Wednesday, 30 September 2009

लडाखचा सफरनामा - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... !


फोटू-लाच्या १३४७९ फुट उंचीवरुन निघालो ते सुसाट वेगाने खाली उतरत अवघ्या ३० मिं. मध्ये 'लामायुरु गोम्पा'ला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पोचलो. आता उजव्या हाताचा रस्ता पुढे अजून खाली उतरत लामायुरु गोम्पाकडे जात होता. पण हा रस्ता खालच्या बाजूला पूर्ण झालेला नसल्याने अजून बंद करून ठेवला होता. डाव्या हाताचा रस्ता पुढे 'खालत्से'मार्गे लेहकडे जात होता. खालत्सेवरुन एक रस्ता पुन्हा लामायुरु गोम्पाकडे येतो असे कळले. पण त्या रस्त्याने फिरून लामायुरुला यायचे म्हणजे २२ कि.मी.चा फेरा होता. ते शक्य नव्हते कारण इथेच इतका उशीर झाला असता की रात्रीपर्यंत लेह गाठणे अशक्य झाले असते. दूसरा पर्याय होता बाइक्स रस्त्यावर ठेवून पायी खाली उतरायचे आणि वर चढून यायचे. त्याला किती वेळ लागु शकेल हे पाहण्यासाठी एका कच्च्या वाटेने मी आणि अभि थोड़े पुढे चालून गेलो. अवघे ५ मिं. सुद्धा चालले नसू पण अशी धाप लागली की काही विचारू नका. बाइकवर असेपर्यंत हे काही तितके लक्ष्यात आले नव्हते. जरा चाल पडल्यावर अंदाज आला की हवेतला प्राणवायु कमी झालेला आहे आणि आता प्रत्येक हालचाल जपून करायला हवी. ५ वाजता आम्ही निर्णय घेतला की लामायुरु बघण्यासाठी खाली न उतरता आपण पुढे सरकायचे. कारण उतरून पुन्हा वर येईपर्यंत सर्वांची हालत नक्की खराब झाली असती आणि त्यात बराच वेळ वाया गेला असता हे नक्की. त्या निर्णयावर बरेच जण नाराज झाले कारण लामायुरु ही लडाख भागातली सर्वात श्रीमंत गोम्पा असून बघण्यासारखी आहे. आम्ही नेमकी ती बघायची मिस करणार होतो. पण पर्याय नव्हता आमच्यापुढे. आम्हाला फक्त एका ठिकाणाचा विचार न करता पूर्ण ट्रिपचा विचार करणे भाग होते. ५ वाजता आम्ही सर्व खालत्सेमार्गे लेह कडे कुच झालो. आता ड्रायवरला आम्ही कुठेही न थांबता थेट लेहमध्ये रेनबो गेस्ट हाउसला पोच असे सांगितले.




लामायुरुला जाणारा तो नविनच बनवलेला मस्त रस्ता सोडून आम्ही पुन्हा कच्च्या रस्त्याला लागलो. ३-४ दिवसात अश्या रस्त्यांवरुन बाइक चालवून-चालवून आता बाइकमधून खड-खड-खड-खड असे आवाज येऊ लागले होते. फोटू-ला उतरताना पकडलेला ५०-६० चा स्पीड आता एकदम नामिके-ला इतका म्हणजे ३०-४० वर आला होता. ह्या रस्त्यावर सुद्धा सर्वत्र छोटी-छोटी खडी पसरली होती. नामिके-ला पेक्षा सुद्धा जास्त. त्यात एकदम शार्प वळण आले की आमचा स्पीड एकदम कमी होउन जायचा. एकदा-दोनदा माझ्या बाइकचे मागचे चाक थोडेसे सरकले सुद्धा. बाकी बायकर्स बरोबर सुद्धा हे झाले असावे. पण आम्ही सगळेच सावकाशीने उतरत होतो. मला लगेच आपल्या सह्याद्रीच्या घाटात लिहिलेले बोर्ड आठवले. 'अति घाई संकटात नेई'. म्हटले उशीर झाला तरी चालेल पण एवढा पॅच नीट पार करायचा. बऱ्यापैकी खाली उतरून आलो. दुरवर खाली आमची गाड़ी पुढे जाताना दिसत होती. इतक्यात २ जवान आमच्या समोर आले आणि त्यांनी आम्हाला 'थांबा' अशी खूण केली. "आगे सुरंगकाम शुरू है. थोडा रुकना पड़ेगा" हे असे इकडे अध्ये-मध्ये सुरूच असते. कुठे माती घसरून रस्ता बंद होतो. तर कधी B.R.O. रस्त्याच्या डागडूजीची कामे करत असते. २० मिं. तिकडे थांबून होतो. अभिजित तर चक्क रस्त्यावर आडवा होउन झोपला होता. सकाळी ८ वाजता खाल्लेल्या पराठ्यानंतर एक चहा सोडला तर कोणाच्या ही पोटात तसे काही गेले नव्हते. पाणी पिउन आणि सोबत असलेले ड्रायफ्रूट्स यावर आम्ही पुढे पुढे सरकत होतो. आता ६ वाजत आले होते आणि आम्हाला अंधार पडायच्या आत जास्तीतजास्त अंतर पार करायचे होते.




डोंगरांचे विविध प्रकार आज बघायला मिळत होते. कधी सपाट मातीचे तर कधी टोके काढल्यासारखे. कधी वाटायचे चोकलेट पसरवून टाकले आहे डोंगरांवर. हाहा... अखेर ६:१५ ला म्हणजेच बरोबर २ तासात फोटू-लाच्या १३४७९ फुट उंचीवरुन ९६०० फुट उंचीवर खालत्सेमध्ये उतरलो. बघतो तर काय एक छोटेसे होटेल दिसले. मी लागलीच 'दहिने मुड' केले आणि बाइक पार्क केली. त्याच्याकडे मस्त पैकी चपाती-भाजी, दाल-चावल, मॅगी, ऑमलेट असे बरेच काही खायला होते. तूटून पडलो सर्वजण. चांगले ४० मिं. जेवण सुरू होते. वेळ किती लागतोय ह्याची पर्वा कोणाला राहिली नव्हती. आता अंधारात तर अंधारात पण आज लेहला पोचायचे हे नक्की होते. साधनाला पुन्हा एक फोन केला तर ती फोटू-लाच्या आसपास आहे असे कळले. अजून सुद्धा ९० की.मी. अंतर पार करून जायचे होते. ७ वाजता तिकडून निघालो आणि खालत्से गावातून पुढे जाऊ लागलो. बघतो तर काय.. आमची गाडीसुद्धा गावातल्या एका होटेलमधून नुकतीच निघून पुढे चालली होती. आता कुठेही थांबणे नव्हते.  खालत्सेनंतर नुसरा - उलेटोप - मिन्नू - अलत्ची अशी एकामागुन एक गावे अंधारात पार करत आम्ही लेहकडे सरकत होतो. खालत्से पुढचा रस्ता एकदम चांगला होता. गाड़ी मागुन आता सर्वात पुढे कुलदीप होता. नामिके-ला आणि फोटू-ला चढताना मागे राहिली त्याची यामाहा आता कोणाला ऐकत नव्हती. मध्ये-मध्ये तर तो गाड़ीला सुद्धा मागे टाकत होता. मी बरोबर मध्ये होतो. माझ्या पुढे अमेय तर आदित्य - अभि मागे होते.





आजचा संपूर्ण वेळ सिंधूनदीचे पात्र आमच्या सोबत होते. रस्ता एका डोंगरावरुन आम्हाला दुसऱ्या डोंगरावर घेउन जायचा. २ डोंगर जोडायला BRO ने लोखंडी ब्रिज बांधले आहेत आणि त्यावर लाकडी फळ्या टाकल्या आहेत. त्यावरून कुठलीही गाडी गेली की ह्या फळ्या अश्या वाजतात की कोणाचे लक्ष्य नसेल तर तो खाडकन दचकेल. साधारण ९ च्या आसपास मिन्नूला पोचल्यावर अमेयच्या बाइकमधले पेट्रोल संपायला आले होते. अभिने त्याच्याकडे असलेले एक्स्ट्रा पेट्रोल त्याला दिले आणि तिकडूनच रेनबो गेस्ट हाउसला फोन करून आम्ही ११ पर्यंत पोचतोय हा निरोप दिला. इतका वेळ मी-शमिका मात्र ह्यांची वाट बघत अंधारात हळू-हळू पुढे सरकत होतो. त्या तिकडे दाट अंधारात थांबूही शकत नव्हतो. शेवटी एक गुरुद्वारा आला तिकडे थांबलो. कुलदीप गाडी बरोबर पुढे निघून गेला होता. मागुन सर्वजण आल्यावर आम्ही पुन्हा शेवटचे २५ की.मी चे अंतर तोडायला लागलो. अचानक काही वेळात सर्वांच्या बाइक्स स्लो झाल्या. कितीही रेस केल्या तरी स्पीड ३०च्या पुढे जाईनाच. चढ आहे म्हटले तर तितकाही नव्हता. नंतर लक्ष्यात आले... अरे आपण 'मॅगनेटिक हिल'च्या आसपास तर नाही ना... तो टप्पा पार झाल्यावर बाइक्स पुन्हा पळायला लागल्या आणि आम्ही अखेर 'सिंधू पॉइंट'ला पोचलो. १० वाजत आले होते त्यामुळे सिंधू नदीचे ते मनोहारी दृश्य काही दिसणार तर नव्हते पण इकडून लेह सिटीचा भाग सुरू होतो. ह्या पॉइंटला 'लडाख स्काउट्स' लडाखच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. १० मिं. मध्ये लेह विमानतळ पार करून लेहच्या मुख्य चौकात पोचलो. गाडी गेस्ट हाउसला पोचली होती. आमचे सर्व सामान उतरवुन अमेय म्हात्रे आम्हाला घ्यायला पुन्हा त्या चौकात आला होता. अखेर ११ वाजता सर्वजण 'रेनबो'ला पोचलो. इतकी रात्र झालेली असून सुद्धा 'नबी' आणि त्याची बायको आमची वाट बघत जागे होते. आल्यानंतर खरंतरं सर्व इतके दमले होते की कधी एकदा बिछान्यात अंग टाकतोय असे झाले होते. पण त्यांनी 'खाना खाए बगेर सोना नाही' अशी प्रेमाने तंबीच दिली. सर्वजण जेवलो आणि झोपायच्या आधी छोटीशी डे एंड मीटिंग घेतली. १२ वाजता साधना आणि उमेश सुद्धा येउन पोचले. अखेर ४ दिवसाच्या अथक प्रवासानंतर आणि अनेक अनुभव घेत जम्मू पासून ८२८ की.मी अंतर पार करत आम्ही त्या ११००० फुट उंचीच्या पठारावर विसावलो होतो. पुढचे ४ दिवस अजून अनेक असे अनुभव घेण्यासाठी...



जम्मू ते लेह ह्या पाहिल्या ४ दिवसांच्या सफरीचे फोटो येथे बघू शकता...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - लडाखचे अंतरंग ... !
.
.
.

