Thursday, 5 November 2009

लडाखचा सफरनामा - 'मनाली'च्या मनातला ... !

लडाखला जाण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्तवेळ हा 'लडाखचा सफ़रनामा' लिहायला लागतोय. काही-ना-काही बारीक-सरिक छोटी-मोठी अडचण येते आहे आणि वेळ जातोय. लिखाणाला वेळ देता येत नाही आहे. असो पण मी लिहित नसलो तरी मागे म्हटल्याप्रमाणे आता आमच्या लडाख मोहिमेमधले एक-एक भिडू त्यांच्या मनातले विचार लिहू लागलेत. अमृता पाठोपाठ आता 'मनाली'ने तिच्या मनातले 'लडाखचे भावविश्व' शब्दबद्ध करून पाठवले आहे. माझ्या हातून सुटलेल्या काही गोष्टी तिने इकडे नेमक्या टिपल्या आहेत.
.
.
.


"गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मधील गोष्ट. आम्ही Y.H.A.I. - 'वाय एच ए आय'च्या कुंभळगड ट्रिपवरुन परतलो होतो. थोडेच दिवस झाले असतील आणि एक दिवस अभि अचानक म्हणाला, "पुढल्या वर्षी जून नंतर आपण लडाख ट्रिप करायची आहे. रोहन आणि माझा कधीपासून विचार आहे, पण पुढल्या वर्षी होऊनच जावूदे." त्यावेळी मनात आनंदाच्या, उत्साहाच्या आणि भीतीच्या कितीतरी भावना एकदम येऊन गेल्या. आम्ही आमचा हा बेत जेव्हा आमच्या मित्र-मैत्रिणींना, घरच्या मंडळींना आणि ऑफीस मधील सहकाऱ्याना सांगितला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देखील हजार प्रश्न उमटून जायचे. जसे, लेह लडाख आले कुठे? भारतात की भारताबाहेर? पासपोर्ट-विज़ाचे काम झाले काय? ट्रेक आहे की ट्रिप आहे? बाइक ट्रिप म्हणजे मनाली तू सुद्दा बाइकवरुनच जाणार का? जमेल का तुम्हाला? लेह लडाख म्हणजे काश्मिरजवळ, मग ते कितपत सुरक्षित आहे? असे एक-ना अनेक प्रश्न. सुरवातीला मला देखील हे प्रश्न पडले, कारण लडाखला आपण फिरायला जाउ, असा मी कधी विचारच केला नव्हता. पण जेव्हा अभि मला म्हणाला की "आपण लडाखला जातो आहोत" तेव्हा मला जाणवला तो त्याचा स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास, की आपण हे करू शकतो. मग मला हे प्रश्न पुन्हा पडले नाहीत."

"साधारणतः जानेवारी ०९ पासून अभिने कामाला सुरवात केली. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाइट्सना भेट देणे, लडाख भागातील माहिती मिळवणे, जायचा-यायचा मार्ग ठरवणे, एकंदर खर्चाचा अंदाज घेणे, अशा एक ना दहा गोष्टी. त्याने गोष्टींचा आढावा घेतला आणि पहिला ई-मेल पाठवला तो या ट्रिपमध्ये सहभागी होऊ ईच्छिणार्‍याची यादी तयार करण्यासाठी. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. "आम्ही यायला तयार आहोत" असे म्हणणार्‍याची संख्या खूप होती, पण प्रश्न होता सुट्ट्यांचा. मग आम्ही 'शिवाजीपार्क'वर भेटायच ठरवले, म्हणजे सगळ्यांच मुद्यांवर बोलता येईल. या भेटीनंतर बर्‍याच गोष्टी ठरल्या. त्यानुसार ट्रिपचा कालावधी जून बदलून ऑगस्ट ७ ते २२ असा पक्का झाला. आधी ठरलेला मार्ग दिल्ली-मनाली-लेह-कारगिल-श्रीनगर-जम्मू असा होता. तो बदलून जम्मू-श्रीनगर-कारगिल-लेह-मनाली-दिल्ली असा ठरला. आधी आमचा प्लान तेथून बाइक्स भाड्याने घ्यायच्या असा होता पण नंतर आपल्याच बाइक्स इथून लोड करायच्या असे ठरले. ( काय आमच्या बाइक्सचे भाग्य!!! नाही???) सहभागी होणर्‍याचा आकडा मात्र सतत बदलत होता. जो आधी २० होता तो कधी १५ तर कधी १० वर यायचा."

