Monday 21 September 2009

लडाखचा सफरनामा - ब्रिज तूटला... प्रवास खुंटला ... !


आज होता मोहिमेचा दूसरा दिवस... आणि आजचे लक्ष्य होते 'द्रास - कारगीलची रणभूमी'. श्रीनगरपासून द्रास १६६ कि.मी. लांब आहे. तर त्या पुढे ५७ कि.मी. आहे कारगील. आजचा टप्पा सुद्धा तसा लांबचा होता. त्यात सर्वांनाच कालचा थकवा आज सकाळी जास्त जाणवत होता. ७ च्या आसपास सर्व उठले आणि आवरून सकाळी ७:३० वाजता सर्वजण न्याहारी करायला हजर होते. चहा आणि ब्रेड-बटर सोबत मस्तपैकी आलूपराठे सुद्धा हाणले. ड्रायवरला सकाळी ९ला हजर रहायला सांगीतले होते त्यावेळेला तो पोचला. गाड़ी लोड केली, सर्व बाइक्स् तपासल्या आणि रवाना झालो आजच्या लक्ष्याकड़े. द्रास-सोनमर्गकड़े जाणारा रस्ता 'दल सरोवर' पासूनच पुढे जातो. मी आणि शमिकाने काल संध्याकाळी सरोवर पाहिलेले असले तरी बाकीच्यांना ते पहायचे होते. तेंव्हा तिकडे जरावेळ थांबून मग पुढे निघायचे असे ठरले. शिवाय साधना आणि उमेशला आसपासचे शूटिंग सुद्धा घेता येणार होते. १५ मिं.मध्ये दल सरोवरला पोचलो. काल संध्याकाळी जसे नीळेशार आणि शांत वाटत होते तसे आता नव्हते. प्रचंड उन लागत होते. जम्मू आणि श्रीनगरला सुद्धा तापमान २८ डिग. च्या वरतीच होते. थंडीचे कपडे घेउन आलेलो खरे; पण त्यांचा अजून तरी काहीच उपयोग होत नव्हता. नाही म्हणायला बाइक वर वारा लागायचा पण थांबलो की घाम निघायचा अक्षरशः



पहिल्या दिवसापासून त्रास देणाऱ्या ड्रायवरने इकडे भलताच त्रास दिला. म्हणतो कसा,"मे यहा लोकल एरियामे नही रुकूंगा. आसपास गाड़ी नही घुमाउंगा. उसके लिए यहाकी गाड़ी करो अलगसे." त्याला म्हटले 'तू बस शांत. आम्ही तुझ्या मालकाशी बोलतो.' ते सगळ प्रकरण निस्तरेपर्यंत बराच वेळ वाया गेला. पण त्यावेळात साधना आणि उमेशचे बरेचसे शूटिंग करून झाले. सर्वजण शिकारामध्ये बसून फोटो वगैरे काढून आले आणि थोडी फार शोपींग पण झाली. आधीच ड्रायवर आणि मग त्याच्या मालकाबरोबर झालेल्या वादामूळे अभिजित वैतागला होता. त्यात ड्रायवर गाड़ी पुढे न्यायला तयार नव्हता आता. त्यावर सर्वजण शोपींग करून गाड़ीमधल्या सामानाचे वजन वाढवून आल्याने तो सर्वांवर डाफरला. बरोबरच होते त्याचे... आता गाडीच कॅन्सल झाली असती तर ते सामान काय डोक्यावर घेउन जाणार होतो आम्ही. हे सर्व सुरू असताना मी शमिकाला घेउन जवळच्या हॉस्पिटलला गेलो. तिला काल रात्रीपासून श्वास घ्यायला थोडा त्रास जाणवत होता. म्हटले अजून उंचीवर जायच्याआधी काही गड़बड़ नाहीना ते बघून घेउया. शिवाय साधना आणि उमेश श्रीनगर यूनीवरसिटीला गेले होते. त्यांना '१५ ऑगस्ट'बद्दल तिथल्या काही मुलांची मते हवी होती. तिकडे जे काही ती मुले बोलली ते खरेच खेदजनक होते. आजही तिथे बऱ्याच लोकांना काश्मिर (खास करून श्रीनगर आणि आसपासचा परिसर) स्वतंत्र हवे आहे. त्यांना भारत नको की पाकिस्तान. 'हम आझाद होना चाहते है.' हे नेहमीचे वाक्य. हे सर्व फुटेज १५ ऑगस्टला दाखवायचे असल्याने ते पोचवायला  साधना तशीच IBN-लोकमतच्या श्रीनगर ऑफिसला पोचली. दुपारचे १२ वाजत आले होते आणि आमच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला होता. तिकडे मालकाशी बोलल्यावर ड्रायवर पुढे सरकायला तयार झाला होता पण त्याला २ दिवसात काहीही करून 'लेह'ला पोचायचे होते. नाही पोचलो तर तो आम्हाला जिकडे असू तिकडे सोडून परत निघणार असे त्याने स्पष्ट सांगीतले. आम्ही म्हटले बघुया पुढे काय करायचे ते ...