Tuesday, 29 September 2009

लडाखचा सफरनामा - फोटू-ला - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !

आज होता मोहिमेचा चौथा दिवस. बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ठरल्याप्रमाणे सर्वजण द्रासवरुन लेहकडे कुच झाले. आज कारगीलमार्गे 'नमिके-ला' आणि 'फोटू-ला' असे २ पास फत्ते करत लेहच्या पठारावर उतरायचे होते. जम्मूपासून निघालेले आम्ही १५ वेडे अथकपणे ५०९ की.मी. चे अंतर पार करत आपल्या लक्ष्याकडे झेप घेत होतो. आजचे अंतर होते ३१९ की.मी. आणि हे अंतर आज आम्ही काहीही झाले तरी गाठणार होतोच. आज पुन्हा एकदा मी आणि अमेय साळवी सर्वात पुढे सुटलो. पाहिले लक्ष्य होते ५७ की.मी. वर असणारे कारगील.  पोटात काहीतरी टाकल्याशिवाय काही सूचायचे नाही आणि जमायचे देखील नाही हे पक्के ठावुक असल्याने तासा-दिडतासामध्ये तिकडे पोचून पहिले  उदरभरण करायचे असे ठरवून आमचे घोडे सुसाट दामटवले.



पुन्हा काही वेळात डाव्या हाताला 'द्रास वॉर मेमोरिअल' लागले. पण न थांबता 'बाये का सल्युट' देत आम्ही भरधाव तसेच पुढे निघालो. वळणा-वळणाच्या त्या रस्त्यावरुन सकाळच्या  प्रहरी बाइक पळवायला मज्जा येत होती. ठंडी नव्हती पण हवेत थोड़ासा गारवा होता. मस्त वाटत होते. एके ठिकाणी रस्ता आम्हाला वर-वर घेउन गेला. उजव्या हाताला डोंगर तर डाव्या हाताला खाली सिंधूनदीचे पात्र. मी सर्वात पुढे होतोच. अचानक रस्ता झपकन असा उजवीकडे वळला की मला रिअक्शन टाइम खुप कमी मिळाला. पण तितक्याच वेगाने मी बाइक उजवीकडे वळवली. जरा समोर गेलो असतो तर काय झाल असत ते सांगायला नकोच. एकदम छाती भरून आली आणि मी बाइक स्लो केली. एकदम मनात काहीतरी विचार येउन गेला. हूश्श्श्... आता वर-वर गेलेला तो रस्ता आता जोरात खाली उतरु लागला आणि त्या ठिकाणी डाव्या हाताने नदीचा अजून एक फाटा येउन मिळत होता. सुंदर दृश्य होते ते. विविध रंगाची फूले तिकडे फुलली होती. बाजुलाच आर्मीच्या महार रेजिमेंटची छोटीशी पोस्ट होती आणि उजव्या हाताला त्याच रेजिमेंटचे एक शहीद स्मारक होते. आम्ही सर्वच तिकडे फोटोग्राफी करायला थांबलो. द्रास - कारगिलच्या मध्ये ताबारेषा अतिशय जवळ म्हणजे अवघे ८-१० की.मी इतकी जवळ आहे आणि सिंधूनदीचे अनेक फाटे-उपफाटे भारत - पाकिस्तान सरहद्दीमधून पार होतात. ह्या संपूर्ण भागावर लक्ष्य ठेवण्यासाठी जागो जागी छोटे-छोटे बंकर्स उभारून पोस्ट तयार केल्या आहेत. कमीतकमी सैन्यानिशी जास्तीतजास्त भागावर लक्ष्य ठेवता येइल अशी रचना येथे केली आहे. नदीच्या पलीकडे जायला आर्मीने ठिकठिकाणी छोटे-छोटे पुल बांधले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला प्रवेश निषिद्ध आहे. पलिकडच्या बाजूला डोंगरांवर जाणाऱ्या वाटा स्पष्ट दिसतात. त्या नक्कीच 'बॉर्डर पीलर'कडे जात असतील.




जेंव्हा थांबलो होतो तेंव्हा लक्ष्यात आले की भूक वाढते आहे... अभिने आणलेली चिक्की पोटात ढकलली आणि पुढे निघालो. थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला अजून एक मेमोरियल दिसले. मी बाइक उजव्या हाताला नेउन थांबवली. त्यावर लिहिले होते 'हर्का बहादुर मेमोरियल'. ह्या मेमोरियलबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. बहुदा हे नविन बांधले गेले आहे की काय अशी शंका आली. पण नाही हे मेमोरियल तर इकडे खुप आधीपासून आहे असे कळले. त्या स्मारकाच्या समोर असणाऱ्या ब्रिजला 'हर्का बहादुर ब्रिज' असे नाव आहे. १९४८ मध्ये काश्मिरवर जेंव्हा आक्रमण झाले तेंव्हा हा ब्रिज 'सुभेदार हर्का बहादुर' यांनी २३ नो. १९४८ रोजी जिंकून पाकिस्तानी सैन्याची अगेखुच रोखली होती. त्यांना मनोमन वंदन करत आम्ही पुन्हा एकदा वेगाने कारगीलकडे सरकलो.



राहिलेले ५ की.मी अंतर पार करून सकाळी ८ वाजता आम्ही कारगीलमध्ये पोचलो. ठरल्याप्रमाणे गाड़ी आर्मी बेसकडे निघून गेली होती. आम्ही मात्र नाश्ता करायला एक होटेल शोधले. 'होटेल शहनवाझ' एकदम छोटूसे होते पण जागेपेक्षा कार्यकारणभाव महत्वाचा नाही का ??? गरमागरम पराठे दिसल्यावर आम्ही बाइक्स् बाजूला पार्क केल्या आणि घुसलो आत. इतके जण सकाळी-सकाळी बघून तो पण गांगरला बहुदा. पण मग नवाझ साहब सुरू झाले. तो बनवतोय आम्ही खातोय ... तो बनवतोय आम्ही खातोय ... कोणी थांबतच नव्हते. एकदाचे उदरभरण झाले आणि मग आम्ही पुढे निघालो.



कारगीलची उंची ८५४० फुट आहे आणि  हे लडाखमधले दूसरी सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे. अर्थात लेह पाहिले. मार्केटमधून बाहेर पडले की २ रस्ते लागतात. समोर जाणारा रस्ता 'झंस्कार'ला जातो तर डावीकडचा रस्ता ब्रिज पार करून वर चढतो आणि पुढे लेहकडे जातो. ह्याच ठिकाणी उजव्या हाताला कारगील ब्रिगेड स्थित आहे. साधना आणि उमेशला इकडे बरेच शूटिंग करायचे होते पण अजून परमिशन मिळत नव्हती. शेवटी असे ठरले की गाड़ी मागे राहील आणि काम झाले की बाइक्सना कव्हर करेल. साधना - उमेशला शूटिंग संपवायला २ तास मिळणार होते. सोबत अमेय म्हात्रे, शोभीत आणि पूनम होतेच. अमेयने कारगील लायब्ररीला देण्यासाठी काही पुस्तके आणली होती. तीही त्यास तिकडे द्यायची होती. आम्ही बाकी सर्व १० जण मात्र पुढे निघालो. ब्रिज पार करून लेहच्या रस्त्याला लागलो. जसे वर-वर जाऊ लागलो तसे सिंधू नदीकाठी वसलेल्या कारगीलचा नजारा दिसू लागला. पण आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली. सोनमर्ग - झोजी-लापर्यंत असणारा निसर्ग आता वेगळे रूप दाखवू लागला होता. आता हिरवा निसर्ग नव्हता तर सर्व काही रखरखीतपणा होता. पण त्याचे सौंदर्य सुद्धा वेगळेचं होते. खाली नदीकाठी मात्र शेती दिसत होती. डोंगर मात्र उघडे बोकडे. श्रीनगर पासून बाइक्स् मध्ये पेट्रोल नव्हते ते इकडे टाकुन घेतले आणि मग पुढचे लक्ष्य होते - 'मुलबेक'.



डाव्याहाताला दुरवर जुब्बार - बटालिकच्या डोंगरसरी साद घालत होत्या.ह्याच ठिकाणाहून तर सुरू झाली होती घुसखोरी. बटालिकच्या भागात मुख्य ३ रिड्ज आहेत.जुब्बार, कुकरथांग-थारू आणि खालुबार. ह्या ठिकाणी ठाणी बनवून 'चोरबाटला' खिंड जिंकून लेहच्या काही भागावर कब्जा करायचा पाकिस्तानचा डाव स्पष्ट झाला होता. भारतीय सेनेतर्फे १२ जैकरीफ (J & K रायफल्स), १ बिहार आणि १/११ गुरखा रायफल्स यांना ह्या भागाची जबाबदारी दिली गेली होती. २९ मे रोजी 'मेजर सर्वानन' यांनी जुब्बारवर जबर हल्ला चढवला. शेवटच्या अवघ्या २०० मी अंतरावर असताना त्यांच्यावर शत्रुने बेधुंद गोळीबार सुरू केला. त्यांच्या सोबत सर्वात पुढे 'लान्सनायक शत्रुघ्नसिंग' आणि जवान प्रमोद होते. इतक्यात एका गोळीने प्रमोदचा वेध घेतला. तो क्षणात खाली कोसळला. मेजर सर्वानन यांनी शत्रुघ्नसिंगच्या पाठीवर थाप मारत 'बढ़ते रहो' असा इशारा केला. ते स्वतः त्याला ओलांडून पुढे जातात न जातात तोच ३ गोळ्या त्यांच्या डोक्यातून आरपार गेल्या आणि ते जागीच कोसळले. शत्रुघ्नसिंगच्या पायात सुद्धा गोळ्या घुसल्या होत्या पण बहुदा त्याला थंडीमूळे तितकी वेदना जाणवत नव्हती. आपला पहिला हल्ला फसला आहे हे समजुन आल्यानंतर तो ४-५ तास निपचित पडून राहिला. अंधार पडल्यावर त्याने रांगायला सुरवात केली. उजव्या पायाला आधार मिळावा म्हणुन त्याने बूटाच्या लेसने तो डाव्या पायाला बांधला. दिवसा झोपून रहायचे आणि रात्री मुंगीच्या वेगाने रांगत तळाकडे सरकत रहायचे हा त्याचा क्रम ७-८ दिवस सुरू होता. एव्हाना पायाची जखम पूर्णपणे चिघळून त्यात अळ्या होऊ लागल्या होत्या. अखेर तो आपल्या सैनिकांना सापडला. स्वतःच्या मनोबलावर त्याने खरच पुनर्जन्म मिळवला होता. अखेर २९ जून रोजी १ बिहारने जुब्बारचे ओब्झरवेशन पोस्ट जिंकून शत्रूला मागे रेटले.


