खाल्ले तरी काही समोसे आणि बोंबिल फ्राय उरले. ते एका बैग मध्ये ठेवून खिडकीच्या मध्ये ती लटकवली. आजुबाजुला बसलेले लोक जसे आडवे व्हायला लागले तसे आम्हाला सुद्धा आवाज खाली करावे लागले. उगाच बाकीच्यांना कशाला त्रास नाही का.. आम्ही सुद्धा आडवे झालो. मी आणि अभि समोरा-समोर अप्पर बर्थ वरती झोपलो होतो. पहाटे ३ वाजताच मला जाग आली. (रोहणा ... अजिबात बोलू नकोस कोणाला की तूला अवघ्या ३ तासात भूक लागुन जाग आली) हाताशी जवळच लटकवून ठेवलेल्या समोश्याच्या पिशवीमध्ये हात घालतो तोच अभि जागा झाला. 'भूक लागली आहे ना रे. दे मला पण एक समोसा.' मी बघतच बसलो. अभ्याचे हे रूप मला नवीन होते... समोसा खाल्यावर आम्ही पुन्हा झोपी गेलो. पहाटे अबू रोड आसपास ट्रेन येता-येता आम्ही जागे झालो पण अनुजा मात्र उठून पुन्हा बसल्या-बसल्या लुडकली होती. स्टेशनवर उतरलो तर सगळीकडे 'रबडी' आणि 'पापडी चाट'वाले दिसत होते. हातात वेळ नव्हता म्हणुन ती संधी हुकली आणि गाडी अबूवरुन 'फालना'ला निघाली. आम्हाला फालना वरुन 'रणकपुर'ला जायचे होते. तिकडून पुढे मग ट्रेक होता. आम्ही फालनाला पोचल्याची वर्दी रतनसिंग भाटी यांना दिली आणि एका जीप मधून रणकपूर जैन मंदिराजवळ असलेल्या बेसकैंपला पोचलो. तिकडे मुंबईचे काही लोक भेटले. ते ट्रेक पूर्ण करून परतत होते. आम्ही सामान लावले, जेवून घेतले आणि गप्पा मारात बसलो. संध्याकाळी 'रणकपूर जैन मंदिर' बघायला गेलो. 'एक्लमटायझेशन' म्हणजे वातावरणाशी समरस होण्याचा तसा काही प्रश्न नव्हता. तासभर मंदीर बघून कैंप वर परत आलो. ग्रुप मधल्या इतर लोकांशी ओळख करून घेतली. कोणी बंगालमधले तर कोणी गुजरात, कोणी दक्षिणात्य तर कोणी उत्तरेकडचे. १८ एकजण होते एकुण. त्यात आम्ही ७ जण 'जय महाराष्ट्र' होतो. YHAI चे हे एक मस्त असते. अनेक विविध ठिकाणच्या लोकांशी ओळखी होतात. नव्याने बरीच माहिती कळते. अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे YHAI च्या कुठल्या ही कैंपला 'कैंपफायर' होत नाही. लाकडे कधीच जाळली जात नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण एकत्र जामुन.. 'फायर..फायर..कैंपफायर..' असे म्हणुन फारतर एखादी मेणबत्ती पेटवून कैंपफायरला सुरवात करतात. आजच्या गप्पांना काही मज्जा आली नाही. ग्रुप मधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) आधीच गुडुप झाले होते. आम्ही तासभर दंगा केला आणि १० वाजता आपापल्या टेंट्स मध्ये जाउन बत्ती गुल केली. पण झोप लागेल तर ना... का विचारताय... घोरण्याची कोंपिटीशन सुरू होती तिकडे. अशी की आता घोरण्यात सुद्धा जोरदार भांडतील की काय. डोके उठले होते अक्षरश:. ह्यांच्या बरोबर ५ दिवस राहायचे... एका टेंट/ खोलीत झोपायचे? च्यामारी... बघुया पुढे पुढे काय होते ते...
.
.
पुढील भाग : ट्रेक टू अरावली - मालघाट मार्गे फूटादेवल ... !
.
.

8 comments:

  1. pudhchya mahinyat yach bhagat firayla janar ahot. trek sathi wel nahi pun ata pudhcha bhag wachaychi utsukta ahe.

    tumchi sahybhramanti va photo chan ahet. tyachi saglyachi milun ek link kinwa pustak tayar hoeel

    aplyakade ya gadana ajun prasiddhi milayla pahije ase watte

    ReplyDelete
  2. माधुरी ... आपले ब्लॉगवर स्वागत.. ह्या भागात जाणार असाल तर कुंभळगड़ नक्की बघा. पुढच्या भागात मी लिहेनच...

    ReplyDelete
  3. रोहन, सहीच रे. मस्तच सुरवात झाली. आणि खादाडी सुरवातीपासूनच जोरात.....:) वाचतेय.

    ReplyDelete
  4. sahi re :) ha blog vachayla farach aavdato mala :)
    aani ha trek kasa aahe re? we might plan to go for this now:)

    aani ho, aata salag ch yeu det, khanda padu nakos :)

    ReplyDelete
  5. भाग्यश्री ताई .. हा ट्रेक कमी आणि खादाडी जास्त होती.. :) खादाडी ब्लॉगवर लिहू की काय असे वाटते होते एकदा ... :D

    ReplyDelete
  6. ट्रेक एकदम सोप्पा आहे... जाणार असशील तर तूला अजून माहिती देतो...

    ReplyDelete
  7. सुरूवात तर सहीये...लगोलग पुढचा भाग वाचते आता...
    पुढच्या वेळेस समोसा, बटाटेवडे खाल्ले तरी लिहीत जाउ नकोस .....त्याऐवजी तुझे ते पारले-जी बरे होते....

    अरे राजस्थान ट्रीप हुन आल्यावर माझे आजोबा (ज्यांनी कायम संयम म्हणजे काय हे उदाहरण ठेवले होते रे...अगदी ईडली, वडे वा तत्सम पदार्थ ही त्यांना मोहात पाडू शकत नव्हते!!!) देखील खादाडी वर बोलले होते....तेव्हा तू तर जाम सुटणार आहेत या ट्रेकच्या (खादाडी)पोस्ट मधे .............

    ReplyDelete
  8. अरे वा... अग काही विचारू नकोस ... एक सो एक खादाडी झाली आहे ह्या ट्रेकमध्ये .. तेंव्हा आगे आगे देखो ... खाता हू क्या... हेहेहे

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...