Saturday 19 September 2009

लडाखचा सफरनामा - काश्मिर हमारा है ... !


ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रविवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ला सर्वजण जम्मूहून श्रीनगरसाठी कुच झाले. अभि-मनाली, ऐश्वर्या-आदित्य, अमेय-कुलदीप, आशिष-उमेश आणि अमेय-दिपाली असे १० जण बाइकसवर तर साधना, पूनम, शोभित असे तिघे गाड़ीमध्ये बसले होते. हो.. हो.. तीच गाडी जी आम्ही जम्मूला पोचलो तेंव्हा यायला हवी होती; नशीब आज तरी तो उगवला.  मी आणि शमिका पहाटेच मुंबईवरुन निघून श्रीनगरसाठी रवाना झालो होतो. पहाटे ६:३०च्या त्या फ्लाईटमध्ये चक्क 'अभिनेता नसरुद्दीन शाह' यांची भेट घडली. काही कामानिमित्त ते सुद्धा श्रीनगरला निघाले होते. न विसरता त्यांची स्वाक्षरी घेतली. विमानाने दिल्ली- हरियाणा मागे टाकले तसे देवभूमी हिमाचल आणि जम्मू - काश्मिरच्या सुंदर नयनरम्य पर्वतरांगा दिसू लागल्या. उंचच-उंच शिखरे आणि त्यांना बिलगणारे पांढरेशुभ्र ढग, शिखरांच्या उतारांवर असलेले ते सूचिपर्णी वृक्ष आणि डोंगरांच्या पायथ्याला असलेली हिरवीगार शेती. त्यामध्येच दिसणारी छोटी-छोटी गावे आणि त्यांना जोडणारे रस्ते. स्वर्ग ह्यापेक्षा वेगळा असू शकेल ??? काही वेळात आम्ही त्याच दृश्यात विलीन होणार होतो.


मी आणि शमिका श्रीनगरला पोचलो तेंव्हा सकाळचे १० वाजत आले होते. दूसरीकडे संपूर्ण ग्रुपचा प्रवास राष्ट्रीय महामार्ग - १ म्हणजेच NH - 1 वरुन सुरू झाला होता. जम्मू ते लेह ह्या संपूर्ण मार्गाची जबाबदारी भारतीय सेनेच्या सिमा सडक संगठन म्हणजेच B.R.O. - Border Road Organisation कडे आहे. जम्मू ते श्रीनगर अंतर आहे ३४३ किमी. आज पहिल्याच दिवशी तसा लांबचा पल्ला गाठायचा होता आम्हाला. जम्मूवरुन निघालो आणि कटरा, उधमपुर, जजरकोठली पार करत 'पटनीटॉप'ला पोचलो. 'पटनीटॉप' ची उंची ६६९७ फुट आहे. तिकडून निघालो आणि बटोत, रामबन, बनिहाल अशी एकामागुन एक शहरे पारकरत अथकपणे श्रीनगरकड़े सरकत होतो. मध्ये दुपारी एके ठिकाणी जेवणाला थांबलो. ह्यापूर्ण वेळात संपूर्ण मार्गाची व्हिडीओशूटिंग आणि फोटोग्राफी सुरूच होती. शिवाय पहिलाच दिवस असल्याने बायकर्स् ज़रा सावकाशीनेच गाडी हाकत होते.


निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेला हा प्रदेश. वळण लागत होती आणि प्रत्येक वळणावर निसर्ग आपलं वेगळ रूप दाखवत होता. एके ठिकाणी '1st view of kashmir valley' असा पॉइंट लागतो. इकडे काहीवेळ थांबून 'काश्मिरचा नजारा' पाहिला. रस्त्याच्याकडेला उभे असताना कुलदीपने त्याचे हेलमेट खाली पडले. खाली म्हणजे चांगले २० एक फुट खाली. मग काय कुठून तरी त्याने रस्ता शोधला आणि उतरला खाली. हेलमेट मिळाले पण त्याचे व्हायसर तुटले होते. तिकडून निघालो आणि पुन्हा एकदा 'लक्ष्य श्रीनगर.' अनंतनागच्या आधी 'जवाहर टनेल' लागले. ह्याची लांबी २.७ किमी. इतकी आहे. गंमत म्हणजे हे टनेल उंचीला फार तर १२-१५ फुट असेल आणि रुंदीला १० फुट. शिवाय आतमध्ये कुठलेच लाइट्स नाहीत बरं का ... तेंव्हा 'काळा चष्मा काढा' आणि हेडलाइट्स फूल ऑन. जरा चुक झाली तर काय होइल हे सांगायला नकोच. टनेल पारकरून अनंतनागकडे निघालो तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. सर्व बाइक्स् आता वेगात पळत होत्या. मात्र गाडीच्या वेगापेक्षा मनातले विचार जोरात पळत होते.