अखेरच्या हल्ल्यासाठी १ बिहारला मदत म्हणुन २२ ग्रेनेडिअर्सची १ कंपनी आणली गेली. ५ जुलैच्या संध्याकाळी थोडे उशिराने शत्रूची मोठी कुमक येताना दिसल्यावर 'रॉकेट साल्वो'ने (MBRL) अचूक मारा केला आणि क्षणार्धात तो साठा उद्वस्त केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ६ जुलै आपण जुब्बार टॉप जिंकून घेतला. लागलीच पुढे आगेकुच करत १ बिहारने ७ जुलै रोजी पॉइंट ४९२४ सुद्धा जिंकला. तिकडे दुसरीकडे १२ जैकरीफ आणि १/११ गुरखा रायफल्स यांनी खालुबार भागात पॉइंट ४८१२, पॉइंट ५२५०, पॉइंट ५२८७ हे सर्व जिंकून घेतले होते. खुद्द खालुबारच्या लढाईमध्ये १/११ गुरखा रायफल्सच्या 'लेफ्ट. मनोजकुमार पांडे' यांनी असीम पराक्रम केला. खांदयात आणि पायात गोळ्या लागलेल्या असताना देखील आपल्या तुकडीसकट त्यांनी शत्रुच्या बंकर्सवर 'आयो गुरखाली'ची आरोळी ठोकत हल्ला चढवला. खालुबार हाती आले पण लेफ्ट. मनोज पांडे यांना वीरमरण आले. अर्थात त्यांचे हे शौर्य परमवीर चक्रच्या मानाचे ठरले. पॉइंट ५२०३, पॉइंट ४१०० आणि आसपासचा सर्व भाग १२ जुलैपर्यंत भारतीय सैन्याने ताब्यात घेतला होता. चोरबाटला खिंडीवर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव पूर्णपणे फसला होता... आपल्या सैन्याच्या विरश्रीला - बलिदानाला मनोमन एक सलाम केला आणि  आमचा वेळेचा डाव मात्र फसू नये म्हणुन आम्ही आता वेगाने पुढे निघालो.




मजल दरमजल करत आता आम्ही पोचलो 'लोचुम्ब' ह्या ठिकाणी. छोटेसे गाव होते आणि त्यामधून जाणारा फारतर चार-सव्वाचार फुट रुंद रस्ता. पुढे बघतो तर काय हे ट्राफिक. वाहनांची मोठी रंग लागलेली. कळले की समोरून आर्मीचा कोंव्होय येतोय. चांगल्या ५०-६० गाड्या आहेत. आम्ही बाइक कधी उजव्या तर कधी डाव्याबाजूने काढत पुढे सरकत राहिलो. अखेर एके ठिकाणी मात्र अडकलोच. ट्रकच्या उजव्याबाजूने बाइक जेमतेम जाइल इतकीच जागा होती. शिवाय उजव्या बाजूला ६-८ फुट खोली होती. अभिने बाइक पुढे टाकली आणि त्याची अंगाने बारीक डिस्कवर निघून सुद्धा गेली. आशिषने कुलदीपची यामाहा तर अशी झुपकन काढली की उतरून पुढे फोटो काढायला गेलेला कुलदीप मागे फिरेपर्यंत आशिष ट्रकच्या त्याबाजूला पोचला सुद्धा होता. आता होत अमेय. त्याने गाडी टाकली खरी पण एका क्षणाला त्याला असे कळले की आता पुढे जायचे असेल तर उजवा पाय टेकवून बाइक उजवीकडे झुकवायला हवी. तो उजवीकडे पाय टेकवणार तोच त्याला कळले की अरे... पाय टेकवायला तर जागाच नाही आहे. :O एव्हाना बाइकचा तोल उजव्याबाजूला जायला सुद्द्धा लागला होता. आता अमेय आणि मागे बसलेली दिपाली हमखास पडणार होते. पण नेमके त्याच वेळेला दीपालीने तिच्या डाव्या हाताने सहजच ट्रकला पकडले. खरंतरं तिला माहितच नव्हते की बाइक उजव्या बाजूला पडणार आहे. नशीब पडायचे वाचले दोघे. तिला तसेच पकडायला ठेवायला सांगून मग अमेयने बाइक कशीतरी पुढे काढली. त्या मागुन आदित्यने ऐश्वर्याला आणि मी शमिकाला खाली उतरायला सांगीतले. बाइक्स पुढे काढल्या आणि ट्राफिक सुटायची वाट बघू लागलो. जवळ-जवळ ४० मिं. नंतर अखेर पुढे जायला वाट मिळाली.



तिकडून निघालो तेंव्हा ११:१५ वाजले होते. आता कुठे ही न थांबता मुलबेकला पोचलो. कारगील नंतर लडाखमध्ये प्रवेश केला की सर्व काही बदलते. निसर्ग आणि राहणारी लोक सुद्धा. लोचुम्बपासून सर्व बुद्धधर्मीय लडाखी लोकांची वस्ती सुरू होते. मुलबेक येथून बौद्धमठ म्हणजेच गोम्पा (Monestry) सुरू होतात. मुलबेकचे मुख्य गोम्पा डोंगरावर आहे तर रस्त्याच्या उजव्या हाताला अजून एक गोम्पा आहे. आम्ही बरोबर १२ वाजता तिकडे पोचलो. तिकडून कारगीलमध्ये साधनाला कॉल केला तेंव्हा कळले की त्यांना अजून वेळ लागणार असल्याने त्यांनी गाडी पुढे पाठवून दिली आहे आणि ते स्वतः काम झाले की वेगळी गाडी करून रात्रीपर्यंत लेहला पोचतील. भूका लागल्या होत्या तेंव्हा गोम्पा बघून खादाडी करायची असे ठरले. गोम्पाच्या बाहेरच फिरती घंटा आहे. प्रत्येक गोम्पा बाहेर अशी १ तरी घंटा आपल्याला बघायला मिळतेच. खिडक्या आणि दरवाजे असे सर्वत्र असणारे रंग आपले लक्ष्य वेधून घेतात. मुलबेक गोम्पामध्ये प्रवेश केल्या-केल्या एक मोठी कोरलेली प्रतिमा आहे. ती कोणाची आहे ते कळायला मार्ग नाही. तिकडे असलेले मोन्क (मराठी शब्द आठवतच नाही आहे) काही बोलायला तयार नव्हते. आतमध्ये एक चांगला ५ फुट मोठा दिवा होता. तो कधीच विझत नाही. तिकडे बुद्ध प्रतिमेला नमन केले आणि समोर असलेल्या छोट्याश्या दुकानामध्ये शिरलो. त्याच्याकडे खायला काहीच नव्हते त्यामुळे फ़क्त चहा - बिस्किट खाल्ले आणि तसेच न जेवता पुढे सुटलो.



१२:३० ला तिकडून निघालो तेंव्हा सर्वांनी पाणी भरून घेतले. आता पुढे बराच वेळ पाणी सहज मिळत नाही. दुपारच्या त्या रखरखत्या उन्हामध्ये आम्ही १०४२० फुट उंचीवरुन अजून वर-वर चढत होतो. आता लवकरचं नमिके-ला लागणार होता. ह्या संपूर्ण रस्त्यात न एक झाड़ होते न एके ठिकाणी पाणी. वाळवंटचं होते हे एक प्रकारचे. हिवाळ्यामध्ये इकडे 'कोल्ड डेसर्ट' बनते. हा संपूर्ण रस्ता कच्चा होता. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. BRO चे हजारो कामगार कामावर लागले होते. तासाभरात मी-शमिका आणि अभि-मनाली १२००० फुट उंचीवर नमिके-लाच्या 'वाखा' पोस्टला पोचलो. खाली बघतो तर बाकी ३ बायकर्स थांबले होते. म्हटले ब्रेक घ्यायला थांबले असतील. पण नाही.. बघतो तर काय कुठल्यातरी एका बाइकला बाकी पिलियन रायडर्स धक्का देत होते. अभ्या आपला इतक्या लांबून आणि वरतून त्यांना हाका मारतोय. जाणार होत्या का त्यांना ऐकायला. नशीब मागुन येणाऱ्या एका गाड़ीसोबत आशिषने निरोप धाडला की कुलदिपची यामाहा हाचके खाते आहे. चढत नाही आहे. मग काहीवेळ आशिषने यामाहा सिंगल रायडर आणली आणि कुलदिप दुसऱ्या एका गाडीमध्ये लिफ्ट घेउन वाखापर्यंत आला. तिकडे पुन्हा थोडा वेळ दम घेतला आणि कुलदिपच्या गाडीला दम घेऊ दिला. पुढे तसा चढ नव्हता. नमिके-ला पार करून आम्ही पुन्हा ११७२५ फुट उंचीवर 'खांग्रन'ला उतरलो. तिकडे चेकपोस्टला पुन्हा एंट्री केली आणि पुढे सटकलो. आता रस्ता पुन्हा वर चढू लागला. दूर-दूर पर्यंत सावली नव्हती. सर्वत्र वेगवेगळ्या रंगांचे उघडे डोंगर पाहण्यासारखे होते. कधी लालसर तर कधी तपकिरी, कधी हिरवट मातीचे तर कधी पिवळ्या. त्या-त्या रंगांची खडी रस्त्यावर पसरलेली असायची. त्या खडीवरुन बाइक सरकू नये ही सावधगिरी बाळगत ते आगळे-वेगळे सृष्टिसौंदर्य अनुभवत आम्ही पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी पुन्हा आर्टिलरीच्या ४-६ गाड्या समोरून आल्या. बोफोर्स तोफा घेउन त्या द्रास - कारगीलकडे जाताना दिसल्या. उगाचच मनात वेगळाच विचार येउन गेला. तो झटकून पुढे निघालो. पुढे काही वेळात अचानक कुठून तरी हाक आली. 'जय महाराष्ट्र...' खरंतरं मी दचकलोच. बाजूला बाइक थांबवली तर रस्त्याचे काम करणाऱ्यावर देखरेख करणारा एकजण धावत आला. साताऱ्याचा निघाला की तो. आम्हाला भेटून त्याला एकदम बरे वाटले. आम्हाला सुद्धा त्याला भेटून बरे वाटले. थोड्या गप्पा मारल्या आणि पुढे निघालो...




आता आम्ही फोटू-ला (व्हिडियो बघा) चढू लागलो होतो. एकदम मस्त रस्ता सुरू झाला होता. 'फोटू-ला'चा नविनच बनवलेला चकचकित डांबरी रस्ता. बाइकचा स्पीड वाढवला आणि वेळ मारायला लागलो. गोल गोल फिरवत वर नेणारा तो रस्ता मला भलताच आवडला. झोजी-ला आणि नामिके-लाच्या कच्च्या रस्त्यांनंतर हा रस्ता म्हणजे एक सुखद धक्काच होता म्हणा ना. कुलदिप पुन्हा बराच मागे राहिला होता. पण आता फोटू- लाच्या टॉप पॉइंटला जाउनाच थांबायचे असे आम्ही ठरवले. बरोबर ३:१५ वाजता आम्ही 'फोटू-ला'च्या टॉपला होतो. आत्तापर्यंतची गाठलेली सर्वोच्च उंची. १३४७९ फुट. फोटू-ला हा श्रीनगर ते लेह ह्या मार्गावरचा सर्वोच्च उंच पॉइंट आहे. काही वेळात मागुन अमेय-दिपाली आणि आदित्य-ऐश्वर्या येउन पोचले. पण कुलदिप आणि आशिषचा काही पत्ता नव्हता. एका येणाऱ्या ट्रकला थांबवून विचारले,"कोई बाइकवाला दिखा क्या रुका हुआ? कोई मेसेज है क्या?" तो ट्रकवाला बोलला,"मेसेज नाही. आदमी है." बघतो तर काय त्या ट्रक मधुनच आशिष खाली उतरला. कुलदिप मागुन यामाहा सिंगल राइड करत पोचलाच. कुलदिपच्या मागुन आमची सपोर्ट वेहिकल सुद्धा येउन पोचली. ४ वाजत आले होते. साधनाला फोन केला तर ती मुलबेकच्या आसपास पोचल्याचे कळले. अजून बरेच अंतर जायचे होते आणि पोहचेपर्यंत रात्र होणार हे नक्की होते. आता अजून उशीर न करता आम्ही सर्व निघालो ते लेहच्या पठारावर उतरून 'लामायुरु' गोम्पाकडे...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... !
.
.
.