दुपारी १ च्या आसपास दल सरोवराच्या समोर असलेल्या 'नथ्थू स्वीट्स' कड़े जेवलो. कारण एकदा श्रीनगर सोडले की सोनमर्गपर्यंत तसे कुठेही चांगले होटेल नाही. आधीच उशीर झालेला होताच म्हटले चला इकडे जेवून मगच निघुया आता. जेवण झाल्यावर मस्तपैकी गुलाबजाम हाणले. आमचे जेवण होते न होते तोपर्यंत साधना आणि उमेश तिकडे येउन पोचले. वेळ नव्हता म्हणुन त्यांनी थोडेसे घशात ढकलले आणि आम्ही अजून उशीर न करता सोनमर्गकडे निघालो. आता शोभितच्या ऐवजी ऐश्वर्या गाडीत बसली. श्रीनगर ते सोनमर्ग अंतर आहे ९५ की.मी. बरोबर २ वाजता श्रीनगर सोडले. आता कुठेही न थांबता संध्याकाळपर्यंत किमान द्रासला पोचायचे असे ठरले होते. एकदा का अंधार झाला की 'झोजी-ला'च्या पुढे सिक्युरिटी प्रोब्लेम होऊ शकतात. बाइक्स् वरुन आशीष, अमेय साळवी, अभिजित, अमेय म्हात्रे आणि आदित्य पुढे निघून गेले. तर त्या मागुन मी, शमिका, साधना, उमेश आणि ऐश्वर्या गाडीमधून येत होतो. जसे आम्ही श्रीनगरच्या बाहेर पडलो तशी गर्दी संपली आणि सुंदर निसर्ग दिसू लागला. हिरवी गार शेते आणि त्यामधून वेगाने जाणारे आम्ही. गाड़ी थांबवून त्या शेतांमध्ये लोळावेसे वाटत होते मला. पण तितका वेळ नव्हता हातात. श्रीनगर नंतर पाहिले मोठे गाव लागते ते 'कंगन'. त्या मागोमाग लागते गुंड.








गुंड मधून बाहेर पड़ता-पड़ता आपल्याला 'सिंधू नदीचे पहिले दर्शन' होते. ह्याठिकाणी आम्ही काही वेळ थांबलो आणि मग पुढे निघालो. आता बाइक्स् मागे होत्या आणि आम्ही पुढे. वाटेमध्ये लागणारी छोटी-छोटी गावे पार करत पोचलो 'गगनगीर'ला. ह्या ठिकाणी एक पेट्रोल पंप आहे. गाडीच्या ड्रायवरला डिझेल भरायचे होते म्हणुन तो थांबला. वाटेमध्ये उमेशने मस्त शूटिंग केले. गाड्या पेट्रोलपंपला पोचतील त्याचे शूटिंग करायचे म्हणुन आम्ही दोघेही आमचे कॅमेरे घेउन सज्ज होतो. एक एक करून सर्व बायकर्स् पोचले. ५ वाजत आले होते आणि पटकन एक चहा ब्रेक घ्यावा असे ठरले. शेजारीच मिड-वे टी-स्टॉल होता. टीम मधले फोटोग्राफर कुलदीप आणि अमेय आसपासचे फोटो घेण्यामध्ये गुंतले होते. तिकडे ऐश्वर्याची तब्येत जरा डाउन व्ह्यायला सुरू झाली होती. नाही म्हणता म्हणता ४० मिं. गेली आणि आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. मोठाच ब्रेक झाला ज़रा... गाडी निघाली आणि त्यामागे अभि-मनाली निघाले. आता आशिष आणि शोभित गाडीमध्ये बसले तर मी आणि शमिका बाइकवर पुढे निघालो. अमेय साळवीने गाडी काढली आणि लक्ष्यात आले की त्याच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले आहे. आता आली का अजून पंचाइत. एक तर आधीच उशिरात उशीर; त्यात अजून एक प्रॉब्लम. अमेयने गाडीचे चाक काढले. तो पर्यंत अमेय म्हात्रे मागच्या गावात टायरवाला शोधायला गेला. तेवढ्या वेळात पुढे गेलेला अभि फिरून पुन्हा मागे आला आणि अमेय साळवी बरोबर चाक घेउन रिपेअर करायला घेउन गेला. आम्ही बाकी तिकडेच त्यांची वाट बघत बसलो होतो. एवढ्या वेळात बसल्या-बसल्या मी आणि मनालीने  पुन्हा एकदा चहा घेतला.



