ज्या शोर्टकटने तेनसिंग आम्हाला घेउन गेला त्या रस्त्यावरुन त्याची गाडी तर व्यवस्थित निघून गेली; आम्ही मात्र लटकलो. पुन्हा एकदा मागच्याला उतरवत तर कधी बाईक ढकलत वाळू खात-खात आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. किमान १०-१२ किमी.चा फेरा नक्कीच वाचला होता. आता पक्का डांबरी रस्ता लागला. चला आता पुढे तरी नीट मस्तपैकी जाऊ ह्या कल्पनेने मन सुखावले. पण काही कल्पना किती क्षणभंगुर ठरतात नाही...!!! २-३मिन. मध्ये तो सुखद रस्ता संपला आणि त्या पुढचा ३७किमि.चा पांग पर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिशय भयानक अश्या परिस्थितिमध्ये आम्ही पार केला. पूर्ण रस्त्याचे काम सुरू होते. दुपारच्या त्या रणरणीत उन्हात चांगली किलोभर वाळू खात आम्ही पुढे-पुढे सरकत होतो. कधी बाईक सांभाळत तर कधी ती वाळूवरुन कशीबशी न पड़ता सरकवत. एका मोठ्या पठारावरून तो कच्चा रस्ता जात होता. उजव्या आणि डाव्या बाजूने असंख्य छोटे-छोटे रस्ते येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्सनी बनवून ठेवले होते. ज्या जागेवरून ट्रक गेला असेल तिकडची वाळू दाबली गेली असल्याने त्याच जागेवरून आम्ही बाईक पुढे काढत होतो नाहीतर बाईक पूर्णवेळ ढकलतच न्यावी लागेल की काय असे वाटत होते. अखेर एके ठिकाणी आम्हाला उतरावेच लागले. बाईक्स जास्तीतजास्त पुढे नेउन पिलियन रायडरला आम्ही खाली उतरवले. मात्र कुलदीपने अमेय म्हात्रेला बरेच आधी उतरवले असल्याने तो जवळ-जवळ २५० मी. अंतर तरी चालून आला असेल. आल्यानंतर कुलदीपला शिव्या पडल्या हे काही वेगळे सांगायला नकोच ... दुरवर रस्ता वर चढत चांगला होत जातोय असे दिसू लागले आणि आम्ही आमच्या बाईक्सचा वेग वाढवला. पांगच्या ४ किमी. आधी रस्ता पुन्हा एकदा पक्का होत घाट उतरु लागला. खाली दुरवर काही दुकानी आणि गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. आम्ही समजलो.. हुशश्श्श्.. आले एकदाचे पांग.
पांगला गाडी मधून पुढे गेलेले सर्व टीम मेंबर्स भेटले. हातात तसा जास्त वेळ नव्हता पण किमान चहा घेउन फ्रेश झालो. कुलदीप आणि अमेय साळवीच्या बाईक्सना सुद्धा भूका लागल्या होत्या, त्यांची भूक भागवली. उगाच आमच्या बाईक्स निषेध करू नयेत म्हणुन त्यांना सुद्धा थोड़े खायला दिले. थकलेल्या रायडर्स आणि पिलियन रायडर्सनी आपल्या जागा गाड़ीमध्ये बदलल्या आणि अर्ध्यातासात आम्ही तिकडून पुढे सटकलो. अजून सरचू बरेच लांब होते. अंधार पडायला अवघे ३ तास उरले होते. त्याआधी 'लाचूलुंग-ला' आणि 'नकी-ला' पार करणे आवश्यक होते. तासाभरात 'लाचूलुंग-ला' समोर उभा राहिला. फोटू-ला, खर्दुंग-ला, चांग-ला असे एक-सो-एक अनुभव पाठीशी असल्याने लाचूलुंग-लाच्या १६६१६ फुट उंचीला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. तो पार करत आम्ही पुन्हा १००० भर फुट खाली उतरलो आणि लगेच 'नकी-ला' कडे मोर्चा वळवला. ६ वाजत आले होते आणि हवेत आता गारवा जाणवू लागला होता. नकी-ला च्या १५५४७ फुट उंचीवर पोचलो तेंव्हा इतकी थंडी वाढली की मी-शमिकाने बाईक थांबवून जाकेट्स अंगात चढवली. तिकडे मागे अमेयच्या बाईकवर बसलेल्या पूनमने पायात फ़क्त फ्लोटर्स घातल्याचे लक्ष्यात आले. ४ वाजता पांगला असताना ती गाडीमधून बाईकवर शिफ्ट झाली होती ते सुद्धा पायात सोक्स न घालता. आता थंडीने तिचे पाय गारठले होते. माझ्याकडे असलेले शमिकाचे एक्स्ट्रा सॉक्स तिला दिले तेंव्हा कुठे तिच्या जिवातजीव आला.