Friday, 25 September 2009

लडाखचा सफरनामा - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... !

"ईश्वर आणि सैनिक या दोघांचे आपल्याला संकटाच्या वेळीचं स्मरण होते. त्या संकटात मदत मिळाल्यानंतर ईश्वराचा विसर पडतो आणि सैनिकाची उपेक्षा होते."


ज्यांनी 'आपल्या उदयासाठी स्वतःचा आज दिला' अश्या वीर जवानांचे स्मरण आणि आपल्या आयुष्यातले काही क्षण त्यांना अर्पण करावे याहेतूने आम्ही 'द्रास वॉर मेमोरिअल'ला भेट द्यायला निघालो होतो. डाक बंगल्यावरुन बाहेर पडतानाच समोर 'टायगर हिल' दिसत होते. त्याच्या बाजुलाच पॉइंट ४८७५ म्हणजेच ज्याला आता 'कॅप्टन विक्रम बत्रा टॉप' म्हणतात ते दिसत होते. संध्याकाळ होत आली होती. उमेश आणि साधनाला इकडे बरेच शूटिंग करायचे असल्याने ते बाइकवरुन आधीच पुढे गेले होते. जेणेकरून अंधार पडायच्या आधी त्यांना सर्व शूट करता येइल.




द्रासवरुन पुढे कारगीलकडे निघालो की ७ की.मी वर डाव्या हाताला वॉर मेमोरिअल आहे. द्रासमध्ये सध्या पंजाबची माउंटन ब्रिगेड स्थित आहे. २६ जुलै २००९ रोजी संपूर्ण भागात आर्मीने १० वा कारगील विजयदिन मोठ्या उत्साहात आणि मिश्र भावनांमध्ये साजरा केला. एकीकडे विजयाचा आनंद तर दूसरीकडे गमावलेल्या जवानांचे दुखः सर्व उंच पर्वतांच्या उतारांवर '10th Anniversary of Operation Vijay' असे कोरले आहे. खरं तरं २६ जुलैलाच या ठिकाणी यायची इच्छा होती. मात्र मी कामावर असल्याने ते शक्य झाले नाही. तेंव्हा १५ ऑगस्टला जोडून या ठिकाणी भेट द्यायची असे आधीच नक्की झाले होते. लडाख मोहिमेचे महत्वाचे उद्दिष्ट हेच होते. २० एक मिं. मध्ये मेमोरिअलला पोचलो. परिसर अतिशय शांत आणि पवित्र वाटत होता. सध्या ह्या स्मारकाची जबाबदारी '२ ग्रेनेडिअर' ह्या रेजिमेंटकडे आहे. 'Indian Army - Serving God and Country With Pride' हे प्रवेशद्वारावरचे वाक्य वाचून नकळत डोळे पाणावले गेले. मुख्य प्रवेशद्वारापासून खुद्द स्मारकापर्यंत जाणाऱ्या पदपथाला 'विजयपथ' असे नाव दिले गेले आहे. या पदपथावरुन थेट समोर दिसत होते एक स्मारक. ज्याठिकाणी पर्वतांच्या उत्तुंग कडयांवर आपल्या जवानांनी प्राणांचे बलिदान दिले त्याच ठिकाणी त्या वीरांचे एक सुंदर स्मारक उभे केले आहे.





त्या विजयपथावरुन चालताना मला आठवत होती १० वर्षांपूर्वीची ती एक-एक चढाई... एक-एक क्षणाचा दिलेला तो अथक लढा. धारातीर्थी पडलेले ते एक-एक जवान आणि ते एक-एक पाउल विजयाच्या दिशेने टाकलेले. १९९८ चा हिवाळ्यामध्येच पाकिस्तानी सैन्याने घुसखोरीची संपूर्ण तयारी केली होती. या ऑपरेशनचे नाव होते 'अल-बदर'. पाकिस्तानी ६२ नॉर्थ इंफंट्री ब्रिगेडला याची जबाबदारी दिली गेली होती. झोजी-ला येथील 'घुमरी' ते बटालिक येथील 'तुरतुक' ह्या मधल्या द्रास - कारगील - तोलोलिंग - काकसर - बटालिक ह्या १४० की.मी च्या पट्यामध्ये ५००० पाकिस्तानी सैनिकांनी सुयोग्य अश्या ४०० शिखरांवर ठाणी प्रस्थापित केली होती. हा साराच प्रदेश उंचचं-उंच शिखरांनी व्यापलेला. हिवाळ्यामध्ये तापमान -३० ते -४० डिग. इतके उतरल्यावर माणसाला इकडे राहणे अशक्य. भारतीय सेना हिवाळ्याच्या सुरवातीला विंटर पोस्टवर सरकल्याचा फायदा घेत करार तोडून पाकिस्तानी सैन्याने ह्या संपूर्ण भागात घूसखोरी केली आणि १९४८ पासून मनाशी बाळगगेले सुप्तस्वप्न पुन्हा एकदा साकारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपलीच इंच-इंच भूमी पुन्हा मिळवण्यासाठी मग भारतीय सेनेने एक जबरदस्त लढा देत पुन्हा एकदा आपले कर्तुत्व दाखवून दिले. जगातल्या लढण्यासाठी अत्यंत प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या युद्धभूमीवर अवघ्या ३ महिन्यांच्या आत त्यांनी शत्रूला खडे चारून अक्षरश: धुळीत मिळवले. झोजी-ला ते बटालिक ह्या २५० की.मी. लांब ताबारेषेचे संरक्षण हे १२१ इंफंट्री ब्रिगेडचे काम होते. ह्या भागात १९४८ मध्ये झालेल्या घुसखोरीनंतर भारतीय सैन्याने मोठ्या मुश्कीलीने हा भूभाग परत मिळवला होता. १९६५ आणि १९७१ मध्ये सुद्धा ह्या भागात तुंबळ लढाया झाल्या होत्या.


४ मे ला बटालिकच्या जुब्बार टेकडी परिसरात घूसखोरी झाल्याची बातमी मिळाल्यानंतर आर्मीची हालचाल सुरू झाली. ७-८ मे पासून परिसरात जोरदार तोफखाने धडधडू लागले आणि पाहिल्या काही चकमकी घडल्या. पुढच्या काही दिवसात संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली आहे हे लक्षात आल्यावर वातावरणाशी समरस होत भारतीय सेना पुढे सरकू लागली. पण हे सर्वसामान्य लोकांसमोर यायला मात्र २५ मे उगवला. जागतिक क्रिकेट करंडकाच्या सोहळ्यात गुंतलेल्या भारतीयांना - खास करून पत्रकारांना इतर गोष्टींकडे बघायला वेळ होताच कुठे???


२६ मे रोजी वायुसेनेची लढाउ विमाने 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू करीत आसमंतात झेपावली. दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी फ्लाइट ले. नाचिकेत यांचे विमान 'फ्लेम आउट' झाल्याने दुर्घटनाग्रस्त झाले तर त्यांना शोधण्यात स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा हे पाकिस्तानी सैन्याच्या हातात सापडले. या नंतर मात्र वायुसेनेने मिराज २००० ही लढाउ विमाने वापरली ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या कुमक आणि रसद वर परिणाम झाला. 'ऑपरेशन सफेद सागर' हे 'ऑपरेशन विजय'च्या जोडीने शेवटपर्यंत सुरू होते.


दुसरीकडे भारतीय सेनेने २२ मे पासून सर्वत्र चढाई सुरू केली होती. १५००० फुट उंचीच्या तोलोलिंग आणि आसपासच्या परिसरात म्हणजेच एरिया फ्लैट, बरबाद बंकर या भागात १८ ग्रेनेडिअर्सने हल्लाबोल केला. ह्या लढाई मध्ये ३ जून रोजी ले. कर्नल विश्वनाथन यांना वीरमरण आले. ११ जूनपर्यंत बोफोर्सने शत्रूला ठोकून काढल्यावर १२ जून रोजी तोलोलिंगची जबाबदारी २ 'राजरीफ'ला (राजपूत रायफल्स) देण्यात आली. १२ जूनच्या रात्री मेजर गुप्ता काही सैनिकांसोबत मागच्याबाजूने चाल करून गेले. ह्या लढाईमध्ये मेजर गुप्ता यांच्या सोबत सर्वच्या सर्व जवान शहीद झाले पण तोलोलिंग मात्र हाती आले. भारतीय सेनेचा पहिला विजय १२ जूनच्या रात्री घडून आला. त्यानंतर मात्र भारतीय सेनेने मागे पाहिले नाही. एकामागुन एक विजय सर करीत ते पुढे सरकू लागले. १४ जूनला 'हम्प' जिंकल्यावर २ राजरिफच्या जागी तिकडे १३ जैकरीफ (J & K रायफल्स) ने ताबा घेतला आणि १४ जूनला त्यांनी 'रोंकी नॉब' जिंकला.


आता लक्ष्य होते पॉइंट ५१४०. ह्यावर १३ जैकरीफ दक्षिणेकडून, २ नागा बटालियन पश्चिमेकडून तर १८ गढवाल पूर्वेकडून चाल करून गेल्या. २० जून रोजी पहाटे ३:३५ ला कॅप्टन विक्रम बत्राच्या डेल्टा कंपनीने पश्चिमेकडच्या भागावर पूर्ण भाग हातात घेतला. १६००० फुट उंचीवर त्यांचे शत्रुशी रेडियो वर संभाषण झाले. पलीकडचा आवाज बोलत होता, 'शेरशहा, ऊपर तो आ गए हो, अब वापस नही जा सकोगे.' शेरशहा हे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे लढाईमधले टोपण नाव होते. शेरशहा कडून लगेच प्रत्युत्तर गेले. 'एक घंटे मे देखते है, कौन ऊपर रहेगा.' आणि १ तासात त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. समोरून येणाऱ्या गोळीबाराला न जुमानता ५ जवान घेउन ते शत्रुच्या खंदकला भिडले. २ संगर उडवले आणि शत्रुच्या ३ सैनिकांशी एकट्याने लढून ठार केले. पॉइंट ५१४० जिंकल्यावर रेडियोवर आपल्या कमांडिंग ऑफिसर ला सांगितले. 'सर, ये दिल माँगे मोअर'. पुढे पॉइंट ४८७५ च्या लढाईमध्ये ५ जुलै रोजी शेरशहा उर्फ़ कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. तर ४ जुलै रोजी 'रायफलमन संजय कुमार' यांनी पॉइंट ४८७५ वर अत्तुच्च पराक्रम करत १३ जैकरीफला 'फ्लैट टॉप'वर विजय प्राप्त करून दिला. ह्या दोघांना 'परमवीर चक्र' प्रदान केले गेले.