तिकडे श्रीनगरमध्ये मी आणि शमिका होटेल वरुन निघालो आणि श्रीनगर फिरायला निघालो. सर्वजण श्रीनगरला पोहचेपर्यंत हातात वेळ होता म्हटले चला भटकून येऊ या. लालचौकला गेलो आणि असेच बाजारात भटकत राहिलो. असाच एक विचार मनात आला... "असे काय वेगळे आहे इकडे?" आपल्यासारखेच तर आहे सर्व काही. डोंगर, नदया, निसर्ग, शहरे, दुकाने आणि हो माणसेसुद्धा. पण तरीसुद्धा इकडे काहीतरी वेगळे आहे. होय... ती एक जखम जी कोरली गेली ६० वर्षांपूर्वी. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण सोबत मिळाला विभाजनाचा शाप देखील. त्यात पाकिस्तानने काश्मिरवर आक्रमण केल्याने राजाहरीसिंग यांनी घाईने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. अगतिक होउन त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि नकळत भारताचा प्रवेश झाला एका चक्रव्यूहात. ज्यात तो शिरला खरा पण आज ६० वर्षांनी देखील बाहेर पडायचा मार्ग शोधतोय.


२१ ऑक्टोबर १९४७ ची काळरात्र. पाकिस्तानी सैन्याने काश्मिर सरहद्दीवरील 'डोमेल' ह्या चौकीवर फंदफितुरीने हल्ला चढ़वून ती काबिज केली. मेजर जनरल अकबरखान याच्या नेतृत्वाखाली रावळपिंडी मुख्यालयात शिजत असलेल्या 'ऑपरेशन गुलमर्ग'ची यशस्वी सुरवात झाली होती. २२ तारखेला काश्मिर राज्याच्या सैनिकी हालचाली सुरू झाल्या आणि ब्रिगेडिअर राजिंदरसिंग यांनी उरी येथे पोचून तिथल्या नदीवरील पुल उडवून दिला. पाकिस्तानी सैन्याला नविन पुल बांधून पुढे सरकायला २४ तास लागले. ह्या लढाईमध्ये ब्रिगेडिअर राजिंदरसिंग यांना वीरमरण आले मात्र हा अत्यंत महत्वाचा वेळ लढाईची अधिक तयारी करायला त्यांनी मिळवून दिला होता. परिस्थिती आता आपल्या हाताबाहेर गेली आहे असे समजताच राजा हरीसिंग यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि मग भारतीय सैन्याने भरलेली डीसी३ - डाकोटा कंपनीची खाजगी विमाने श्रीनगरला उतरु लागली. भारतीय सैन्य प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला प्रखर प्रतिकार करू लागले. बारामुल्ला येथे ले.कर्नल रणजीत रॉय (मरणोपरांत महावीरचक्र), बदगाम येथे मेजर सोमनाथ शर्मा (मरणोपरांत परमवीरचक्र) आणि शेटालोंग येथे ब्रिगेडिअर सेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने अतुल्य पराक्रम गाजवत ७ नोव्हेंबरपर्यंत भाडोत्री सैन्याला माघारी माघारी पिटाळायला सुरवात करून दिली.


पाकिस्तानी सैन्याने ५००० भाडोत्री टोळीवाल्यांना हाताशी धरून  पुंछ, जजरकोटली, राजौरी, झंगड, मीरपुर, अखनूर, कठुआ अश्या सर्व महत्वाच्या शहरांना वेढा घालता होता. १६ नोव्हेंबर पासून मेजर जनरल कलावंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली २६८ इंफंट्री ब्रिगेड, ब्रिगेडिअर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ५० पॅराशूट ब्रिगेड आणि ब्रिगेडिअर सेन यांच्या नेतृत्वाखाली १६१ इंफंट्री ब्रिगेड पुढची चाल करून गेल्या. २ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशेराच्या लढाईमध्ये 'नाइक जदुनाथ सिंग'याने अतुलनीय पराक्रम करून ते भारतीय सैन्याला जिंकून दिले. ह्यात त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या असीम शौर्याची दखल घेउन त्यांना मरणोपरांत परमवीरचक्र बहाल केले गेले. पुढे ८ एप्रिल रोजी भारतीय सैन्याने राजौरीवर अखेरचा हल्ला चढवला. माघारी पळणाऱ्या पाकी सैन्याने जागोजागी सुरुंग पेरले होते. लेफ्टनंट राघोबा राणे ह्या इंजिनिअर दलाच्या अधिकाऱ्याने जिवाची पर्वा न करता ३ दिवस आणि ३ रात्र सतत काम करून सर्व सुरुंग निष्प्रभ करण्याचे कार्य पार पाडले. त्यांचे हे कार्य 'परमवीरचक्र'च्या तोडीचे होते. अर्थात तो सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. १९४७-४८ ची लढाई जम्मू ते लेह ह्या संपूर्ण भागात लढली गेली होती आणि १ जानेवारी १९४९ ला झालेल्या युद्धबंदीनूसार ती थांबली... थांबवली गेली... कारगिल - द्रास आणि लेह भागातल्या लढायांबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये दृष्टी क्षेप टाकू.