नकी-ला उतरु लागतो तसे २१ लूप्स समोर येतात. खाली-खाली उतरत जाणारा २१ वळण असलेला हा रस्ता अतिशय सुंदर आहे. पांगच्या वाळवंटामधून इकडे आल्यावर तर हा रस्ता आम्हाला स्वर्गाहून सुंदर असा भासत होता. शिवाय रुक्ष, झाडे नसलेल्या प्रदेशाच्या जागी आता हिरवी झाडे दिसू लागली होती. २१ लूप्सचा रस्ता १५३०२ फुट उंचीवरून सुरू होत १३७८० फुट उंचीवर येउन संपतो. म्हणजेच अवघ्या ८-१० किमी मध्ये थेट १५०० फुट खाली. २१ लूप्स जिथे संपतात तिकडे 'ब्रांडी नाला' आहे. ह्याचे नाव ब्रांडी नाला का ते माहीत नाही पण २१ लूप्स उतरल्यावर बहुदा ब्रांडी सारखी झिंग चढत असावी. आम्हाला तरी मस्तच झिंग चढली होती. ब्रांडीची नाही तर किमान रायडिंगची तरी. इकडून सरचू २१ किमी. लांब आहे. नाल्यावरचा ब्रिज पार करून पुढे निघालो. अंधार पडत आला असल्याने आमचा वेग पुन्हा कमी झाला होता. शिवाय रस्ता सुद्धा बराच वळणा-वळणाचा होता. ७:३० वाजता आम्ही सरचू मध्ये प्रवेश केला. गाडी पुढे गेली होती आणि रहायची सोय गाडीच्या ड्रायव्हरनेच केली होती. तेंव्हा आम्हाला आता त्या अंधारात त्याला शोधणे भाग होते. सरचूवरुन सुद्धा जवळ-जवळ ८ किमी. पुढे आलो तरी कोणी भेटेना. हवेत चांगलीच थंडी वाढली होती. टेम्परेचर ९ डिग. झाले होते. अखेर आर्मी पोलिसांच्या सांगण्यावरुन सर्वांना तिकडच्या एका चेकपोस्टवर थांबवले आणि मी-अभिजित शोधाशोध करायला अजून पुढे निघालो.
एका कैंपसाइट वर चौकशी करत असताना समोरून एक गाडी येताना दिसली. मी धावतच रस्त्यावर पोचलो आणि गाडीला हात केला. अंदाज बरोबर निघाला होता. उमेश ड्रायव्हरला घेउन आम्हाला शोधायला मागे आला होता. शेवटी ९ च्या आसपास सर्व साइटवर पोचलो. सर्वांना रहायच्या जागेत सामान टाकले आणि गरमागरम चहा घेतला. रात्रीच्या जेवणावर धमालच आली. आजचे एक-सो-एक किस्से एकमेकांना सांगत, ऐकवत वेळ भुर्रकन निघून गेला. आज खरच भन्नाट दिवस होता. जरी गेल्या २ दिवसात आम्ही लेहवरुन निघून त्सो-कार मार्गे सरचूला आल्याने 'तांगलांग-ला' हा जगातील सर्वोच्च द्वितीय उंचीचा पास (उंची १७५८२ फुट) आम्ही स्किप केला. तरी सुद्धा 'त्सो-कार - पांगचा रुक्ष वाळवंटी प्रदेश' आणि मग 'नकी-ला, २१ लूप्स - सरचूचा हिरवागार प्रदेशात बाईक चालवायला मज्जा तर आलीच होती त्याशिवाय सर्वांच्याच कणखर मनोवृत्तीचा कस लागला होता. उद्याची आखणी करून आम्ही सर्व झोपी गेलो. उद्याचे लक्ष्य होते बारालाच्छा-ला आणि रोहतांग पास करत मनाली ... अर्थात काश्मिरला टाटा करत हिमाचल प्रदेश मध्ये प्रवेश ...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - रोहतांगचा चिखल सारा ... !
.
.
.
namaskar ,
ReplyDelete21 loops che photo baghayala milatil ?te pahanyachi khup echha aahe
dhanyawad
आत्ता तरी उपलब्ध नाही माझ्याकडे म्हणुन तर टाकू शकलो नाही. पण इतर कोणाकडे असेल तर लगेच टाकतो इकडे ... प्रतिक्रियेकरता धन्यवाद apashchim.
ReplyDeleteho re photos taak na milale ki :)
ReplyDeleteaani kharach bhari asnar valu madhe driving cha anubhav
Second highest pass na baghta "Pang" la jaycha decision point jad gela asel na !
फोटो हातात आला की लगेच टाकीन ... :) तांगलांग-ला करायचा नाही हे लेहवरुन निघतानाच ठरवले होते. तेंव्हा तितकं जड गेलं नाही.
ReplyDelete