कालच्या थोड्या विश्रांतीच्या दिवसानंतर लडाख मध्ये समरस होत आलो होतो. आज एक मोठे लक्ष्य गाठायचे होते. जगातील तिसरा सर्वोच्च रस्ता 'चांग-ला' (१७५८६ फुट) फत्ते करून भारत - चीन सीमेवरील 'पेंगॉँग-त्सो'चे सौंदर्य अनुभवायचे होते. 'त्सो' म्हणजे तलाव. लडाखमधल्या प्रेक्षणीय स्थळापैकी महत्वाचा असा हा लेक आज आम्ही बघणार होतो. पहाटे-पहाटे ४:३० वाजता उठलो आणि आवरा-आवरी केली. चहा-कॉफी बरोबर ब्रेड-बटर पोटात ढकलले. ५ ला निघायचे होते ना. पण सर्वांचे आवरून गेस्टहाउस वरुन निघायला ५:४५ झाले. तसा फ़क्त ४५ मिं. उशीर झाला होता पण ही ४५ मिं. आम्हाला चांगलीच महागात पडणार होती. का म्हणताय... पुढे कळेलच की. अजून एक मिनिट सुद्धा न दवडता आम्ही पुन्हा एकदा मार्ग घेतला मनालीच्या दिशेने. आज मी - शमिका, अमेय म्हात्रे - पूनम आणि अमेय - दिपाली सर्वात पुढे होतो. आमच्या मागुन अभि - मनाली आणि आदित्य - ऐश्वर्या येत होते. सर्वात मागे होती आमची गाड़ी. कालपासून आम्ही गाडी बदलली होती. नवा ड्रायव्हर लडाखी होता.
६:१५ च्या आसपास पुन्हा एकदा शे आणि ठिकसे गोम्पा पार करत आम्ही 'कारू'ला पोचलो. चीन सीमारेषेपर्यंत जाणाऱ्या ह्या मार्गावरची ही पहिली चेक पोस्ट. पहाटे-पहाटे आम्ही तेथे पोचलो तेंव्हा सर्व जवान परेडसाठी निघाले होते. आर्मी ग्रीन कलरचे वुलन जॅकेट आणि वुलन कैपमध्ये ते सर्वजण एकदम स्मार्ट दिसत होते. तिथून पुढे निघालो आणि थोड़े पुढे जातो न जातो तो मागुन अमेय साळवी आम्हाला जोरात हार्न देऊ लागला. मी थांबलो पण अमेय म्हात्रे बराच पुढे निघून गेला होता. मला वाटले बाइकला परत काही झाले की काय. पण नाही, अभीने मागुन फोन केला होता की परमिट क्लिअरन्ससाठी त्याला पुन्हा कारू पोस्टला मागे जावे लागेल. बायकर्सना थांबवले नव्हते आर्मी पोलिसांनी मात्र त्यांनी गाडी अडवली होती. अमेय म्हात्रे तर पुढे निघून गेला होता पण मी आणि अमेय साळवी तिकडेच थांबलो. आमचे बाइक नंबर्स अभीकडे असल्याने आम्हाला मागे जायची गरज नव्हती. बराच वेळाने पुढे गेलेला अमेय म्हात्रे परत येताना दिसला. बहुदा त्याला आणि पूनमला कळले असावे की अरे.. आपल्या मागुन तर कोणीच येत नाही आहे. ६ की.मी पुढे जाउन म्हणजे जवळ-जवळ 'शक्ती'पर्यंत पुढे जाउन आला तो. ७ च्या आसपास मागुन सर्वजण आले आणि मग आम्ही पुढे निघालो. जास्तीत जास्त वेगाने पुढे सरकून वेळ कव्हर करायची हा आता आमचा प्रयत्न होता.
काही मिनिटांमध्ये १३५५० फुट उंचीवर 'शक्ती' या ठिकाणी पोचलो. अमेय इकडूनच तर परत आला होता. आणि याच ठिकाणाहून सुरू होतो जगातील तिसरा सर्वोच्च पास. 'चांग-ला' रस्ता फोटू-ला इतका चांगला नसला तरी नमिके-ला सारखा खराब सुद्धा नव्हता. पहिलाच नजारा जो समोर आला तो बघून तर मी अवाक होतो. दूरपर्यंत जाणारा तो सरळ रस्ता टोकाला जाउन डावीकडे वर चढत जात होता आणि चांगला ३-४ की.मी.चा U टर्न घेउन मागे फिरत होता. साधना आणि उमेश गाडीमध्ये होते. आधीच उशीर झाल्याने जे जे शूटिंग करायचे आहे ते जास्तीत-जास्त पुढे जाउन उरकायचे होते त्यांना. उमेशला बायकर्सचे रायडिंग शॉट्स सुद्धा घ्यायचे असल्याने तो मध्येच गाडी थांबवायचा. हा ड्रायव्हर चांगला होता. हवी तशी गाडी मारत होता. सर्वजण एकाच पेस मध्ये कुठेही न थांबता बाइक्स दामटवत होते. माझ्यामागून शमिकाची आणि अभीच्या मागुन मनालीची धावती फोटोग्राफी सुरू होती पण अमेय आणि कुलदिप यांना मात्र फोटो घ्यायला थांबावे लागायचे. पण मग तो गेलेला वेळ ते कव्हर करायचे. तो एक मोठा U टर्न मारून आम्ही थोडे वर पोचलो. बघतो तर काय ... अजून तसाच एक U टर्न. आधीचा डावीकडे होता आणि हा उजवीकडे इतकाच काय तो फरक. आणि तो U टर्न चढून वर गेलो की पुढे अजून एक डावीकडे वळत जाणारा प्रचंड असा C टर्न. मनात म्हटले हा 'चांग-ला' चांगलाच आहे की. मागच्या बाजूला दुरवर शक्ती गावाबाहेरील शेती दिसत होती. मनोहारी दृश्य होते ते. आजुबाजुला सर्व ठिकाणी ना झाडे ना गवत पण बरोबर मध्यभागी हिरवेगार पुंजके.
