Wednesday 30 September 2009

लडाखचा सफरनामा - ११००० फुट उंचीच्या लेहच्या पठारावर ... !


फोटू-लाच्या १३४७९ फुट उंचीवरुन निघालो ते सुसाट वेगाने खाली उतरत अवघ्या ३० मिं. मध्ये 'लामायुरु गोम्पा'ला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पोचलो. आता उजव्या हाताचा रस्ता पुढे अजून खाली उतरत लामायुरु गोम्पाकडे जात होता. पण हा रस्ता खालच्या बाजूला पूर्ण झालेला नसल्याने अजून बंद करून ठेवला होता. डाव्या हाताचा रस्ता पुढे 'खालत्से'मार्गे लेहकडे जात होता. खालत्सेवरुन एक रस्ता पुन्हा लामायुरु गोम्पाकडे येतो असे कळले. पण त्या रस्त्याने फिरून लामायुरुला यायचे म्हणजे २२ कि.मी.चा फेरा होता. ते शक्य नव्हते कारण इथेच इतका उशीर झाला असता की रात्रीपर्यंत लेह गाठणे अशक्य झाले असते. दूसरा पर्याय होता बाइक्स रस्त्यावर ठेवून पायी खाली उतरायचे आणि वर चढून यायचे. त्याला किती वेळ लागु शकेल हे पाहण्यासाठी एका कच्च्या वाटेने मी आणि अभि थोड़े पुढे चालून गेलो. अवघे ५ मिं. सुद्धा चालले नसू पण अशी धाप लागली की काही विचारू नका. बाइकवर असेपर्यंत हे काही तितके लक्ष्यात आले नव्हते. जरा चाल पडल्यावर अंदाज आला की हवेतला प्राणवायु कमी झालेला आहे आणि आता प्रत्येक हालचाल जपून करायला हवी. ५ वाजता आम्ही निर्णय घेतला की लामायुरु बघण्यासाठी खाली न उतरता आपण पुढे सरकायचे. कारण उतरून पुन्हा वर येईपर्यंत सर्वांची हालत नक्की खराब झाली असती आणि त्यात बराच वेळ वाया गेला असता हे नक्की. त्या निर्णयावर बरेच जण नाराज झाले कारण लामायुरु ही लडाख भागातली सर्वात श्रीमंत गोम्पा असून बघण्यासारखी आहे. आम्ही नेमकी ती बघायची मिस करणार होतो. पण पर्याय नव्हता आमच्यापुढे. आम्हाला फक्त एका ठिकाणाचा विचार न करता पूर्ण ट्रिपचा विचार करणे भाग होते. ५ वाजता आम्ही सर्व खालत्सेमार्गे लेह कडे कुच झालो. आता ड्रायवरला आम्ही कुठेही न थांबता थेट लेहमध्ये रेनबो गेस्ट हाउसला पोच असे सांगितले.




लामायुरुला जाणारा तो नविनच बनवलेला मस्त रस्ता सोडून आम्ही पुन्हा कच्च्या रस्त्याला लागलो. ३-४ दिवसात अश्या रस्त्यांवरुन बाइक चालवून-चालवून आता बाइकमधून खड-खड-खड-खड असे आवाज येऊ लागले होते. फोटू-ला उतरताना पकडलेला ५०-६० चा स्पीड आता एकदम नामिके-ला इतका म्हणजे ३०-४० वर आला होता. ह्या रस्त्यावर सुद्धा सर्वत्र छोटी-छोटी खडी पसरली होती. नामिके-ला पेक्षा सुद्धा जास्त. त्यात एकदम शार्प वळण आले की आमचा स्पीड एकदम कमी होउन जायचा. एकदा-दोनदा माझ्या बाइकचे मागचे चाक थोडेसे सरकले सुद्धा. बाकी बायकर्स बरोबर सुद्धा हे झाले असावे. पण आम्ही सगळेच सावकाशीने उतरत होतो. मला लगेच आपल्या सह्याद्रीच्या घाटात लिहिलेले बोर्ड आठवले. 'अति घाई संकटात नेई'. म्हटले उशीर झाला तरी चालेल पण एवढा पॅच नीट पार करायचा. बऱ्यापैकी खाली उतरून आलो. दुरवर खाली आमची गाड़ी पुढे जाताना दिसत होती. इतक्यात २ जवान आमच्या समोर आले आणि त्यांनी आम्हाला 'थांबा' अशी खूण केली. "आगे सुरंगकाम शुरू है. थोडा रुकना पड़ेगा" हे असे इकडे अध्ये-मध्ये सुरूच असते. कुठे माती घसरून रस्ता बंद होतो. तर कधी B.R.O. रस्त्याच्या डागडूजीची कामे करत असते. २० मिं. तिकडे थांबून होतो. अभिजित तर चक्क रस्त्यावर आडवा होउन झोपला होता. सकाळी ८ वाजता खाल्लेल्या पराठ्यानंतर एक चहा सोडला तर कोणाच्या ही पोटात तसे काही गेले नव्हते. पाणी पिउन आणि सोबत असलेले ड्रायफ्रूट्स यावर आम्ही पुढे पुढे सरकत होतो. आता ६ वाजत आले होते आणि आम्हाला अंधार पडायच्या आत जास्तीतजास्त अंतर पार करायचे होते.