मनातले विचार थांबले तेंव्हा माझ्यासमोर अथांग 'दल सरोवर' पसरले होते. निळेशार आणि शांत... एक शिकारा केला आणि आम्ही त्या सरोवरातून फिरायला निघालो. अभिला फोन केला तर ते श्रीनगरच्या आसपास पोचले होते आणि कुठेतरी चहा प्यायला थांबले होते. ८ वाजत आले तेंव्हा मी पुन्हा हॉटेलवर पोचलो आणि जेवणाची ऑर्डर देउन टाकली. सर्वजण आल्या-आल्या भूक-भूक करणार हे मला माहीत होते. बऱ्याच उशिराने ९ च्या आसपास अखेर टीम पोचली. सर्वजण फ्रेश झाले आणि मग आम्ही जेवून घेतले. पहिल्याच दिवशी बाइक्स् चालवून सर्व थकले होते पण झोपायच्या आधी ठरल्याप्रमाणे दररोजच्या नियमानूसार दिवसाअखेरची मीटिंग झाली. उदया किती वाजता निघायचे आणि वेळेचे गणित अजून चांगले कसे मांडायचे ते सर्व ठरले. उद्याचे लक्ष्य होते... 'द्रास - कारगिल'

.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... !
.
.
.

7 comments:

  1. खूपच सविस्तर व चांगले होतेय. हो रे खरेच आहे चक्रव्यूहात प्रवेश तर केला पण.....:( सगळ्या वीरांना सलाम.
    दल लेक-अहाहा!डोळ्यासमोर अनेक दृष्ये तरळून गेली. सुंदर.वर्णनातीत आहे संपूर्ण काश्मिर. बस अनुभवायचे,साठवायचे आणि पुन्हा पुन्हा जायचे.
    हो रे जवाहर टनेल म्हणजे.... आम्ही गेलो होतो तेव्हा दरड कोसळून रस्ता बंद झाला होता पुढचा त्यामुळे पाच तास तिथे अडकून पडलो होतो.:)
    बापरे इतक्या आठवणी आहेत की इथे एक नवीन पोस्ट तयार होईल.हेहे,:D.
    मस्त लिहीतो आहेस.

    ReplyDelete
  2. माझा हा आवडता भाग, तसा सगळाच भारत फिरायला मला खुप आवडतो. आपण छान सफर घडवत अहात. माहिती पण उत्तम. धन्यवाद...!

    ReplyDelete
  3. प्रत्येक पोस्टगणिक उत्कंठा शिगेला पोह्चते आहे. . .Thanks for sharing!!!

    ReplyDelete
  4. धन्यवाद ... नरेंद्र आणि मनमौजी ... अपेक्षा आहे की पुढच्या भागात उत्कंठा अजून वाढेल ... :D

    भानस ताई ... इथले रस्ते म्हणजे असे प्रकार व्हायचेच... कधी दरड कोसळणे तर कधी रस्ता खचणे तर कधी ब्रिज तूटणे... पुढच्या भागात लिहीनच ... :)
    तुम्ही तर खुप आधी हा प्रवास केला आहे ... खरच लिहा की एक पोस्ट ...

    ReplyDelete
  5. hey khoop informative aahe ha post aani ozartya shailimule te interesting pan zalay :)
    kharach tu pustak lihaycha vichar kar :)

    ReplyDelete
  6. पूनम .. तुर्तास तरी ही ओघवती शैली ब्लॉग पुरती राहू दे. पुस्तकाचे नंतर बघुया ... काय .. :D

    ReplyDelete
  7. Roooooooohaaaaaaaaannnnnnnnnnnnnnnnnnnnn
    sahiiiiiiiii.........haa postt khuppp chaaannnnnn zalay :D
    anxiety level was quiet high while reading it.......tu tya journeyt nastana varnan ekdum fakkad zalay........
    historical referencemule ajun chan flavour yetoy........ani nisarga varnan wit feelgs chan jamun alay.......mastttttttttt :)
    waiting for rest parts!!! :)
    Sapta Shivpadsparsha vachatana jasa ekdum thrilling.......ekdum bharoon alyasarkha vatayacha te haa post vachatana thoda thoda zala......tyatle Rajgadcha varnan as if to swata boltoy aani hya post madhale Kashmir che varnan......appeals a lottt......
    Sapta Shivpadsparsha mi @ a time....salag vachalele all parts mhanun ajun majja aleli vachatana.....Ladakh pan asach sagale zalyavar ekdumach vachu kay?????? utkantha tanali janar nahiiii jast :D

    gr8 dude....kip it up!!!

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...