Thursday, 26 November 2009

लडाखचा सफरनामा - 'त्सो-मोरिरी' अवर्णनीय असे ... !

मोहिमेच्या ९ व्या दिवशी अखेर आम्ही लेह सोडून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. जम्मू ते लेह ह्या ४ दिवसाच्या आणि लेह मधील ४ अश्या एकुण ८ दिवसात अनेक अनुभव घेउन आम्ही मनाली मार्गे दिल्लीसाठी निघालो होतो. गेल्या ८ दिवसात कारगिल - द्रास, नुब्रा - खर्दुंग-ला, पेंगोंग - चांग-ला अश्या अनेक ठिकाणी भेट देऊन तृप्त झालेले आम्ही आता 'त्सो-मोरिरी'कडे निघालो होतो. लेह-लडाखला येणारे ९९ टक्के लोक मनालीमार्गे 'सरचू'वरुन लेहला पोचतात. आम्ही मात्र नेमका उलटा मार्ग घेतला होता तो ह्या 'त्सो-मोरिरी'साठी.वाकड्या मार्गाने पुन्हा एकदा चीन सीमारेषेवर जायचे आणि मग तिकडून 'त्सो-कार'च्या रस्त्याने खाली सरचूला उतरायचे असे आमचे ठरले होते.


सकाळी नाश्त्याला सर्वजण हजर झाले तेंव्हा ऐश्वर्याला लक्ष्यात आले की गेले २-४ दिवस झाले तिचा 'चीज'चा डब्बा दिसत नाही आहे. "तूला माहीत आहे का रे?" तिने आदित्यला विचारले. तितक्यात दीदी बाहेर आल्या आणि त्यांनी विचारले, "क्या धुंड रहे हो?" तर अमेय हाताने चौकोनी आकार दाखवत बोलला,"वो त्रिकोणी डब्बा था न. वो कहा है?" आता डब्बा होता चौकोनीच. हाताने त्याने सुद्धा चौकोन दाखवला पण बोलला मात्र त्रिकोणी. मी म्हटले काय रे,"आज इतक्या दिवसांनी विरळ हवेचा त्रास व्हायला लागला की काय? हा.. हा.." असो तो डब्बा काही शेवटपर्यंत मिळाला नाही. बहुदा ऐश्वार्याने रात्री झोपेमध्येच तो संपवला असावा. तिलाच लक्ष्यात नसेल बहुदा. हाहा...

८:३० च्या आसपास आवरून झाल्यावर बाइक्स वर सामान लोड केले. गाड़ीचे काही काम असल्याने आम्ही उशिराने निघणार होतो. मी-शमिका, पूनम, साधना आणि शोभित गाडीमधून जाणार असल्याने मागे थांबलो. शिवाय मला शिवायला दिलेले टी-शर्ट सुद्धा घ्यायचे होते. बाकी सर्वजण बाइक्सवर पुढे निघाले. जाण्याआधी 'नबी'च्या फॅमिलीसोबत एक ग्रुप फोटो काढायला आम्ही विसरलो नाही. गेल्या ५ दिवसात खरच अगदी घरच्यासारखे राहिलो होतो आम्ही इकडे. त्यांचा मुलगा असीम तर आम्हाला सोडायला तयारच नव्हता. शेवटी एका मोठ्या चोकलेटवर आम्ही आमची सुटका करून घेतली.पण त्याने पुन्हा यायचे प्रोमिस आमच्या कडून घेतलेच. गाडीचा ड्रायव्हर तेनसिंग गाडी घेउन गेला. तो आम्हाला मार्केट मध्ये मुख्य कमानी खाली भेटणार होता १०:३० ला भेटणार होता तेंव्हा आम्ही सुद्धा शेवटची धावती खरेदी आटपायचे ठरवले. टी-शर्ट साठी इब्राहीमभाईकडे पोचलो तर ते काही तयार नव्हते. जेवढे होते तेवढे घेतले आणि बाकी  सरळ माझ्या घरच्या पत्यावर पाठवून द्यायला सांगितले. उरली-सुरली कामे आटोपली आणि आम्ही सुद्धा ११ वाजता त्सो-मोरिरीच्या दिशेने निघालो.