डोंगरांचे विविध प्रकार आज बघायला मिळत होते. कधी सपाट मातीचे तर कधी टोके काढल्यासारखे. कधी वाटायचे चोकलेट पसरवून टाकले आहे डोंगरांवर. हाहा... अखेर ६:१५ ला म्हणजेच बरोबर २ तासात फोटू-लाच्या १३४७९ फुट उंचीवरुन ९६०० फुट उंचीवर खालत्सेमध्ये उतरलो. बघतो तर काय एक छोटेसे होटेल दिसले. मी लागलीच 'दहिने मुड' केले आणि बाइक पार्क केली. त्याच्याकडे मस्त पैकी चपाती-भाजी, दाल-चावल, मॅगी, ऑमलेट असे बरेच काही खायला होते. तूटून पडलो सर्वजण. चांगले ४० मिं. जेवण सुरू होते. वेळ किती लागतोय ह्याची पर्वा कोणाला राहिली नव्हती. आता अंधारात तर अंधारात पण आज लेहला पोचायचे हे नक्की होते. साधनाला पुन्हा एक फोन केला तर ती फोटू-लाच्या आसपास आहे असे कळले. अजून सुद्धा ९० की.मी. अंतर पार करून जायचे होते. ७ वाजता तिकडून निघालो आणि खालत्से गावातून पुढे जाऊ लागलो. बघतो तर काय.. आमची गाडीसुद्धा गावातल्या एका होटेलमधून नुकतीच निघून पुढे चालली होती. आता कुठेही थांबणे नव्हते.  खालत्सेनंतर नुसरा - उलेटोप - मिन्नू - अलत्ची अशी एकामागुन एक गावे अंधारात पार करत आम्ही लेहकडे सरकत होतो. खालत्से पुढचा रस्ता एकदम चांगला होता. गाड़ी मागुन आता सर्वात पुढे कुलदीप होता. नामिके-ला आणि फोटू-ला चढताना मागे राहिली त्याची यामाहा आता कोणाला ऐकत नव्हती. मध्ये-मध्ये तर तो गाड़ीला सुद्धा मागे टाकत होता. मी बरोबर मध्ये होतो. माझ्या पुढे अमेय तर आदित्य - अभि मागे होते.





आजचा संपूर्ण वेळ सिंधूनदीचे पात्र आमच्या सोबत होते. रस्ता एका डोंगरावरुन आम्हाला दुसऱ्या डोंगरावर घेउन जायचा. २ डोंगर जोडायला BRO ने लोखंडी ब्रिज बांधले आहेत आणि त्यावर लाकडी फळ्या टाकल्या आहेत. त्यावरून कुठलीही गाडी गेली की ह्या फळ्या अश्या वाजतात की कोणाचे लक्ष्य नसेल तर तो खाडकन दचकेल. साधारण ९ च्या आसपास मिन्नूला पोचल्यावर अमेयच्या बाइकमधले पेट्रोल संपायला आले होते. अभिने त्याच्याकडे असलेले एक्स्ट्रा पेट्रोल त्याला दिले आणि तिकडूनच रेनबो गेस्ट हाउसला फोन करून आम्ही ११ पर्यंत पोचतोय हा निरोप दिला. इतका वेळ मी-शमिका मात्र ह्यांची वाट बघत अंधारात हळू-हळू पुढे सरकत होतो. त्या तिकडे दाट अंधारात थांबूही शकत नव्हतो. शेवटी एक गुरुद्वारा आला तिकडे थांबलो. कुलदीप गाडी बरोबर पुढे निघून गेला होता. मागुन सर्वजण आल्यावर आम्ही पुन्हा शेवटचे २५ की.मी चे अंतर तोडायला लागलो. अचानक काही वेळात सर्वांच्या बाइक्स स्लो झाल्या. कितीही रेस केल्या तरी स्पीड ३०च्या पुढे जाईनाच. चढ आहे म्हटले तर तितकाही नव्हता. नंतर लक्ष्यात आले... अरे आपण 'मॅगनेटिक हिल'च्या आसपास तर नाही ना... तो टप्पा पार झाल्यावर बाइक्स पुन्हा पळायला लागल्या आणि आम्ही अखेर 'सिंधू पॉइंट'ला पोचलो. १० वाजत आले होते त्यामुळे सिंधू नदीचे ते मनोहारी दृश्य काही दिसणार तर नव्हते पण इकडून लेह सिटीचा भाग सुरू होतो. ह्या पॉइंटला 'लडाख स्काउट्स' लडाखच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. १० मिं. मध्ये लेह विमानतळ पार करून लेहच्या मुख्य चौकात पोचलो. गाडी गेस्ट हाउसला पोचली होती. आमचे सर्व सामान उतरवुन अमेय म्हात्रे आम्हाला घ्यायला पुन्हा त्या चौकात आला होता. अखेर ११ वाजता सर्वजण 'रेनबो'ला पोचलो. इतकी रात्र झालेली असून सुद्धा 'नबी' आणि त्याची बायको आमची वाट बघत जागे होते. आल्यानंतर खरंतरं सर्व इतके दमले होते की कधी एकदा बिछान्यात अंग टाकतोय असे झाले होते. पण त्यांनी 'खाना खाए बगेर सोना नाही' अशी प्रेमाने तंबीच दिली. सर्वजण जेवलो आणि झोपायच्या आधी छोटीशी डे एंड मीटिंग घेतली. १२ वाजता साधना आणि उमेश सुद्धा येउन पोचले. अखेर ४ दिवसाच्या अथक प्रवासानंतर आणि अनेक अनुभव घेत जम्मू पासून ८२८ की.मी अंतर पार करत आम्ही त्या ११००० फुट उंचीच्या पठारावर विसावलो होतो. पुढचे ४ दिवस अजून अनेक असे अनुभव घेण्यासाठी...