यानंतर पॉइंट ५१००, पॉइंट ४७००, थ्री पिंपल असे एकामागुन एक विजय मिळवत भारतीय सेनेने अखेर ३ जुलैच्या रात्री १६५०० फुट उंचीच्या टायगर हील वर हल्लाबोल केला. ८ सिख, १८ गढवाल आणि १८ ग्रेनेडिअर्सने आपापले मोर्चे जिंकत आगेकूच सुरू ठेवली होती. ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव यांनी ह्या लढाईमध्ये अत्तुच्च पराक्रम केला. त्यांना 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आले. अखेरचा हल्ला १८ ग्रेनेडिअर्सच्या कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी चढवला आणि विजय प्राप्त केला. 'Sir. I am on the Top' अशी आरोळी त्यांनी रेडियोवर ठोकली.


जब्बार - बटालिक ह्या भागातल्या लढाया आपण पुढच्या भागात बघुया. पण एक किस्सा सांगतो. कारगील येथील पॉइंट १३६२० ह्या ठिकाणी लढाईमध्ये कश्मीरासिंगचा एक हातच धडा वेगळा झाला. त्याने स्वतःचा हात स्वतःच उचलून घेतला आणि इतर सैनिकांनी त्याला आर्मी हॉस्पिटलकडे नेले. वाटेमध्ये तो आपल्या लढाईची झटपट त्या २ सैनिकांना सांगण्यात मग्न होता. अचानक एकाने विचारले,"कश्मीरा, टाइम काय झाला असेल रे?" कश्मीराने उत्तर दिले,"माझ्या त्या तुटलेल्या हातावर घड्याळ आहे. तूच बघ ना."

दोस्तहो ... आता काय बोलू अजून ??? खरंतरं मला पुढे काही लिहायचे सुचत नाही आहे. इतकच म्हणीन.


"When you go home, tell them of us & say,
for your tomorrow we gave our today"




ऑपरेशन विजयमध्ये शहीद आणि जखमी झालेल्या सर्व १०९१ अधिकारी आणि जवानांची नावे... 










स्मारकासमोर २ मिं. नतमस्तक होउन त्यांना मूक श्रद्धांजली वाहिली आणि बाजूला असलेल्या शहीद ले. मनोज पांडे  'एक्सिबिट'मध्ये गेलो. प्रवेशद्वारातून आत गेलो की समोरच शहीद ले. मनोज पांडे यांचा डोक्यावर काळी कफनी बांधलेला आणि हातात इंसास रायफल असलेला अर्धाकृति पुतळा आहे. त्यांच्यामागे भारताचा तिरंगा आणि ग्रेनेडिअर्सचा कलर फ्लॅग आहे. उजव्या हाताला 'कारगील शहीद कलश' आहे. ह्यात सर्व शहीद जवानांच्या पवित्र अस्थि जतन केल्या गेल्या आहेत. कारगील लढाईमध्ये वापरलेल्या, शत्रुकडून हस्तगत केलेल्या अश्या बऱ्याच गोष्टी आत मांडल्या आहेत. या लढाईमध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र मिळालेल्या वीरांचे फोटो आहेत. तोलोलिंग, पॉइंट ४८७५, टायगर हिल वर कोणी कशी चढाई केली त्याचे मोडल्स बनवलेले आहेत. लढाईचे वर्णन करणारे शेकडो फोटो येथे आहेत. हे फोटो बघताना उर जसा अभिमानाने भरून येतो तश्या हाताच्या मुठी सुद्धा घट्ट होतात. आपल्या सैनिकांनी जे बलिदान दिले आहे ते पाहून डोळे भरून येतात. एक वेगळीच विरश्री अंगात भिनते. कुठल्या परिस्थितिमध्ये आपल्या वीरांनी हा असीम पराक्रम केला हे एक्सिबिट बघून लगेच समजते. काहीवेळ तिकडे असणाऱ्या सैनिकंशी बोललो. अधिक माहिती घेतली.





पाकिस्तानी सैन्याकडून हस्तगत केलेली काही युद्ध सामुग्री ...





८ वाजत आले होते तेंव्हा तिकडून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा मेमोरियल समोर उभे राहिलो.  दिवस संपला होता. एक जवान शहीद स्मारकासमोर ज्योत पेटवत होता. त्याला प्रतिसाद म्हणुन बहूदा ते शहीद वीर वरुन म्हणत असतील. 'कर चले हम फिदा जान और तन साथियों ... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...' तिकडून निघालो तेंव्हा आमच्यापाशी एक अनुभव होता. असा अनुभव जो आम्हाला कधीच विसरता येणार नव्हता. ते काही क्षण जे आम्हाला त्या थरारक रणभूमीवर घेउन गेले होते. शहीद कॅप्टन विक्रम बत्राचा फोटो आणि शहीद ले. मनोज पांडे यांचा पुतळा पाहून अंगावर अवचित उठलेला तो शहारा मी जन्मभर विसरु शकणार नाही. त्या सर्व ज्ञात-अज्ञात सैनिकांचे स्मरण करण्यासाठी मी इकडे पुन्हा-पुन्हा येइन. जसे-जेंव्हा जमेल तसे...



पुन्हा एकदा माघारी निघालो. ८:३० वाजता डाक बंगल्यावर पोचलो. ड्रायवर अजून सोबतचं होता. आम्हाला उदया लेहला सोडुनच तो परत जाणार होता. जेवणानंतर उदयाचा प्लान ठरवला. कारगील बेसला जास्त वेळ लागणार असल्याने साधना, उमेश, अमेय म्हात्रे, ऐश्वर्या आणि पूनम गाडीमधुन येणार होते. बाकी सर्व बायकर्स पुढे सटकणार होते. सकाळी ६ ला निघायचे असे ठरले आणि सर्वजण झोपेसाठी पांगलो. मी आणि साधना मात्र उद्याच्या कारगीलभेटीसाठी काही नोट्स काढत बसलो होतो. ११ वाजून गेले होते. अखेर उदया नेमके काय-काय करायचे ते ठरले आणि आम्ही सुद्धा गुडुप झालो. द्रास पाठोपाठ आता उदया कारगील शहर बघायचे होते आणि त्याहून पुढे जाउन कुठल्याही परिस्थितीमध्ये लेह गाठायचे होतेच...
.
.
लढाईचे संदर्भ - 'डोमेल ते कारगील' - लेखक मे. जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे. आणि
www.bharat-rakshak.com
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - 'फोटू-ला' - श्रीनगर ते लेहच्या सर्वोच्च उंचीवर ... !
.
.
.

Wednesday, 23 September 2009

लडाखचा सफरनामा - 'द्रास'ला पोचता-पोचता ... !

"कोंबडी पळाली ... तंगडी धरून ... लंगडी घालाया लागली ..." ह्या गाण्याने सर्वजण पहाटे सव्वाचारला जागे झाले. आधी 'पहाटे-पहाटे मला जाग आली' ... हे गाणे लावणार होतो पण लवकर आणि उशिरा झोपलेले सर्वजण उठावे म्हणुन मुद्दामून मी हे गाणे गजर म्हणुन लावले होते. आंघोळी वगैरे करायच्या नव्हत्याच त्यामुळे फटाफट बाकीचे उरकले, सामान बाहेर काढले आणि ५ वाजता निघायला आम्ही तयार झालो. सोनमर्ग सारख्या उंच ठिकाणी किमान पहाटे तरी थंडी वाजेल हा आमचा भ्रम निघाला. एका साध्या टी- शर्ट मध्ये मी पहाटे ५ वाजता तिकडून बाइक वरुन निघालो. खाली मार्केट रोडला आलो तर आमचा ड्रायवर अजून गाड़ीमध्ये झोपलेलाच होता. त्याला उठवला. त्याला बोललो,'गाड़ी मध्येच झोपायचे होते तर खाली कशाला आलात? वर तिकडेच झोपायचा होत ना गाड़ी लावून. आता अजून उशीर होणार निघायला' काही ना बोलता तो आवरायला गेला. बाजुलाच एक होटेल सुरू झालेले दिसले तिकडे चहा सांगितला आणि बाकिच्यांची वाट बघत बसलो. एक तर मोबाइल नेटवर्क नव्हते त्यामुळे वरती फोन सुद्धा करता येइना. श्रीनगर सोडले की कुठलेच नेटवर्क लागत नाही. तसे BSNL लागते अध्ये-मध्ये. अखेर ६ नंतर सर्वजण खाली पोचले. नाश्ता उरकला आणि झोजी-ला मार्गे कुच केले द्रास - कारगीलकडे.



आज सर्वात पुढे मी-शमिका होतो. माझ्या मागून अमेय-दिपाली आणि बाकी सर्व त्यामागे होते. सोनमर्ग सोडले की लगेच 'झोजी-ला'चा भाग सुरू होतो. 'ला' - म्हणजे इंग्रजीमधला 'पास' हे लक्ष्यात आला असेलच तुम्हाला. बरेच पण 'झोजिला पास' असे जे म्हणतात ते चुकीचे आहे. तासाभरात झोजी-लाची 'घुमरी' चेकपोस्ट गाठली. इकडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला आणि माणसाला नाव, गाड़ी नंबर आणि तुमचे लायसंस नंबर याची नोंद करावी लागते. तिकडे आपल्या बायकर स्टाइलने बाइक सर्वात पुढे टाकली आणि चारचाकी गाड्यांच्या पुढे आपला नंबर लावून पुढे सटकलो सुद्धा. आज आम्हाला कुठेच जारही वेळ घालवायचा नव्हता. सोनमर्गच्या ८९५० फुट उंचीवरुन आता आम्ही हळू-हळू वर चढत १०००० फुट उंचीपर्यंत पोचलो होतो. संपूर्ण रस्ता हा कच्चा आहे. कुठे मातीच माती तर कुठे वरुन वाहत येणारे पाण्याचे प्रवाह. सलग ५-१० मी. रस्ता सलग चांगला असेल तर शपथ. तरी नशीब उन्हाळ्याचा अखेर असल्याने वाहून येणारे पाणी कमीच होते. सोनमर्गनंतरचा सर्व भाग हा L.O.C. म्हणजेच 'ताबा सिमा रेषा'च्या अगदी जवळ आहे. जस-जसे पास चढू लागलो तस-तसे एक-एक शहिद स्मारक दिसू लागले. १९४८ पासून येथे अनेक वीरांनी आपल्या मात्रुभूमीच्या रक्षणार्थ जीवन वेचले आहे. त्यासर्वांच्या आठवणीत येथे छोटी-छोटी स्मारके उभी केली गेली आहेत. काही ठिकाणी थांबत तर काही ठिकाणी मनोमन वंदन करत आम्ही अखेर झोजी-लाच्या सर्वोच्च उंचीवर पोचलो. ११५७५ फुट...