आज काही आपण द्रासला पोहचत नाही हे आम्हाला समजले होते. आता सोनमर्गला राहण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण सोनमर्ग सोडले की पुढे झोजी-ला पार करून द्रासला पोहचेपर्यंत रहायची तशी सोय नाही. शिवाय तासभराच्या आत अंधार पडणार होताच. पुढे गेलेली गाड़ी सोनमर्गला पोचली आणि आम्ही अजून गगनगीरला पडलेलो होतो. अभ्या-अमेय परत यायच्या आधी सोनमर्गवरुन आशिषचा फोन आला. "पुढचा रस्ता बंद आहे रे. झोजी-लाच्या पुढे 'माताईन' गावाजवळ सिंधू नदीवरचा ब्रिज पडला आहे. आर्मी- B.R.O. चे काम सुरू आहे. उदया दुपारपर्यंत रस्ता सुरू होइल अशी माहिती आहे." बोंबला ... एकात एक ... प्रॉब्लम अनेक. त्यांना तिकडे रहायची सोय काय ते बघायला सांगितले. आणि अभि - अमेय आल्यावर आम्ही निघालो सोनमर्गच्या दिशेने. अंतर तसे फार नव्हते पण संध्याकाळ होत आली तसा हवेत जरा गारवा जाणवू लागला. ३०-४० मिं. मध्ये आम्ही सोनमर्गमध्ये प्रवेश केला. दोन्हीबाजूला बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली होती. सोनमर्ग ८९५० फुट उंचीवर आहे. आम्ही पोचलो तो पर्यंत उमेश आणि आशिषने रहायची- खायची जागा बघून ठेवली होती. संध्याकाळी ८ च्या आसपास तिकडे जेवलो आणि दिवसा अखेरची एक मीटिंग घेतली. तसे आज विशेष काही झालेच नव्हते पण उदया पहाटे-पहाटे लवकर निघून 'लेह'ला किंवा त्याच्या जवळपास तरी पोचायचेचं असे ठरले. ८:३० च्या आसपास रहायच्या जागी जायला निघालो. ही जागा कुठेतरी ३-४ कि.मी आत डोंगरात होती. एकतर सगळा अंधार पडला होता आणि हा गाडीवाला सुसाट पुढे निघून गेला. आम्ही बाईकवर मागुन येतोय रस्ता शोधत-शोधत. डोंगराच्या पलीकडून बारीकसा उजेड येताना दिसत होता. मी, अमेय आणि आदित्यने गाड्या तीथपर्यंत नेल्या. नशीब तिकडे पुढे गेलेले सर्वजण सापडले. सामान उतरवले आणि राहायला मिळालेल्या २ खोल्यांमध्ये शिरलो. ऐश्वर्याची तब्येत बरीच खराब झाली होती. अंगात ताप भरला होता. शोभितचे अंग सुद्धा गरम लागत होते. दोघांना आवश्यक त्या गोळ्या दिल्या आणि सर्वजण झोपी गेलो. पण शांतपणे झोपतील तर ना. कुलदीप, अमेय आणि उमेश बाहेर पडले आणि ट्रायपॉड लावून चंद्राचे फोटो काढू लागले. ११ वाजले तरी ते काही झोपेना. शेवटी १२ च्या आसपास सर्वजण झोपी गेलो. उदया पहाटे ४ ला उठून ५ वाजता सोनमर्ग सोडायचे होते. ब्रिज सुरू झाला की त्यावरुन पहिल्या गाड्या आमच्या निघाल्या पाहिजे होत्या ना...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - 'द्रास'ला पोचता-पोचता ... !
.
.
.

