
लडाख मोहिमेच्या १३ दिवसांच्या आणि त्या आधीच्या तयारीचा सफरनामा मी अगदी मोकळेपणाने मांडला. पण आज थोड़े मनातले लिहायचे म्हटले आहे तर विचार काही करून कागदावर उतरायला तयार नाहीत. डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे नुसती. बघुया किती प्रश्न कागदावर उतरवता येतात आणि किती प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता येतात ते.
अगदीच सुरवात करायची झाली तर.. आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???
आज ३ महिन्यांनी सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे...
कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राद्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत.
ही ब्लॉगपोस्ट संपवायच्या आधी मला खास करून इकडे 'अभिजित'चा विशेष उल्लेख करायला अतिशय आनंद होतोय. गेल्या सर्व पोस्ट्समध्ये त्याने ह्या मोहिमेत किती मोलाची भूमिका बजावली हे वाचक जाणतातच. तरीसुद्धा त्याचा उल्लेख केल्याशिवाय ही पोस्ट संपवणे योग्य ठरणार नाही. ट्रिपच्या प्लानिंगपासून ते ट्रिप पूर्ण होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी त्याने एकट्याने ज्याप्रकारे पेलली (जे फ़क्त त्यालाच शक्य होते) त्यासाठी त्याला खरच हाट्स ऑफ. उगाच आभार वगैरे मानत नाही मी, कारण ते त्याला आवडणार देखील नाही. मी त्याला जमेल तशी मदत करेन असे जरी ठरले होते, तरीपण माझ्या कामाच्या व्यापामुळे ते शक्य तर झाले नाहीच, उलट माझा अधिक व्याप त्याला सहन करावा लागला. त्याने माझ्याकडे कुठलीही तक्रार न करता ट्रिपचाच एक भाग म्हणुन मान्य केला हा त्याच्या मनाचे मोठेपण.

या लेखातून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या ब्लॉग लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की आमचा हा सफ़रनामा तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
आज हा सफ़रनामा संपतोय याचा अर्थ हा ब्लॉगसुद्धा बंद असा होत नाही. ह्या ब्लॉगचे नाव ‘माझे भारत भ्रमण’ असे आहे. तेंव्हा काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात माझी अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन... तो पर्यंत 'टाटा' ...
आज हा सफ़रनामा संपतोय याचा अर्थ हा ब्लॉगसुद्धा बंद असा होत नाही. ह्या ब्लॉगचे नाव ‘माझे भारत भ्रमण’ असे आहे. तेंव्हा काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात माझी अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन... तो पर्यंत 'टाटा' ...
.
.
.