आमच्या समोर होती नजर जाईल तितक्या दूरपर्यंत पसरलेली उंचचं-उंच शिखरे आणि त्यामधून नागमोडी वळणे घेत वाहत येणारी सिंधू नदी. झोजी-ला वरुन दिसणारे ते नयनरम्य दृश्य डोळे भरून पाहून घेतले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. चढायला जितका वेळ लागला तितकाच वेळ उतरायला लागणार होता कारण रस्ता तसाच खराब होता. मध्येच कुठेशी चांगला रस्ता लागला की आम्ही सर्वजण गाड्या सुसाट दामटवायचो. ९ च्या आसपास झोजी-ला पार करून 'मेणामार्ग' चेक पोस्टला १०३०० फुट उंचीवर उतरलो. इकडे सुद्धा पुन्हा नाव, गाड़ी नंबर आणि लायसंस नंबर याची नोंद केली. डाव्या बाजूला बऱ्याच चारचाकी गाडया थांबून होत्या. चौकीवर असे कळले की पुढचा रस्ता अजून सुद्धा बंदच असून दुपारपर्यंत सुरू व्हायची शक्यता आहे. आता आली का पुढची अडचण. काय करायचे ह्याचा विचार सुरू असतानाच एक व्यक्ती आली आणि आम्हाला विचारू लागली. कुठून आलात? आम्ही म्हणालो 'महाराष्ट्र म्हणजे मुंबई - ठाणे वरुन आलोय.' ती व्यक्ती होती आपल्या मराठीमधले कलाकार 'प्रदीप वेलणकर'. त्यांनी MH-02, MH-04 अश्या नंबर प्लेट बघून लगेच ओळखले असणार की हे तर मराठी मावळे. काहीवेळ त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि आम्ही पुढे निघालो. जिथपर्यंत रस्ता सुरू आहे तिथपर्यंत जाउन बसायचे आणि रस्ता सुरू झाला की पुढे सुटायचे असे ठरले. मेणामार्ग वरुन थोडेच पुढे 'माताईन' गाव आहे. तिथपर्यंत पोचायला फारवेळ लागला नाही. १० वाजता आम्ही तिकडे पोचलो होतो. गेल्या २४ तासांपासून ब्रिजच्या दोन्ही बाजूला वाहनांची ही.... लांब रांग लागली होती. ड्रायवरने गाडी रांगेत लावली. आम्ही मात्र बाइक्सवर अगदी पुढपर्यंत गेलो. ब्रिजच्या आधी थोडा उतार होता तिकडे गाड्या लावल्या आणि काय चालू आहे ते बघायला पुढे गेलो. B.R.O. चे काही कामगार आणि तिकडच्या पोस्टवरचे जवान भरभर काम उरकत होते. एक मेजर आणि एक कर्नल कामावर देखरेख करत सर्वांना सुचना देत होते. उमेश आणि साधने इकडे काही शूटिंग केले. कुलदीप आल्यापासून फोटो काढत कुठे गायब झाला ते पुढचे तास दोनतास कोणालाच माहीत नव्हते. आशिष तर सर्वात पुढे जाउन नदी किनारी उभा राहून कामावर देखरेख करू लागला. मी तिकडे थोडावेळ थांबलो मग कंटाळा आला. पुन्हा माघारी आलो आणि आम्ही गप्पा मारत बसलो.



अजून १ तासाभरात ब्रिज सुरू होईल अशी आशा होती. पण कसले काय १२ वाजत आले तरी अजून सुद्धा ब्रिज उघडायचा पत्ताच नाही. श्या ... आता आज सुद्धा आम्ही काही लेह गाठु शकणार नव्हतो हे निश्चित होते. किमान कारगील तरी गाठू अशी आशा होती. पण नंतर मनात विचार आला की आज ब्रिज ओपन झालाच नाही तर ??? लटकलो ना. एक तर पुन्हा झोजी-ला क्रोस करून मागे सोनमर्गला जा; नाहीतर इकडेच कुठेतरी रहायची सोय बघा. आधीच सॉलिड भूक लागली होती. आशिष आणि मनाली काही खायला मिळते का ते बघायला गेले पण आसपास काही म्हणजे काही मिळत नव्हते. अभि आणि मी नकाशा काढून पुढचे अंतर किती आहे, संध्याकाळ पर्यंत कुठपर्यंत जाता येईल, तिकडे रहायची सोय काही आहे का... ह्या सगळ्याचा विचार करत बसलो होतो. आसपास अजिबात झाडी नव्हती आणि उन तळपत होते म्हणुन २ बाइक्सच्या मध्ये एक चादर अडकवली आणि त्या सावलीमध्ये ३-४ घुसले. बाकी काहीजण गाडीमध्ये बसले तर काही समोर असणाऱ्या शाळेत जाउन बसले. एका जागी थांबून मला आता कंटाळा यायला लागला होता. म्हणुन मी आसपास फोटो काढायला गेलो. उत्तुंग कडे असणारे डोंगर आणि त्याला न जुमानता अगदी वर टोकाशी भिडणारे पांढरेशुभ्र ढग ह्यांचा एकच मेळ जमला होता. त्या दोघांनी आकाशात एक सुंदर चित्र निर्माण केले होते. पायथ्याला पसरलेले हिरवे गालीचे त्या दृश्याच्या सौंदर्यात अधिक भर टाकत होते. काहीवेळ फोटो काढले आणि पुन्हा गाडीपाशी आलो. हाताशी वेळ होता तेंव्हा म्हटले चला, ब्लॉगसाठी नोट्स काढूया. मी आणि साधना गप्पा मारत-मारत नोट्स काढू लागलो. तितक्यात एक मुलगा कुठूनसा आला आणि ओरडू लागला. 'बाबा MH-04 गाडी'. त्याच्यामागुन त्याचा तो बाबा आला आणि त्यांनी विचारले 'ठाणे का?' मी म्हटले 'होय'. मी असे ऐकून होतो की लडाखला जाणाऱ्या लोकांमध्ये मराठी लोकांचा बराच वरचा नंबर आहे. गेल्या ३-४ दिवसात ते प्रकर्षाने जाणवत होते. मुंबईवरुन आलेल्या त्यालोकांशी काहीवेळ गप्पा मारल्या. आल्यापासून तसा गायब असलेला कुलदीप कुठूनसा आला आणि ऐश्वर्या, आदित्य, पूनम आणि अमेयला घेउन नदीकाठी फोटोग्राफी करायला गेला. मी आणि साधना पुन्हा आपल्या नोट्स काढायच्या कामाला लागलो. ३ वाजत आले तशी आर्मीच्या लोकांची हालचाल सुरू झाली. 'ये वाली गाडी पीछे लो. सामनेसे अभि गाडियां आने वाली है.' ब्रिज सुरू होण्याची लक्ष्यणे दिसू लागली तर. आम्ही भराभर बाइक्सवर सवार झालो आणि त्या ट्राफिकमधून जाण्यापेक्षा बाजुच्या गवतात बाइक टाकल्या. आणि सुसाट ब्रिज पार झालो. इकडून द्रास अवघे ४० की.मी होते. तेंव्हा आता थेट द्रासला जाउन थांबायचे, काहीतरी खायचे आणि द्रासचे 'वॉर मेमोरियल' बघायचे असे ठरले. पुढचा रोड इतका मस्त होता की आम्ही बाइक किमान ८० च्या स्पीडला पळवत होतो.







 झोजी-ला वरुन द्रासला जाताना डाव्या बाजूला आर्मीचे 'High Altitude Training School' आहे. त्याच्या लगेच पुढे जम्मू आणि काश्मिर रायफल्सचे ट्रेनिंग स्कुल आहे. त्याला आता कॅप्टन विक्रम बत्रा (PVC) यांचे नाव देण्यात आले आहे. ४० मिं. मध्ये आम्ही द्रास मध्ये पोचलो होतो. द्रास ... ऊँची ९८५० फुट फ़क्त. तरीसुद्धा जगातली लोकवस्ती असलेली दुसऱ्या क्रमांकाची थंड जागा असे ज्याचे वर्णन केले जाते ते द्रास. छोटुसे आहे द्रास. फार मोठे नाही. गावामधून जाणाऱ्या रस्त्यावरच दुकाने आहेत. आम्ही एक ठिकसे होटेल शोधले आणि शिरलो आत. 'होटेल दार्जिलिंग'. जे होते ते पोटात टाकले. काही फोन करायचे होते ते केले. हे सर्व आटपेपर्यंत ५ वाजत आले होते आणि आमच्यामागुन सर्व चारचाकी गाड्या कारगीलकडे रवाना झाल्या होत्या. आता कारगीलला जाउन रहायची जागा मिळणे थोड़े कठिण वाटत होते तेंव्हा आज द्रासलाच रहायचे असे ठरले. शिवाय सकाळी बरी असलेली ऐश्वर्याची तब्येत आता पुन्हा ख़राब व्हायला लागली होती. सर्वानुमते आम्ही आज एकडेच रहायचे ठरवले आणि जागेच्या शोधात निघालो. २ मिं. वरच सरकारी डाक बंगला होता तिकडे खोल्या मिळाल्या. ६ वाजता सर्व सामान खोलीत टाकले आणि निघालो द्रासचे 'वॉर मेमोरियल' बघायला... नेमक्या काय भावना होत्या आमच्या 'वॉर मेमोरियल' ला जाताना???
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ... !
.
.
.

Monday, 21 September 2009

लडाखचा सफरनामा - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... !