15 comments:

  1. रोहन आजची पोस्ट चांगली झालिये. या अश्या अचानक येणारया अडचणी त्या त्या वेळी फार मन:स्ताप देतात. पण त्यामुळे वेळ कमी असल्याने तुम्ही जे पाहणार नव्हता ते पाहायला मिळाले.:)
    ऐश्वर्याला लवकर बरे वाटले ना?
    काश्मिरचा प्रश्न अजून किती काळ चिघळणार व अजून किती बळी घेणार आहे?:(

    ReplyDelete
  2. utsukta ajun vadhtie..everyday must be a thrilling experience itself
    gr8 yaar keep it up :)

    ReplyDelete
  3. होय पूनम ... प्रत्येक दिवस नवे अनुभव ... नवी अनुभूति ...आणि निसर्गाचे नवे खेळ बघायला मिळत होते... :)

    ReplyDelete
  4. खरे आहे ... अचानक येणारया अडचणी फार मन:स्ताप देतात. होय हे बाकी खरे आहे की आम्हाला बघायला मिळाले. धन्यवाद ... )

    ReplyDelete
  5. छान पोस्ट आहे. सगळ्या अडचणी मी आधीच माहीत करुन घेतोय... उपयोग होईल.

    ReplyDelete
  6. मस्त, मी सुध्दा उत्सुक आहे पुढे काय होते ते ऐकायला विशेषतः लेह-लडाख चे हवामानाबद्दल. तिकडे जायची भयंकर इच्छा आहे, परंतु तेथील कमी ऑक्सिजन आणि त्यायोगे होणारे त्रास ऐकुन आहे त्यामुळे अजुनतरी जाण्याचा योग आला नाहि.

    ReplyDelete
  7. होय पंकज ... माहीत नाही कदाचित तुझ्याबरोबर मी सुद्धा असेन पुन्हा एकदा लडाख मोहिमेला ... :D

    अनिकेत ... ६५ वर्षाची म्हातारी माणसे देखील तिकडे नीट जाउन येतात. काही त्रास होत नाही. तिकडच्या हवमानाबद्दल मी लेहला पोचलो (पोस्ट मध्ये) की लिहेनच. :)

    ReplyDelete
  8. हे खुपच छान लिहिलय... माझ्या पण मनात आहे एकदा तरी लेह लडाख बाइकवरुण करणारच...
    पण अजुन या बद्दल काहीच माहित नाहीये.. आणि शिवाय बाइक चालवता येत नाही.. [:(].. पण तिथे जाण्यासाठी का होइना मी बाइक शिकून घेइन.. [:)]
    तुम्हाला अनेक शुभेच्छा..!!!

    ReplyDelete
  9. वा किर्ती... नक्की जा. आयुष्यात हा अनुभव नक्की घ्यावा असाच आहे. आणि तू त्यासाठी बाइक सुद्धा शिकणार म्हणजे तुझा दृढ़निश्चय दिसतो आहेच की ... :)

    ReplyDelete
  10. भले शाब्बास! बहाद्दर! काय मस्त लिहिलय राव.... अगदी तुमच्या बरोबरच फिरतोय असं वाटतय.. पुढच्या भागाच्या अपेक्षेत.. ;)

    ReplyDelete
  11. होय रे भुंग्या ... हा बघ टाकतोच आहे लवकरच ... :)

    ReplyDelete
  12. सगळं व्यवस्थित document करुन ठेवणंही खूप महत्त्वाचं असतं आणि मला वाटतं Rohan did a fantastic job....

    ReplyDelete
  13. होत अपर्णा ... जरा कुठे वेळ मिळाला की मी आपला बसायचो नोट्स काढत ... अगदी रात्री सुद्धा झोपायच्या आधी एक रिविजन व्हायची ... :D

    ReplyDelete
  14. छान लिहिले आहे दादा तुज्या लिहिण्यात खुप जिवंत्पना आहे..... Sahi yaar आणि तुम्ही तरीही सगल्या अडचणी तुन चांगला मार्ग कधालत Gr88........

    ReplyDelete
  15. Snety ... अश्या अडचणी यायच्याच. त्या मोहिमेचाच एक भाग असतात असेच म्हणना.

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...