-आम्ही निघालोय हे सांगायला अभीला फोन लावतोय तर तो काही लागेना तेंव्हा बायकर्स आतल्या रस्त्याला लागले हे समजुन आले. आता लवकरात लवकर अंतर गाठून बायकर्सना कधी गाठतो ते बघायचे होते. तासाभरात म्हणजे १२ च्या आसपास 'उपशी'ला पोचलो होतो. इकडून एक रस्ता मनाली कडे जातो तर दूसरा 'सुमधो' मार्गे 'त्सो-मोरिरी'कडे. सुमधो च्या मार्गाने आम्ही पुढे निघालो तशी सिंधुनदी पुन्हा आमच्या सोबत यायला निघाली. कधी आमच्या सोबत वहायची तर कधी आजुबाजुच्या डोंगरांना वळसा मारत उलट्या दिशेने वाहत जायची. दुपारी १:१५ च्या सुमारास उपशी - सुमधो मार्गावरील 'गयाक' हे महत्वाचे गाव लागले. पण इकडे काहीतरी खायला मिळेल ही आशा खोटीच निघाली. गाडीमध्ये सोबत जे काही होते ते खात-खात तसेच पुढे निघालो. बायकर्सचा सुद्धा पत्ता नव्हता. किती पुढे निघून गेले होते काय माहीत. फोन सुद्धा लागत नव्हते कोणाचे. इतक्यात २ च्या सुमारास 'कियारी' गावापासून ६ किमी. अंतरावर आमची गाडी बंद पडली. सर्व प्रयत्न करून झाले पण काही केल्या सुरू होईना. १ तास असाच वाया गेला. मागुन दुसरी गाडी पाठवायला आम्ही दुसऱ्या एका गाडीसोबत निरोप सुद्धा धाडला. पण निरोप जाउन दुसरी गाडी यायला किमान ३ तास जाणार ह्या अंदाजाने आम्हाला इकडेच संध्याकाळ होणार हे समजुन आले होते. पुन्हा एकदा वेळेचा बट्याबोळ.



असेच रस्तावर बसलो असताना समोरून आर्मीचा कोन्व्होय येताना दिसला. त्यातील जवानांनी थांबून चौकशी केली आणि पुढे 'कियारी चेक पोस्ट जा' कोणीतरी ते फोन लावून देतील असे सांगितले. मग शोभित मागुन येणाऱ्या एका गाड़ीतून पुढे गेला. आम्ही बाकी सर्व तिकडेच बसलो होतो. इतक्यात मागुन अजून एक ट्रावेल्सची गाडी आली. त्यातला ड्रायव्हर तेनसिंगच्या ओळखीचा होता. त्याने चक्क गाडी चालू करून दिली. स्पार्कप्लग मध्ये काहीसा प्रॉब्लम होता. ३ वाजून गेले होते आणि आम्ही अजून त्सो-मोरिरी पासून बरेच लांब होतो. आता अगदी जेवायला सुद्धा कुठेही थांबणे शक्य नव्हते. गाडी सुरू झाल्यावर पुढच्या १० मिं मध्ये कियारी चेकपोस्टला पोचलो. तिकडे शोभित सुद्धा भेटला. कियारी चेकपोस्टला A.S.C. म्हणजेच 'आर्मी सप्लाय कोअर'चा मोठा बेस होता. सध्या तिकडे Bombay Sapers 128 Field Coy स्थित आहे. तिकडच्या सुभेदारने आमची बरीच मदत केली.२-३ तास आधी मुंबईचे काही बायकर्स सुद्धा इकडून पुढे गेले आहेत असे सुद्धा त्यांच्याकडून कळले. भुकेले बायकर्स सुद्धा इकडे थांबले होते. सुभेदारने दिलेले काजू-बदाम आणि केळी खाऊन मग पुढे गेले होते. पण त्या आधी तो सुभेदार शिव्या द्यायला विसरला नव्हता. 'कयू आतेहो यहाँ? क्या देखने? है क्या यहाँ? नंगे पहाड़? पैसा बहोत है क्या तुम्हारे पास. हम को तो आना पड़ता है लेकिन तुम कयू आतेहो?' उद्विग्न मनाने बोलत होता बहुदा. एकजण धीर करून बोलला 'आपसे मिलने आये है साबजी' तसा एकदम खुश झाला आणि मग काजू-बदाम- केळी. ती स्टोरी ऐकून तिकडून निघालो. आवश्यक फोना-फोनी झाली होती. ३:३० होउन गेले होते. अजून सुद्धा बरेच अंतर जायचे होते. केशर, नुर्नीस अशी गावे मागे टाकत आम्ही 'किदमांग'ला पोचलो. डोंगरांनी आपला रंग आता बदलला होता. काळ्यावरुन आता ते जांभळ्या रंगाचे झाले होते. उजव्या बाजूला सिंधुनदी तर डाव्या बाजूला जांभळ्या रंगाचा सडा पसरला होता. त्यांच्यावरुन ऊन परावर्तित झाले की ते लख-लख चमकायचे.