"लग्नाआधी आणि लग्नानंतरही ट्रिपची आखणी करताना मी पहिल्यांदाच इतक्या जवळून आभिला पाहत होते आणि त्यातच माझ्या जॉबमुळे मला त्याला पुरेशी मदत करता येत नव्हती. १५ जणांसाठी १५ दिवसांची ट्रिप तिही लडाखसारख्या ठिकाणी !!! हे काही सोप्पे काम नव्हते. त्यातून ट्रिपमद्ये सहभागी होणर्‍याचा प्रतिसाद वेळच्यावेळी नाही आला की अभिला निर्णय घ्यायला उशीर होत असे. मग त्याची चिडचिड होई. पण या गोष्टी होणार याची त्याला जाणीव होती आणि तरीही आपली ट्रिप चांगली होणार असा विश्वासही होता. एक दोनदा त्याने मला बोलूनही दाखवले की रोहन भारतात असता तर बरे झाले असते. अशी ही लडाख बाइक ट्रिप माझ्यासाठी आधीपासूनच सुरू झाली होती. ही बाइक ट्रिप असल्याने पुरेसा सराव असणे गरजेचे होते. जसे सलग काही तास बाइक चालवणे, तितका वेळ बाइक वर मागे बसणे, गाडीमध्ये काही खराबी आल्यास ती दुरुस्त करणे, इत्यादी इत्यादी. म्हणून आम्ही २-४ सराव ट्रिप्स करायचे ठरवले. त्यानुसार आमची पहिली सराव ट्रिप झाली ती 'राजमाची' येथे (आणि तीच आमची शेवटची सराव ट्रिप ठरली) पण तो अनुभव आम्हाला पुरेसा होता."

"जरा विचार करा ट्रिप आधीचे इतके सारे अनुभव मी तुम्हाला सांगू शकते, तर ट्रिपमध्ये आम्ही किती धमाल केली हे सांगायला मला रोहन सारखा ब्लॉगच लिहावा लागेल... नाही!!! घाबरू नका, मी काही ब्लॉग नाही लिहिणार, पण माझे अनुभव थोडक्यात सांगते. मला सांगायला खूप आनंद होत आहे की ही आमची ट्रिप खूप सुंदर झाली आणि आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली. आम्ही श्रीनगर सोडले आणि लडाखच्या दिशेने प्रयाण केले आणि एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले डोंगर.. कधी काळा कातळ, कधी दगड, कधी रूपेरी वाळू असे त्यांचे वेगवेगळे प्रकार. ओसाड वैराण जमीन. या ट्रिप दरम्यान आम्ही अनेक नवीन ठिकाणे पहिली. जसे जोझीला, चांगला, खारदुंगला, फोतुला, रोहतांगला असे पास म्हणजे खिंडी, तिकडची सरोवरे म्हणजे 'त्सो' जसे पॅनगॉँग-त्सो, मोरिरि-त्सो. तसेच तेथील लामांची प्रार्थना मंदिरे एत्यादी. ही ठिकाणे पहाणे जितके सुंदर होते, तितकेच तिथे पोहचणे देखिल रोमांचकरक होते."

"आम्हा सर्व मित्रमंडळींची १५ दिवसांची १५ जणांची अशी ही पहिलीच ट्रिप होती. सगळेच ओळखीचे होते. मित्र किंवा मित्रांचे मित्र. बाइक वरुन फिरताना, वेगवेगळ्या ठिकाणाना भेट देताना एकूणच सुंदर अनुभव होता. या ट्रिपमध्ये मला नवीन मित्र मिळाले आणि जुन्या मित्रांचे नवे पैलू कळले."


"आमच्या या प्रवासाचे काही क्षण अत्यंत हृदयस्पर्शी होते. आम्ही या ट्रिपचा कालावधी ७ ते २२ ऑगस्ट असा ठरवीला, कारण 'ऑपरेशन विजय' जे 'कारगिल युद्ध' म्हणून ओळखले जाते; त्याला जुलै ०९ मधे १० वर्षे पूर्ण झाली. दुसरे विशेष कारण असे की यंदाचा स्वातंत्रदिन आम्ही याच भागात साजरा केला. यामुळे आमच्या प्रवासाला एक ध्येय मिळाले. प्रवासात ठराविक अंतरावर महत्वाच्या ठिकाणी आर्मी चौकया लागायच्या. वाटेत किती वेळा आम्हाला बंदुकधारी जवान, त्यांच्या जीप, कॉनवाय्स, बोफोर्स तोफा असे बरेच काही पाहावयास मिळाले. सकाळच्या प्रहरी एक्सर्साइज़ करताना, उन्हात - वैराण जागी त्याना गस्त घालताना पहिले की माझे डोळे पाणवायाचे. त्याग, देशप्रेम, बलिदान यांसारखे शब्द जे केवळ पुस्तकात वाचले होते, ते प्रत्यक्षात पाहाताना काळीज भरून यायचे. आणि त्याना सलाम करायला नकळत हात वर उठायचे. लडाखवरुन परतल्यावर जेव्हा चिनी घुसखोरीच्या बातम्या कानावर आल्या त्यावेळी मनात एक कळ उठली. कारण आज मला जाणीव आहे की, हा आपलाच / आपल्या भारताचाच भाग आहे आणि त्यावर आक्रमण केले जात आहे. म्हणतात ना...