आज होता मोहिमेचा दूसरा दिवस... आणि आजचे लक्ष्य होते 'द्रास - कारगीलची रणभूमी'. श्रीनगरपासून द्रास १६६ कि.मी. लांब आहे. तर त्या पुढे ५७ कि.मी. आहे कारगील. आजचा टप्पा सुद्धा तसा लांबचा होता. त्यात सर्वांनाच कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. ७ च्या आसपास सर्व उठले आणि आवरून सकाळी ७:३० वाजता सर्वजण न्याहारी करायला हजर होते. चहा आणि ब्रेड-बटर सोबत मस्तपैकी आलूपराठे सुद्धा हाणले. ड्रायवरला सकाळी ९ला हजर रहायला सांगीतले होते त्यावेळेला तो पोचला. गाड़ी लोड केली, सर्व बाइक्स् तपासल्या आणि रवाना झालो आजच्या लक्ष्याकड़े. द्रास-सोनमर्गकड़े जाणारा रस्ता 'दल सरोवर' पासूनच पुढे जातो. मी आणि शमिकाने काल संध्याकाळी सरोवर पाहिलेले असले तरी बाकीच्यांना ते पहायचे होते. तेंव्हा तिकडे जरावेळ थांबून मग पुढे निघायचे असे ठरले. शिवाय साधना आणि उमेशला आसपासचे शूटिंग सुद्धा घेता येणार होते. १५ मिं.मध्ये दल सरोवरला पोचलो. काल संध्याकाळी जसे नीळेशार आणि शांत वाटत होते तसे आता नव्हते. प्रचंड उन लागत होते. जम्मू आणि श्रीनगरला सुद्धा तापमान २८ डिग. च्या वरतीच होते. थंडीचे कपडे घेउन आलेलो खरे; पण त्यांचा अजून तरी काहीच उपयोग होत नव्हता. नाही म्हणायला बाइक वर वारा लागायचा पण थांबलो की घाम निघायचा अक्षरशः



पहिल्या दिवसापासून त्रास देणाऱ्या ड्रायवरने इकडे भलताच त्रास दिला. म्हणतो कसा,"मे यहा लोकल एरियामे नही रुकूंगा. आसपास गाड़ी नही घुमाउंगा. उसके लिए यहाकी गाड़ी करो अलगसे." त्याला म्हटले 'तू बस शांत. आम्ही तुझ्या मालकाशी बोलतो.' ते सगळ प्रकरण निस्तरेपर्यंत बराच वेळ वाया गेला. पण त्यावेळात साधना आणि उमेशचे बरेचसे शूटिंग करून झाले. सर्वजण शिकारामध्ये बसून फोटो वगैरे काढून आले आणि थोडी फार शोपींग पण झाली. आधीच ड्रायवर आणि मग त्याच्या मालकाबरोबर झालेल्या वादामूळे अभिजित वैतागला होता. त्यात ड्रायवर गाड़ी पुढे न्यायला तयार नव्हता आता. त्यावर सर्वजण शोपींग करून गाड़ीमधल्या सामानाचे वजन वाढवून आल्याने तो सर्वांवर डाफरला. बरोबरच होते त्याचे... आता गाडीच कॅन्सल झाली असती तर ते सामान काय डोक्यावर घेउन जाणार होतो आम्ही. हे सर्व सुरू असताना मी शमिकाला घेउन जवळच्या हॉस्पिटलला गेलो. तिला काल रात्रीपासून श्वास घ्यायला थोडा त्रास जाणवत होता. म्हटले अजून उंचीवर जायच्याआधी काही गड़बड़ नाहीना ते बघून घेउया. शिवाय साधना आणि उमेश श्रीनगर यूनीवरसिटीला गेले होते. त्यांना '१५ ऑगस्ट'बद्दल तिथल्या काही मुलांची मते हवी होती. तिकडे जे काही ती मुले बोलली ते खरेच खेदजनक होते. आजही तिथे बऱ्याच लोकांना काश्मिर (खास करून श्रीनगर आणि आसपासचा परिसर) स्वतंत्र हवे आहे. त्यांना भारत नको की पाकिस्तान. 'हम आझाद होना चाहते है.' हे नेहमीचे वाक्य. हे सर्व फुटेज १५ ऑगस्टला दाखवायचे असल्याने ते पोचवायला  साधना तशीच IBN-लोकमतच्या श्रीनगर ऑफिसला पोचली. दुपारचे १२ वाजत आले होते आणि आमच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला होता. तिकडे मालकाशी बोलल्यावर ड्रायवर पुढे सरकायला तयार झाला होता पण त्याला २ दिवसात काहीही करून 'लेह'ला पोचायचे होते. नाही पोचलो तर तो आम्हाला जिकडे असू तिकडे सोडून परत निघणार असे त्याने स्पष्ट सांगीतले. आम्ही म्हटले बघुया पुढे काय करायचे ते ...



दुपारी १ च्या आसपास दल सरोवराच्या समोर असलेल्या 'नथ्थू स्वीट्स' कड़े जेवलो. कारण एकदा श्रीनगर सोडले की सोनमर्गपर्यंत तसे कुठेही चांगले होटेल नाही. आधीच उशीर झालेला होताच म्हटले चला इकडे जेवून मगच निघुया आता. जेवण झाल्यावर मस्तपैकी गुलाबजाम हाणले. आमचे जेवण होते न होते तोपर्यंत साधना आणि उमेश तिकडे येउन पोचले. वेळ नव्हता म्हणुन त्यांनी थोडेसे घशात ढकलले आणि आम्ही अजून उशीर न करता सोनमर्गकडे निघालो. आता शोभितच्या ऐवजी ऐश्वर्या गाडीत बसली. श्रीनगर ते सोनमर्ग अंतर आहे ९५ की.मी. बरोबर २ वाजता श्रीनगर सोडले. आता कुठेही न थांबता संध्याकाळपर्यंत किमान द्रासला पोचायचे असे ठरले होते. एकदा का अंधार झाला की 'झोजी-ला'च्या पुढे सिक्युरिटी प्रोब्लेम होऊ शकतात. बाइक्स् वरुन आशीष, अमेय साळवी, अभिजित, अमेय म्हात्रे आणि आदित्य पुढे निघून गेले. तर त्या मागुन मी, शमिका, साधना, उमेश आणि ऐश्वर्या गाडीमधून येत होतो. जसे आम्ही श्रीनगरच्या बाहेर पडलो तशी गर्दी संपली आणि सुंदर निसर्ग दिसू लागला. हिरवी गार शेते आणि त्यामधून वेगाने जाणारे आम्ही. गाड़ी थांबवून त्या शेतांमध्ये लोळावेसे वाटत होते मला. पण तितका वेळ नव्हता हातात. श्रीनगर नंतर पाहिले मोठे गाव लागते ते 'कंगन'. त्या मागोमाग लागते गुंड.








गुंड मधून बाहेर पड़ता-पड़ता आपल्याला 'सिंधू नदीचे पहिले दर्शन' होते. ह्याठिकाणी आम्ही काही वेळ थांबलो आणि मग पुढे निघालो. आता बाइक्स् मागे होत्या आणि आम्ही पुढे. वाटेमध्ये लागणारी छोटी-छोटी गावे पार करत पोचलो 'गगनगीर'ला. ह्या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे. गाडीच्या ड्रायवरला डिझेल भरायचे होते म्हणुन तो थांबला. वाटेमध्ये उमेशने मस्त शूटिंग केले. गाड्या पेट्रोलपंपला पोचतील त्याचे शूटिंग करायचे म्हणुन आम्ही दोघेही आमचे कॅमेरे घेउन सज्ज होतो. एक एक करून सर्व बायकर्स् पोचले. ५ वाजत आले होते आणि पटकन एक चहा ब्रेक घ्यावा असे ठरले. शेजारीच मिड-वे टी-स्टॉल होता. टीम मधले फोटोग्राफर कुलदीप आणि अमेय आसपासचे फोटो घेण्यामध्ये गुंतले होते. तिकडे ऐश्वर्याची तब्येत जरा डाउन व्ह्यायला सुरू झाली होती. नाही म्हणता म्हणता ४० मिं. गेली आणि आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. मोठाच ब्रेक झाला ज़रा... गाडी निघाली आणि त्यामागे अभि-मनाली निघाले. आता आशिष आणि शोभित गाडीमध्ये बसले तर मी आणि शमिका बाइकवर पुढे निघालो. अमेय साळवीने गाडी काढली आणि लक्ष्यात आले की त्याच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले आहे. आता आली का अजून पंचाइत. एक तर आधीच उशिरात उशीर; त्यात अजून एक प्रॉब्लम. अमेयने गाडीचे चाक काढले. तो पर्यंत अमेय म्हात्रे मागच्या गावात टायरवाला शोधायला गेला. तेवढ्या वेळात पुढे गेलेला अभि फिरून पुन्हा मागे आला आणि अमेय साळवी बरोबर चाक घेउन रिपेअर करायला घेउन गेला. आम्ही बाकी तिकडेच त्यांची वाट बघत बसलो होतो. एवढ्या वेळात बसल्या-बसल्या मी आणि मनालीने  पुन्हा एकदा चहा घेतला.



आज काही आपण द्रासला पोहचत नाही हे आम्हाला समजले होते. आता सोनमर्गला राहण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण सोनमर्ग सोडले की पुढे झोजी-ला पार करून द्रासला पोहचेपर्यंत रहायची तशी सोय नाही. शिवाय तासभराच्या आत अंधार पडणार होताच. पुढे गेलेली गाड़ी सोनमर्गला पोचली आणि आम्ही अजून गगनगीरला पडलेलो होतो. अभ्या-अमेय परत यायच्या आधी सोनमर्गवरुन आशिषचा फोन आला. "पुढचा रस्ता बंद आहे रे. झोजी-लाच्या पुढे 'माताईन' गावाजवळ सिंधू नदीवरचा ब्रिज पडला आहे. आर्मी- B.R.O. चे काम सुरू आहे. उदया दुपारपर्यंत रस्ता सुरू होइल अशी माहिती आहे." बोंबला ... एकात एक ... प्रॉब्लम अनेक. त्यांना तिकडे रहायची सोय काय ते बघायला सांगितले. आणि अभि - अमेय आल्यावर आम्ही निघालो सोनमर्गच्या दिशेने. अंतर तसे फार नव्हते पण संध्याकाळ होत आली तसा हवेत जरा गारवा जाणवू लागला. ३०-४० मिं. मध्ये आम्ही सोनमर्गमध्ये प्रवेश केला. दोन्हीबाजूला बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली होती. सोनमर्ग ८९५० फुट उंचीवर आहे. आम्ही पोचलो तो पर्यंत उमेश आणि आशिषने रहायची- खायची जागा बघून ठेवली होती. संध्याकाळी ८ च्या आसपास तिकडे जेवलो आणि दिवसा अखेरची एक मीटिंग घेतली. तसे आज विशेष काही झालेच नव्हते पण उदया पहाटे-पहाटे लवकर निघून 'लेह'ला किंवा त्याच्या जवळपास तरी पोचायचेचं असे ठरले. ८:३० च्या आसपास रहायच्या जागी जायला निघालो. ही जागा कुठेतरी ३-४ कि.मी आत डोंगरात होती. एकतर सगळा अंधार पडला होता आणि हा गाडीवाला सुसाट पुढे निघून गेला. आम्ही बाईकवर मागुन येतोय रस्ता शोधत-शोधत. डोंगराच्या पलीकडून बारीकसा उजेड येताना दिसत होता. मी, अमेय आणि आदित्यने गाड्या तीथपर्यंत नेल्या. नशीब तिकडे पुढे गेलेले सर्वजण सापडले. सामान उतरवले आणि राहायला मिळालेल्या २ खोल्यांमध्ये शिरलो. ऐश्वर्याची तब्येत बरीच खराब झाली होती. अंगात ताप भरला होता. शोभितचे अंग सुद्धा गरम लागत होते. दोघांना आवश्यक त्या गोळ्या दिल्या आणि सर्वजण झोपी गेलो. पण शांतपणे झोपतील तर ना. कुलदीप, अमेय आणि उमेश बाहेर पडले आणि ट्रायपॉड लावून चंद्राचे फोटो काढू लागले. ११ वाजले तरी ते काही झोपेना. शेवटी १२ च्या आसपास सर्वजण झोपी गेलो. उदया पहाटे ४ ला उठून ५ वाजता सोनमर्ग सोडायचे होते. ब्रिज सुरू झाला की त्यावरुन पहिल्या गाड्या आमच्या निघाल्या पाहिजे होत्या ना...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - 'द्रास'ला पोचता-पोचता ... !
.
.
.