त्या डोंगरांच्या सोबतीने आम्ही ४:३० च्या आसपास 'चूमाथांग'ला पोचलो. पोटात सणसणीत भूक लागली होती. स्त्याच्या दोन्ही बाजूला २ होटल्स बघून आम्ही 'जेवायला थांबुया' असे बोलायच्या आत तेनसिंगनेच गाडी थांबवली. 'खाना खाके आगे जायेंगे' असे बोलून तो उतरला. आम्ही सुद्धा भुकेले होतो. आता इकडे जे मिळेल ते खाऊन पुढे जायचे होते. नेहमी प्रमाणे माग्गी आणि चावल-राजमा. बायकर्स सुद्धा इकडेच जेवून आत्ताच पुढे गेले आहेत असे कळले. २० मिं मध्ये तिकडून जेवून पुढे निघालो आणि ५ वाजता 'माहे' चेक पोस्ट गाठली. तिकडे एंट्री केली आणि 'सुमधो'कडे निघालो. अर्ध्यातासात 'सुमधो' गावात पोचलो. इकडून एक रस्ता 'त्सो-कार'मार्गे पांग-मनालीकडे जातो तर दूसरा आत 'कार्झोक'ला. ७ वाजायच्या आत 'कार्झोक' म्हणजेच त्सो-मोरिरीच्या काठाला असणाऱ्या गावात आम्हाला पोचायचे होते. अजून सुद्धा चक्क ६० किमी अंतर बाकी होते. पाहिले २५ किमी.चा रस्ता चांगला आहे पण नंतरचा कच्चा आहे असे तेनसिंग बोलला होता. 'अब थोडा संभालके बैठो. मै गाडी भगाने वाला हू. अँधेरा होने से पाहिले हमें कार्झोक पहुचना होगा. नहीं तो एंट्री नहीं मिलेगी' असे बोलून त्याने गाडी सुसाट मध्ये घेतली. चांगला रस्ता कमीतकमी वेळेत त्याला पार करायचा होता. तेनसिंगची बडबड सुरूच होती, 'इस ढलान से निचे जायेंगे तो कैमेरा तयार रखना. त्सो-मोरिरी दिखने वाला है आपको पहिली बार. आप फोटो तो निकालेंगे ही. लेकिन ज्यादा टाइम नहीं है अपने पास.' आता आम्ही कैमरे सरसावून बसलो ते त्सो-मोरिरी च्या पहिल्या दर्शनासाठी. आणि पाहतो तर काय ... निळ्याशार पाण्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरांची रेखीव अशी मांडणी. काही हिमाच्छादित तर काही रांगडे. उघडे-बोडके असले तरी आगळेच असे सौंदर्य. मावळतीच्या उन्हाची एक चादर त्यावर पसरली होती. डोळेभरून ते दृश्य पाहून घेतल्यावर कामेर्यात सुद्धा पकडले आणि पुढे निघालो.





.
.