ते दृश्य मागे टाकुन आम्ही पुढे निघालो. दुसऱ्या U टर्नच्या मध्ये आपण पोचतो तेंव्हा आपण १७००० फुट उंचीवर असतो. ह्याच ठिकाणी 'चांग-ला'ची पहिली चेकपोस्ट लागते. 'सिंग इज किंग' असे लिहिले आहे इकडे. २ सिख लाइट इंफंट्रीचे (सिखली) एक प्लाटून स्थित आहे. इथपासून रस्ता थोडा ख़राब आहे. कितीही वेळा रस्ता बनवला तरी बर्फ पडला की सर्व काही वाहून जाते आणि परिस्थिति जैसे थे. तेंव्हा BRO ने इकडे रस्ते किमान ठिकठाक करून ठेवले आहेत. जसजसे वर-वर जात होतो तसा रस्ता अजून ख़राब होत जात होता. मध्येच एखाद्या वळणावर बाइक वाहत्या पाण्यामधून घालावी लागायची तर कधी पाण्यामुळे वाहून गेलेल्या खडबडीत रस्तामधून. असेच एक डावे वळण लागले. वाहत्या पाण्यामधून डबल सीट बाइक टाकणे सेफ वाटले नाही म्हणुन शमिकाला उतर बोललो. घाटामध्ये अश्या वाहत्या पाण्यामधून बाइक टाकायची असेल तर जास्तीत जास्त खबरदारी घेतलेली बरी नाही का..!! उजव्या बाजूने रापकन बाइक काढली आणि मग पुढे जाउन थांबलो. बाकीचे सुद्धा सिंगल सीट तेवढा भाग पार करून आले आणि मग पुढे निघालो. 'शक्ति' पासून सुरू झालेला चांग-ला संपतच नव्हता. एकामागुन एक U टर्न आणि चढतोय आपला वर-वर. कारूपासून निघून ४३ किमी. अंतर पार करून पुढे जात-जात अजून २ मोठे U टर्न पार करत आम्ही अखेर चांग-ला फत्ते केला. उंची १७५८६ फुट. फोटू-ला मागोमाग गाठलेली सर्वोच्च उंची. तो क्षण अनुभवायला आम्ही थोडावेळ तिकडे थांबलो.
वर पोचल्या-पोचल्या दिसला तो इंडियन आर्मीने लावलेला बोर्ड. १७५८६ फुट उंचीवर काय करावे आणि काय करू नये हे त्या बोर्डवर स्पष्टपणे लिहिले आहे. वरती चांग-ला बाबाचे मंदिर आहे. येथे असणाऱ्या सर्व जवानांचे आणि येणाऱ्या सर्व पर्यटकांचे चांग-ला बाबा भले करो अशी मनोकामना येथे आर्मीने केली आहे. २ सिख लाइट इंफंट्रीचे अजून एक प्लाटून वरती आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी इकडे सर्व सोई आहेत. शौचालय आहे, वैद्यकीय सुविधा आहे. खायला हवे असेल तर इकडे एक छोटेसे कॅंटीन आहे. चहा मात्र आर्मीतर्फे मोफत दिला जातो. अर्थात बिनदुधाचा बरं का.. त्या ठिकाणी दूध आणणार तरी कुठून नाही का!!! बाजुलाच एक छोटेसे शॉप आहे. तिकडे पेंगोंग संदर्भातले काही टी-शर्ट्स, कप्स, मिळतात. आम्ही सर्वांनी आठवण म्हणुन काही गोष्टी विकत घेतल्या. तिकडे हरप्रीत सिंग नावाचा जवान होता. त्याच्या बरोबर थोडावेळ गप्पा मारल्या. गेल्या २ वर्ष ते सर्वजण तिकडे आहेत. फारसे घरी गेलेले नाहीत. दिवाळीच्या आधी तो घरी जाणार आहे. चांगली २ महीने सुट्टी आहे. खुशीत होता तो. आम्हाला सांगत होता. "बास. अब कुछ दिन और. ३ गढ़वाल आके हमें रिलीफ करेगी. फिर मै अपने गाव जाऊंगा छुट्टी पे." त्याला शुभेच्छा दिल्या आणि परत येताना भेटू असे म्हणुन तिकडून निघालो. आता लक्ष्य होते चुशूल येथील 'तांगत्से' पार करून 'पेंगॉँग-त्सो' गाठणे ...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - १५००० फूटावरील पेंगॉँग-त्सो ... !
.
.
.
१७५८६ फूट, हम्म्म......खूपच हाईटवर होतात की. तुम्हा कोणाला ऒक्सिजनचा त्रास झाला नाही हे बरे झाले. दोन्ही यू टर्नस मध्ये दोन वेगवेगळी व मनोहरी दृष्ये दिसली.:) हरप्रीत सींग दोन वर्षे घरी गेला नाही:( किती खूश असेल आता तो. उद्याची पोस्ट येऊ दे लवकर.
ReplyDeleteचांग-लाच आहे.
ReplyDeleteभानस ताई... खरच अजिबात त्रास झाला नाही. आश्चर्य आहे. आम्हाला सुद्धा वाटले होते होइल म्हणुन. :)
ReplyDeleteपंकज ... 'चांग-ला' चांगलाच किलर होता... :D