 अज्ञानात सुख असते, पण जेव्हा गोष्टी ज्ञात होतात, खरी बोच तेव्हाच लागते."


"याच ट्रिप दरम्यान मला स्वतःला उमगले की मी सुंदर फोटो काढू शकते. ट्रिप दरम्यान बाइक चालवण्याचे काम अभिकडे असायचे त्यामुळे कॅमेरा माझ्याकडे असायचा. सुरुवातीला चालत्या बाइक वरुन फोटो काढणे जमायचे नाही. कॅमेरा खाली पडेल / खराब होईल अशी भीती वाटायची. मग मीच बाइक वर स्वतःला सेट करून कॅमेरा नीट हाताळू लागले. आणि मग तर आजूबाजूचा निसर्ग पाहून कॅमेरा आत ठेवावा असे वाटेच ना. पाठीवर सॅक, कमरेला पाउच, डोक्यावर हेल्मेट आणि हातात ग्लॉव्स असतानाही फोटो घेताना हात थांबायाचे नाहीत. अशीही ही आमची 'लडाख बाइक ट्रिप' माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. या आठवणी आम्ही फोटोमधून, डॉक्युमेंटरी मधून साठवून ठेवल्या आहेत. असेच अनुभव पुढे येतील याची खात्री बाळगते. राहून राहून एकाच गोष्टीची खंत वाटते, ही बाइक ट्रिप करायच्या आधी मी माझे ड्राइविंग लाइसेन्स काढायला हवे होते... :( "
.
.
.

7 comments:

  1. अरे किती दिवस लावलेस.. आत्ता घरी आल्यावर वाचलं पोस्ट.. कधी संपवणार प्रवास वर्णन? उत्कंठा जास्त ताणु नये.. :)

    ReplyDelete
  2. काही विचारू नकोस. इकडे सुट्टीमध्ये सर्व लिंक तुटली आहे लिखाणाची. पण आता कामाला आलो की पूर्ण करतो बघ लगेच.. :)

    ReplyDelete
  3. मनाली खरंच खूप मस्त केलंयस शब्दांकन!!! अगदी पूर्वतयारीपासूनचे बरेच बारकावे आले आहेत लिखाणातून.....मी मागेच लिहिलं होतं एवढं सगळं प्लानिंग आणि मग त्याचं एक्सिक्यूशन यासाठी अभिचं खरंच खूप खूप कौतुक आहे.....तुझीही त्याला पुरेपुर साथ आहेच म्हणून तर ते शक्य आहे!!!
    तुझी फोटोग्राफी एस्पेशली तु शूट केलेले व्हिडिओज (रोहनच्या पोस्ट्समधलॆ) खरंच सही आहेत.....
    खरंतर पूर्वतयारी वर एक आणि अक्चुअल ट्रीपवर असे दोन पोस्ट लिहायला हवे होतेस...रादर ब्लॉगच लिहायला सुरूवात कर.... (तुम्ही 15 जणांनी लडाखवर 15 सफरनामे लिहिले तरी वाचायला धम्माल येईल):)
    तुझ्या फोटोग्राफिसाठी व लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छ।!!!!

    ReplyDelete
  4. hey Kharach Rohan, Manali ni tu na lihilela sagla cover kelay :) aani te pan titkyach changlya paddhatine :)

    aani ho, aata tujha post pan yeu det ki :)

    ReplyDelete
  5. अभिचे कौतुक तर आहेच पण मनालीने घेतलेले फोटो आणि व्हिडिओस सहीच आहेत. खास करून माझ्या ब्लॉगला त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. ;)

    पूनम माझे लिखाण येतेच आहे. चांगल्या गोष्टीसाठी थोडी वाट बघावीच लागते.. नाही का.. :D

    ReplyDelete
  6. sahi lihilays bog, ek suchavto; tu commerce graduate ugach jhalis patrakarita karayla havi hotis. mala chakka naharashtra times vachlya sarkha vatat hota...
    keep it up.....
    pudhchya veli me suddha asen tumchya barobar mag pe pan try karen asa blog lihayla.
    to paryant tumche vachto kay :)

    ReplyDelete
  7. manali, khoop chan Blog lihila aahes..
    tumacha experience vachtana Maja aali.
    photo sudha chan aahet......

    manalichi aai

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...