Saturday, 19 September 2009

लडाखचा सफरनामा - काश्मिर हमारा है ... !


ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ला सर्वजण जम्मूहून श्रीनगरसाठी कुच झाले. अभि-मनाली, ऐश्वर्या-आदित्य, अमेय-कुलदीप, आशिष-उमेश आणि अमेय-दिपाली असे १० जण बाइकसवर तर साधना, पूनम, शोभित असे तिघे गाड़ीमध्ये बसले होते. हो.. हो.. तीच गाडी जी आम्ही जम्मूला पोचलो तेंव्हा यायला हवी होती; नशीब आज तरी तो उगवला.  मी आणि शमिका पहाटेच मुंबईवरुन निघून श्रीनगरसाठी रवाना झालो होतो. पहाटे ६:३०च्या त्या फ्लाईटमध्ये चक्क 'अभिनेता नसरुद्दीन शाह' यांची भेट घडली. काही कामानिमित्त ते सुद्धा श्रीनगरला निघाले होते. न विसरता त्यांची स्वाक्षरी घेतली. विमानाने दिल्ली- हरियाणा मागे टाकले तसे देवभूमी हिमाचल आणि जम्मू - काश्मिरच्या सुंदर नयनरम्य पर्वतरांगा दिसू लागल्या. उंचच-उंच शिखरे आणि त्यांना बिलगणारे पांढरेशुभ्र ढग, शिखरांच्या उतारांवर असलेले ते सूचिपर्णी वृक्ष आणि डोंगरांच्या पायथ्याला असलेली हिरवीगार शेती. त्यामध्येच दिसणारी छोटी-छोटी गावे आणि त्यांना जोडणारे रस्ते. स्वर्ग ह्यापेक्षा वेगळा असू शकेल ??? काही वेळात आम्ही त्याच दृश्यात विलीन होणार होतो.


मी आणि शमिका श्रीनगरला पोचलो तेंव्हा सकाळचे १० वाजत आले होते. दूसरीकडे संपूर्ण ग्रुपचा प्रवास राष्ट्रीय महामार्ग - १ म्हणजेच NH - 1 वरुन सुरू झाला होता. जम्मू ते लेह ह्या संपूर्ण मार्गाची जबाबदारी भारतीय सेनेच्या सिमा सडक संगठन म्हणजेच B.R.O. - Border Road Organisation कडे आहे. जम्मू ते श्रीनगर अंतर आहे ३४३ किमी. आज पहिल्याच दिवशी तसा लांबचा पल्ला गाठायचा होता आम्हाला. जम्मूवरुन निघालो आणि कटरा, उधमपुर, जजरकोठली पार करत 'पटनीटॉप'ला पोचलो. 'पटनीटॉप' ची उंची ६६९७ फुट आहे. तिकडून निघालो आणि बटोत, रामबन, बनिहाल अशी एकामागुन एक शहरे पारकरत अथकपणे श्रीनगरकड़े सरकत होतो. मध्ये दुपारी एके ठिकाणी जेवणाला थांबलो. ह्यापूर्ण वेळात संपूर्ण मार्गाची व्हिडीओशूटिंग आणि फोटोग्राफी सुरूच होती. शिवाय पहिलाच दिवस असल्याने बायकर्स् ज़रा सावकाशीनेच गाडी हाकत होते.


निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेला हा प्रदेश. वळण लागत होती आणि प्रत्येक वळणावर निसर्ग आपलं वेगळ रूप दाखवत होता. एके ठिकाणी '1st view of kashmir valley' असा पॉइंट लागतो. इकडे काहीवेळ थांबून 'काश्मिरचा नजारा' पाहिला. रस्त्याच्याकडेला उभे असताना कुलदीपने त्याचे हेलमेट खाली पडले. खाली म्हणजे चांगले २० एक फुट खाली. मग काय कुठून तरी त्याने रस्ता शोधला आणि उतरला खाली. हेलमेट मिळाले पण त्याचे व्हायसर तुटले होते. तिकडून निघालो आणि पुन्हा एकदा 'लक्ष्य श्रीनगर.' अनंतनागच्या आधी 'जवाहर टनेल' लागले. ह्याची लांबी २.७ किमी. इतकी आहे. गंमत म्हणजे हे टनेल उंचीला फार तर १२-१५ फुट असेल आणि रुंदीला १० फुट. शिवाय आतमध्ये कुठलेच लाइट्स नाहीत बरं का ... तेंव्हा 'काळा चष्मा काढा' आणि हेडलाइट्स फूल ऑन. जरा चुक झाली तर काय होइल हे सांगायला नकोच. टनेल पारकरून अनंतनागकडे निघालो तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. सर्व बाइक्स् आता वेगात पळत होत्या. मात्र गाडीच्या वेगापेक्षा मनातले विचार जोरात पळत होते.



तिकडे श्रीनगरमध्ये मी आणि शमिका होटेल वरुन निघालो आणि श्रीनगर फिरायला निघालो. सर्वजण श्रीनगरला पोहचेपर्यंत हातात वेळ होता म्हटले चला भटकून येऊ या. लालचौकला गेलो आणि असेच बाजारात भटकत राहिलो. असाच एक विचार मनात आला... "असे काय वेगळे आहे इकडे?" आपल्यासारखेच तर आहे सर्व काही. डोंगर, नदया, निसर्ग, शहरे, दुकाने आणि हो माणसेसुद्धा. पण तरीसुद्धा इकडे काहीतरी वेगळे आहे. होय... ती एक जखम जी कोरली गेली ६० वर्षांपूर्वी. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण सोबत मिळाला विभाजनाचा शाप देखील. त्यात पाकिस्तानने काश्मिरवर आक्रमण केल्याने राजाहरीसिंग यांनी घाईने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. अगतिक होउन त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि नकळत भारताचा प्रवेश झाला एका चक्रव्यूहात. ज्यात तो शिरला खरा पण आज ६० वर्षांनी देखील बाहेर पडायचा मार्ग शोधतोय.


२१ ऑक्टोबर १९४७ ची काळरात्र. पाकिस्तानी सैन्याने काश्मिर सरहद्दीवरील 'डोमेल' ह्या चौकीवर फंदफितुरीने हल्ला चढ़वून ती काबिज केली. मेजर जनरल अकबरखान याच्या नेतृत्वाखाली रावळपिंडी मुख्यालयात शिजत असलेल्या 'ऑपरेशन गुलमर्ग'ची यशस्वी सुरवात झाली होती. २२ तारखेला काश्मिर राज्याच्या सैनिकी हालचाली सुरू झाल्या आणि ब्रिगेडिअर राजिंदरसिंग यांनी उरी येथे पोचून तिथल्या नदीवरील पुल उडवून दिला. पाकिस्तानी सैन्याला नविन पुल बांधून पुढे सरकायला २४ तास लागले. ह्या लढाईमध्ये ब्रिगेडिअर राजिंदरसिंग यांना वीरमरण आले मात्र हा अत्यंत महत्वाचा वेळ लढाईची अधिक तयारी करायला त्यांनी मिळवून दिला होता. परिस्थिती आता आपल्या हाताबाहेर गेली आहे असे समजताच राजा हरीसिंग यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि मग भारतीय सैन्याने भरलेली डीसी३ - डाकोटा कंपनीची खाजगी विमाने श्रीनगरला उतरु लागली. भारतीय सैन्य प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला प्रखर प्रतिकार करू लागले. बारामुल्ला येथे ले.कर्नल रणजीत रॉय (मरणोपरांत महावीरचक्र), बदगाम येथे मेजर सोमनाथ शर्मा (मरणोपरांत परमवीरचक्र) आणि शेटालोंग येथे ब्रिगेडिअर सेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने अतुल्य पराक्रम गाजवत ७ नोव्हेंबरपर्यंत भाडोत्री सैन्याला माघारी माघारी पिटाळायला सुरवात करून दिली.


पाकिस्तानी सैन्याने ५००० भाडोत्री टोळीवाल्यांना हाताशी धरून  पुंछ, जजरकोटली, राजौरी, झंगड, मीरपुर, अखनूर, कठुआ अश्या सर्व महत्वाच्या शहरांना वेढा घालता होता. १६ नोव्हेंबर पासून मेजर जनरल कलावंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली २६८ इंफंट्री ब्रिगेड, ब्रिगेडिअर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ५० पॅराशूट ब्रिगेड आणि ब्रिगेडिअर सेन यांच्या नेतृत्वाखाली १६१ इंफंट्री ब्रिगेड पुढची चाल करून गेल्या. २ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशेराच्या लढाईमध्ये 'नाइक जदुनाथ सिंग'याने अतुलनीय पराक्रम करून ते भारतीय सैन्याला जिंकून दिले. ह्यात त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या असीम शौर्याची दखल घेउन त्यांना मरणोपरांत परमवीरचक्र बहाल केले गेले. पुढे ८ एप्रिल रोजी भारतीय सैन्याने राजौरीवर अखेरचा हल्ला चढवला. माघारी पळणाऱ्या पाकी सैन्याने जागोजागी सुरुंग पेरले होते. लेफ्टनंट राघोबा राणे ह्या इंजिनिअर दलाच्या अधिकाऱ्याने जिवाची पर्वा न करता ३ दिवस आणि ३ रात्र सतत काम करून सर्व सुरुंग निष्प्रभ करण्याचे कार्य पार पाडले. त्यांचे हे कार्य 'परमवीरचक्र'च्या तोडीचे होते. अर्थात तो सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. १९४७-४८ ची लढाई जम्मू ते लेह ह्या संपूर्ण भागात लढली गेली होती आणि १ जानेवारी १९४९ ला झालेल्या युद्धबंदीनूसार ती थांबली... थांबवली गेली... कारगिल - द्रास आणि लेह भागातल्या लढायांबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये दृष्टी क्षेप टाकू.




मनातले विचार थांबले तेंव्हा माझ्यासमोर अथांग 'दल सरोवर' पसरले होते. निळेशार आणि शांत... एक शिकारा केला आणि आम्ही त्या सरोवरातून फिरायला निघालो. अभिला फोन केला तर ते श्रीनगरच्या आसपास पोचले होते आणि कुठेतरी चहा प्यायला थांबले होते. ८ वाजत आले तेंव्हा मी पुन्हा हॉटेलवर पोचलो आणि जेवणाची ऑर्डर देउन टाकली. सर्वजण आल्या-आल्या भूक-भूक करणार हे मला माहीत होते. बऱ्याच उशिराने ९ च्या आसपास अखेर टीम पोचली. सर्वजण फ्रेश झाले आणि मग आम्ही जेवून घेतले. पहिल्याच दिवशी बाइक्स् चालवून सर्व थकले होते पण झोपायच्या आधी ठरल्याप्रमाणे दररोजच्या नियमानूसार दिवसाअखेरची मीटिंग झाली. उदया किती वाजता निघायचे आणि वेळेचे गणित अजून चांगले कसे मांडायचे ते सर्व ठरले. उद्याचे लक्ष्य होते... 'द्रास - कारगिल'

.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... !
.
.
.