आता पुढे तर संपूर्ण कच्चा रस्ता होता. माती आणि भुसभुशीत वाळू. वाळूचे एक मोठेच्या मोठे पठारच. एकामागुन एक वेगवेगळे  डोंगर, रस्ते बघत आम्ही जगावेगळे अनुभव घेत होतो. त्सो-मोरिरीच्या वरती डाव्या बाजूला दुरवर आता एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र ढगाने स्वतःचे अस्तित्व बनवले होते. एखाद्या चित्रकाराने स्वतःच्या ब्रशने आकाशात एक चित्र निर्माण करावे असा तो पसरला होता. आम्ही जस जसे पुढे जात होतो तसतसे त्या ढगचे रंग बदलत होते. मावळती बरोबर आता सूर्य सुद्धा त्यात स्वतःचा लालसर रंग भरत होता. काही क्षणात पचिमेकड़े कडा पूर्ण लालसर झाली आणि त्याचे प्रतिबिंब त्सो-मोरिरीमध्ये चमकू लागले. ढगाने आणि पाण्याने स्वतःचे आधीचे रंग बदलत नवे रंग धारण केले. निसर्गाचा तो खेळ बघत बघत आम्ही त्सो-मोरिरी च्या अगदी काठावर पोचलो. पुढे गेलेले बायकर्स सुद्धा इकडेच भेटले आम्हाला. आता त्सो-मोरिरीला शेवटचा वळसा मारत आम्ही 'कार्झोक'कडे निघालो. त्सो-मोरिरी म्हणजेच कार्झोक १५०७५ फुट उंचीवर आहे.



बरोबर ६:५० ला आम्ही कार्झोक चेक पोस्टला एंट्री केली आणि रहायच्या जागेच्या शोधात निघालो. इकडे राहण्यासाठी टेंट्स आहेत हे आम्हाला माहीत होते पण ते ३५००/- (डबल बेड) इतके महाग असतील हे नव्हते माहीत. याचे कारण असे की या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये भारतियाँचे प्रमाण अत्यल्प आहे. येथे सर्व फिरंगी येतात. पुढे कार्झोक गावात स्वस्तात 'होम स्टे' मिळेल असे त्याने आम्हाला सांगितले. पुढे बघतो तर काय... इतक्या आत आडवाटेला १००० च्या आसपास लोकवस्ती असलेले गाव असेल असे आम्हाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. ते सुद्धा स्वतःची बाजारपेठ असलेले. पुढे कार्झोक गावात 'मेंटोक' म्हणुन छोटेसे १ मजली 'गेस्ट हॉउस' सापडले. अवघ्या ४००/- एक खोली. जेवायला सुद्धा बनवून देऊ असे म्हणाले पण शमिका आज जेवण बनवायच्या मुड मध्ये होती. 'तुम्ही फ़क्त सामान दया. आम्ही घेऊ बनवून' असे बोलली. तिला मदत करायला पूनम सुद्धा किचन मध्ये शिरली. बाकी मी, अभी, उमेश, आशिष फोटो ट्रांसफरच्या कामाला लागलो होतो. तर दमलेल्या ऐश्वर्या आणि साधना कधीच झोपी गेल्या होत्या. जेवणाआधी मस्त पैकी चहा-कॉफी झाल्याने सर्वच ताजेतवाने झाले. रात्री १० च्या आसपास शमिका आणि पूनमने बनवलेले चविष्ट जेवण जेवून आम्ही सर्व निद्राधीन झालो. संध्याकाळी त्सो-मोरिरीच्या नितांत सुंदर दर्शनाने पेंगोंगच्या वेळचे दुख्ख थोडे कमी झाले होते. तिकडे नं देता आलेली वेळ इकडे थोड़ी भरून निघाली होती. परतीच्या प्रवासाचा पाहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता उदया लक्ष्य होते काश्मिरला अलविदा करत पांगमार्गे 'सरचू' गाठायचे.
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - त्सो-कार - पांगच्या वाळवंटात ... !.
.
.
.

5 comments:

  1. रोहन फोटोतून दिसणारे सौंदर्यच इतके अप्रतिम आहे तर प्रत्यक्ष पाहताना फारच आनंद वाटला असणारच. गाडी बिघडणे म्हणजे फारच वैताग रे... :( सफर पुन्हा सुरू झालीये आता येऊ दे रे पटापट....:)

    ReplyDelete
  2. होय आता फटाफट दिल्ली गाठायला हवी .. माझी गाडी पुन्हा बंद पडायच्या आधी ... :D

    ReplyDelete
  3. As usual a gr8 post :) pan faaaaar vel ghetlas ya veli !

    Photos Apratim aani ho nisargvarnan pan tya photos na todis tod aahe :) gud work...keep it up :)

    aani aata jast vaat baghayla lau nakos :)

    ReplyDelete
  4. अप्रतिम फोटो आहेत!

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...