जम्मू ते लेह ह्या पाहिल्या ४ दिवसांच्या सफरीचे फोटो येथे बघू शकता...
.
.
.
पुढील भाग : लडाखचा सफरनामा - लडाखचे अंतरंग ... !
.
.
.

11 comments:

  1. khoop chan :)
    khoop jast presence of mind lagat asel na, to deal with such unplanned situations and delays !

    ReplyDelete
  2. akheris mazya bike vishayi kahitari changla lihilas.....hahahaha

    ReplyDelete
  3. वाचतेय,वाचतेय,मस्त. बरेच अंतर कापलेत की अनपेक्षित अडचणी व निसर्गदर्शन करत. शिवाय भावनीक चढऊतार होतेच. फोटो सही आहेत.:)

    ReplyDelete
  4. होय पूनम .. अडचणी आल्या की आपण मात करायला शिकतोच नाही का... आणि ...

    कुलदीप .. जे जसे घडले ते लिहिले रे ... बाकी त्या दिवशी संध्याकाळ नंतर तू खरच सुटला होतास ... :)

    भानस ताई ... खरच फोटो मस्तच आले आहेत. मी स्वतः समाधानी आहे त्याबाबत... एका दिवसात द्रासच्या ९००० फुटवरुन फोटु-ला १३००० फुटवर आणि पुन्हा लेह ११००० फुट असा भन्नाट पल्ला एक दिवसात गाठला आम्ही ... मज्जा आली.

    ReplyDelete
  5. . रोहन,
    आम्ही एकदा कुलु हुन चंडिगढ ला निघतांना पण ९ तास लॅंड स्लाइडमुळे अडकलॊ होतो. पण वेळ मस्त गेला रस्त्यावर. बरेच लोकल लोकं आले होते पराठे आणि सब्जी, राजमा चावल विकायला. अक्षरशः रस्त्यावर जेवलॊ आम्ही. सौ. ला असं आवडत नाही, म्हणुन तिने जवळचा चिवडा लाडु खाउन दिवस काढला, पण मी आणि मुलिंनी मस्त एंजॉय केलं.
    अशा अडचणी पण एंजॉय केल्या जातात जर ग्रुप मधे असलो तर.. पोस्ट खुपच मस्त झालंय.

    ReplyDelete
  6. हो रे दादा ... असे काही झाले की आधी मुड जातो पण नंतर तो वेळ खरच धमाल करतो आपण. खास करून मस्त ग्रुप असेल तर. बाकी जेवायचे काय ... ते कधीही - कुठेही सांग .. हा हा .. आपण तयार :D

    ReplyDelete
  7. वाह! क्या बात है! सगळेच ब्लॉग पोस्ट उत्कृष्ठ आहेत. ह्याचा पुरावा म्हणून मी माझी बुडाशी अर्धवट जळालेली खुर्ची दाखवायला तयार आहे ;)

    ReplyDelete
  8. वाह रे वाह... अफलातुन प्रवासवर्णनं आहेत...

    ReplyDelete
  9. great great great fotos..... simply superb!!!

    ReplyDelete
  10. कमा कमाल कमाल लिहलं आहेस... तु ते ई-बुक मला ईमेल करु शकलास तर नक्की कर...
    compute.saurabh@gmail.com

    ReplyDelete
  11. मस्त!!
    आमची कॉलेजची स्टडी टूर गेली होती काश्मीरला. अर्थात अशी साहसपूर्ण नव्हती. आमची आपली स्केचबुक, रंग आणि पेन्सिल घेऊन! :)

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ... आपली प्रतिक्रिया लवकरच प्रकाशित केली जाइल ...